pune
pune sakal
सप्तरंग

स्वतःच्या गावातच प्रगतीचा मार्ग...

सकाळ डिजिटल टीम

ग्रामीण भागातील महिला त्यांच्या छोट्या कुटुंबाला आधार देण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. तसेच कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य आणि एकूणच जीवनमान सुधारण्यासाठी महिलांची भूमिका महत्वपूर्ण ठरते. ग्रामीण भागात महिलांना लघू व कुटीर उद्योग सुरु करताना बऱ्याच संकटाना सामोरे जावे लागते. सर्वप्रथम कुटुंबातून होणारा विरोध हा सर्वात मोठा अडथळा असतो.

शहरी भागातील महिलांप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांनी उद्योग - व्यवसाय करणे ही संकल्पना अजूनही फारशी कुटुंब व समाजमान्य नाही. पुरुष प्रधान कुटुंबपद्धतीत महिलांनी व्यवसाय करून कुटुंबाला मदत करणे हे त्या पुरुषाला कमीपणाचे वाटते. तसेच समाज काय म्हणेल? या भीतीबरोबरच खोट्या सामाजिक प्रतिष्ठेपायी महिला उद्योग व व्यवसायापासून वंचित राहतात.

ही समस्या लक्षात घेऊन, सोलापूर जिल्ह्यात महिला सशक्तीकरण या विषयावर काम करणाऱ्या ‘मित्र फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने ग्रामीण भागातील महिलांसाठी लघू व कुटीर उद्योग व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम राबविला. तसेच गावोगावी महिलांनी व्यवसाय प्रशिक्षण घेण्यास व व्यवसाय सुरु करण्यास कुटुंबाने व समाजाने प्रोत्साहन द्यावे यासाठी संस्थेमार्फ़त जनजागृतीचे, व्यक्तिगत व कौटुंबिक समुपदेशनाचे कार्यक्रम राबविले. महिलांना उद्योग - व्यवसायाची ओळख करून दिली तर महिला प्रशिक्षण घेण्यास तयार होतील या उद्देशाने संस्थेने सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी व करमाळा तालुक्यातील दहा गावांमध्ये महिलांचे ४६५ बचत गट तयार करून , एकूण सात हजार महिलांना विविध लघू - कुटीर उद्योग व्यवसायांचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणानंतर दोन हजार तीनशे पंधरा महिलांना स्वतःचा उद्योग व व्यवसाय सुरु करण्यासाठी नाबार्ड (ग्रामीण आणि कृषी विकासासाठी राष्ट्रीय बँक), व्हीकेजीबी (विदर्भ कोकण ग्रामीण बँक) आदी वित्तीय संस्थांमार्फत १४ कोटी रुपयांचे कर्जे वाटप केले.

चिखर्डे हे सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील बार्शी-उस्मानाबाद रोडवर वसलेले एक छोटेसे गाव. तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावर असणाऱ्या या गावाची एकुण लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३०८० एवढी आहे, तर घरांची एकुण संख्या ६१० आहे. स्त्रियांची संख्या एकुण लोकसंख्येच्या ४७.२ टक्के इतकी आहे तर गावाचे साक्षरतेचे प्रमाण ६९.५ टक्के इतके आहे. गावात दर वर्षी मार्च ते जून या कालावधीत पाण्याची अंशत: टंचाई असते. शिवारातील विहिरीद्वारे अथवा बाहेरून टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा करावा लागतो.दिलशाद मुख्तार सय्यद ही महिला आपल्या तीन मुलांसह चिखर्डे गावात राहते . घरची परिस्थिती तशी खूपच बेताची.

तिचा नवरा एका छोट्या चहाच्या कँटीनमध्ये काम करतो. तिच्या नवऱ्याच्या एकट्याच्या कमाईत रोजच्या गरजा भागविणे अवघड जात होते. त्यामुळे दिलशाद आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी दररोज दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरीला जात असे. कुटुंबाच्या दैनंदिन खर्चासहित मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा दिलशाद यांना भेडसावत होता. तिची मोठी मुलगी बारावीत असताना, ‘मित्र फाउंडेशन’ या संस्थेने चिखर्डे गावात सामाजिक काम सुरू केले होते. यापूर्वी संस्थेने गावाची प्राथमिक घेऊन गावातील उत्पन्नाची साधने, उद्योग-व्यवसायाची उपलब्धता, लोकांच्या गरजा, गावातील विकासाचे मुद्दे, इ. गोष्टींचा अभ्यास लोकसहभागातून व ग्राम मुल्यावलोकन (Participatory Rural Appraisal – PRA) या तंत्राद्वारे केला होता.

यानंतर याच गावातील एका महिलेची संस्थेने फिल्ड असोसिएट म्हणून निवड केली. त्यांच्या मदतीने संस्थेने गावात येडेश्वरी महिला बचत गटाची स्थापना केली. दिलशाद मुख्तार सय्यद यांना बचत गटाबद्दल माहिती मिळाली आणि लगेच त्यांनी येडेश्वरी बचत गटाचे सभासदत्व स्वीकारले. त्यानंतर त्यांना संस्थेने मिरची कांडप या लघू व्यवसायाचे प्रशिक्षण दिले. दिलशाद यांनी त्यांच्या मासिक उत्पन्नातून बचत गटात नियमित बचत केली. बचत गटातून त्यांना प्रथम तीस हजार रुपयांचे कर्ज मिळाले. त्यातून त्यांनी एक मिरची कांडप मशीन खरेदी केली. नवीन सुरू केलेल्या व्यवसायातून त्यांना हळूहळू बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागले. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. रोजच्या मोल मजुरीच्या कामातून त्यांना उसंत मिळू लागली आणि उद्योग व्यवसायाकडे त्यांचा कल वाढत गेला. गटातून घेतलेले कर्ज त्यांनी अवघ्या एका वर्षात फेडले. २०१८ साली जेव्हा नाबार्डच्या JLG योजनेबद्दल ऐकले, तेव्हा त्यांनी त्यातही भाग घेतला. ‘मित्र फाउंडेशन’ च्या मदतीने त्यांना JLG योजनेतून पन्नास हजार रुपयांचे कर्ज मिळाले. या कर्जाच्या पैशातून तिने बांगड्यांचा आणि पिठाच्या चक्कीचा नवा व्यवसाय सुरू केला. त्या आता तिन्ही व्यवसाय पूर्णवेळ स्वतः संभाळत असून , त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान व राहणीमान सुधारले आहे. तसेच त्यांना आपल्या मुलीचे पदवी पर्यंतचे शिक्षण सुद्धा पूर्ण करता आले.

दैवशाला विठ्ठल वाकडे ही पस्तीस वर्षीय महिला पती आणि तीन मुलांसह चिखर्डे गावात राहत असून, तिचा नवरा गावात पोस्ट ऑफिसमध्ये काम करतो. त्यांच्याकडे दोन एकर शेतजमीन आहे. परंतु शेतीचे कमी क्षेत्र आणि कमी पावसामुळे शेतीचे उत्पादन सुद्धा अत्यल्प होते. कुटुंबाच्या उपजीविकेचे मुख्य स्त्रोत फक्त तिच्या पतीने पोस्ट ऑफिसमधून मिळवलेले उत्पन्न होते. दैवशाला यांना गावातील "मित्र फाउंडेशन" संस्थेच्या महिला बचत गटाबद्दल माहिती मिळाली आणि लगेच त्यांनी येडेश्वरी बचत गटाचे सभासदत्व स्वीकारले. त्यानंतर त्यांना संस्थेने शिलाई व्यवसायाचे प्रशिक्षण दिले. सुरुवातीला त्या गावातील महिलांचे कपडे शिवू लागल्या , शिवणकामातून त्यांना उत्पन्नही मिळू लागले. काही दिवसांनी दैवशाला यांना संस्थेच्या माध्यमातून विदर्भ कोकण ग्रामीण बँक, बार्शी शाखेतून पन्नास हजार रुपयांचे कर्ज मिळाले. या कर्जातून त्यांनी स्वतःच्या घरी ‘सोनाली साडी सेंटर’ या नावाने पूर्ण तयार कपड्यांचे दुकान सुरू केले. गावातील लोक लग्न आणि विविध कार्यक्रमांसाठी तिच्या दुकानातून साड्या, कपडे आणि ड्रेस साहित्य खरेदी करू लागले. त्यामुळे दैवशाला यांचे मासिक उत्पन्न वाढून , जीवनमान व राहणीमानात बदल झाला.

महिला सक्षमीकरण बरोबरच इतरही सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात. यामध्ये पर्यावरण संवर्धन, व्यवसाय प्रशिक्षण, सेंद्रिय शेती, आर्थिक साक्षरता, जल संवर्धन, साक्षर भारत अभियान, ग्राहक साक्षरता इ. उपक्रम संस्था राबवत आहे. शेती क्षेत्रात रासायनिक खतांच्या वापरामुळे आरोग्यावर दूषित परिणाम होऊन , किशोरवयीन मुली , महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण वाढत आहे. चांगले आरोग्य राखण्यासाठी व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करून सेंद्रिय शेती करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांसाठी व इतर घटकांसाठी सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण कार्यक्रम , प्रशिक्षण साहित्य , बी - बियाणे वाटप , कृषी अवजारे व साधने वाटप , गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण इत्यादी घटकांवर होणारा खर्च जास्त आहे.

बार्शी , माढा , करमाळा परिसरातील ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांना व समाजातील इतर घटकांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्याकरीता तसेच व्यवसायभिमुक प्रशिक्षण उपक्रम राबविण्यासाठी संस्थेला निधीची आवश्यकता आहे. आणि हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी संस्थेला आपल्या सर्वांच्या सामूहिक मदतीची गरज आहे.

-अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप

-क्रमांक : ८६०५०१७३६६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT