Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray 
सप्तरंग

बाळासाहेबांनंतरची शिवसेना...

संजय मिस्कीन

राज्यात विरोधी पक्ष म्हणून २०१४ पर्यंत शिवसेनेचाच मान होता. भाजप हा शिवसेनेच्या मागे राहून राजकारण करणारा पक्ष अशी ओळख होती. शिवसेनेवर एकही शब्द बोलण्याची हिंमत भाजपचे नेते करत नव्हते. मुंडे, महाजन असताना युतीत कितीही वाद झाले, तरी ते विकोपाला जाऊ दिले जात नव्हते. बाळासाहेबांच्या इशाऱ्यावर भाजप नेते शांत राहत होते; पण २०१४ च्या अभूतपूर्व यशानंतर भाजपने शिवसेनेच्या वाघाला आव्हान दिले.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत स्वबळावरच लढण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. राज्यभरात दौरे काढले. भाजपला कोणत्याही परिस्थितीत युती हवी आहे, पण युती करणारच नाही, असे उद्धव यांनी ठणकावून सांगितले आहे. यामुळे शिवसेनेच्या समोर आगामी काळात अनेक राजकीय आव्हाने उभी राहण्याची भीतीदेखील आहे. स्वबळावर निवडणूक लढवताना शिवसेनेला भाजपच्या ‘साम-दाम-दंड’ नीतीचे पहिले मोठे आव्हान आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी युती करा नाही तर ‘पटक देंगे’ हा इशारा दिला आहे. त्यांच्या राजकारणाची पद्धत आक्रमक आहे. कोणत्याही विपरित परिस्थितीत ते डगमगत नाहीत.

प्रतिस्पर्ध्याच्या वर्मावर घाव घालण्यात ते माहीर आहेत. याशिवाय शिवसेनेच्या अनेक आमदार व विद्यमान खासदारांवर भाजप गळ टाकेल, असेही संकेत आहेत. त्यापासून शिवसेना अभेद्य ठेवणे हे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.
याशिवाय प्रचारतंत्राचा झंझावात निर्माण करण्यात भाजपचा हातखंडा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे जाळे स्थानिक पातळीवर त्यांच्या मदतीला आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे आव्हान आहे. अशा स्थितीत शिवसेनेकडे उद्धव ठाकरे हे एकमेव प्रचाराचे केंद्रस्थान आहे. २८८ विधानसभा व ४८ लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेच्या प्रचाराचा झंझावात निर्माण करण्याच्या मर्यादा आहेत. स्टार प्रचारकाची वानवा आहे.

मुंबई महापालिका हा शिवसेनेचा श्‍वास आहे, नाक आहे, अस्मिता आहे, अस्तित्वच आहे. या महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेसमोर कठोर आव्हान उभे केले. ज्या मुंबईत शिवसेनेच्या होर्डिंग्जवर भाजपच्या नेत्यांना कसेबसे स्थान दिले जात होते, त्या अख्ख्या मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘होय हा माझा शब्द आहे’ अशी भलीमोठी व मोक्‍याच्या ठिकाणी होर्डिंग्ज लागली. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वेळी ‘वाघाच्या जबड्यात घालूनी हात दात मोजणारी जात आमुची...!’ अशी डरकाळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या विरोधात फोडली.

मित्रत्वाच्या नात्यातील युती कट्टर दुश्‍मनीच्या धाग्यात गुंतत गेली. हे सगळं आव्हान शिवसैनिकांच्या सोबतीनं पेलण्याचं धाडस उद्धव ठाकरे यांनी दाखवलं. भाजपच्या आक्रमणकारी पवित्र्याला त्याच आक्रमकतेनं प्रत्युत्तर देण्यात उद्धव ठाकरे यांनी कसूर केली नाही. मुंबई व कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपने प्रचंड मोठी उसळी मारली, पण शिवसेना हरली नाही. भाजप वाढली तशी शिवसेनाही वाढली अन्‌ उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची कसोटी यशस्वी होत असल्याचे शिवसैनिकांना जाणवू लागले. भाजपच्या अत्यंत धसमुसळ्या राजकारणाला उद्धव ठाकरेंनीदेखील प्रतिआव्हान दिलं. राज्याची सर्व सत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती चालवताना शिवसेना मंत्र्यांना कुठेही स्थान मिळणार नाही याची काळजी घेतली. त्यातच उद्धव ठाकरे यांनी २७ जानेवारी २०१६ रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात यापुढील सर्व निवडणुका स्वबळावरच लढणार अशी गर्जना केली. ‘युतीचा कटोरा घेऊन कोणाच्याही दारात भीक मागायला जाणार नाही’ या गर्जनेनं उद्धव यांनी शिवसैनिकांमध्ये नवी चेतना जागी केली. एका बाजूला सर्वपक्षीय टीकेचे केंद्रस्थान शिवसेना होत असताना उद्धव यांनी मात्र मित्रपक्ष भाजपला लक्ष्य करण्यावरच भर दिला.

२०१४ ते २०१९ या पाच वर्षांत शिवसेनेत असलेली मरगळ उद्धव यांनी झटकून टाकली. शिवसेनेने युती केली तरी मोदी-शहा यांच्या नेतृत्वाचीच छाप राहील. शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व भाजपच्या वादळात झाकोळून जाणार नाही याची काळजी उद्धव ठाकरे यांनी घेतली. या पाच वर्षांत उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून संघटनेवर वचक राहिली. नव्या व युवा नेत्यांना जोडत उद्धव यांनी शिवसेनेची वाटचाल सुरू ठेवली आहे. भाजपच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेनेचा बाणा अबाधित असल्याची झलकदेखील त्यांनी दाखवल्याची भावना शिवसैनिकांत व राजकीय विश्‍लेषकांमध्ये आहे.

६३ विधानसभा मतदारसंघांत सध्या शिवसेनेचे आमदार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांत तब्बल ७१ मतदारसंघांत शिवसेना उमेदवार दुसऱ्या स्थानावर आहेत. सध्याचे मतदारसंघ व दुसऱ्या क्रमांकाचे मतदारसंघ यावर शिवसेनेने कितीही झोकून देऊन काम केले, तरी या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची ताकद एकत्र लढणार हे कडवे आव्हान असू शकते.

हिंदुत्वाची कसोटी
अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर ‘पहले मंदिर फिर सरकार’ हा शिवसेनेचा नारा आहे, पण भाजपचे हिंदुत्व व त्यांच्या पाठीशी असलेल्या हिंदुत्ववादी संस्था, संघटना अजूनही शिवसेनेच्या सोबत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या या अजेंड्यासोबतच राज्यातील दुष्काळी परिस्थिती व स्थानिक सरकारच्या उपाययोजना याची जबाबदारी शिवसेनेला झटकता येणार नाही. राज्य व केंद्राच्या सत्तेत असल्याने दुष्काळी जनतेची नाराजी सत्ताधारी म्हणून त्यांना झुगारता येणार नाही. केवळ सत्तेवर टीका करून उद्धव ठाकरे यांना प्रचाराची रणनीती किती यश देईल, याबाबत शंका आहे. त्यामुळे कट्टर हिंदुत्वाचा नारा हा भाजपसाठी आव्हान ठरणार असेल तर मतविभागणीचा फटका दोन्ही पक्षांना बसेल असे मानले जाते, पण भाजपला धडा शिकवण्याचा विडा उद्धव यांनी उचलण्याचे निश्‍चित केले, असे ठामपणे मानले तरी शिवसेनेचे स्वबळ आत्मघातकी ठरणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी उद्धव यांना सांभाळावी लागेल. भावनिक विषयांतच शिवसेना गुरफटणार असेल, तर नव्या युवा मतदारांना अशा भावनिक प्रश्‍नावर आपलेसे करणे ही कसोटी शिवसेना कशी पार करेल, याबाबत तर्कवितर्क आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT