dr vijay joshi
dr vijay joshi 
सप्तरंग

सफर लंडनच्या प्राणीसंग्रहालयाची... (डॉ. विजय जोशी)

डॉ. विजय जोशी

इंग्लंडमध्ये असूनही ज्यांच्या मनात इथलं भीमाशंकर आणि पुण्यातलं पेशवे पार्क आजही ताजं आहे, अशा भारतीय माणसानं कोरोनाचा विळखा थोडासा सैल झाल्यावर लंडन शहरातल्या प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. वेगवेगळे प्राणी पाहून मन प्रफुल्लित तर झालंच; पण एक वेगळंच जग अनुभवायला मिळालं. त्या छोट्या सफरीचा हा वृत्तांत...

लंडनचा उन्हाळा म्हणजे पर्यटनाची नामी संधी! पण कोरोनाच्या साथीमुळं या वर्षी जगभरच प्रवासाला मर्यादा आल्या, तरीही सध्याचं हवामान चांगलंच उष्ण असल्यामुळं आम्ही प्रवासाचे बेत आखायला सुरुवात केली. पुढच्या आठवड्याच्या अखेरीला तापमान ३५ अंशांच्या पुढं असणार असं भाकीत होतं, त्यामुळं आम्ही काही ठिकाणं पक्की ठरवली. पण, आम्ही ठिकाणं ठरवेपर्यंत उशीर झाला होता. सोशल डिस्टन्सिंगचे नियम बऱ्यापैकी शिथिल झाल्यामुळं सर्व पर्यटनस्थळं आणि समुद्र किनारे, तसंच अन्य प्रेक्षणीय स्थळं अगोदरच आरक्षित झाली होती. त्यामुळं या वेळी आम्ही निसर्ग आणि प्राणिमित्रांच्या सहवासात वीकएंड घालवायचं ठरवलं. ही मोहीम ठरल्यावर दर आठवड्याला लंडनमधील मोठ्या उद्यानांना (उदा. रिजंट्स पार्क, हाईड पार्क, रिचमंड पार्क आदी) भेटी देण्याचा आमचा परिपाठ सुरू झाला.

या मोहिमेतच आम्ही लंडन झू बघायचं ठरवलं. लंडन शहराच्या मध्ये आणि रिजंट्स पार्कच्या जवळ वसलेलं हे प्राणिसंग्रहालय म्हणजे विविधतेनं नटलेलं प्राणिविश्‍वच! बहुतेक लंडनवासी शहरापासून दूर गेल्यामुळं सकाळी दहा वाजता आम्ही जेव्हा प्राणिसंग्रहालयात गेलो, तेव्हा फारशी गर्दी जाणवली नाही. संग्रहालयाच्या प्रवेशद्वारापासून प्राण्यांची आकर्षक चित्रं असल्यामुळं आपण निराळ्या जगात जात आहोत, याचा आनंद होत होता. आत गेल्यावर प्रथम आम्ही ‘पिंक मार्गा’वरून जायचं ठरवलं. सुरुवातीलाच आमचं स्वागत ‘आफ्रिकन हंटिंग डॉग्ज’ या कुत्र्यांनी केलं. कोल्ह्यासारखी दिसणारी रानटी अशी ही कुत्री कळपानं त्यांच्या भव्य जागेत फिरत होती. ही कुत्री अंगावर आली तर निश्‍चितच एका माणसाला यमसदनाला पाठवण्याची त्यांच्यात ताकद होती.

या भटक्‍या कुत्र्यांच्या नादाला न लागता आम्ही पुढं सरकलो, तर पुढं होता ‘साउथ आफ्रिकन झेब्रा’ व त्याचा वर्गमित्र शोभावा असा ओकापी (OKAPI) नावाचा प्राणी. झेब्रा क्रॉसिंग हे नाव सार्थ करणारी त्या प्राण्यांची अंगकांती होती. ओकापी हा काँगोमधल्या घनदाट अशा वर्षावनात (रेनफॉरेस्ट) सापडतो. हा प्राणी आपले स्वतःचे कान स्वतःच्या ३५ सेंटिमीटर लांब अशा जिभेनं स्वच्छ करू शकतो. त्यानंतर आम्हाला आकर्षित केलं ते उंचच उंच अशा दोन जिराफांनी. बिचाऱ्यांचं लक्ष मुख्यत्वे खाण्याकडंच लागलं होतं. भूतलावरील हे सर्वांत उंच असे प्राणी. तिथून पुढं गेलो, तर पाण्यात पोहत असलेले हिप्पोस आणि पिग्मी हिप्पो दिसले. उष्ण वातावरणामुळं थंडगार पाण्यात त्यांचा मुक्त संचार सुरू होता.

संग्रहालयात आम्ही फिरत होतो. वाटेवर प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगची पत्रकं लावली होती. त्यानंतर आमची पावलं वळली ती बंदिस्त ‘लेमूर गृहात’. इथं सर्वांनी मास्क लावणं सक्तीचं होतं. छोट्या माकडांसारखे दिसणारे हे प्राणी आतमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत होते. कुणी झाडांवर झोपले होते, काही लेमूर झाडांवरून उड्या मारत होते, तर काही आपसांत दंगामस्ती करत होते. अर्थात, उत्साही प्रेक्षकांनी लेमूरबरोबर आपले फोटो काढून घेतले. हे प्राणी मादागास्करमध्ये आढळतात. ‘रिंग टेल्ड लेमूर्स’ हे शाकाहारी असून, वाढत्या शिकारींमुळं नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या शिकारीवर बंधनं आहेतच आणि तो संरक्षित प्राणी म्हणूनही त्याला दर्जा दिलेला आहे.
त्यापुढचा आमचा प्रवास हा कृत्रिम अशा रेनफॉरेस्टमध्ये झाला. इथलं वातावरण साक्षात भीमाशंकरच्या पावसाळी वातावरणाची आठवण करून देत होतं. कर्दळी किंवा केळीची झाडं आणि आपल्या इथं सापडणाऱ्या बहुतेक झाडांनी इथं उपस्थिती लावली होती. निसर्ग आणि पर्यावरण यांचं महत्त्व पटवणारे फलक इथं होते. जंगलतोडीचे वातावरणावर कसे परिणाम होतात, कार्बन उत्सर्जनाची तीव्रता कशी वाढत आहे, याबद्दलची बरीच माहिती इथं चित्रबद्ध केलेली आहे. या वातावरणातून घामाघूम होऊन, सॅनिटायझरनं हात धुऊन आम्ही पुन्हा नैसर्गिक वातावरणात प्रवेश केला.
त्यानंतर आमचा प्रवेश ड्रॅगनच्या दरबारात झाला. इथं भलेमोठे कोमोड ड्रॅगन आपली लांबलचक जीभ वळवळत बसले होते. त्यानंतर गॅलॉपॅगोस आयलंडवर सापडणाऱ्या भव्य कासवांचं आम्हाला दर्शन झालं. त्यांना पाहून आपल्या देवळांमध्ये असणाऱ्या दगडी कासवांची आठवण झाली. पहिला प्रवासमार्ग संपवून आता आम्ही ऑरेंज मार्गावरून दुसऱ्या प्राणिविश्‍वात निघालो. सुरुवातीलाच 'अंबिका पॉल झू' हे नाव पाहून कुतुहल वाढलं. लॉर्ड स्वराज पॉल यांची ही कन्या, जी ल्युकेमियामुळं अकाली गेली. तिच्या नावानं हा मोठा विभाग उभारला आहे. त्यासाठी स्वराज पॉल यांनी भरभक्कम अशी देणगी दिलेली आहे. या मार्गावर प्रथम दर्शन झालं ते शेळी-मेंढीसारखे दिसणारे, पण त्यापेक्षा बरेच उंच असणारे लामा (LAMA) नावाचे प्राणी यांचं! हे मुख्यत्वेकरून पेरू आणि बोलिव्हियामध्ये सापडतात आणि भरपूर गवत हे त्यांचं खाद्य. त्याच्या पुढच्या पिंजऱ्यात आमच्याकडं एकटक बघत असणारी दोन घुबडं आम्हाला दिसली. त्यांना 'टाऊनी आऊल' असं म्हणतात आणि ही इंग्लंडमधली नेहमी दिसणारी घुबडं.
त्यानंतर होती ती भलीमोठी गणेशमूर्ती आणि सर्वत्र दिसणाऱ्या गुजराथी पाट्या. अचानक ही कुठली गुप्त वाट फुटली, असं आम्हाला वाटलं; पण हे तर होतं इथलं गीर नॅशनल प्रोजेक्‍ट! एक मिनी गुजरातच म्हणा ना!! अर्थातच, पुढच्या क्षणाला आम्हाला दिसले ते मचाणावर बसलेले ५-६ गीर जंगलातले सिंह. भव्य आयाळ असलेले हे सिंह म्हणजे खरोखरच जंगलचा राजा हे नाव सार्थ करीत होते. शामियानात बसून आल्या-गेल्या प्रेक्षकांवर करडी नजर ठेवून ते विश्रांती घेत असावेत. आशियाई आणि आफ्रिकन सिंहांमध्ये काय फरक असतो, याविषयीची भित्तीचित्रं इथं होती. यापुढील मार्गावर एक लहानसं गुजरातच वसवलं होतं. जिथं साधारणतः गुजरातमधील कुठल्याही शहरात शोभेल, अशा निरनिराळ्या गोष्टींची मांडणी केली होती. यामध्ये एक छोटं देऊळ होतं, रिक्षा होती, छोटंसं रेल्वेस्टेशन होतं, घरगुती सामानाची दुकानं होती.

लंडनमधल्या गुजरातला वळसा घालून आम्ही पुढं आलो, ते एका भव्य पक्षी उद्यानात. समोर बाह्यदर्शनीच एक मोठं घड्याळ लावलेलं, ज्यातून प्रत्येक अर्ध्या तासाला एक पक्षी बाहेर येऊन आवाज करत असे. आतल्या भागात तर प्रचंड किलबिलाट सुरू होता. यात होते बुलबुल, जावा, चिमण्या, सनबर्डस, चेस्टनट थ्रश असे विविध जातींचे आणि विविधरंगी पक्षी. काही तर आमच्या डोक्‍यावरून थव्याथव्यानं उडत होते. यामध्ये कोकीळकंठी आवाज मात्र ऐकू आला नाही.

त्यानंतर आमचं लक्ष वेधून घेतलं ते, ध्यानस्थपणे एका पायावर उभ्या असलेल्या फ्लेमिंगोंनी. उपासनेला दृढ चालवावे, अशी मनात गाठ बांधून ही मंडळी आपली मान आपल्याच खांद्यावर ठेवून उभी होती. पुढच्या मार्गावर आमचं स्वागत छोटेखानी पण चुणचुणीत अशा ‘मिरकट’ नावाच्या प्राण्यांनी केलं. मागच्या दोन पायांवर उभं राहून, पुढच्या दोन पायांनी नमस्कार करण्याची त्यांची कला दाद देण्यासारखीच होती. या मिरकट समूहात कुणाचं लग्न असावं अशी धांदल आणि सर्वत्र पळापळ सुरू होती. खरंतर हे प्राणी म्हणजे आफ्रिकेत सापडणारे छोटेखानी मुंगूसच आणि त्यांचं खाद्य म्हणाल तर विंचू, किडे, कोळी, पाली आणि साप आदी.

या प्राण्यांचा नमस्कार स्वीकारून आम्ही रेपटाइल पार्कमध्ये शिरलो. नागपंचमीची आठवण करून देणारे विविध प्रकारचे साप इथं वावरत होते. लांबलचक किंग कोब्रा होता. पलीकडंच मोठमोठ्या सुसरी, मगरी असे महाकाय जलचर प्राणी होते. एका ठिकाणी एक साळिंदरही झोपलेलं होतं. अजून वेळ घालवला तर रात्री झोप येणार नाही या भीतीनं आम्ही इथून काढता पाय घेतला आणि फुलपाखरू उद्यानाला वळसा घालून पेंग्विनच्या जलतरण विभागात प्रवेश केला. वाटेतच विविध रंगांचे पोपट आम्हाला दिसले. बिच्चारे इथंदेखील पिंजऱ्यातच होते. पण, तोता-मैना एकत्र असावेत, कारण आमच्याकडं त्यांनी संपूर्ण दुर्लक्षच केलं. पेंग्विनच्या पोहण्याच्या तलावात करकोचे, छोटी-मोठी बदकं, पेलिकन्स आणि आपण जणू बीचवर सुटीसाठी आलो आहोत अशा थाटात बसलेले पेंग्विन्स होते. काहींची जलक्रीडा चालली होती.
दोन मार्ग पादाक्रांत केल्यावर पोटात काहीतरी ढकलल्याशिवाय तिसरा मार्ग धरणं आम्हाला शक्‍य नव्हतं, त्यामुळे आमची क्षुधाशांती झाल्यावर आम्ही शेवटचा मार्ग धरला. दोन पावलं चालतो न चालतो तोच 'टायगर टेरिटरी' अशी पाटी दिसली व लगोलग वाघाची मोठी डरकाळी ऐकू आली. समोर होता तो पिवळा पट्टेवाला वाघ. बिचाऱ्याची झोपमोड झाली असावी. मध्येच मान वर करून त्यानं सर्वांना आपल्या मोठ्या जबड्याचं दर्शन घडवलं. तिथं मिळालेल्या माहितीनुसार या वाघाचं नाव हरी असून, सध्या त्याच्यासाठी वधूसंशोधन सुरू असल्याचं समजलं. वाघाच्या पिंजऱ्यासमोरून आम्ही आता मोकळ्या जागेत आलो. तिथं दोन उंट बसले होते, बिचारे वाळवंटातून जबरदस्तीनं उचलून आणल्यासारखे पाय दुमडून बसले होते. चुकूनही आमच्या हाकेला त्यांनी दाद दिली नाही.

उंटांची नाराजी पत्करून पुढं आम्ही आलो ते आपल्या पूर्वजांच्या प्रदेशात. हे होते गोरिला. हे मुख्यत्वे करून काँगो, अंगो, आफ्रिका, कॅमेरून या भागात आढळतात. वाढत्या जंगलतोडीमुळं आणि पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळं यांच्यावर आता संक्रांत आली आहे. धोक्यात आलेली प्रजाती म्हणूनच त्यांच्याकडं आता पाहिलं जातं.
या प्रदेशात गोरिलांचा मोठा समूहच बसला होता. त्यांच्या देहबोलीवरून मानवाची उत्पत्ती ही माकडांपासूनच झाली असावी, यावर विश्‍वास बसला. प्रेक्षकांच्या विविध हरकतींना आणि चाळ्यांना तसंच उत्तर देणं ही कला त्यांनी लीलया अवगत केली होती. त्यांच्या अवतीभोवती इतर विविध प्रकारची माकडं उड्या मारताना दिसत होती. त्यांच्या माकडचेष्टा पाहून 'आधीच मर्कट त्यात....' या उक्तीची आठवण झाली.

शेवटी मर्कटलीलांचा मोह आवरत आम्ही परत रेस्टॉरंट्समोरील मोकळ्या जागेत आलो. आता इथं मात्र मनुष्यप्राण्यांचंच अस्तित्व जाणवत होतं आणि मनात येत होते पाहिलेले विविध प्राणी. लंडन शहराच्या मध्यवस्तीत असूनही प्राणिमात्रांशी आणि निसर्गाशी इतकी जवळीक साधता येते, हेच या भेटीनं जाणवलं. चार तास किती पटकन संपले ते कळलंच नाही. बाहेरच्या जगातला कृत्रिमपणा, बकालपणा आठवून इथंच कायमचं ठाण मांडून बसावं असं वाटत असतानाच आम्ही परतीच्या वाटेवर शहराच्या गोंगाटात आमची गाडी चालवत मार्गक्रमण करू लागलो. मात्र, निसर्गाशी साधलेली जवळीक एक वेगळाच आनंद देऊन गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT