amit tribhuvan
amit tribhuvan 
सप्तरंग

चिमूटभर चांदणं (डॉ. अमित त्रिभुवन)

डॉ. अमित त्रिभुवन amit.tribhuvan@gmail.com

काऊंटरवरच्या धनलक्ष्मीनं विचारलं : ‘‘आज काय कामाला सुट्टी नव्हती का?’’ ती करारी बाई म्हणाली : ‘‘ताई, सुट्टी कशाची वं?’’ दुकानाच्या मालकीणबाई म्हणाल्या : ‘‘अगं, आज लक्ष्मीपूजा नव्हं का?’’ ती करारी बाई उत्तरली : ‘‘ताई, घरी खायाला चार तोंडं हायती. सुट्टी घेतली तर लक्षुमी कुठून ईल वं? आन् तुमी तरी कुटं सुट्टी घेतलीय? तुमि बी कामाचं करताय की!’’ धनलक्ष्मीनं काटेकोरपणे छटाक गोडेतेल दिलं. ते देता देता त्या मालकीणबाईंनी म्हटलं : ‘‘पाच रुपयाच्या गुळात भागंल का?’’ ती बाई म्हणाली : ‘‘ताई, पुरून उरंल! दिवाळसण हुईल बगा अक्खा.’’ मालकीणबाई आणि मी तिच्याकडं बघतच राहिलो. ती करारी बाई परत म्हणाली : ‘‘आन् एक वात बी द्या!’’...

‘अंधाराचे दिवस येत आहेत दिवा दिवा जमवायला हवा
वेळ पडली तर सूर्यदेखील पणतीत आणून ठेवायला हवा!...’

दिवाळी आली, की  प्रा. जयंतकुमार त्रिभुवन सरांच्या या कवितेच्या ओळी नेहमीच आठवतात. पणती, आत्मा, प्रकाश आणि अंधार यांची संगती लावत या ओळी नेहमीच एक वेगळं परिमाण देऊन जातात. प्रत्येक दिवाळी प्रत्येक वेळी वेगवेगळे अर्थ घेऊन समोर येते. दिवाळी... प्रकाशाचा सण. आनंदाचा सण. आपल्या कृषिप्रधान देशातल्या कृषकांचा सण. आणि आजकाल बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल करणारासुद्धा सण. वेगवेगळ्या प्रदेशात त्याची रूपंपण वेगवेगळी. मला नेहमीच वाटतं, की कोणत्याही धार्मिक सणाचा संबंध आहे आणि असायला हवा तो अध्यात्मिकतेशी. खाणं- पिणं, मौज-मजा, फराळ, कपडे ही सगळी बाह्य आनंदाची साधनं; पण ईश्वर.. आत्मा असल्यानं सणांचं गूज हेच, की आपण आत्म्यानं त्या जगन्नियंत्याशी कसे जोडले जातो. हे होत असताना विविधतेत एकता साधणारे आपण सारे एकमेकांशी माणूस म्हणून कसे जोडले जातो हेही मला महत्त्वाचं वाटतं. त्या दृष्टीनं अनेक धर्मीयांच्या अनेक सणांसोबत दिवाळीचा उत्सव आपल्या भारतासाठी मोठा वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. मुळात शेतकऱ्यांचा असलेला हा सण आज लहान थोर, सर्व जाती धर्माचे लोक.. सगळ्यांचा झालाय. कारण या सगळ्या उत्सवांत महत्त्व असतं ते दिव्यांना, प्रकाशाला. आणि प्रकाश कोणाला नकोय? या प्रकाशात न्हाऊन निघावं, प्रकाश अंतरात भरून घ्यावा असं प्रत्येकाला वाटतं. या प्रकाशाचं महत्त्व वेगळं सांगायची गरज नाही. घरात आणि घराच्या पायरीवर, दारात, खिडकीत दिवा लावणं हे तर एक निमित्त झालं; पण त्याची ज्योत अंतरात पेटावी आणि त्या प्रकाशात आयुष्य उजळून गेलं, तर ती खरी दिवाळी असेल आणि अशी एकच दिवाळी आयुष्यात येणं गरजेचं असतं. हे सगळं लिहावंसं वाटलं याचं कारण अर्थात दिवाळीच.
असाच एका वर्षी दिवाळीचा महत्त्वाचा दिवस आला. मी नाशिकला गेलो होतो. लक्ष्मीपूजनाची संध्याकाळ होती. जसजशा सावल्या लांब होत गेल्या आणि अंधार पसरू लागला तसतशी घरोघरी तिच्याच स्वागताची तयारी सुरू झाली. कानाकोपरा दिव्यांनी उजळू लागला. सगळीकडे प्रसन्न वातावरण तयार झालं. फराळाची घरोघर लगबग सुरू झालेली, पाहुणे मंडळींची ये-जा आणि त्यात ठिकठिकाणी फटाक्यांचा वाढता आवाज, लहान मुलांचा दंगा, रांगोळ्या या सगळ्यांनी वातावरण प्रसन्न होत होतं. या सगळ्या भारलेल्या वातावरणात माझ्या पाच वर्षांच्या लेकानं अजून पाहिजे म्हणत बिनआवाजी फटाक्यांची मागणी आवाज वाढवत केली.  मग काय काढली गाडी आणि त्याला घेऊन निघालो. त्या निमित्तानं लेकाला ती सुंदर संध्याकाळ दाखवत नाशकात जरा फिरलो, फुलबाज्या वगैरे खरेदी केल्या. रस्त्यावर फिरताना साहजिकच मन पुण्या- मुंबईची दिवाळी आणि नाशिकची दिवाळी अशी तुलना करत होतं. मला माझं पुण्यातलं बालपण आठवलं. आकाशदिवे, किल्ला, सजावट आणि हो... फराळ! सगळं हातानं घरी बनवला जायचं, तो काळ मला आठवला! काय मजा असायची तेव्हा.   

मुलाला त्या सगळ्या गंमती सांगत, फिरत जरा शहरापल्याड आलो. तेवढयात माझ्या  पत्नीचा फोन आला : ‘‘कुठं आहेस? एक काम कर. येताना शहाजिरे घेऊन ये!’’ गृहलक्ष्मीचाच हुकूम तो. मग काय गाडी वळवली परत आणि किराणा दुकान शोधत शोधत देवळाली आणि विहीतगांवच्या पुसट सीमेवर आलो. एक बऱ्यापैकी जुनं दुकान सापडलं. मी बऱ्याच वर्षांनी असं दुकान पाहिलं. रोलिंग शटरऐवजी दाराला फळ्या लावलेल्या. आतली कपाटं कळकट, मळकट, जुन्या प्रकारची. काचा काही ठिकाणी फुटलेल्या, तर काही ठिकाणी काळ्या पडलेल्या. इलेक्ट्रॉनिक मशिनऐवजी वर लटकेला तराजू आणि काऊंटरच्या फळीलासुद्धा तेलाचा गोडसर वास. असं ते जुनाट दुकान.

मी गेलो दुकानात आणि गृहलक्ष्मीची मागणी सांगितली. काऊंटरवर साक्षात धनलक्ष्मी उभी होती. दुकानाची मालकीण. दिवाळी असल्यानं आज मालकीणबाई जोरात होत्या बहुधा. अंगावर सोन्याचे भरपूर दागिने होते, पैठणी नेसलेली. दुकानात बऱ्यापैकी गर्दी होती. इतर गिऱ्हाईकांना ती सामान देत होती. मोजून मापून हिशेब करत होती. तिला स्कॅनर, कॅल्क्युलेटर वगैरे काही लागत नव्हतं. झटपट तोंडी हिशेब सुरू होता.

इतक्यात माझ्या मागं एक आवाज आला : ‘‘अवो ताई, छटाक गोडतेल आन् पाच रुपायचा गूळ देता का?’’... मी चमकून मागं पाहिलं. कारण मॉलच्या दुनियेत गेल्यापासून, कार्ड स्वाईप करायला लागल्यापासून ‘छटाक’ हा शब्द कानावर पडणं बंद झालं होतं. जेव्हा खिशात ५, १०, २० पैसे; चारआणे, आठ आणे असायचे त्या काळात मीही छटाक, अर्धा छटाक वगैरे वस्तू आणायचो. तेव्हा ती सगळी दुकानं पण अशीच असायची... जुनाट.   

मी त्या स्त्रीकडे पाहिलं. साधी गरीब बाई; पण चेहरा करारी. जराशी उंच, सावळी, कपाळावर ठसठशीत कुंकू, डोईवर पदर. एका  हातात मिरची, खोबरं, आलं, कोथिंबिरीच्या काड्या, कमरेवरच्या एका डब्यात ज्वारीचं पीठ. नुकत्याच गिरणीतून आणलेल्या त्या गरम पिठाचा छान वास येत होता. काऊंटरवरच्या धनलक्ष्मीनं विचारलं : ‘‘आज काय कामाला सुट्टी नव्हती का?’’ ती करारी बाई म्हणाली : ‘‘ताई, सुट्टी कशाची वं?’’ दुकानाच्या मालकीणबाई म्हणाल्या : ‘‘अगं, आज लक्ष्मीपूजा नव्हं का?’’ ती करारी बाई  उत्तरली : ‘‘ताई, घरी खायाला चार तोंडं हायती. सुट्टी घेतली तर लक्षुमी कुठून ईल वं? आन् तुमी तरी कुटं सुट्टी घेतलीय? तुमि बी कामाचं करताय की!’’  मी दोघींचा संवाद ऐकत होतो. स्त्री- कुठल्याही वर्गातली, स्तरातली असो- सतत काम करत राहणारीच दिसते. आजच्या भाषेत ‘मल्टिटास्किंग’ करणारी. धनलक्ष्मीनं काटेकोरपणे छटाक गोडेतेल दिलं. ते देता देता त्या मालकीणबाईंनी म्हटलं : ‘‘पाच रुपयाच्या गुळात भागंल का?’’ ती बाई म्हणाली : ‘‘ताई, पुरून उरंल! दिवाळसण हुईल बगा अक्खा.’’  मालकीणबाई आणि मी तिच्याकडं बघतच राहिलो. ती करारी बाई परत म्हणाली : ‘‘आन् एक वात बी द्या!’’ माझं  लक्ष आता पलीकडं गेलं. तिथं तिची पाच-सात वर्षांची चिमुरडी उभी होती. तिच्या एका हातात एक मातीची पणती होती आणि दुसऱ्या हातात दोन फुलबाज्या...आणि काळ्याभोर टपोऱ्या निरागस डोळ्यांत होतं चांदणं!!

त्या बाईनं पैसे दिले. इकडं मी ही शहाजिऱ्याचं पाकीट खिशात घातलं. पैसे दिले. काऊंटरवरची मालकीण... धनलक्ष्मी ती सारी चिल्लर व्यवस्थित मोजून घेत होती. तोवर सगळं किराणा सामान त्या करारी बाईनं पिशवीत ठेवलं. पिशवी डोक्यावरच्या पाटीत. कमरेवर दळण. एका हातात पोरीचं बोट धरून ती निघाली देवळालीच्या दिशेनं. पोरगी फुलबाज्या घेऊन आनंदानं उड्या मारत होती.
मी लेकाचं बोट धरून गाडीकडं निघालो. गृहलक्ष्मीचा परत फोन आला. तिला ‘आलोच पाच मिनिटांत’ असं आश्वासन दिलं. सारी व्यवधानं सांभाळत आनंद साजरा करणारी माझी गृहलक्ष्मी. तिच्याबद्दल मनात आदर आहेच. डोक्यात जे काही चालू होतं, त्यामुळं आज तो अजून वाढला होता.

दिवाळी असली, तरी व्यवहार काटेकोरपणे सांभाळणारी ती धनलक्ष्मी मी पाहिली होती. ती करारी बाई- जिनं पाच रुपयांचा गूळ नेला म्हणजे काहीतरी गोड ती नक्कीच करणार होती. छटाक गोडेतेलात सगळ्या घरासाठी दिवाळीचं जेवण आणि एक मातीची पणती ती लावणार होती. एका मातीच्या पणतीत सूर्य आणून ठेवणारी, छटाक गोडेतेलात संसाराचा गाडा चालवणारी ती...धैर्यलक्ष्मी मी पाहिली होती.! फक्त दोन फुलबाज्या नाचवत, नाचत, अंगणात चांदणं सांडत चालणारी ती चिमुरडी. प्रकाशाकडं आपले टपोरे डोळे लावणारी, काही क्षण अंधारावर मात करणारी जणू ती विजयलक्ष्मीच!

घर जवळ आलं.. मनात विचार आला, की ‘अष्टलक्ष्मी आज मिळाव्यात’ अशा शुभेच्छा आपण देतो खरं; पण त्या सगळ्या अवतीभवतीच असतात. आपल्या संस्कृतीनं स्त्रीला देवीचा दर्जा देत तिची पूजा केली खरी; पण स्त्रीला रोजच्या जीवनात जो सन्मान दिला पाहिजे तो तिला दिलाय? समाजात स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाचा विरोधाभास का आहे अजून मग? काहीतरी कुठंतरी चुकतंय आणि ते लवकर सुधारलं पाहिजे, तर त्या तिच्या पूजनाला अर्थ आहे. आपण नुसतं त्यांच्याकडून न घेता त्यांना द्यायला पण शिकलं पाहिजे. तिचा दर्जा, तिचं श्रेय, तिचा कष्टाचं मूल्य आपण वेळीच दिलं पाहिजे, तिच्या कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे. नावं काही ठेवा; पण स्त्रीरूपाच्या आठपैकी या चार ‘गृहलक्ष्मी’, ‘धनलक्ष्मी’, ‘धैर्यलक्ष्मी’ आणि ‘विजयलक्ष्मी’... चारही मला आज दिसल्या होत्या. त्या सगळ्या कार्यतत्पर आहेत, सहनशील आहेत, प्रेमळ आहेत  म्हणून आपली घरं, परिवार, समाज... आणि मग पर्यायानं ‘भारतलक्ष्मी’ ठीक आहे, नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

SCROLL FOR NEXT