Khandoba
Khandoba 
सप्तरंग

खंडोबाची यात्रा...

संतोष शेणई

मालवणी मुलखाला खंडोबाचे वेड नाही. आम्हासी तो प्रिय सातेरी- रवळोबा. खंडोबाच्या नामावलीत रवळोबा आहे. पण आमच्या रवळनाथाशी खंडेरायांचे नाते नाही. मालवणी मुलखात गावागावात रवळनाथ आहे. तो भैरवही आहे. पण खंडोबा वेगळा आणि आमचा रवळोबा वेगळा. मालवणी मुलखात खंडोबाचे स्थान नाही. पार रायगड जिल्ह्यात माणगावजवळच्या तिळोरे येथील डोंगरावर खंडोबाचे स्थान आहे, तर गोमंतभूमीतील म्हाडदोळ येथे म्हाळसेचे मंदिर आहे. कोकण भूमीशी खंडोबा- म्हाळसेचा संबंध इतकाच. मालवणी मुलखातले भक्त वाडी नरसोबाच्या दर्शनाला आवर्जून जातात. वाटेत कोल्हापूरला महालक्ष्मीचे आणि वाडी रत्नागिरीला जोतिबाचे दर्शन घेतात. पंढरीच्या विठोबालाही आवर्जून जातात. पण खंडोबाचे दर्शन घ्यायला जेजुरीला गेले असे सहसा घडत नाही. मात्र दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वी मालवणी मुलूखवासी जेजुरीला खंडोबाची यात्रा करीत असावेत, असे दिसते. कोल्हापूरची महालक्ष्मी, वाडी रत्नागिरीचा जोतिबा, वाडीचा नरसोबा, जेजुरीचा खंडोबा, मोरगावचा मयुरेश्वर, शिखर शिंगणापूरचा महादेव आणि पंढरपूरचा विठोबा असा या तीर्थयात्रेचा मार्ग असावा. दोन मालवणी लोकगीतेच पुरावा देतात. ही दोन्ही लोकगीते तीर्थयात्रेच्या प्रवासाचे वर्णन करणारी आहेत. मराठीतील लिखित प्रवासवर्णनांच्या आधीची ही लोकगीतातील प्रवासवर्णने आहेत, असे म्हणता येईल.     

आंब्याक इलो म्होउर, रावे जनू फणसार

गाडी चालयती धनी देवाच्या वाटेर

पंडुच्या गो पाथरीर नाल वाढयलो

डिरकी मारून बाळो- लालो गो निगालो

अवगड घाट वाट चडणीची

लाल्या-बाळ्याच्या पायाबुडी गादी पातेऱ्याची

जंगलाचे वाटेर धोतरो फुललो

कुकू-हळदीचो जनू सडो गो सांडलो

मुऱ्याचो गो म्हाल डोंगराचे डोयी

सूर्यदेवाच्या पालकीचे निजले भोयी

अंबेच्या खळ्यात पिवळ्या नरसाळ्याची येल

पोसुली आसतली फाटची सोनयाळ

हा एका लोकगीताचा पूर्वार्ध आहे. घरधन्यासंगे तीर्थयात्रेला निघालेली ती स्त्री-लोकगीतकार आपल्यालाही प्रवास घडवू लागते. प्रवासाच्या सुरूवातीलाच ती निसर्गवर्णनांत रमलेली आहे. पण त्यावरूनच हा प्रवास साधारण मार्गशीर्षात झाला असावा, असा अंदाज करता येतो. 

कार्तिक सरत जातानाच धुक्‍याचा झिरमिरीत पडदा पसरत जातो. साऱ्या सृष्टीवर धुक्‍याचीच मोहिनी असते. मार्गशीर्षात तर धुक्याचा महाल उभा राहतो. घाट चढून आल्यावर ती प्रवासिनी पाहते तर काय, `मुऱ्याचो गो म्हाल डोंगराचे डोयी` . `मुरं` म्हणजे धुकं. तेलुगुमधेही धुक्याला `मुरं`च म्हणतात, बरं का! तर, मला लोकगीतातली ही ओळ पुन्हा वाचताना खूप गंमत वाटली. दोन-अडीचशे वर्षांपूर्वीच्या या लोकगीतात `मुऱ्याचो म्हाल` ही कल्पना येते आणि साठोत्तरी आधुनिक कवितेतही ही कल्पना येते. `तुझी पावले गे धुक्याच्या महालांत` असं ग्रेस लिहून गेलेत. आता प्रवासालाच निघालो आहोत, तर जरा आसपासही हिंडून घ्यावं. दत्तो वामन पोतदारांना हे `मुरं` चकवा देऊन गेलं आहे. प्रतापगडाच्या पलीकडे `मुऱ्याचा डोंगर` आहे. जावळीच्या मोऱ्यांचा हा प्रदेश. या भागात मोरही अधिक. म्हणून पोतदारांनी अनुमान काढले की, हा `मुऱ्याचा डोंगर` मुळचा `मोऱ्यांचा किंवा मोरांचा डोंगर` असावा. हा साराच प्रदेश मोऱ्यांचा आणि मोरांचा आहे, मग या एकाच डोंगराला `मुऱ्याचा डोंगर` का म्हणत असावेत, अशी शंका पोतदारांच्या मनात आली नाही. हा डोंगर कोकणाच्या सीमेवर आहे आणि हिवाळ्यात सतत धुक्यात असतो. म्हणून तो `मुऱ्याचा डोंगर` असं मला वाटतं. तर हा धुक्याचा महाल कुणाला बरे आवडणार नाही?

ही प्रवासिनी पहिल्या ओळीतच सांगते, `आंब्याक इलो म्होउर, रावे जनू फणसार`. कुणगे आता मोकळे झाले होते. घराभोवतीची आंबा-फणसाची झाडं तजेलदार दिसत होती. गारफांवर किरमिजी, अंजिरी, पांढऱ्या, तांबूस रंगाचा मोहोर येऊ घातला होता. मोहोराला पूर्ण फुलण्यासाठी डहाळ्यांच्या टोकाची तांबूस कोवळी पानं खाली झुकली होती. त्यांच्यामधून ताठ उभे असलेल्या मोहारांचे गुच्छ मोहक दिसत होते. छोट्या कीटकांना मोहात पाडत होते. मोहोरातील फुलांचा मादक गंध सर्वत्र भरून राहिला होता. फणसाच्या झाडांवर कोवळ्या पोपटी पानांचे झुबके दिसू लागले होते. पोपटांची पिल्लं फणसावर उतरली आहेत, असा भास होत होता. एकीकडे काळोख उतरू लागला की त्याचा हात धरून धुकंही उतरू लागतं. काळोखाच्या पोकळीत हळूहळू धुकं मिसळत जातं. आता रात्र अजूनच दाटून आल्यागत होते. दऱ्याखोऱ्यांत तर धुरकट, पांढरट, भुरकं धुकं ढगांचा झगा घालून बसतं. हवेच्या अस्तराला गारठा चिकटतो. हा गारठा गात्रांना गारठवणारा! सकाळी धुक्याची ओढणी दूर करीत किरणं मातीला बिलगू लागतात, तेव्हा गोंधळलेलं धुकं पानांवर थबकतं. आता त्याचे दवबिंदू होतात आणि कोवळ्या उन्हात स्फटिकमणी चमकू लागतात. या टपोर दवगोलात इंद्रधनुचे रंग पेरलेले असतात. हवेला ओलाव्याचा गिलावा चढतो अन् उत्साहाचा गंध पसरतो.

तीर्थयात्रेला निघताना प्रवासिनीला दारातल्या आंब्या-फणसांची आठवण येते, पण लगेच ती पुढे जाते. प्रवासाच्या सुरूवातीलाच `चाळ्या`ला चुचकारून आपली राखण करायला त्याला यायला सांगणं ही रीती आहे. `पंडुच्या पाथरीर नाल` वाढवण्याची रीत घरधनी पूर्ण करतात. ही `पंडुची पाथर` कुडाळ-सावंतवाडी रस्त्यावर झाराप या गावी आहे. `पाथरीचं देवस्थान` किंवा श्रीदेव चाळोबा म्हणूनही हे स्थान ओळखलं जातं. सुमारे बासष्ट फूट उंच आणि दोनशे सात फूट लांबीच्या पाथरीवर एकशे पस्तीस फूट लांब व छत्तीस फूट उंच दुसरी पाथर आहे. या स्थानाभोवती झाडी आहे. जमिनीलगत एक लहानशी घुमटी व पाण्याचं कुंड आहे. चाळोबाशेजारच्या कुंभारवाड्यातील मातीची भांडी वसई-मुंबईपर्यंत बैलगाडी भरून जात असत. चाळेगतीला थोपवणारा तो चाळा. गावावर विनाशक शक्तीचा घाला पडू नये म्हणून सावध असणारा तो चाळा. चाळा म्हणजे चालक. मालक वेगळा. त्याचा सेवक म्हणून व्यवस्थापनाचं काम पाहणारा तो चाळा. पाट-परुळ्याच्या सामंतांचा कुडाळ प्रांतावर अंमल होता. अगदी सहाव्या शतकातील चालुक्यांच्या सत्तेपासून. पाटातील श्रीचामुंडेश्वरीचा चाळा हा देवीचा सेवक आहे. पाटातील सामंत कुडाळ प्रांताचे सत्ताधीश झाले आणि झारापीचा चाळोबा सामंतांच्या अमलाखालील प्रांताचा दैवत झाला. सावंतवाडीचे खेमसावंतही पाथरीच्या देवस्थानाला भजत असत. साहजिकच तेथे नारळ वाढवून प्रवासाला निघायची प्रथा प्रजेत त्याकाळी स्थिरावली असावी. 

दीर्घ प्रवासाला निघायचे हे जाणून गाडीच्या दोन्ही बैलांनी डिरकी मारली म्हणजे गर्जनेसारखा आवाज काढला आणि ते निघाले. पूर्वी वेंगुर्ला- कोल्हापूर प्रवासासाठी बहुदा रांगणागडाजवळचा हणमंतघाट वापरला जात असे. मात्र कोणत्या घाटातून प्रवास झाला याचा उल्लेख दोन्ही गीतात नाही.  

बैलांच्या पायातळी पातेऱ्याची गादी असल्याच्या उल्लेखाने जंगलात पानगळ सुरू झाल्याचं लक्षात येतं. या पानगळ झालेल्या सृष्टीतही एक प्रकारचं चैतन्य जाणवतं. हवेतली चैतन्याची ओल झाडे साठवून ठेवतात. या ओलीतूनच पुढे चैत्रात पुन्हा पालवी फुटणार असते. नव्यांना जागा द्यायची तर जुन्यांना बाजूला व्हावं लागतं. हिरवी पाने पिवळी पडली. अजिबात सळसळ न करता झाडांचा हात सोडून वाऱ्यावर गिरकी घेत पिवळी पाने भुईवर उतरली. पायातळी गादी अंथरल्यागत पसरली. मातीत मिसळली. खरं तर कार्तिकातच एकेक पान गळावया लागलेलं होतं आणि आता मार्गशीर्षात नुसती पानगळ. 

जंगल शुष्क-कोरडे होत जातानाही निसर्ग फुलायचाच थांबला, असे काही झाले नाही. पिवळा धोतरा फुलला होता. धोतऱ्याच्या खोडावर आणि पानांवर काटेच फार. सगळ्यांपासून फटकून वागणाऱ्या, जवळ येऊ पाहणाऱ्याला काटे दाखवणाऱ्या धोतऱ्यापाशी कुणीच फिरकत नव्हतं. धोतऱ्याचं फूल म्हणजे सोन्याचं नाजूक तबकच. त्या तबकातील पिवळे पुंकेसर म्हणजे हळदीचा करंडाच आणि स्त्रीकेसरातल्या तांबडकळा म्हणजे तांबड्या कुंकवाची नाजूक डबी. वाटेवरच्या झाडांना बिलगून बोणवरीचा वेल वाढलेला असेल. कारण हृदयाकृती पानं असलेल्या बोणवरीच्या वेलीला नरसाळ्यासारखी फूल येतात. पिवळ्या-बदामी रंगांची. फुलांच्या पाचही पाकळ्या एकमेकांना अगदी चिकटून असतात. एखाद्या तबकासारखं हे फूल भासतं. प्रत्येक पाकळीवर एक लांबट गडद पिवळा शंकू. पाचही पाकळ्यांच्या शंकूची रचना शिस्तबद्ध असते. त्यामुळे तबकात चांदणी चमकत असल्याचा भास होतो. निसर्गातली ही पिवळी माया पाहतांना त्या प्रवासिनीला आठवते ती आपल्या परसातली प्रसववेळ झालेली सोनयाळ केळ. निसर्गातल्या या खुणा मार्गशीर्षातल्या आहेत. दुसऱ्या प्रवासगीतात येणारा उल्लेख पाहा, 

फाटफटी पडला हीव बैल चालले लयीत

शुकराची गे चान्नी पूरयेच्या आकाशात

ही खूणही मार्गशीर्षाशी जुळणारी. मार्गशीर्ष चंपाषष्ठीला खंडेरायांनी मणि-मल्ल राक्षसांचा वध केला. त्यानिमित्तानं जेजुरीला मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी हा प्रवास झाला का, याचं उत्तर दोन्ही प्रवासिनी देत नाहीत. कोणत्याही उत्सवाचा उल्लेख दोन्ही प्रवासिनी करीत नाहीत. म्हणजे केवळ देवदर्शन एवढाच उद्देश असावा. दोन्ही प्रवासात महालक्ष्मी, जोतिबा आणि वाडीतल्या नरसोबांचे दर्शन घेतले गेले. तरीही जेजुरीच्या खंडेरायाचा आणि पंढरीच्या विठूरायाचा विशेष उल्लेख दोन्ही गीतांमध्ये आहे. त्यामुळे खंडोबाची आणि विठोबाची यात्रा हाच मूळ उद्देश असावा, असं नक्कीच वाटतं. पहिल्या लोकगीताचा उत्तरार्ध पाहा ना - 

जोती, नरसोबा, पालीपेंबूरासी गेलव

हराकला मन तीरथा सारी चोखटीव

सोन्याचो गो देव सोन्याच्या डुंगली

येक बायल रुसली, दुसरी खालती रवली

म्हाळसा फाटी घोड्यावरी तेचो बगा गे तऊर

बानू बिचारी पायाशी जरी आसली चउर

कोट राणीन बांदलो देवाच्या म्हालाशी

बसइले गो जराल कोटाच्या दाराशी

देव इले घोड्यावरी, दरबारी बसले

देव दयाळू सांगती, माका दुरळ गमले

कुकू लायलं देईचं, खंडेरायाची हळद

साता जलमाचा देना दे बा भरतय मळद

मोरगाव आणि शिखर, मगे पंढरपूर

भागेच्या वाळवंटी इलो भगतांचो होऊर

इटेवरी उबो येड लायी देव योगी

बाई रकमाई उबी एकली गो उगी

रकमाईच्या परास मिया गो भाग्यवान

माजे धनी करयती देवाचा दर्सान

साताऱ्याजवळच्या पालीपेंबर येथे म्हाळसा आणि खंडोबा यांचा विवाह झाला, `उधळे भंडार। पाली पेंबरात। मल्हारीसी नित्य। हळदी लागे` अशी लोकसमजूत आहे. तारळी नदीमुळे या गावाचे दोन भाग झाले आहेत. नदीच्या एका अंगाला पाली आणि दुसऱ्या अंगाला प्रेमपूर म्हणजे पेंबर. या पेंबरमध्येच खंडोबाचं ठाणं आहे. पालीपेंबर अशा जोडनावानं हे गाव ओळखलं जातं. खंडेरायांच्या ठाण्यात जाऊनही तिथं प्रवासिनी रमत नाही,  तिला ओढ जेजुरीचीच आहे. जेजुरीगडाचा उल्लेख ती `सोन्याची डुंगली` असा करते. `डुंगली` म्हणजे छोटा डोंगर. बाणाईशी विवाह करून खंडेराय परतले, तेव्हा म्हाळसा रुसली. खंडेरायांनी रुसलेल्या म्हाळसेला वरचा अर्धा डोंगर दिला, तर बाणाईला खालचा अर्धा डोंगर देऊन पायापाशी स्थान दिलं. खंडेराय घोड्यावरून निघतात, तेव्हा म्हाळसा त्यांच्या मागे घोड्यावर असते अशी लोकश्रद्धा आहे. मल्हारी मार्तंडांची ती शक्ती आहे. इथल्या `तऊर` व `चउर` या शब्दांची गंमत वाटली. `तऊर` हा फार्सी शब्द आहे. `तोरा` असा त्याचा अर्थ, तर ज्ञानेश्वरकालीन `चउर` म्हणजे `चतुर`. `नेणा आणि चउरा` (१५.३८७) असा `ज्ञानेश्वरी`च्या राजवाडे प्रतीमधे हा शब्द सापडतो. मालवणी भाषेने ज्ञानेश्वरकालीन अनेक शब्द जपले आहेत. पण प्रवासिनी यमक साधण्यासाठी एक ज्ञानेश्वरकालीन आणि दुसरा फार्सीतून आलेला शब्द वापरते, त्याची गंमत वाटते. त्यानंतर लगेच ती `जराल` हा पोर्तुगीज शब्द वापरते. `जराल` म्हणजे फिरंगी सैनिक. पोर्तुगीज गोव्याला साधारण १५१०च्या अखेरीस आले. गोमंतभूमी आणि मालवणी मुलुख यांचा जवळचा संबंध राहिला आहे. पोर्तुगीजांच्या छळानंतर गोव्यातील अनेक सारस्वत कुटुंबं मालवणी मुलुखात आली. त्यांचे देव गोव्यात. तसंच नंतरच्या काळात लग्नसंबंधही राहिले. त्यातून काही पोर्तुगीज शब्द मालवणीत आले असावेत. आता अनेक शब्द विस्मृतीत गेले आहेत. `जराल` हा शब्दही आता केवळ या लोकगीतातच उरला आहे. `दुरळ` हा शब्दही फार अपवादाने आता वापरला जातो. आजी आणि तिच्या बरोबरच्या बायका हा शब्द सहज वापरायच्या. `दुरळ` म्हणजे खडतर किंवा उग्र. श्रीधरपंतांनी `हरीविजय`मधे खंडोबासाठीच हा शब्द वापरला आहे. `खंडेराव दैवत दुरळ। प्रचीत दाविली तत्काळ` (९.२००)

खंडोबा हा रक्षक देव आहे. अनेकांचे कुलदैवत आहे. ही प्रवासिनी आपल्या सौभाग्यरक्षणासाठी महालक्ष्मीबरोबरच खंडोबाची प्रार्थना करते आहे. सौभाग्याची खूण म्हणून हळद-कुंकू लावलं जातं. कोल्हापूरहून महालक्ष्मीचं कुंकू आणून ते रोज लावण्याची, `कुकू लायलं देईचं`, अशी एक श्रद्धा बाळगली जाते; त्याचवेळी  `खंडेरायाची हळद` लावण्याचं समाधानही सांभाळलं जात आहे. `साता जलमाचा देना दे बा भरतय मळद` या पंक्तीतील `बा` हे अक्षर मला सतावत आहे. हे चालपूरक अक्षर असेल की `बाणाई`साठी योजले असेल?  मालवणी लोकगीतात चालपूरक अक्षर म्हणून `गो` हे अक्षर योजले जाते. याही गीतात अन्यत्र `गो` हे अक्षरच योजले आहे. म्हणून येथे `बा` हे अक्षर `बाणाई`साठीच योजले आहे नक्की.

पंढरीरायाच्या वर्णनातील `देव योगी` हा उल्लेख मला महत्त्वाचा वाटतो. मूर्तींचा विचार करता `योगी`, `भोगी` आणि `वीर` असे तीन प्रकार असतात. श्रीबालाजीची मूर्ती `भोगी` प्रकारातील आहे, तर खंडोबा, जोतिबा, रवळनाथ या भैरवमूर्ती `वीर` प्रकारातील आहेत. श्रीविठ्ठल समचरणी आहे. त्याचे कटेवरी हात आहेत. मस्तक स्थिर आहे. समत्वभावातील श्रीविठ्ठलांची मूर्ती `योगी` प्रकारातील आहे. संत ज्ञानेश्वरांनी `योगियांचा राणा` असे श्रीविठ्ठलाला पुकारले आहे, तर संत चोखोबांनी `देखिला देखिला योगियांचा योगी` असे म्हटले आहे. विठूरायांचे हे `योगी` रुप लोकगीतांतून आळवलेले मला आढळले नव्हते, ते येथे आढळते.

या प्रवासगीताच्या आधीच्या काळात आणखी एक प्रवासगीत कुणा प्रवासिनीनं रचलेलं आढळतं. ही प्रवासिनी निसर्गवर्णन करत बसत नाही. ती प्रवासातील अवस्था वर्णन करते. 

बैल निवांत गो जाले गाडी इली घाटावरी

रंकाळ्याचे पिले पाणी गाठी वाडी रत्नागिरी

तेल-खोबऱ्याची वाटी देव जोतिबाचे साठी

खणानारळाची बाये भरू अंबेची गो वटी

बैल निवांत चालले घुंगराच्या तालावर

वाडीक नरसोबाच्या बसले घटकाभर

फाटफटी पडला हीव बैल चालले लयीत

शुकराची गे चान्नी पूरयेच्या आकाशात

उगावले नारायण गड माखलो सोन्यानं

पिवळ्या कळसावर पिवळा निशान

नावान देवाच्या राजान बांदला तळा

भायासाठी जालो देव हळदीचो तांदळा

भायासाठी इले देव सोडून पेंबर

मानला गो गावान रावाच्या समूर

बानूच्या पोरसातलो घेतलो गो ठांब

म्हाळसेला इनयती भोळे देव सांब

मोराच्या केक्याला मोरगाव गाठला

देवाचा दर्सन घेता जीव सुखावला

बैल चालले हळूहळू गाठला शिंगणापूर

पार आभाळा टेकला म्हादेवाचा शिखर

बैल थकले चालून वाळवंटी इसावले

बनात जावोनी मिया पदुबाईस भेटले

पदु बनात एकली, म्हाली रक्माई एकली

संसार संसार जपत बाई संसारी एकली

भागेमदी न्हाले देवा पाह्यले डोळाभर

सरासरा बैल निगाले कोकणाच्या वढीवर

प्रवासाचा मार्ग दोन्ही गीतांमध्ये सारखाच आहे. दोन्ही प्रवास कार्तिक-मार्गशीर्षातच झाले असावेत हेही आपण पाहिले. या दुसऱ्या गीतात प्रवासाची गती नकळत सांगितली आहे. कोकणातून घाट चढून येणं हे बैलांची दमछाक करणारं आहे. कोल्हापूरच्या हद्दीत येताच बैल निवांत झाले. रंकाळ्याचे पाणी पिऊन ताजेतवाने झाले. नरसोबाच्या वाडीला जाताना कोकणासारखी वळणे नाहीत की, सततचा चढउतार नाही. त्यामुळे या रस्त्यावर बैल निवांत व एका लयीत चालले आहेत. अर्थात हे जेजुरी गाठेपर्यंत. नंतर शिंगणापूर गाठतांना बैलांची चाल मंदावली आहे आणि पंढरपूरला जाईतोवर ते पार थकले आहेत. आपल्यालाही प्रवासाच्या उत्तरार्धात असाच शीणवटा येत जातो. प्रवासिनीनं तो नेमका वर्णन केला आहे. यात्रा संपली आणि प्रवासिनीला आणि बैलांनाही घरची ओढ लागली. आता बैल कोकणाच्या ओढीनं सरासरा निघालेले दिसत आहेत.

`खंडेरायाची हळद, साता जलमाचा देना दे बा भरतय मळद` अशी ओळ पहिल्या लोकगीतात होती. या लोकगीतातील `बानूच्या पोरसातलो घेतलो गो ठांब` या ओळीतून तीच भावना व्यक्त होत आहे. `ठांब म्हणजे हळदीचं रोप`. खंडेरायाला प्रिय असलेली हळद बाणाईच्या परसबागेत रूजली आहे, असंच प्रवासिनी सुचवते आहे. लोकगीतकार स्त्री म्हाळसेपेक्षा बाणाईला महत्त्व का देत असावी? खंडेरायांच्या दोन्ही शक्तीच आहेत. पण म्हाळसा म्हणजे बुद्धी आणि बाणाई म्हणजे श्रद्धा. म्हणूनच कदाचित लोकगीतकार स्त्री बाणाईला म्हणजे श्रद्धेला महत्त्व देत असेल. बाणाईच्या बाबतीतील एक श्रद्धाकथा जेजुरीत ऐकवली जाते. बाणाईला गडाच्या खालीच जागा द्यावी लागली. तिच्याकडच्या बाणानं खंडेरायांनी आपल्या बैठकीमागे एक छिद्र पाडलं. ते त्या छिद्रातून सतत हळद टाकत राहात. ही हळद खाली बाणाईच्या डोक्यावर पडत राहते. या हळदीच्या माध्यमातून खंडेराय बाणाईला सतत भेटत राहतात, अशी ही कथा आहे. खंडेराय-बाणाईचा हा हळदबंध आपल्याही आयुष्यात कायम राहो, अशी प्रार्थनाच जणू प्रवासिनी करीत आहे. 

या दोन्ही गीतांच्या गीतकार स्त्रीत्व विसरत नाहीत. एका गीतातील स्त्री आपलं भाग्यवंतपण कथन करताना म्हणते,  

`बाई रकमाई उबी एकली गो उगी

रकमाईच्या परास मिया गो भाग्यवान

माजे धनी करयती देवाचा दर्सान`

देवाच्या शेजारच्या खोलीत अठ्ठावीस युगे उभी राहूनही रुक्मिणीमातेला देवदर्शन काही झाले नाही, ती तिथे दुःखाचे कढ ओठाआड बंद ठेवून उभी आहे, याकडे एक गीतकार लक्ष वेधते. तर दुसरी म्हणते,  

`बनात जावोनी मिया पदुबाईस भेटले

पदु बनात एकली, म्हाली रक्माई एकली

संसार संसार जपत बाई संसारी एकली`

पंढरपुरात भक्तांचा पूर लोटलेला असतो. विठ्ठलाला भेटायला लक्ष लक्ष भक्त आलेले असतात. पण या अलोट गर्दीतही पदुबाई असो वा रक्माई, दोघीही एकटेपणाचं दुःख भोगत असतात. हे स्त्रीचंच दुःख आहे जणू. संसारात काडी काडी जमवणाऱ्या बाईच्याही वाट्याला एकटेपणाच येतो असा मनभाव गीतकार व्यक्त करते.   

या दोन्ही गीतांचा काळ सर्वसाधारणपणे निश्चित करता येतो. येथे दुसऱं दिलेलं गीत आधी रचलं गेलं आहे. या गीतातील चार पंक्ती पाहा -   

`नावान देवाच्या राजान बांदला तळा

भायासाठी जालो देव हळदीचो तांदळा

भायासाठी इले देव सोडून पेंबर

मानला गो गावान रावाच्या समूर` 

खंडेरायांचं एक नाव आहे – `मल्हारी`. जेजुरीची पहिली वस्ती जेजेवाडीची. या वस्तीजवळ `देवाच्या नावाचं` एक तळं आहे, ते म्हणजे `मल्हारतीर्थ`. हे मल्हारतीर्थ सातारच्या छत्रपती शाहूमहाराजांनी १७१० ते १७२० या काळात बांधून घेतलं. 

जेजुरीत भाया गुरवाची भक्तीकथा तुम्हाला ऐकायला मिळेल. भायासाठी देव पालीपेंबरहून जेजुरीगडावर आले आणि हळदीचा तांदळा होऊन राहिले अशी एक कथा आहे. त्यावरून भायाचे समर्थक आणि इतर असा एक कलहही उभा राहिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चिंचवडच्या मोरया गोसावींनी हा कलह मिटवायचा प्रयत्न केला होता. पण तो काही संपला नव्हता, तो पुढे थोरल्या बाजीराव पेशव्यांनी १७२० ते १७३० या काळात कधी तरी मिटवला. हा इथला इतिहास, `नावान देवाच्या राजान बांदला तळा` आणि `मानला गो गावान रावाच्या समूर` या ओळीतून ही प्रवासिनी कथन करते. याचाच अर्थ असा की, तिचा प्रवास साधारण १७३० नंतर झाला आहे. पण त्याचबरोबर हेही नक्की की, हा प्रवास १७६७च्या आधी झालेला आहे. कारण जेजुरीगडाला अहल्याबाई होळकर यांनी तटबंदी केली ती १७६८ ते १७७७ या काळात. या तटबंदीचा उल्लेख ही प्रवासिनी करीत नाही. इतिहास कथन करणारी ही प्रवासिनी तटाचा उल्लेखच करीत नाही, याचा अर्थ तिचा प्रवास १७६७च्या आधी झालेला असला पाहिजे. या तटाचा उल्लेख दुसऱ्या गीतात आहे,  

`कोट राणीन बांदलो देवाच्या म्हालाशी

बसइले गो जराल कोटाच्या दाराशी`

म्हणजेच हे गीत तट बांधल्यानंतर म्हणजे १७७७ नंतर रचले गेले असले पाहिजे, हा कयास चुकीचा ठरू नये. याचाच अर्थ असा की, १७३० ते १७७७ या चाळीस-पन्नास वर्षातील ही दोन लोकगीते आहेत. मराठीतील पहिले छापील प्रवासवर्णन तीर्थयात्रेचंच आहे ते म्हणजे शामराव मोरोजी यांचं `काशिप्रकाश- महायात्रा वर्णन`. हे पुस्तक १८५२ मध्ये म्हणजे ही दोन प्रवासीलोकगीतं रचली गेल्यानंतर सुमारे शतकानंतरचं आहे. 

जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेऊन पंढरपूरच्या विठोबाच्या भेटीला जाण्याची मालवणी मुलुखवासीयांची एक वाट तयार झाली होती, हे जसं दिसतं, तसंच खंडोबा आणि विठोबा यांचं एकत्वही कुठंतरी मालवणी माणसाच्या मनात तयार होत गेलं असावं. 

बायो गो जेजुरी गडात, सोन्याच्या नगरात

म्हाळकाय बानू भांडती, हळद गो कांडती

मल्हारी देव हासती, गो हळद फासती

जेजुरी म्हाळकाय-बानाई, पंढरीत गो रकमाई

देव बसले गो घोड्यावरी, पंढरीत इटेवरी

जेजुरी हेगडे परधान, पंढरीत पुंडलिक निधान

देव हळदीचो खुळो, पंढरीत बुक्क्याचो टिळो

पंढरीत मृदुंग टाळ, जेजुरीत वाघ्यामुरळीचो घोळ

विठोबा हा विष्णूचा अवतार, तर खंडोबा हा शिवाचा अवतार. हरी व हर यांची परस्परजोड मालवणी माणसाच्या मनात आहेच. माझी आजी (आईची आई) म्हणायची, `जन्माक येवन काशीक नाय गेला तरी येकवेळ चालात, पण पंढरपुराक जावक व्हया. हरी आणि हर दोगंव भेटतंत थय`. हा कदाचित `हरिवंशा`चाही प्रभाव असू शकेल. `हरिवंशा`त म्हटलं आहे –

रुद्रश्च परमो विष्णुः विष्णुश्च परमः शिवः।

एक एव द्विधा भूतो लोके चरति नित्यशः।।

कोणत्याही यात्रेची फलश्रुती सांगितलेली असते. खंडोबाला ठोंबऱ्याचा नैवेद्य आवडतो. विशेषतः खंडोबाच्या नवरात्रात ठोंबरा केला जातो. जोंधळे खूप शिजवून मऊ करून त्यात दही-मीठ घालून हा अत्यंत चविष्ट पदार्थ केला जातो. यात गहू, तीळ, गूळ हेही घातले जाते. खंडोबाला `मैराळ` असंही म्हटलं जातं. `इला` हे पृथ्वीचं एक नाम आहे. तर `र`कार विष्णूसाठी वापरला जातो. खंडोबाची यात्रा केली तर, खुद्द म्हाळसाईकडून ठोंबरा मिळेल आणि तुम्ही पृथ्वीचे धनी व्हाल. या यात्रेची फलश्रुती पाहाच - 

खंडेरायाच्या यात्रेक निगाले, पालीपेंबूरी पोचले गो

चंदनपुरा दुरून नमान, ग़डजेजुरी गाठले गो

गडजेजुरी गाठता बाये उरले ना घोपान गो 

देव इले धरलो हात सोपे केले सोपान गो

निळ्या घोड्यावरी देव बसले थाटात गो

देवाचो उत्साव बाये माईना डोळ्यात गो

उत्साव पाह्यलो त्येंका कैलासार मान गो

म्हाळसाई वाडता सोता ठोंबऱ्याचा पान गो

मल्हारीन रणी मारले मल्ल आणखीन मणी गो

ह्या गाना आयकता व्हती इळेच्ये धनी गो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT