jaiprakash pradhan
jaiprakash pradhan 
सप्तरंग

ज्वालामुखीतून फुललेलं उद्यान... (जयप्रकाश प्रधान)

जयप्रकाश प्रधान japradha1@gmail.com

या उद्यानामध्ये अन्य लहान-मोठी कारंजी, डबकी पाहण्याचीही फार उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. कारंजी, डबकी यांच्यापासून थोड्या अंतरावर लाकडाचे फलाट बांधण्यात आले आहेत. त्यांवर उभं राहून कारंज्यांचा किंवा डबक्यांचा चमत्कार पाहता येतो. या लाकडाच्या फलाटांवरून अनेक किलोमीटर चालता येतं. इथं कोणत्याही परिस्थितीत जमिनीवरून चालण्यास मनाई आहे. कारण जमिनीतून कधी, कुठं अचानक गरम पाणी, वाफ बाहेर पडेल याचा नेम नाही. हा धोका पत्करल्यानं काहीजणांना जबरदस्त भाजून आपला प्राण गमवावा लागला.

अमेरिकेतल्या वायोमिंग राज्यात यलो स्टोन व ग्रँड टेटॉन ही दोन राष्ट्रीय उद्यानं एकमेकांना लागून आहेत. त्यांपैकी यलो स्टोनची घोषणा, जगातलं पहिलं नॅशनल पार्क म्हणून १८७२ मध्ये झाली. बावीस लाख एकरांचं हे पार्क म्हणजे खरोखरच एक आश्चर्य आहे. निसर्गाचा आगळा-वेगळा चमत्कार तर इथं पाहायला मिळतोच; पण येथील निसर्गसौंदर्यही डोळे दिपवून टाकतं. पृथ्वीच्या पोटात काय सामावलं आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकातून काय-काय बाहेर पडतं, ते पाहून अक्षरश: चकित व्हायला होतं.

यलो स्टोन व ग्रँड टेटॉन या दोन्ही उद्यानांमध्ये भटकंती करण्यासाठी मी व पत्नी जयंतीनं चांगले तीन दिवस राखून ठेवले होते. ‘जॅक्सन होल’ हे जवळचं मोठं शहर. अनेकजण इथं विमानानं येतात व भाड्यानं मोटार घेऊन फिरतात. आमचा संपूर्ण प्रवास मात्र अमेरिकन दाम्पत्य वॉर्नर व लूसिला यांच्याबरोबर मोटारीनं सुरू होता. तीन दिवसांपैकी एक दिवस जॅक्सन होलमध्ये राहिलो व दोन दिवस तर चक्क ‘यलो स्टोन नॅशनल पार्क’मधील ‘यलो स्टोन पार्क हॉटेल’मध्येच मुक्काम केला. दिवसभर गाडीनं, पायी भरपूर फिरायचं; हवं तेव्हा, हवं तिथं थांबायचं. निसर्गाची, त्याच्या अचंबित करणाऱ्या चमत्कारांची माहिती घ्यायची, असा आमचा तेथील दिनक्रम होता.
येथील यलो स्टोन नदीवरून या पार्कला यलो स्टोन नाव मिळालं. यलो स्टोनचा भूत- वर्तमान- भविष्यकाळ ज्वालामुखीशीच निगडित आहे.

सुमारे वीस लाख वर्षांपूर्वी, त्यानंतर तेरा लाख व मग परत ६ लाख ४० हजार वर्षांपूर्वी इथं अतिप्रचंड ज्वालामुखीचा उद्रेक झाला. शेवटच्या ज्वालामुखीतून २४० क्युबिक (घन ) मैलांचा लाव्हारस बाहेर आला, त्यामुळं आता पार्कचा जो मध्यवर्ती भाग आहे, तिथं ३० बाय ४५ मैलांची जमीन खचली व कपाच्या आकाराचा खड्डा पडला. त्या ज्वालामुखींमुळं निर्माण झालेली उष्णता इतकी तीव्र होती, की त्यामुळं आजही या उद्यानात गरम पाण्याची कारंजी, झरे, कुंड कायम राहिली आहेत. इतकंच काय; पण भूगर्भातून सतत वायू बाहेर पडत असल्यानं, बुडबुडे येत असलेली डबकीही (मड पॉट्स ) ठिकठिकाणी दिसून येतात.

यलो स्टोनमध्ये गरम पाण्याची अडीचशेपेक्षा जास्त कारंजी असली, तरी मुख्य आकर्षण आहे ‘ओल्ड फेथफुल’ कारंज्याचं. वस्तुत: ते उद्यानातील सर्वांत मोठं कारंजं नाही; पण दर नव्वद मिनिटांनी १०६ ते १८४ फूट उंच ते नियमित उडतं. त्यामुळंच १८७० मध्ये वॉशबर्न गिर्यारोहकांच्या तुकडीनं त्याला ‘ओल्ड फेथफुल’ असं नाव दिलं.

आम्ही साधारणत: दुपारी दोनच्या सुमारास फेथफुलच्या परिसरात पोहोचलो. तिथंच उद्यानाचं माहिती कार्यालय आहे. फेथफुल कारंजं आता कधी उडण्याची अपेक्षा आहे, याची वेळ तिथं फलकावर लावलेली असते. त्यानुसार २ वाजून ४७ मिनिटांनी फेथफुल उडणार होतं. कारंज्याच्या सभोवताली थोड्या दूर अंतरावर, वर्तुळाकार बाकं लावून, बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. साधारणत: अडीच वाजेपर्यंत सर्व बाकं पर्यटकांनी भरून गेली होती. सुदैवानं आम्हाला बसायला चांगली जागा मिळाली.
दोन वाजून चाळीस-बेचाळीस मिनिटं झाली आणि कारंज्यातून थोड्याथोड्या वाफा येऊ लागल्या. सर्वजण कॅमेरे घेऊन सज्ज झाले. वाफांच प्रमाण कमी-जास्त होत होतं. मध्येच सर्व काही बंद झालं. मग २ वाजून ४६-४७ मिनिटांनी त्यातून छोटी-छोटी कारंजी उडू लागली. काही क्षणांत त्यांची उंची वाढली. थोड्याच वेळात ती आणखी वरवर जाऊ लागली. आता ती चांगली ८०-९० फुटांपर्यंत उंच उडत होती. साधारणत: चार-पाच मिनिटं हा सर्व खेळ चालला आणि मग कारंज बंद झालं. या कालावधीत ३७०० ते ८४०० गॅलन्स (१४ ते ३२ हजार लिटर्स ) उकळतं पाणी कारंज्यातून बाहेर पडतं. हे कारंजं नियमित उडत असलं, तरी त्याचा उडण्याच्या दोन वेळांतील फरक दिवसेंदिवस वाढतही आहे. एखादा भूकंप या वेळापत्रकात बदल घडवू शकेल किंवा त्याची जागाही बदलली जाईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

या उद्यानामध्ये अन्य लहान-मोठी कारंजी, डबकी पाहण्याचीही फार उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. कारंजी, डबकी यांच्यापासून थोड्या अंतरावर लाकडाचे फलाट बांधण्यात आले आहेत. त्यांवर उभं राहून कारंज्यांचा किंवा डबक्यांचा चमत्कार पाहता येतो. या लाकडाच्या फलाटांवरून अनेक किलोमीटर चालता येतं. इथं कोणत्याही परिस्थितीत जमिनीवरून चालण्यास मनाई आहे. कारण जमिनीतून कधी, कुठं अचानक गरम पाणी, वाफ बाहेर पडेल याचा नेम नाही. हा धोका पत्करल्यानं काहीजणांना जबरदस्त भाजून आपला प्राण गमवावा लागला.

येथील प्रत्येक कारंज्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. अॅनेमोने कारंज्याच्या जवळ आम्ही पोहोचलो, तेव्हा ते पूर्ण शांत होतं. काही मिनिटांनी जमिनीतून वाफा येऊ लागल्या आणि मग उकळलेलं पाणी बाहेर आलं. त्यानं डबकं भरून वाहू लागलं. त्यातून बुडबुडे येत होते. अचानक पाणी सहा फुटांपेक्षा जास्त उंच उडू लागलं. मग आवाज सुरू झाला आणि सारं शांत झालं. हे चक्र साधारणत: दर सात ते दहा मिनिटांनी सुरू असतं. स्टीम बोट कारंज्याची कथा आणखीनच निराळी. या कारंज्यातून पाणी कधी उडायला लागेल याचा भरवसा नाही; पण ज्या वेळी ते उडतं, त्या वेळी ओल्ड फेथफुलपेक्षाही अधिक उंच जातं. उकळत्या पाण्याची रंगबिरंगी डबकी पाहायला तर फारच गंमत वाटते. त्यातून निरनिराळे आवाज व बुडबुडे येत असतात. तांबड्या, निळ्या, किरमिजी रंगांची उधळण थक्क करून सोडते. त्यातील उष्ण वाफेची दाहकता लांबूनही चांगलीच जाणवते. काही वेळेस वाऱ्याची दिशा आपल्या बाजूनं असेल, तर त्याचा वासही सहन होत नाही. न्यूझिलंडमधील रोटोरूआ येथील कारंजी, झरे, डबकी यांच्या तुलनेत यलो स्टोनची भव्यता, विविधता डोळ्यांत अधिक भरते हे निश्चित.

यलो स्टोन पार्क हा केवळ ज्वालामुखीच्या चमत्कारासाठी प्रसिद्ध नाही, तिथं शेकड्यानं तलाव, नद्या, घनदाट जंगलं आणि विविध प्रकारचे प्राणी सारं काही आहे. मासेमारीचा कमालीचा शौक असलेल्या अमेरिकनांच्या दृष्टीनं तर हे अत्यंत आवडीचं ठिकाण. मीही मासेमारीचं प्रशिक्षण जॉन पॉवेल यांच्याकडून इथं घेतलं. पॉवेल गेली २८ वर्षं इथं मासेमारीसाठी नियमित येतात. त्यांच्यासारखे निदान शंभरजण भेटले. यलो स्टोनमध्ये मासेमारीचं निराळं वैशिष्ट्यआहे. खास पोशाख, बूट व गळ घेऊन (या सर्वांची किंमत निदान ५०० ते ८०० डॉलर्सच्या घरात जाते) नदीच्या पाण्यात उभं राहायचं. येथील नद्यांमध्ये नानाविध प्रकारचे मासे आहेत. मासा गळाला लागला, की तो कोणत्या प्रकारचा, जातीचा आहे हे बारकाइनं पाहायचं, त्याची नोंद करायची व मग तो मासा नदीत परत सोडून द्यायचा. कारण या उद्यानामध्ये मासेमारीकडं एक ‘खेळ’ म्हणून पहिलं जातं. त्यामुळंच मासा पकडायचा व पुन्हा नदीला अर्पण करायचा, असा नियम आहे. वस्तुत: ते पाहण्यासाठी कोणीही रक्षक नसतो; पण तरीही प्रत्येकजण त्याचं काटेकोरपणे पालन करतो.

यलो स्टोनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रीझली व ब्लॅक बेअर्सचा (अस्वल) उद्यानात मुक्त संचार असतो. इथं जवळजवळ १५० ग्रीझली व ५०० पेक्षाही अधिक ब्लॅक बेअर्स आहेत. प्रत्येक वर्षी या अस्वलांच्या हल्ल्यात निदान एक व्यक्ती जखमी होते.२०११ मध्ये दोन निरनिराळ्या प्रसंगांत दोन जणांना आपला प्राण गमवावा लागला. पार्कमध्ये फिरत असताना समोर अस्वल आलं तर कसं वागायचं, काय करायचं याच्या सूचना ठिकठिकाणी लिहिलेल्या आहेत. ग्रीझली बेअर फार खतरनाक असतं. ते पाण्यात पोहू शकतं, डोंगरावर ताशी ४० मैलांच्या वेगानं पळू शकतं. ग्रीझलीचं वजन ७०० पौंडापर्यंत असतं व आयुष्य तीस वर्षं. ब्लॅक बेअर्स हे उद्यानामध्ये सर्रास फिरताना दिसतात. अस्वल दिसलं, तर त्याला पाहण्यासाठी, फोटो काढण्यासाठी पार्कमध्ये गाड्यांच्या अक्षरश: रांगा लागतात, त्यामुळं वाहतूक जॅम होते. त्याला ‘बेअर जॅम’ म्हणतात. याखेरीज गवे (बायसन), हरणं, सांबर आदी प्राण्यांचंही मस्त दर्शन होतं.

या उद्यानामध्ये २९० लहान-मोठे धबधबे आहेत. त्यात यलो स्टोन नदीवरील लोआर फॉल्स धबधबा अत्यंत प्रेक्षणीय आहे. ३१० फुटांवरून कोसळणारी नदी पुढे काही अंतरानंतर अत्यंत अरुंद घळीतून प्रवास करते. इथं आवर्जून उल्लेख करायला हवा तो म्हणजे, या किंवा सर्वच उद्यानांमधील उत्तम व्यवस्थापनाचा. कर्मचारी माहिती देण्यात, मदत करण्यात अत्यंत तत्पर असतात आणि भेट देणारे अमेरिकन पर्यटकही, हे माझ्या देशाचं उद्यान आहे या भावनेनं नियमांचं काटेकोरपणे पालन करतात. पार्कमध्ये ४०-४५ मैल वेगानंच वाहनं चालवण्यास परवानगी आहे. कारण कधीही, कुठंही जनावरं रस्त्यावर येऊ शकतात. कोणीही पर्यटक या मर्यादेचा भंग करताना दिसत नाही, हे विशेष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT