shri ram janmashtami
shri ram janmashtami sakal
सप्तरंग

महत्त्व श्रीरामाष्टमीचे...

सकाळ वृत्तसेवा

प्रभू श्रीरामांच्या ठायी असलेले विविध गुण अंगी बाणवून आदर्श व्यक्तीमत्त्व घडवण्याचा प्रत्येकाचा कल असतो. रामनवमीच्या (ता.३०) उत्सवाला चैत्र प्रतिपदेपासून प्रारंभ होतो.

- सरिता कुलकर्णी

प्रभू श्रीरामांच्या ठायी असलेले विविध गुण अंगी बाणवून आदर्श व्यक्तीमत्त्व घडवण्याचा प्रत्येकाचा कल असतो. रामनवमीच्या (ता.३०) उत्सवाला चैत्र प्रतिपदेपासून प्रारंभ होतो. श्रीरामांच्या जन्माआधीच्या अष्टमीचे महत्त्व हे त्यांच्या महतीमधून समजून घेतल्यास त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध गुणांचा अधिक चांगल्या प्रकारे परिचय होऊ शकतो.

रामरायाचे चरित्र शतकोटी श्लोकांइतके उदंड विस्तार पावलेले आहे. त्यातील एकेक अक्षरसुद्धा मनुष्यांच्या महापातकांचा नाश करणारे आहे. रामरक्षेचा हा पहिलाच श्लोक आश्वासन देतो की, तुमचं मन पूर्वी केलेल्या कर्मांच्या संस्काराने वाईट झालेले असले तरी ते रामनामानें शुद्ध आणि पवित्र होईल. रामाचे गुण, त्यांनी आचरलेला मार्ग, दाखवलेले मर्यादापूर्ण जीवन, स्नेहपूर्ण अलिप्तता, स्थिरता, प्रेमस्वरूप आणि ज्ञानस्वरूप आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. असे श्रीराम समोर असले की मनात वाईट विचार येतच नाहीत. रावणाला रामाचे रूप घेऊन सीतेचे हरण करणे सोपे होते; पण रावण म्हणतो मी जर रामरूप घेतले तर माझे विचारच बदलतील, मी रामासारखाच होईन.

क्षुद्र विचारच येणार नाहीत. शतकोटिश्लोकांचं रामचरित्र आम्हाला सांगा असे म्हणून देव, दानव आणि मानव श्रीशंकरांकडे हट्ट धरून बसले. श्रीशंकरांनी तीन समान वाटण्या केल्या. प्रत्येकाला तेहतीस कोटी तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस श्लोक आले आणि एक श्लोक उरला. त्याचीही वाटणी. श्लोक अनुष्टप छंदातील अक्षरे ३२. मग समान दहा-दहा दिली. दोन अक्षरे राहिली ‘राम,’ ती शंकरांनी आपल्या कंठात धारण केली. ‘राम’ ही दोनच अक्षरे मानवाचा उद्धार करायला पुरेशी आहेत. रामकथा श्रवण करा, रामनाम घ्या. चित्त सदैव पवित्र राहील. महापातकनाशनम् असे रामनाम मुखाने म्हणा. या श्लोकात सीता लक्ष्मणासह रामाचे ध्यान सांगितले आहे. नीलकमळाप्रमाणे श्यामल कांती असणारा राम, राजीवलोचन अर्थात कमळदळाप्रमाणे सुंदर लोचन असणारा राम, सीता व लक्ष्मणासह असणारा राम हवा.

दुर्जनांचा परिहार, सज्जनांचे रक्षण

राम वाल्मिकी ऋषींना म्हणाले- मी येथे अरण्यात कोठे राहू. राम हा सर्वव्यापी आहे, तो प्रत्यक्ष ईश्वर आहे. तो नाही अशी जागाच नाही. मग तू कोठे राहावे हे कसे सांगता येईल? राम म्हणाले सीता व लक्ष्मणासहित कोठे राहू? रामा, सीता व लक्ष्मणासह तू भक्तांच्या हृदयात राहा. सीता हे भक्तीचं प्रतिक तर लक्ष्मण हे संयमाच आणि वैराग्याचं प्रतिक. रामाचं ध्यान हे सीता व लक्ष्मणासह म्हणजेच भक्ती, संयम आणि वैराग्य. जटेच्या व मुकुटाने सुशोभित श्रीरामाचे मुकुट हे राज्यवैभवाचे प्रतिक तर जटा या वैराग्याचे प्रतिक. वैभव आणि वैराग्य दोन्हीही एकत्र असणं महत्त्वाचं. जो खड्ग, तलवार, भाता, धनुर्बाण यांनी सुसज्ज आहे, असा श्रीराम निशाचरांचा, राक्षसांचा अंत करणारा आहे. रात्र हे अंधाराचे, अज्ञानाचे प्रतिक. वाईट कृत्ये ही रात्रीच घडत असतात, ती करण्यासाठी जे निशाचर, राक्षस फिरत असतात त्यांचा नायनाट प्रभूरामचंद्र करतात. रामाच्या प्रकाशाने रात्रीचा म्हणजेच अंधाराचा नाश होऊन प्रकाशीत होतात. मन, बुद्धी, अंतःकरण प्रकाशित होते. जो जन्मरहित आहे आणि सर्व ठिकाणी व्यापून आहे तो परमात्मा जगताचे रक्षण करण्यासाठी स्वतः अवतार घेतो. निर्गुणातून सगुणात येतो.

रामरक्षेत ‘जगत् त्रातुम्’ या दोन शब्दांत गीतेतील नारायणाचे अवतार कार्य सांगितले आहे. दुर्जनांचा परिहार आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी श्रीरामांचे खड्ग, धनुष्यबाण सज्ज आहेत. दुष्टांचे शस्त्राने, वाईट प्रवृत्तीचे रामनामाने, गुणांच्या श्रवणाने आणि ध्यानाने नाश होतो. या श्लोकापासून म्हणजे श्लोक क्रमांक पाचपासून ते दहापर्यंत मुख्य रामरक्षा आहे. शरीराच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या विविध भागांचे रक्षण रामाने करावे, अशी प्रार्थना केली आहे. याला रामनाम कवच म्हणतात. आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करायचे. शिर-मस्तकाचे रक्षण याला आध्यात्मात सहस्त्रदलकमल म्हणतात. हे परमात्म्याचे स्थान त्याच्या प्राप्तीचे स्थान आहे. परमार्थिक आणि ऐहिक दृष्ट्या डोकं चांगलं असेल तरच सर्व चांगलं होईल. त्याचं रक्षण रामाने करावे.

अष्टमीच्या पूजेचे महत्त्व

इक्ष्वकू कुळातील राजे धर्मनिष्ठ आणि अत्यंत सामर्थ्यशाली, देवांना सहाय्य करणारे होते. अशा कुळात ईश्वराने राम अवतार घेतला. राघवाने शरीराच्या सर्वश्रेष्ठ भागाचे रक्षण करावे. माझ्या कपाळाचे रक्षण दशरथात्मज अर्थात दशरथाचा मुलगा श्रीरामाने करावे. माझे भाग्य चांगले असावे. तत्त्वनिष्ठ व सत्यनिष्ठ जीवन जगण्याचा आदर्श रामाने निर्माण केला त्याप्रमाणे आम्हांलाही कर्तृत्वाची संधी, आलेला प्रसंग आहे अशी पाहण्याची बुद्धी रामरायाने द्यावी. आध्यात्मिक दृष्ट्या ध्यानयोग प्रक्रियेत कपाळावर लक्ष ठेऊन ईश्वरतत्त्वात नाममंत्राने स्मरण करणे आणि क्रमाक्रमाने चित्त एकाग्र करावे.

दशरथ म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये असे मिळून दहा इंद्रियांच्या रथावर आरूढ झालेला जीव-आत्मा म्हणजे अंत:करणात जन्म घेणारा. मनुष्य स्व-स्वरूपाला जेव्हा जाणतो तेव्हा आत्मसाक्षात्काराचा अनुभव येतो. या मार्गावरून चालण्यासाठी साधना हवी. माझ्या शिराचे व भालाचे रक्षण रामाने करावे. कौसल्येचा पुत्र राम माझ्या डोळ्यांचे रक्षण करो. चांगलंच पाहण्याची दृष्टी दे! आत्मस्वरूप पाहण्याची देखणी दृष्टी कौसल्यामातेसारखी दे. राम वनवासात जातांना होती तशी दृष्टी वात्सल्य, वियोग, दुःख, कर्तव्य भावना. दृष्टीत आसक्ती, अभिलाषा नको. विश्वामित्रांना प्रिय असणाऱ्या रामा, कानांनी नेहमी चांगले ऐकावे यासाठी तू माझ्या कानांचे रक्षण करावे. सद्‍गुरूंकडून पारमार्थिक आध्यात्मिक ऐकून स्व-स्वरूपाचा ध्यास लागू दे. गुरूंकडून प्रथम ज्ञान आणि शेवटी धन्योद्गार ऐकण्याचे भाग्य आम्हांला श्रीरामाच्या कृपेने प्राप्त होवो.

अशा या प्रभू रामचंद्रांचा जन्म दिवस म्हणजे चैत्र शुद्ध नवमी, पण हा जन्म होण्यासाठी गौरी मातेचे अनुष्ठान अपरिहार्य होते. सर्वोत्तम असा पुत्र प्राप्त होण्यासाठी राजा दशरथाने अष्टमीची पूजा केली. नऊ कुमारिकांना आमंत्रण देऊन त्यांची पाद्यपूजा विधीवत करून तिला प्रसन्न केले गेले. जी सगळी पापं या भुतलावर वाढली होती ती नाहीशी करून सगळ्या जगाचे कल्याण करण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांच्या पाठीशी मोठी शक्ती नवदुर्गेच्या रूपात उभी राहावी, हे अष्टमीच्या पूजेचे महत्त्व आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT