Sanjay Manjrekar
Sanjay Manjrekar Sakal
सप्तरंग

सरळ बॅट आणि तिरकस फटकेबाजी

शैलेश नागवेकर saptrang@esakal.com

संजय मांजरेकर म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाज, सरळ बॅटनं व्हीमध्ये (मिड ऑफ ते मिड ऑन) फटकेबाजी. समोर आलेला चेंडू त्याच्या क्षमतेनुसार खेळणं हा वारसा वडील विजय मांजरेकर यांच्याकडून आलेला. नीडर, बेधडक आणि जिगरबाज असाही लौकिक विजय मांजरेकर यांचा होता. भारतातील एका कसोटी सामन्यात चंदू बोर्डे यांचं शतक पूर्ण होण्यासाठी, हात फ्रॅक्चर असतानाही, फलंदाजीला येण्याची जिगर दाखवणाऱ्या विजय मांजरेकर यांचा सुपुत्र संजयही तेवढाच फलंदाजीत खडूस...! पण फलंदाजीत संजयला जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही तेवढी मात्र तो ‘बोलंदाजी’त मिळवत आहे. दोन वर्षांपूर्वी रवींद्र जडेजा आणि आणि आता आर. अश्विन यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मांजरेकर सध्या - समालोचन करत नसला तरी - चर्चेत आहे.

आपल्या सरळ बॅटनं खेळायचा चेंडू तिरकस बॅटनं मारला तर विकेट जाण्याची शक्यता अधिक असते, तरी काही फलंदाजांना तो मोह आवरत नाही. आपल्या काही वक्तव्यांमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, टीका होऊ शकते, आर्थिक नुकसानही होऊ शकतं याची जाणीव असूनही बिनधास्तपणे मत मांडण्याचं धैर्य संजयच दाखवू शकतो. समालोचनातील सहकारी हर्ष भोगले, इतकंच नव्हे तर, सौरव गांगुली यांच्यावरही ट्विटरचे बाण सोडणाऱ्या संजयला वादग्रस्त वक्तव्यांमुळे बीसीसीआयनं समालोचक पॅनेलमधून दूर केलेलं आहे, तरी संजय काही थांबलेला नाही. त्याची तिरकस फटक्यांची ‘बोलंदाजी’ कायम आहे.

रविचंद्रन अश्विन हा कुंबळेनंतर भारताचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. आयसीसीचा सर्वोत्तम पुरस्कारही त्यानं मिळवलेला आहे; पण ‘अश्विन सार्वकालिक श्रेष्ठ गोलंदाज असू शकत नाही,’ असं संजयनं नुकतंच म्हटलं आणि भारतीय संघ सध्या लंडनमध्ये विलगीकरणात असला तरी भारतीय क्रिकेटवर्तुळात चर्चेला मुक्त वातावरण मिळालं. अश्विननं भले भारतात खेळताना अनेक विक्रम केले असतील; पण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या देशांत त्याला एकदाही एका डावात पाच विकेट मिळवता आलेल्या नाहीत, त्यामुळे तो सार्वकालिक श्रेष्ठ गोलंदाज होऊ शकत नाही, असं संजयचं मत आहे. भारतातील पोषक असलेल्या खेळपट्ट्यांवर अश्विनचा ३० वेळा एकाच डावात पाच विकेट मिळवण्याचा दबदबा अफलातूनच आहे; पण आशियाई देशांचा अपवाद वगळता एकदाही पाच विकेट न मिळवणं हेसुद्धा तेवढंच सत्य आहे. संजयच्या या थेट वक्तव्यामुळे अश्विनचे पाठिराखे चिडणं स्वाभाविक आहे आणि संजय अगोदरच बदनाम झालेला असल्यामुळे तो पुन्हा लक्ष्य होणं हेही निश्चितच होतं; पण संजयनं उल्लेखिलेली अश्विनची परदेशातील आकडेवारीही तेवढीच खरी आहे.

संजयला बहुधा भारताच्या फिरकी गोलंदाजांबाबत राग असावा. रवींद्र जडेजावर त्यानं केलेली ‘बीट्स आणि पीसेस’ ही कॉमेंट तर फारच गाजली होती. ‘तुकड्यातुकड्यात होणारी कामगिरी’ असं त्याला म्हणायचं होतं. अर्धशतक किंवा शतक झाल्यावर बॅट तलवारीसारखी फिरवणारा आणि सौराष्ट्रातील आपल्या घरी स्वतःचे अश्व असणाऱ्या जडेजानं संजयला तेवढंच तिखट आणि जोरदार प्रत्युत्तर दिलं नसतं तरच नवल होतं. पुढं जेव्हा जेव्हा जडेजाकडून मॅचविनर कामगिरी झाली तेव्हा तेव्हा संजयनं त्याचं दिलखुलास कौतुकही केलेलं आहे.

टीका-टिप्पणी आणि प्रत्युत्तर हा खेळ मैदानाबाहेर रंगतोच; पण त्याचा परिणाम काय होतो हे सर्वात महत्त्‍वाचं असतं. कोणत्याही खेळाडूला पेटून उठण्यासाठी एखादा प्रसंगही पुरेसा ठरतो. विराट कोहलीसारख्या खेळाडूंना असं डिवचलं जाणं हे सर्वोत्तम कामगिरी घडण्यासाठी पुरेसं असतं. सन १९९९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत संजयची टीका जडेजानं मनावर घेतली आणि त्यानंतर आत्तापर्यंत पाहिलं तर जडेजा सातत्यानं मॅचविनर होत आहे. तिन्ही प्रकारांत तो अविभाज्य खेळाडू झाला आहे.

आता संजयची टीका अश्विन कशी घेतो हे पाहणंही महत्त्वाचं आहे. म्हटलं तर संजयनं मोक्याच्या वेळी त्याला डिवचलं आहे. कारण, इंग्लंडदौऱ्यात भारतीय संघ एकूण सहा कसोटी सामने खेळणार आहे. काही वर्षांपूर्वी परदेशात प्रथम पसंतीचा फिरकी गोलंदाज म्हणून अश्विनला पसंती होती. आता ती जागा जडेजानं घेतली आहे. आत्ता अश्विनला संधी मिळाली तर तो नक्कीच संजयला खोटं ठरवण्यासाठी लढेल. एकूणच ‘टीम इंडिया’चं भलं होईल यात शंका नाही.

रवी शास्त्रींचं सूचक मौन?

‘टीम इंडिया’चे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संजय मांजरेकर हे मुळात ‘खडूस’ मुंबईकर! त्यात ते ‘दादर युनियन’ या एकाच क्रिकेटविद्यापीठातून तयार झालेले. एकच कॉलेज आणि एकच मैदान. क्रिकेटमधील दोघांचा कालखंड थोडासा वेगवेगळा असला तरी समालोचनात ते एकमेकांना चांगलेच ओळखीचे. हे शास्त्री ‘टीम इंडिया’चे प्रशिक्षक असताना आणि संजय संघातील खेळाडूंना डिवचणारी टीका करत असताना शास्त्रींकडून जाहीर काहीही मतप्रदर्शन केलं जात नाही. कदाचित संजयच्या टिप्पणीमुळे खेळाडू अधिक तडफेनं खेळणार असतील तर त्यांच्यासाठी ते चांगलंच आहे.

गावसकरांनी कपिलला डिवचलं होतं

प्रतिस्पर्ध्यांना डिवचणं यात मुंबईकरांचा हात कुणी धरू शकत नाही. सन १९७९ मध्ये पाकिस्तानचा संघ भारतात आलेला असताना मुंबई कसोटीपूर्वी कर्णधार सुनील गावसकर यांनी कपिलदेव यांच्यासंदर्भात ‘हा काय फलंदाज आहे?’ अशी टीका लिखित माध्यमाद्वारे केली होती. कपिलपर्यंत तो संदेश पोहोचला होता. दुसऱ्याच दिवशी मुंबईत सुरू झालेल्या कसोटीत फिरकीच्या आखाड्यात भारताचा निम्मा संघ ‘पन्नाशी’त गारद झाल्यावर कपिलदेव यांनी केलेली भन्नाट ६४ धावांची खेळी भारताला विजयपथावर नेणारी ठरली होती. गावसकरांची ‘मोहीम’ फत्ते झाली होती.

आता संजय मांजरेकरचं पुढचं लक्ष्य कोण असणार याची उत्सुकता वाढली आहे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT