sunil chhetri
sunil chhetri sakal
सप्तरंग

सुनील छेत्रीची छत्रछाया

शैलेश नागवेकर saptrang@esakal.com

‘हवं तर आम्हाला शिव्या द्या...पण त्या देण्यासाठी मैदानात आमचा सामना पाहण्यासाठी या...’ असं मन हेलावून टाकणारं आर्जव भारताच्या एका सुपरस्टार फुटबॉलपटूनं तीन वर्षांपूर्वीच केलं होतं.

‘हवं तर आम्हाला शिव्या द्या...पण त्या देण्यासाठी मैदानात आमचा सामना पाहण्यासाठी या...’ असं मन हेलावून टाकणारं आर्जव भारताच्या एका सुपरस्टार फुटबॉलपटूनं तीन वर्षांपूर्वीच केलं होतं. हाच सुपरस्टार खेळाडू आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये देशाची शान तर उंचावत आहेच; पण सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेस मेस्सी यांच्याशी स्पर्धाही करत आहे. हा खेळाडू कोण हे तुमच्या लक्षात एव्हाना आलंच असेल...सुनील छेत्री! भारतीय फुटबॉलला आपल्या छत्रछायेखाली घेणारा हा सुपरस्टार.

कोरोनाच्या अगोदरचा तो काळ होता. मुंबईत भारतीय फुटबॉल संघाचे सामने सुरू होते; पण क्रिकेटवेड्या प्रेक्षकांना त्याचं सोयरसुतक नव्हतं; पण छेत्रीनं केलेल्या या एका विनंतीवरून विराट कोहलीसारखे अनेक दिग्गज खेळाडू त्याच्या पाठीशी उभे राहिले. सर्वांनी मोहीम उघडली. मुंबईकर प्रेक्षकांनीही प्रतिसाद दिला आणि पाहता पाहता भारताच्या पुढच्या सामन्यासाठी स्टेडियम खचाखच भरून गेलं...

‘आमची प्राथमिकता फुटबॉललाच’

आता ताजं उदाहरण पाहू या...या आठवड्यात आयपीएलमध्ये अब्जावधी रुपयांची उधळण होत होती. आयपीएलच्या मीडिया-हक्कांची बोली डोळे विस्फारून टाकणारी होती.

क्रिकेट आणि त्यातही आयपीएल म्हणजे भारतीयांसाठी जणू घरचंच कार्य; पण त्याच वेळी कोलकत्यात भारतीय फुटबॉल संघ हा ‘एएफसी आशिया कप’ची पात्रतास्पर्धा खेळत होता आणि हे सामना पाहण्यासाठी ४४ हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहत होते. प्रेक्षकांचा हा उत्साह आणि पाठिंबा पाहून छेत्रीला काही वर्षांपूर्वी मुंबईत केलेलं आर्जव नक्कीच आठवलं असणार.

मुंबईला जसं ‘क्रिकेटची पंढरी’ म्हटलं जातं तसं कोलकत्याला ‘भारतीय फुटबॉलचं माहेरघर’ असं म्हटलं जातं. आयपीएलचं काय व्हायचं ते होऊ द्या; पण फुटबॉलची प्राथमिकता आम्ही सोडणार नाही, हे त्यांच्या दर्दी प्रेक्षकांनी दाखवून दिलं आणि या प्रेक्षकांना आपल्या खेळामुळे खिळवून ठेवण्याची क्षमता छेत्रीमध्ये आहे.

एकत्रित कामगिरीही महत्त्वाचीच

भारतीय फुटबॉल संघटना सध्या एका नाजूक वळणावर आहे. संघटनेच्या कारभारामुळे तीवर आता न्यायालयनियुक्त प्रशासक आहे आणि प्रशासक असलेल्या देशांवार ‘फिफा’ (आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ) बंदी घालत असते, त्यामुळे भारतीय संघालाही बंदीचा सामना करण्याची भीती असल्यानं छेत्रीनं काही दिवसांपूर्वीच ‘मी अजून किती खेळू शकतो ते माहीत नाही, तसंच ही आशियाई पात्रता स्पर्धा माझी अखेरची स्पर्धा असेल,’ असं विधान केलं होतं; पण आपल्या नेतृत्वाच्या आणि कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर त्यानं सलग दुसऱ्यांदा भारताला ‘आशिया कप’मध्ये खेळण्याचा बहुमान मिळवून दिला. स्वतः छेत्री तर तिसऱ्यांदा ही स्पर्धा खेळणार आहे. सन २०११, २०१९ आणि आता २०२३. छेत्री ३७ वर्षांचा आहे...९० मिनिटं न थकता खेळत राहण्याच्या फुटबॉलच्या या खेळात शारीरिक क्षमतेचा कस लागतो; पण छेत्री या क्षमतेसह कौशल्यातही अजून तरुण आहे. त्याची ऊर्जा आणि आत्मविश्वास संघातील इतरांना प्रेरणा देत असतो.

जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेला फुटबॉल हा खेळ ‘फिफा’शी संलग्न असलेले दोनशेहून अधिक देश खेळतात. त्यांच्या तुलनेत भारत फारच मागं आहे. क्रमवारीत सांगायचं तर १०६ वा नंबर. मात्र, याच भारतातला एक खेळाडू आपल्या १२९ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कारकीर्दीत ८४ गोल करतो ही फार मोठी अभिमानाची बाब आहे. हा गोल करताना छेत्रीनं हंगेरीचा दिग्गज खेळाडू फेरेन्स पुस्कास याच्याशी बरोबरी साधली.

कधीकाळी भारतीय संघ ऑलिंपिकमध्ये खेळला होता; पण त्यानंतर त्याला आशिया खंडाची वेस ओलांडता आलेली नाही. त्यामुळे छेत्रीनं केलेल्या विक्रमांवर काही परदेशी नाकं मुरडतात. ‘दुबळ्या संघांविरुद्ध केलेले गोल आणि विक्रम’ अशी हेटाळणी करतात; पण दुबळा संघ असो वा बलिष्ठ, ९० मिनिटं खेळण्याचं आणि चेंडू गोलजाळ्यात मारण्याचं कौशल्य तर सिद्ध करावंच लागतं. ‘फिफा’शी संलग्न असलेल्या पहिल्या ५०-८० देशांचा अपवाद वगळता इतर देश काही तेवढे महान नाहीत; मग त्यांच्या देशातील अशा कोणत्या खेळाडूनं छेत्रीएवढे गोल केले आहेत? खेळाच्या दुनियेत शाबासकीबरोबरच दूषणंही सावलीप्रमाणे सोबत असतात; पण विजयाचा उन्माद जो बाळगत नाही आणि पराभवानं जो खचून जात नाही तोच खेळाडू आपला ठसा उमटवत असतो. छेत्रीही त्याच श्रेणीतला फुटबॉलपटू. कोलकत्यात झालेल्या आशियाई पात्रतास्पर्धेतील सर्व सामने जिंकल्यामुळे भारतीय संघात एक वेगळाच आत्मविश्वास संचारला आहे. ‘ही स्पर्धा आपली अखेरची असू शकेल,’ असं स्पर्धा सुरू होण्याअगोदर नाराजीनं म्हणणारा छेत्री आता स्पर्धा संपल्यानंतर ‘मी सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे,’ असं सांगत आहे. म्हणजेच, एखादी दिमाखदार कामगिरी वयाच्या सदतिसाव्या वर्षीही कशी प्रेरणा देऊ शकते याचं हे उदाहरण आहे. आता पुढच्या वर्षी ‘आशिया कप’मध्ये भारताचा सामना इराण, जपान, दक्षिण कोरिया, चीन अशा विश्वककरंडक स्पर्धा खेळणाऱ्या संघांशी होऊ शकतो, त्याचबरोबर सौदी अरेबिया, कतार यांचंही आव्हान मिळू शकेल. त्यासाठी एकच छेत्री पुरेसा ठरणार नाही. असे अनेक छेत्री तयार झाले तरच मोठ्या प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकेल.

भारतीय फुटबॉल सुपरस्टार

  • सुनील छेत्री - ८४ गोल, १२९ सामने, सरासरी ०.६५

  • आयएम विजयन - २९ गोल, ६६ सामने, सरासरी ०.४४

  • बायचुंग भुटिया - २७ गोल, ८२ सामने, सरासरी ०.३३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

SCROLL FOR NEXT