सप्तरंग

सागर, संगीत आणि प्रेम...

बेलापूरहून त्या दिवशी मी मंदार फणसे यांना भेटायला ठाण्याला जायला निघालो. रेल्वेस्थानकात खूप गर्दी होती. गाडी आली आणि एकच पळापळ सुरू झाली.

संदीप काळे sandip.kale@esakal.com

बेलापूरहून त्या दिवशी मी मंदार फणसे यांना भेटायला ठाण्याला जायला निघालो. रेल्वेस्थानकात खूप गर्दी होती. गाडी आली आणि एकच पळापळ सुरू झाली.

बेलापूरहून त्या दिवशी मी मंदार फणसे यांना भेटायला ठाण्याला जायला निघालो. रेल्वेस्थानकात खूप गर्दी होती. गाडी आली आणि एकच पळापळ सुरू झाली. गाडी थांबताच मागची माणसं पुढच्या माणसांना रेल्वेच्या डब्यात अलगद नेऊन ठेवत होती. घाई-गर्दीत माझ्या जवळचा डबा पुढं कधी गेला समजलं नाही. मी अगदी डोळे बंद करून मागचा डबा पकडला. गाडीत चढलो. गाडीत गेल्यावर डोळे उघडून पुढं पाहिलं तर काय? त्या डब्यातले सगळेजण माझ्याकडं एखाद्या गुन्हेगाराकडं पाहावं तसं पाहत होते. आजूबाजूला पाहिल्यावर लक्षात आलं, आपण अपंगांच्या डब्यात आलो. एक व्यक्ती माझ्याकडं पाहत म्हणाली, ‘‘अरे चांगला धडधाकट आहेस ना? कळत नाही का तुला?

अपंगांच्या डब्यात आलास.’’ मी म्हणालो, ‘‘मला माफ करा काका, मी चुकून आलो." तसा डबा रिकामाच होता. माझा विचार होता पुढच्या स्टेशनला उतरावं. माझ्या बाजूला अंध असलेलं जोडपं बोलत बसलं होतं. त्यांचा आवाज स्पष्टपणे कानांवर पडत होता. दोघंही एकमेकांशी गोड बोलत होते. असं वाटत होतं, त्यांचं बोलणं सतत ऐकत राहावं. मी घाबरत-घाबरत त्या अंध व्यक्तीला म्हणालो, "दादा तुम्ही नवरा-बायको आहात काय?" ती अंध व्यक्ती एकदम सावध झाली. ती महिलाही एकदम स्तब्ध झाली. तो लगेच म्हणाला, "हो." त्यांनी लगेच मला विचारलं, "आपला परिचय?" मी माझा परिचय दिला. मी पुन्हा त्या व्यक्तीला म्हणालो, "अहो चुकीनं मी अपंगांच्या डब्यात चढलो." ती व्यक्ती हसत म्हणाली, "जागा असेल तर बसा. अहो, त्यात काय, जागा आहे ना?

ही लाल काठी हातात घ्या. म्हणजे हा डबा आपल्या मालकीचा आहे, असं समजणारे शांत बसतील." आम्ही तिघंही हसलो. आमच्या गप्पा सुरू झाल्या. पुन्हा मला ''या डब्यात का बसलास?'' असं कुणीही विचारलं नाही. बाकी काही नाही, त्या लाल रंगाच्या काठीचा महिमा. तो अंध बांधव आणि महिला दोघंही खूप हौशी वाटत होती. ती व्यक्ती मला सांगत होती, "माझा हा पत्रकार मित्र खूप ओळखीचा आहे, त्या पत्रकाराचं चर्चासत्र मी नेहमी ऐकतो." दोघंही शंभर टक्के अंध होते; पण उत्साह विचारू नका. ते काय करतात, कुठं राहतात, किती दिवसांपासून सोबत आहेत. इथपासून ते पुढं काय करणार आहेत इथपर्यंत त्यांनी सर्व मला सांगितलं. त्यांचा प्रवास आणि नातं मी जेव्हा त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं. ''तुम्ही लग्न करायचा निर्णय केव्हा घेतला?'' हा प्रश्न विचारल्यावर मात्र त्यांच्या उत्साही चेहऱ्यावर एकदम शोककळा पसरली. माझ्या लक्षात आलं, हे सांगत नाहीत म्हणजे यामागं काहीतरी कारण आहे. ते दोघंही शांतच होते.

मी ज्यांच्याशी बोलत होतो, त्यांचं नाव सागर आणि संगीत (दोघांची नावं बदललेली आहेत.) दोघंही नवी मुंबईतल्या दोन वेगवेगळ्या कार्यालयांत काम करतात. सागर वर्ध्याचे आणि संगीत जळगावच्या. या दोघांच्या लग्नाला पंधरा वर्षं झाली. या दोघांची रेल्वेमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. इथपर्यंतचा प्रवास त्यांनी मला सांगितला. पण मी जेव्हा त्यांना विचारलं, ''तुम्ही लग्न करायचा निर्णय केव्हा घेतला?'' त्यावर ते गप्प होते. गप्पांच्या ओघात ठाणे कधी आलं हे कळलं नाही मला. माझ्या हातातल्या काठीला सरळ करून मी सागरच्या हाती दिली. मी रेल्वेतून बाहेर पडलो. त्यांचा बराचसा प्रवास समजून घेण्याचं माझं तसंच राहून गेलं होतं. मी त्या दोघांनाही विचारलं, "तुमची काही हरकत नसेल, तर आपण चहा घेऊ शकतो का?" त्यांनी थोडासा विचार केला आणि पुन्हा होकार दिला. ठाणे स्टेशनमधल्या हॉटेलमध्ये आम्ही बसलो. सागर चहाचा घोट घेत-घेत गोड आवाजात म्हणाले, "हे बघा पत्रकार महाशय, संगीतच्या आयुष्यात खूप मोठा भूकंप झालाय, तो पुन्हा-पुन्हा डोळ्यांसमोर आला की आम्ही खचून जातो." मी पुन्हा विचारलं, "असं काय झालं होतं?" ते पुन्हा शांत झाले. संगीतच बोलायला लागल्या, तेव्हा सागर मध्येच म्हणाला, "नको ना सांगू, मला ते ऐकायचं नाही." त्या लगेच सागरला म्हणाल्या, "आपल्या मनातलं सांगितल्यावर मन हलकं होतं रे." असं म्हणत संगीत बोलायला लागल्या, "माझी आणि सागरची मैत्री नुकतीच फुलत होती. आम्ही दोघेजण एकाच ट्रेननं ये-जा करायचो.

दरम्यानच्या काळात सागर काही दिवस आजारी पडला. मी एकटीच ये-जा करायची. त्या दिवशी माझी नेहमीची ट्रेन चुकली. दुसरी ट्रेन उशिरा होती. त्या ट्रेननं मी निघाले. कोपरखैरणे स्टेशनवर माझ्या डोक्यावर काही तरी पडलं आणि मी बेशुद्ध झाले. त्यानंतर मला पाच दिवसांनी दवाखान्यात जाग आली. सागरसह माझ्या ऑफिसमधील मंडळी माझ्या अवतीभोवती होती. मी दवाखान्यात का आले, मला काय झालं, हे कुणीही सांगत नव्हतं." आता पुढं काय, आता पुढं काय? ऐकताना माझी उत्सुकता शिगेला पोचली होती. सागर म्हणाले, "जे घडू नये ते घडलं होतं. संगीतच्या अब्रूवर घाला पडला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस आरोपीपर्यंत अजून पोहोचतच आहेत. चार दिवसांनी संगीतला जाग आली." सागर हे सर्व सांगत असताना संगीत सागरच्या खांद्यावर डोकं ठेवून अश्रूंना वाट मोकळी करून देत होत्या. माझंही मन ते ऐकताना सुन्न झालं होतं.

संगीत पुन्हा मला सांगत होत्या. "मी पंधरा दिवस दवाखान्यात होते. ते पंधरा दिवस सागरनं माझी खूप सेवा केली. आता दोन-तीन दिवसांत सुटी मिळणारच तेव्हढ्यात डॉक्टरांनी अजून एक वाईट बातमी सांगितली." मी म्हणालो, "काय झालं?" संगीत सांगू शकत नव्हत्या. सागर म्हणाले, "या अपघातामुळं संगीतची कूस आता कधीही उजवणार नव्हती. ती कधीही आई होणार नव्हती." हे ऐकून मलाही धक्का बसला. आमच्या त्या प्रवासात दोघांनी मला अशा अनेक गोष्टी सांगितल्या, ज्यांतून धडधाकट, डोळस असलेली माणसं पशूसारखी वागत होती.

"हातातली नोकरी गेली, अब्रूच्या चिंध्या झाल्या, भविष्यात येणाऱ्या गर्भानं कायमचं तोंड वाकडं केलं. आता जगायचं कशासाठी?... विचार करून-करून मी वेडी होणार होते. कचऱ्याच्या डब्यात लहानपणी डोळे उघडले होते. आता नेमकेच पाय ठेवायला लागले, तेव्हा लगेच नियतीनं सर्व हिरावून घेतलं." संगीत एक एक प्रसंग मला सांगत होत्या आणि मी ऐकत होतो.

संगीत म्हणाल्या, "दवाखान्यात एके दिवशी सागर मला जेवायला घेऊन आला. सोबत मला आवडणारा गजराही त्यानं आणला होता. रोज तो मला हातानं भरवायचा. जेवण झाल्यावर तो म्हणाला, ''मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे.'' मी म्हणाले, ''बोल ना.'' तो म्हणाला, ''आपल्याला पुढच्या आठवड्यात लग्न करायचं आहे.'' मला त्याचे हे शब्द ऐकून एकदम रडू कोसळलं. काय बोलावं तेही सुचेना. सागर माझ्यावर प्रेम करतो हे मला माहिती होतं; पण हा सर्व प्रकार झाल्यावर तो मला पूर्णपणे स्वीकारेल याची ग्यारंटी मला नव्हती. कामोठेच्या डॉ. कांचन यांनी आमचा विवाह लावला. दोघांना नोकरीही लावून दिली. डॉ. कांचन पाटील वडगावकर (८४५२-८१७६३८) यांनी आम्हाला आयुष्यात आनंदी कसं राहायचं हे शिकवलं."

मी मध्येच सागर यांना विचारलं, ''तुम्हाला हे सर्व माहिती असताना तुम्ही संगीतला स्वीकारलं कसं काय?'' सागर म्हणाले, "माझा मोठा परिवार, मी अंध आहे म्हणून मला सोडलं. आई-वडील तर कधीच सोडून गेले होते. मला संगीतचा खूप आधार वाटायचा. मी तिच्यावर खूप प्रेम करत होतो. कामावरून घरी जाताना रेल्वेत तिचं एक गाणं ऐकलं की माझा थकवा दूर व्हायचा." सागर आपल्या भावना व्यक्त करीत होते. त्यांना अनेक वेळा भरून येत होतं. त्या हॉटेलमधला वेटर येऊन आम्हाला आता चला उठा म्हणत होता. मी चहाचं बिल देत होतो. "तुम्ही बहिणीकडं आलात, मी बिल देऊ देणार नाही." असं म्हणत संगीतने बिल दिलं. आता आम्ही एकमेकांचा निरोप घेणार होतो. मी सागरला मिठी मारली. त्यांच्या स्पर्शामध्ये कमालीची सकारात्मकता होती. मी निघणार तेवढ्यात संगीतने आपले डोळे पुसत मला मिठी मारली. कमी वेळात माझं आणि त्या दोघांशी नातं निर्माण झालं होतं.

मी एका दिशेनं निघालो आणि ते एका दिशेनं निघाले. माझा पाय त्या दोघांपासून दूर जायला तयार नव्हता. माणूस किती गरीब, किती श्रीमंत आहे; दिसायला कसा आहे, अपंग आहे की धडधाकट आहे, यापेक्षा त्यांनी इतरांसाठी काय योगदान दिलं हे महत्त्वाचं आहे. सागरचं योगदान तर सर्वार्थाने महत्त्वाचं होतं. तुम्ही अशा चांगल्या कामासाठी कधी योगदान दिलंय? देणार आहात? सांगा मला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT