Hanuma-Vihari
Hanuma-Vihari 
सप्तरंग

जय हनुमा 

शैलेश नागवेकर (saptrang@esakal.com)

लंकेवरच्या स्वारीत लक्ष्मण बेशुद्ध पडलेला असताना बजरंगबली हनुमानानं संजीवनीसाठी द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला होता असा रामायणात उल्लेख आहे. सिडनीत भारतीय संघ पराभवाच्या छायेत असताना हनुमा विहारीनं हनुमान होण्याची बजावलेली कामगिरीही अशीच थक्क करणारी होती. पराभव टाळण्याच्या त्या लढतीत रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि आर. अश्विन हे योद्धेही लढत होते; पण हॅमस्ट्रिंगची दुखापत झालेल्या विहारीनं, आता आपण पुढचे काही महिने खेळू शकणार नाही हे माहीत असूनही, स्वतःच्या शारीरिक वेदनांची पर्वा न करता संघाचं हित जपलं. तो दुखापत घेऊनच तब्बल तीन तास लढत राहिला, म्हणूनच त्या दिवशी भारतीय संघाचा तर तो हनुमा(न) तर ठरलाच; पण बाहुबलीही ठरला.

हॅमस्ट्रिंग दुखापत म्हणजे, मांडीचे मागचे स्नायू मर्यादेपेक्षा अधिक ताणले जाणं. ही दुखापत नेमकी किती काळ मैदानापासून दूर ठेवू शकते हे जाणून घ्यायचं असेल तर रोहित शर्माचं उदाहरण डोळ्यांसमोर आणावं. या दुखापतीत चालणंही कठीण होत असतं. 

आयपीएलमध्ये याच दुखापतीवरून नाट्य घडलं आणि त्याला ऑस्ट्रेलियाच्या बहुतांश दौऱ्याला मुकावं लागलं. विहारी याला हीच दुखापत झाली आहे. रोहित शर्माच्या बाबतीत सांगायचं तर, तो रोहित होता म्हणून त्याच्यासाठी सर्वजण एकवटले होते. बीसीसीआयलाही दखल घ्यावी लागली होती; पण विहारी हा स्टार खेळाडू नाही. असे खेळाडू एकदा का संघातून बाहेर गेले की पुन्हा येण्याचा त्यांचा मार्ग कठीण असतो. याचं नेमकं उदाहरण म्हणजे कर्नाटकचा करुण नायर. त्यानं इंग्लंडविरुद्ध त्रिशतक केलं. कसोटी क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागनंतर त्रिशतक करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज; पण त्या त्रिशतकानंतर तो आत्तापर्यंत कधीच पुढची कसोटी खेळलेला नाही. विहारीनं संघासाठी आपली कारकीर्द पणाला लावली म्हणूनच तो ‘त्यागपुत्रां’च्या यादीत स्थान मिळवू शकतो.

 सुरुवातीला १०० चेंडूंत सहा धावा आणि १६१ चेंडूंत २३ धावा अशी कामगिरी विहारीनं केली; पण त्याचं कौतुक करताना कर्णधार अजिंक्य रहाणेनं ‘विहारीची ही खेळी शतकापेक्षा कमी नव्हती,’ असे गौरवोद्गार काढले. धावफलकात भलेही त्याच्या नावासमोर २३ धावांचीच नोंद होईल; पण तो सामना जेव्हा जेव्हा आठवला जाईल तेव्हा तेव्हा त्यानं जी शर्थ केली तिचे दाखले दिले जातील आणि आकडेवारीपेक्षा असे दाखलेच खेळाडूंना महान बनवत असतात.

कोण हा हनुमा?
हनुमा विहारी हा आंध्र प्रदेशचा खेळाडू. रणजी क्रिकेटमध्ये आंध्रचा संघ तसा दुय्यम पातळीवरचा; पण सन २०१७-१८ च्या मोसमात त्यानं एका त्रिशतकासह आंध्र संघातून धावांचा रतीब घातला होता आणि ७५२ धावा केल्या होत्या. त्या वेळी भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद होते. विहारीची सन २०१८-१९ च्या इंग्लंडदौऱ्यासाठी निवड झाली. त्या दौऱ्यात भारतीय संघाच्या पदरी अपयश आलं असलं तरी विहारीनं चमक दाखवत ‘आपली निवड वशिल्यानं झालेली नव्हती,’ हे सिद्ध केलं. पुढं गतवेळच्या ऑस्ट्रेलियादौऱ्यात भारतीय संघानं मिळवलेल्या ऐतिहासिक यशाचा विहारीही शिलेदार होता.

विश्वकरंडकविजेता
‘कसोटी स्पेशालिस्ट’ म्हणून आत्ता विहारीकडे पाहिलं जात असलं तरी तो आयपीएलमध्येही खेळलेला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि आत्ताच्या दिल्ली कॅपिटलसह सनरायजर्स हैदराबाद संघाचाही तो सदस्य होता; पण त्याअगोदर सन २०१२ मध्ये ऑस्ट्रलियात झालेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या भारतीय संघाचाही तो सदस्य होता. आत्ता त्याचा विचार केवळ कसोटीसाठी होत असला तरी त्याच्याकडे आक्रमक फलंदाजीचा वसा आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
‘दीवार’मधला अमिताभ
आजकालचा सोशल मीडिया उपमा देण्यात किंवा दाखले देण्यात नंबर वन आहे! विहारीची ती ऐतिहासिक खेळी साकारली गेली आणि सोशल मीडियावर लगेचच ‘दीवार’मधल्या एका प्रसंगावर आधारित एक क्लिप व्हायरलही झाली. ‘दीवार’मध्ये अमिताभ बच्चन गोडाउनमध्ये गुंडांची धुलाई करून गेट उघडून बाहेर येतो, तेव्हा कामगार त्याचं जल्लोषात स्वागत करतात असा प्रसंग आहे. याच प्रसंगाचा आधार घेऊन विहारीबाबतची क्लिप उत्साही चाहत्यांनी तयार केली.  

ऑस्ट्रेलियाची जिरवून विहारी जेव्हा ड्रेसिंगरूममध्ये परतला तेव्हा त्याचं असंच स्वागत झालं असेल अशी कल्पना या क्लिपमध्ये करण्यात आली आहे. विहारी संघाबाहेर राहिल्यावर पुन्हा एकदा टीम इंडियाची संघरचना बदलेल. 

नवी समीकरणं तयार होतील; पण तंदुरुस्त झाल्यावर त्याला पुन्हा स्थान मिळायला हवं, तरच त्याच्या त्यागाचं मोल राहील. त्याचा ‘करुण नायर’ व्हायला नको. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT