snehal
snehal 
सप्तरंग

पाडवा...नवजीवनाचा (स्नेहल बाकरे)

स्नेहल बाकरे

सईचं हे उत्तर ऐकून नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हेच तिच्या तिन्ही मैत्रिणींना कळेना. तिघी अगदी स्तब्ध झाल्या. चेष्टा-मस्करीचं वातावरण क्षणभरात बदलून गेलं आणि गंभीर शांतता पसरली.
अनुराधानं सईचा हात घट्ट पकडला आणि ती पुन्हा विचारू लागली : ‘‘सई, तू हे काय बोलत आहेस? हे सगळं कधी घडलं? कसं घडलं? आणि आम्हाला कधी काही सांगितलंस का नाहीस?’’

दुपारचे दोन वाजले होते. जेवण करून सई नुकतीच हॉलमध्ये सोफ्यावर बसली होती.
‘‘लता, माझ्या गोळ्या आणि पाणी आण गं’’ तिनं तिच्या घरात काम करणाऱ्या मुलीला हाक मारत सांगितलं. लतानं लगेचच लगबगीनं तिला औषधं आणि पाणी आणून दिलं.
‘‘ताई, तुमच्यासाठी ताकही केलं आहे. आणू का आत्ता?’’ लतानं सईला विचारलं.
‘‘अरे वा...अगदी माझ्या मनातलं ओळखलंस. मला हवंच होतं ताक,’’ लतानं सईला ताक आणून दिलं.
‘थँक यू, लता’ असं म्हणत सईनं ताक घेतलं.
औषधं, ताक वगैरे सगळं झाल्यावर सई लताला म्हणाली :‘‘बरं, लता... तुला माहीत आहे ना, मी आज रात्री घरी नाहीये ते...
आदित्यसाहेबांसाठी आणि अंशुलदादासाठी मी पावभाजी करून ठेवली आहे...ते दोघं आले की त्यांना गरम करून वाढ...दादाला पाव जास्त कडक भाजू नकोस, त्याला पाव मऊच हवा असतो...जेवण झाल्यावर दोघांना आठवणीनं गुलाबजाम दे...दादाला त्यासोबत त्याचं ठरावीकच आइस्क्रीम लागतं. ते वर फ्रिझरमध्ये आहे. ते त्याला दे.’’
लतानं सईच्या सगळ्या सूचना बारकाईनं ऐकून घेतल्या व होकारार्थी मान हलवत ती सईला म्हणाली : ‘‘ताई, तुम्ही काहीही काळजी करू नका...मी सगळं नीट सांभाळीन...तुम्ही निवांत जा...’’
‘‘हो गं बाई. तू आहेस म्हणूनच तर मी निश्चिंतपणे जाऊ शकतेय, नाहीतर ते दोघं घरभर पसारा करून ठेवतील हे का मला माहीत नाही?’’
एवढं बोलून सई तिच्या खोलीत थोडा वेळ विश्रांती घ्यायला गेली. ती बेडवर झोपायला जाणार इतक्यात तिचा मोबाईल वाजू लागला.

सईनं फोनं घेतला.
‘‘हाय सई, मी वृंदा बोलतीये...आम्ही निघालो आहोत मुंबईहून.
तू आमच्या आधी पोचशील ना हॉटेलवर? नाही म्हटलं, तू पक्की पुणेकर आहेस ना, तुम्हा पुणेकरांना वामकुक्षी फार प्रिय!...चुकून तुझा डोळा लागला तर आम्हाला तुझी वाट पाहत बसावी लागेल, म्हणून म्हटलं...’’
वृंदा चेष्टा करत म्हणाली.
‘‘बाय द वे, मॅडम, तुम्हीपण मूळच्या पुणेकरच आहात हे विसरलात वाटतं...! ‘मुंबईकर’ ही उपाधी तुम्हाला लग्नानंतर लाभली आहे.
आणि बरं का, आम्ही पुणेकर वेळेचे अगदी पक्के आहोत. मी नक्कीच तुमच्या आधी तिथे पोचेन. डोन्ट वरी.’’
सई हसत हसत वृंदाला म्हणाली.
फोनवर बोलून झाल्यावर सईनं थोडा वेळ विश्रांती घेतली.
***

सई, वृंदा, मृणाल आणि अनुराधा या अगदी नर्सरीपासूनच्या मैत्रिणी. दहावीपर्यंत एकाच शाळेत शिकल्या, नंतर पुढच्या शिक्षणासाठी प्रत्येकीनं वेगवेगळ्या वाटा निवडल्या. लग्नानंतर चौघींची अजूनच ताटातूट झाली. सध्या वृंदा व मृणाल मुंबईत, अनुराधा अमेरिकेत, तर सई पुण्यातच असते. आपापल्या सुखी संसारात चौघी व्यग्र असल्यानं त्यांच्यातला संवादही पूर्वीपेक्षा थोडा कमीच झाला असला तरीही अनुराधा कधी भारतात आली की चौघीही अगदी न चुकता भेटतातच. आज अनुराधा जवळपास पाच वर्षांनी भारतात आली आहे. गप्पांच्या मैफलीत कुणाचा व्यत्यय नको म्हणून त्यांनी आज एक रात्र हॉटेलवर राहण्याचा बेत आखला आहे. सगळ्यांची मुलं सतरा ते तेवीस या वयोगटांतली असल्यामुळे मुलांचीही तशी काळजी नाही.
आज सईचा रंग काही निराळाच होता. मैत्रिणींना एवढ्या दिवसांनी भेटणार म्हणून ती खूपच आनंदात होती. तिनं खास त्यांच्यासाठी स्वतः गुलाबजाम तयार केले होते. ती आता पूर्वीपेक्षा थोडी बारीकही झाली आहे, त्यामुळे जीन्स आणि टॉप तिला अगदी शोभून दिसत होता. तिच्या लांबसडक केसांचं रूपांतर मात्र आता शॉर्ट; पण आकर्षक अशा हेअर कटमध्ये झालं होतं.
***

सई आवरून खोलीबाहेर येताच लतानं तिला गरमागरम चहा आणून दिला. चहा पिता पिता सई पुन्हा लताला सगळ्या सूचना देऊ लागली.
‘‘लता, तुला मी सांगितलेलं सगळं नीट समजलं आहे ना? रात्री झोपताना गॅस बंद करायला विसरू नकोस. मी उद्या दुपारपर्यंत येतेच आहे, तोपर्यंत तू घर नीट सांभाळ. चल बाय, निघते मी आता. नाहीतर मला उशीर होईल.’’
लतानं नेहमीप्रमाणे होकारार्थी मान डोलावली.
पर्स, गुलाबजामचा डबा आणि एक छोटीशी बॅग घेऊन सई घराबाहेर पडली. हॉटेलवर जाण्यासाठी तिनं बोलावलेली कॅब खाली तिची वाटच पाहत होती.
ठरल्यानुसार सई सगळ्यांच्या आधी हॉटेलवर पोचली. तिनं रूमचा ताबाही घेतला. अर्ध्या तासात इतर तिघीही पोचल्या. भेटताक्षणीच त्यांनी एकमेकींना घट्ट मिठी मारली.
सई आज जरा जास्तच उत्साहात होती. अनुराधाला पाहताक्षणीच ती जोरात ओरडली : ‘‘अनू, काय गं, कशी आहेस? किती वर्षांनी भेटतोय आपण. तुझा नवरा तुला एकटीला भारतात सोडत नाही की काय?’’ सईनं चेष्टा केली.
‘‘मी एकटी इथं आले की परत अमेरिकेला जाईन की नाही याची त्याला खात्री नाही, म्हणून तो मला एकटीला सोडत नाही,’’ अनुराधा हसत हसत उत्तरली.
‘‘माझं ठीक आहे; पण तुम्ही तिघी इथं असूनही एकमेकींना का भेटत नाही?’’ अनुराधानं तिघींकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत विचारलं.
सई लगेचच तक्रारीचा सूर लावत म्हणाली : ‘ ‘‘आपण भेटू या’ असं मी तर नेहमीच म्हणत असते या दोघींना; पण वृंदा तिच्या वकिलीत इतकी व्यग्र असते की कधी कधी तर माझ्या मेसेजचं उत्तरही ती दोन दिवसांनी देते! आणि मृणालचं तर काही विचारूच नकोस...घर, मुलं, ऑफिस एवढंच तिचं विश्व. या सगळ्या पसाऱ्यातून तिला मैत्रिणींसाठी वेळ मिळणं म्हणजे वाळवंटात पाण्याचा तलाव आढळण्याइतकं दुर्मिळ!’’
यावर वृंदा आणि मृणाल खोटं खोटं चिडत म्हणाल्या : ‘‘तू गप्प बस सई. तुझा नवरा आदित्य तुला सगळी मदत करतो आणि मुलगा अंशुलही मोठा असल्यानं तू सदान्‌कदा बाहेर फिरायला मोकळीच असतेस.’’

एकमेकींची चेष्टा-मस्करी करता करता संध्याकाळचे सात वाजले. अनुराधानं रूममध्ये चहा-कॉफी मागवली. छोट्याशा टी-ब्रेकनंतर गप्पांची मैफल पुन्हा रंगू लागली. गप्पांना अगदी उधाण आलं होतं. गेल्या पाच वर्षांत आपल्या आयुष्यात काय काय घडलं याची अगदी इत्थंभूत माहिती एकेकीनं दिली. सई तशी मितभाषी. स्वतःच्याच विश्वात रमणारी; पण आज मात्र सर्वात जास्त तीच बोलत होती.
तिच्या या आंतर्बाह्य बदलाकडे पाहून अनुराधानं तिला एक प्रश्न विचारला :‘‘सई, तुझ्या या ‘कम्प्लीट मेकओव्हर’चं रहस्य तरी काय? डाएटिंग वगैरे नक्कीच करत असशील तू. सांग तरी आम्हाला...’’
सई दोन मिनिटं थांबून म्हणाली : ‘‘माझं सिक्रेट आहे कॅन्सर...कर्करोग!’’
तिचं हे उत्तर ऐकून नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हेच तिघींनाही कळेना. तिघी अगदी स्तब्ध झाल्या. चेष्टा-मस्करीचं वातावरण क्षणभरात बदलून गेलं आणि तिथं गंभीर शांतता पसरली.
अनुराधानं सईचा हात घट्ट पकडला आणि ती पुन्हा विचारू लागली : ‘‘सई, तू हे काय बोलत आहेस? हे सगळं कधी घडलं? कसं घडलं? आणि आम्हाला कधी काही सांगितलंस का नाहीस?’’ सई तिला धीर देत म्हणाली : ‘‘अगं, आजकाल कॅन्सर होणं हे खूप कॉमन आहे.’’
वृंदा चिंतेच्या स्वरात सईला म्हणाली : ‘‘पण तू तर स्वतःची खूप काळजी घेत असतेस...बाहेरचं फारसं काही खातही नाहीस...नियमितपणे व्यायामही करतेस...मग तुला कसा काय कॅन्सर झाला?’’
मृणाल सईकडे शंकेनं बघत म्हणाली :‘‘तू आमची फिरकी तर घेत नाहीस ना?’’
सईनं तिघींवर एक दृष्टिक्षेप टाकला आणि ती सविस्तर वृतान्त सांगू लागली : ‘‘तुम्ही एवढ्या घाबरू नका आणि हा कॅन्सर माझ्या लेखी आजार नसून एक प्रकारे मला मिळालेलं ते वरदानच आहे असं मी समजते. आयुष्य मजेत कसं जगायचं हे त्यानंच मला शिकवलं. तीन वर्षांपूर्वीचा गुढी पाडवा माझ्यासाठी खऱ्या अर्थानं चैतन्यानं भरलेलं नवजीवन घेऊन आला. त्या दिवशी सकाळी माझ्या छातीत अचानकच दुखू लागलं. सणामुळे आमच्या फॅमिली डॉक्टरांचा दवाखाना त्या दिवशी नेमका बंद होता, म्हणून मग आम्ही डॉक्टरांकडे दुसऱ्या दिवशी गेलो. तिथं त्यांनी एकापाठोपाठ एक अशा माझ्या भरपूर तपासण्या केल्या. मला स्टेज थ्रीचा ब्रेस्ट कॅन्सर आहे असं त्यातून निदर्शनास आलं. पुढच्याच आठवड्यातच शस्त्रक्रिया करावी लागणार होती; पण माझ्या मनात सतत आदित्यचे आणि अंशुलचे विचार घुमत होते. शस्त्रक्रियेदरम्यान मला चुकून काही झालं तर त्या दोघांचं काय होईल या विचारानंच माझी झोप उडाली...’’
मृणाल तिचं सांत्वन करत म्हणाली : ‘‘हो ना गं, आपलं कुटुंब आपल्यावर इतकं विसंबून असतं ना की आपल्याशिवाय त्याचं कसं होईल या विचारानं जीव अगदी कुरतडला जातो आपला.’’

‘‘पण सई, तू पूर्णपणे बरी होणं हे सध्या जास्त आवश्यक आहे,’’
अनुराधा म्हणाली.
सई पुन्हा सांगू लागली :‘‘ मी अगदी ठणठणीत बरी आहे. मी त्या कॅन्सरला हरवलं आहे!’’
वृंदानं मध्येच विचारलं : ‘‘काय? म्हणजे तुझा कॅन्सर आता बरा झाला आहे?’’
सई म्हणाली : ‘‘अगदी तसंच नाही; पण मी कॅन्सरला माझ्या आयुष्यातून बऱ्यापैकी पळवून लावलं आहे. शस्त्रक्रियेनंतर
दोन महिने मी घरीच विश्रांती घेतली. माझ्या मनातल्या भलत्यासलत्या विचारांना अटकाव बसावा म्हणून आदित्यनं मला काही पुस्तकं वाचायला आणून दिली. त्यापैकी व. पु. काळे यांच्या एका पुस्तकातल्या काही ओळी मला कमालीच्या पटल्या. मी त्या माझ्या मनावर कोरून ठेवल्या आहेत अगदी. त्यांनी म्हटलंय : ‘अत्यंत महागडी, न परवडणारी, खऱ्या अर्थानं ज्याची हानी कधीच भरून काढता येत नाही अशी गोष्ट जी आपण वारेमाप उधळतो, ती म्हणजे आयुष्य.’
त्यानंतर मला आयुष्याचा खरा अर्थ समजला आणि मी ठरवलं की आता कॅन्सरशी दोन हात करायचेच...त्याला आपल्या आयुष्यातून पळवून लावायचं. आपणही आनंदात राहायचं आणि दुसऱ्यालाही आनंद द्यायचा.’’
हे ऐकून वृंदा सईला म्हणाली : ‘‘म्हणजे, एका पुस्तकानं तुझ्या कॅन्सरवर मत केली तर...!’’

सई म्हणाली : ‘‘त्या ओळींनी मला सकारात्मक विचार करायची दिशा दिली एवढं खरं! आदित्य आणि अंशुल यांनीही मला खूप धीर दिला. माझ्या सगळ्या किमो थेरपीज् मी व्यवस्थितपणे पूर्ण केल्या. जराही हलगर्जीपणा न करता सगळी औषधं काटेकोरपणे घेत गेले. हल्ली मी आणि आदित्य रोज नियमितपणे योगासनंही करतो. शस्त्रक्रियेनंतर
तीन महिन्यांनी मी पुन्हा माझं काम सुरू केलं आहे. सोमवार ते शुक्रवार ऑफिस आणि वीकएंडला सिनेमा, नाटक किंवा नातेवाईक/ मित्रमंडळी यांच्यासोबत गेट टुगेदर या सगळ्यात माझं एक वर्ष कसं निघून गेलं ते कळलंच नाही. वर्षभरातच माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल येऊ लागले. कॅन्सरचं माझ्या शरीरातलं संक्रमण रोखण्यात मी यशस्वी झाले.’’

सईचं हे बोलणं ऐकून अनुराधाला मात्र अश्रूंच्या धारा रोखता आल्या नाहीत. सईनं तिला घट्ट मिठी मारली.
तिचे डोळे पुसत सई तिला मिश्किलपणे म्हणाली : ‘‘तुला आजी झालेलं पाहिल्याशिवाय मरणार नाही मी!’’
यावर मृणाल सईला म्हणाली : ‘‘पुरे झाली तुझी थट्टा आता.’’
वृंदानं काही न बोलताच सईला कुशीत घेतलं आणि दोन मिनिटं ती तशीच बसून राहिली.
सईसुद्धा मग अगदी ‘फिल्मी अंदाज में’ म्हणाली : ‘‘बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नाही...मैत्रिणींनो, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला घाबरून न जाता त्या संकटाकडे एक संधी म्हणून बघा. मग बघा, सगळं कसं सुरळीत होत की नाही ते. ’’
अनुराधा सईकडे आश्र्चर्यानं पाहत म्हणाली : ‘‘तू अशीच मजेत राहा... तुझा खरंच अभिमान वाटतो आम्हाला.’’
यावर सई सगळ्यांना सावरत म्हणाली : ‘‘चलो यार, बहोत हो गया रोनाधोना. अब कुछ मीठा हो जाए...’’
मग खास मैत्रिणींसाठी स्वतः करून आणलेल्या गुलाबजामचा डबा सईनं उघडला आणि आपल्या तिन्ही जिवलग मैत्रिणींना स्वतःच्या हातानं गुलाबजाम भरवले...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : कॉँग्रेसने ६० वर्षे देशाला बुडविले ; शिंदे

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT