Dipali-Ghadage
Dipali-Ghadage 
सप्तरंग

एक चळवळ ताईसाठी...

संदीप काळे sandip.kale@esakal.com

आमच्या ‘एसआयएलसी’च्या कार्यालयात ‘महान राष्ट्र नेटवर्क’ची बैठक होती. राज्यभरातून मोठमोठी मंडळी या बैठकीला आली होती. मस्टरमध्ये नोंदणी करताना व्यक्तिगत माहितीही लिहिली जात होती. त्यातल्या चार-पाच जणांचं वेगळेपण त्यांच्या कामामुळे उठून दिसत होतं. त्यांत दीपाली तुषार घाडगे यांचा समावेश होता. 

दीपाली यांनी ‘दीपज्योती फाउंडेशन’च्या माध्यमातून महिलांसाठी राज्यात मोठं काम उभं केलं आहे. ‘मोरया ट्रेनिंग सेंटर’च्या माध्यमातूनही त्यांनी राज्यातल्या असंख्य स्त्रियांना स्वावलंबी केलं आहे. एक महिला कोणतंही मूल्य न घेता एवढं मोठं काम हाती घेते हे नोंद घेण्यासारखं होतं. त्याच मीटिंगमध्ये दीपाली यांची भेट झाली. नंतर त्यांना भेटायचं ठरवलं. काही दिवसांनी पुण्याला आल्यावर सातारा रस्त्यावरच्या त्यांच्या कार्यालयात त्यांना भेटलो.

दीपाली घाडगे (७७२१८०६००३) यांचं शिक्षण बारावीपर्यंत झालं. गावात राहणं, कुटुंबाची काळजी घेणं याशिवायही काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना सतत वाटे. छोटे छोटे उद्योग सुरू कसे करायचे याचं प्रशिक्षण त्यांनी सुरुवातीला  घेतलं. एखादा उद्योग उभा करण्याऐवजी आपणच एखाद्याला चांगलं प्रशिक्षण देऊ शकतो असं प्रशिक्षणानंतर त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी मेणबत्त्या तयार करणं, मधुमक्षिकापालन, डेअरी अशा ४५ ते ५० प्रकारच्या कुटीरोद्योगांचं - महिलांना प्रशिक्षित करण्यासंदर्भातलं - प्रशिक्षण घेतलं.  सुरुवातीच्या काळात गावपातळीवर महिला मोफतदेखील शिकायला येत नसत. 

दीपाली यांचे सासरे नारायण घाडगे हे एकसर गावाचे सरपंच होते. त्यांंच्या संपर्कातून एकसर या गावासह आसपासच्या गावांत दीपाली यांनी प्रशिक्षण सुरू केलं. दीपाली यांचे यजमान तुषार हे वाईत बँकेत कामाला आहेत, त्यामुळे वाई आणि परिसर सोडून कसं जायचं हा प्रश्न दीपाली यांच्यासमोर होता. पुढं क्षितिज या त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्यांना पुण्यात यावं लागलं. पुण्यात आल्यावर भारती इंगवले, वंदना पवार, अपर्णा गाढवे, समृद्धी पोपकर अशा मैत्रिणी दीपाली यांना मिळाल्या आणि त्यातून त्यांच्या कामाचा आलेख वाढत गेला. 

या कामातून गेल्या चार वर्षांत गोव्यासह राज्यातल्या ३६ जिल्ह्यांत मोफत प्रशिक्षणकेंद्रं सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांची संख्या अडीच हजारांच्या घरात आहे. चार हजार महिला दीपाली यांच्या या प्रशिक्षण-चळवळीत प्रशिक्षक, मदतनीस म्हणून काम करत आहेत. आता ज्या चळवळीत एवढ्या महिला काम करत असतील तिथं किती महिला प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या असतील हे सांगण्याची आवश्यकता नाही. 

सहाशे बचतगट आज दीपाली यांच्या चळवळीनं राज्यभरात उभे केले आहेत. आपल्या देशात, राज्यात महिलांच्या प्रश्नांवर अनेक चळवळी झाल्या, खूप लढे झाले; पण महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत अशा चळवळी किती झाल्यात? दीपाली यांची ही महिलासक्षमीकरणाची चळवळ ‘मला काहीतरी करायचं आहे’ हे ध्येय बाळगून काम करणाऱ्या महिलांसाठी वरदान ठरली आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारनिवारणाबाबतही दीपाली आणि त्यांच्या टीमनं अनेक ठिकाणी पुढाकार घेतला आहे हे त्यांच्याशी झालेल्या संवादातून समजलं.          

माझ्या भेटीच्या दिवशी दोन महिलाही दीपाली यांना भेटायला आल्या होत्या. एक डोळे पुसत होती आणि दुसरीच्या हाती पुष्पगुच्छ होता. एकीचं नाव संगीता पाटील आणि दुसरीचं सुनीता महाजन. दीपाली यांनी मध्यस्थी केल्यानं 
संगीता यांचा संसार वाचला होता. सुनीता यांनी कुटीरोद्योगाच्या माध्यमातून जालना इथं चार उद्योग सुरू केले होते. तिथं तीनशे महिला काम करतात. दीपाली यांच्यामुळे हे काम सुरू झालं म्हणून आभार मानण्यासाठी सुनीता तिथं आल्या होत्या. दीपाली यांचं काम किती मोठं आहे हे संगीता आणि सुनीता यांच्याशी बोलल्यावर पुन्हा एकदा कळलं. 
दीपाली गेल्या आठ वर्षांपासून हे काम करतात.

दीपाली म्हणाल्या : ‘‘माझे यजमान तुषार यांची साथ-सोबत नसती तर कदाचीत मी राज्यभर एवढं मोठं काम उभं करू शकले नसते. महिलांना इच्छा असूनही पुरुषी मानसिकतेमुळे बाहेर काम करता येत नाही अस चित्र अनेक ठिकाणी दिसतं. मात्र, ‘तुम्ही पुरुषांपेक्षा कमी नाही’ हे मला महिलांना आवर्जून सांगायचं आहे.’’ 

मी दीपाली यांना विचारलं : ‘‘तुम्ही तर प्रशिक्षण देण्यासाठी पैसे घेत नाही, तर मग सारं चालतं कसं?’’ त्या म्हणाल्या : ‘‘शासन आणि खासगी स्तरावर आम्ही त्या त्या ठिकाणच्या लोकांची मदत घेतो. राज्यातल्या ग्रामपंचायतींनी आम्हाला खूप मदत केली आहे. ‘एक चळवळ ताईसाठी’ हा मूलमंत्र घेऊन प्रत्येक शहरातल्या आणि गावातल्या गरजू आणि इच्छा असणाऱ्या महिलांना आम्ही प्रशिक्षण देत आहोत. नवीन बचतगट स्थापन करत आहोत.’’

कुटुंबातल्या व्यक्तींबाबत सांगताना दीपाली म्हणाल्या : ‘‘ज्या सासऱ्यांनी या कामाची सुरुवात करून दिली ते आज नाहीत याचं दुःख होतं. माझ्या आई-वडिलांना (नर्मदा आणि दत्तात्रेय सणस) माझ्या कामाचा खूप अभिमान वाटतो. मुलगा क्षितिजच्या शिक्षणासाठी आम्ही पुण्यात आलो होतो, त्याचीही आता एनडीएमध्ये निवड झाली आहे.’’  

दीपाली यांचा निरोप घेऊन निघताना मनात विचार सुरू होता...कोणतीही महिला, ओळख, पैसा, शिक्षण यांशिवाय आपला वेगळा इतिहास निर्माण करू शकते...आपलं छोटंसं काम राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेऊ शकते, त्यासाठी लागते ती केवळ इच्छाशक्ती आणि सुयोग्य नियोजन. दीपाली यांनी ‘एक चळवळ ताईसाठी’ राज्यभरात नेली. 

अशा अनेक ‘दीपालीं’ची आज महिला सक्षमीकरणासाठी गरज आहे...

संदीप काळे यांची पुस्तके
‘भ्रमंती लाईव्ह’ या सदरातील निवडक लेखांचे ‘अश्रूंची फुले’ आणि माणूस‘की’ हे संग्रह अमेझॉनच्या माध्यमातून घरपोच मिळवण्यासाठी कृपया खालील क्यू आर कोड स्कॅन करावा.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT