Parenthood
Parenthood  sakal
सप्तरंग

निरोपापूर्वीचा महत्वाचा निरोप...

संजीव लाटकर

पालकत्व हे निसर्गानं दिलेलं वरदान आहे आणि त्यामुळेच त्याचा नैसर्गिक ढाचा हा कायम ठेवला पाहिजे.

पालकत्व हे निसर्गानं दिलेलं वरदान आहे आणि त्यामुळेच त्याचा नैसर्गिक ढाचा हा कायम ठेवला पाहिजे. त्यासाठी गेले ७५ आठवडे मी ‘सकाळ’ मुंबईच्या अवतरण पुरवणीत हे सदर नियमित लिहीत आहे. आता अमृतमहोत्सवाच्या क्षणी या लेखमालेचा निरोप घ्यायची वेळ आली आहे... प्रत्येक गोष्टीला जसा एक तार्किक शेवट असतो, तसा तो लिखाणालाही असतो. किंबहुना असावा...

पालक यात्रा या विषयाचे इतके असंख्य पैलू आहेत, की ते उलगडून सांगण्यामध्ये अख्खं आयुष्य निघून जाईल. मलाही पालकत्वाचे अनेक पैलू हे कधी कधी नव्याने उलगडतात, नव्याने समजतात. कारण पालकत्व हा एक प्रवास आहे, जो तुमचं आयुष्य व्यापून टाकतो. आयुष्य समृद्ध करतो. म्हणूनच पालकत्वाला पूर्णविराम नाही... ते अथांग आणि व्यापक आहे!

पालकत्व ही आपण आपल्या मुलांच्या सोबतीने सुरू केलेली एक आनंदयात्रा आहे. पालकत्व हे स्वतःसाठी की आपल्या मुलांसाठी, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं की पालकत्वाचा प्रवास हा सरळ, सुंदर आणि सोपा होऊन जातो.

पालकत्व ही एक जबाबदारी आहे, पालकत्व ही एक जोखीम आहे, पालकत्व म्हणजे शिस्तशीर आयुष्याचा आदर्श नमुना आहे, पालकत्व म्हणजे संस्कार आहेत, पालकत्व म्हणजे त्याग आहे, पालकत्व हे एक ओझं आहे... असे पालकत्वाचे अनेक विभिन्न दृष्टिकोन घेऊन पालक मुलांसोबत राहत असतात.

पालकागणिक पालकत्वाबद्दलचा दृष्टिकोन बदलत असतो. पालकांचं लहानपण कसं गेलं, पालकांच्या पालकांनी त्यांचं संगोपन कसं केलं, यावरही अनेकदा पालकत्व निश्चित होत असतं. तुमच्या पालकांनी केलेले संस्कार, तुमचं वाचन, तुमचं शिक्षण, तुमची पूर्ण झालेली आणि अपूर्ण राहिलेली स्वप्नं, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, तुमची संगत,

तुमच्या महत्त्वाकांक्षा, तुमच्यावरचे संस्कार, तुमची बालपणीच्या सर्व घटकांकडून झालेली जडणघडण, तुमचा मूळचा पिंड, तुमच्यातल्या जाणिवा, तुमच्यातली संवेदनशीलता, तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमचं व्यक्त होणं, तुमच्यातली समज, तुमचा स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास, तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुमची आदर्शाची कल्पना... यावर तुमचं पालकत्व कमी अधिक प्रमाणात ठरत असतं.

खूपदा आपल्या बालपणी घडलेले दुःखद आणि यातनादायी प्रसंग पालक विसरू शकत नाहीत. त्या प्रसंगाचं लोढणं ते आयुष्यभर वाहतात आणि त्याचा परिणाम मग साहजिकच त्यांच्या स्वतःच्या पालकत्वावरती होतो आणि फटका मात्र मुलांना बसतो!

म्हणून पालकत्वामध्ये आपण दुःखद आणि अप्रिय गोष्टी किती लवकर विसरतो, इतरांना आणि स्वतःला माफ करण्याचं औदार्य आपल्यात आहे का, यावरही पालकत्व अवलंबून असतं. आयुष्य म्हणजे सुखदुःखाची, प्रेम आणि द्वेष याची, चांगल्या आणि वाईट याची नेहमीच सरमिसळ असते; परंतु यात कशाची निवड करायची, हे ठरवण्यासाठी प्रत्येकाकडे नीरक्षीर विवेक हा लागतोच.

पालकांना तर तो विशेष करून बाळगावा लागतो. कारण ही सरमिसळ तुम्ही तुमच्या आयुष्याच्या मूल्यांमध्ये, विचारांमध्ये आणि भावनांमध्ये जशीच्या तशी आणली, तर त्याचे दुष्परिणाम हे पालकत्वावरती होतातच होतात!

पालकत्व हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. त्यावर आपलं स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं जीवनमान ठरत असतं. जीवनमूल्य आकार घेत असतात; परंतु अशा महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नाही, ही खेदाची गोष्ट आहे. पालकत्वाचा अभ्यासक्रम नाही. पालकत्वाचा कुठलाही कोर्स नाही.

शाळा नाही, कॉलेज नाही. एखादी व्यक्ती आई किंवा वडील झाली की ती नैसर्गिकरीत्या पालकही झाली असं आपण समजतो... पालकत्वाला सर्टिफिकेटही नाही. त्यामुळे खुपदा ज्याला जसं पाहिजे तसं त्याचं पालकत्व हे आकार घेत राहतं. म्हणूनच पालकत्व हे घरागणिक बदलतं.

खूपशा गोष्टी या घरागणिक बदलत राहिल्या, तरी पालकत्वाचा मूलभूत गाभा आणि पाया हा बदलू शकत नाही. या दोन्ही गोष्टी बदलता कामा नयेत, याची खबरदारी पालकांनी घ्यायला हवी...

आज पालकत्वासमोर अनेक आव्हानं उभी आहेत. बाहेर घडणाऱ्या प्रत्येक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक बदलांचे परिणाम किंवा दुष्परिणाम हे आज घराघरात शिरले आहेत. त्यामुळेच आपली घरं ही यातल्या धोक्यांपासून अलिप्त राहू शकत नाहीत.

साहजिकच कौटुंबिक उलथापालथीही मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. आपण ज्या वातावरणात वाढलो, ते वातावरण एकीकडे आणि आपण सध्या ज्या वातावरणात मुलांना वाढवतो आहोत, ते दुसरीकडे, यातली तफावत, किंबहुना प्रचंड मोठी दरी पाहिली की सामान्य पालकाचं डोकं चक्रावून जातं. ते स्वाभाविकही आहे...

नियतीने आपल्यापुढे काय बरंवाईट वाढून ठेवलंय याची जशी आपल्याला कल्पना नसते, तशीच विज्ञानाने, तांत्रिक बदलाने, नवनव्या शोधांनी, इंटरनेटसारख्या महाजालाने, मोबाईलसारख्या तंत्रज्ञानाने आपल्यापुढे अजून काय वाढून ठेवलं आहे, याची आपल्याला कल्पना नाही.

नाकासमोर चालून स्वतःचा प्रवास आजवर केलेल्या पालकांना खूप धास्ती वाटते आहे... कोरोनाच्या आघातानंतर परिस्थिती खूपच बदलली आहे किंबहुना गंभीर झाली आहे... या परिस्थितीने आमच्या मुलांपुढे खूप मोठे संकट निर्माण केले आहे, अशी अनेक पालकांची भावना असते..

पण संकट हे कधी एकटं येत नाही. ते संधीचा हात धरूनच चालत असतं, यावर आपली श्रद्धा असायला हवी. आजूबाजूच्या प्रतिकूल परिस्थितीतही आपण आपल्या मुलांचं उत्तम संगोपन करू शकतो, आपलं पालकत्व समृद्ध करू शकतो हा ध्यास आणि विश्वास आपल्या मनात असायलाच हवा. परिस्थितीशरण विचार डोक्यात आणता कामा नयेत.

थोडी वेगळी वाट चालायची तयारी हवी. चौकटीबाहेरचा विचार करण्याची क्षमता आपण आपल्यात विकसित करायला हवी. त्यासाठी वेळ आणि प्राधान्य द्यायला हवं. पालकत्व ही केवळ जबाबदारी नसून ती एक आनंद यात्रा आहे जी आपण आपल्यासाठी सुरू केली आहे आणि आपल्या मुलांना त्यात सहभागी करून घेतलं आहे, ही भावना खूप खोलवर रुजायला हवी.

पालकत्व हे उपकार नव्हेत. पालकत्व हे कोणी कोणावर केलेलं किंवा कोणी कोणाला दिलेलं ऋण नव्हे. आपलं आयुष्य परिपूर्ण व्हावं, समृद्ध व्हावं, आपल्या आनंदात, सुखात आपल्या हक्काची माणसं सोबत असावीत या निकोप सहजीवनाच्या दृष्टीने पालकत्वाकडे बघायला हवं आणि हेच पालकत्व जोपासायला हवं. आपण आपल्यासाठी पालक झालो आहोत, मुलांसाठी नव्हे; ही जाणीव सर्वप्रथम आपल्या मनात असायला हवी...

पालकत्व ही एक सर्जनशील अशी जीवनपद्धती आहे. प्रेम आणि क्षमाशीलता हा तिचा पाया आहे. संयम, चिकाटी आणि सातत्य हे तिचे महत्त्वाचे निकष आहेत. मुलांवर सतत रागावणं, ओरडणं, घरात चिडचिड करणं, त्यांना शिक्षा करणं हे खूप वरवरचे, उथळ आणि चटकन सुचणारे अत्यंत सवंग उपाय आहेत.

हे उपाय म्हणजे मुलांमधील नव्हे तर आपल्यातली कमतरता आहे. मुलांच्या मर्यादेसह त्यांचा स्वीकार करणे ही पालकत्वाची पहिली कसोटी आहे. मुलांना त्यांच्या मर्यादेपलीकडे जाऊन ताण देणं हे सुजाण पालकत्वात बसत नाही.

मुलांच्या संदर्भात पालकांच्या काही इच्छा असणं हे खूप नैसर्गिक आहे; पण या इच्छेचं रूपांतर अपेक्षांमध्ये झालं, तेही दृढ आग्रही अपेक्षांमध्ये झालं, तर पालकत्वाची सगळी चव ही कडवट होऊन जाते. तो कडवटपणा आपल्या पालकत्वात उतरतोच उतरतो. त्यामुळे आपल्या इच्छा आणि आपल्या अपेक्षा यांच्यातला फरक ओळखायला आपणच शिकलं पाहिजे..

पालकत्व हे निसर्गांनं दिलेलं वरदान आहे आणि त्यामुळेच त्याचा नैसर्गिक ढाचा हा कायम ठेवला पाहिजे. धोक्यापासून आपल्या अपत्याचा बचाव करणं, ते मोठे होईपर्यंत त्याचं उत्तम संगोपन करणं, त्यांच्या पंखात बळ देण्यासाठी प्रयत्न करणं हा निसर्ग नियम आहे.

त्यांनी अमुक एका उंचीवर उडावं, त्यांनी अमुक प्रदेशातच उंच भरारी घ्यावी, ही अपेक्षा अनैसर्गिक आहे. कुठे उडायचं, किती उंच उडायचं हे मुलं आणि त्यांची मानसिकता ठरवतीलच; पण ही मानसिकता तयार करण्याचे काम मात्र आपण करायचं आहे. म्हणूनच पालकत्व ही एक मानसिकता आहे...

असो. हा विषय अथांग आहे, हे मी आधी म्हटलं होतंच. पालकत्व या विषयावर अजून वेगळं काही करण्याची इच्छा आहे. त्यासाठी तूर्तास आपला निरोप घेतो. आपण सर्वांनी वेळोवेळी जो प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ‘सकाळ’ने या विषयाला सातत्याने प्राधान्य दिलं, याबद्दल ‘सकाळ’च्या संपादकांचे आणि संपादकीय वर्गाचे मनापासून आभार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT