- श्रीकृष्ण पुराणिक, saptrang@esakal.com
प्राचीन भारतीय आर्यांचे तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ म्हणजे उपनिषदे होत. या उपनिषदांमध्ये प्राचीन भारतवासी आर्यांच्या तात्त्विक विचारांची आत्यंतिक अवस्था निदर्शनास येते. या उपनिषदांमध्ये साठवलेल्या विचाररत्नांच्या भक्कम आधारावरच आर्यांच्या तत्त्वज्ञानशास्त्राची उभारणी झाली आहे. शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य इत्यादी आचार्यांनी उपनिषदांतील तत्त्वांच्या पायावर आपल्या अद्वैत, विशिष्टाद्वैत व द्वैत तत्त्वज्ञानाची मांडणी केली.
या कारणामुळे उपनिषदांना भारतीय आर्यांच्या इतिहासात अतिशय उच्च दर्जाचं स्थान प्राप्त झालं आहे व ते सर्वथैव योग्यच आहे. ‘उपनिषद्’ हा शब्द ‘सद्’ या धातूला ‘उप’ आणि ‘नि’ ही उपपदं लागून तयार झाला आहे. ‘सद्’ याचा अर्थ बसणं. उपनिषद् याचा अर्थ जवळ बसणं असा होतो. अत्यंत भक्तिभावानं गुरूजवळ बसणं असा या ‘उपनिषद्’ शब्दाचा धात्वर्थ होतो; पण उपनिषद् या शब्दाचा रूढार्थ थोडासा निराळा झाला आहे. अत्यंत भक्तिभावानं गुरूजवळ बसून गुरूकडून जी पारमार्थिक विद्या शिष्य संपादन करतो त्या विद्येला उपनिषद् हा शब्द लावण्यात येतो.
कठोपनिषदावरील आपल्या भाष्याच्या आरंभी उपनिषद् या शब्दाचे निरनिराळे अर्थ शंकराचार्यांनी दिलेले आहेत. आचार्य म्हणतात की, उपनिषद् या शब्दांतील ‘सद्’ या धातूचे ‘विशरण’, ‘गति’ व ‘अवसादन’ असे तीन अर्थ होतात. ‘विशरण’ म्हणजे विध्वंसन. जे मुमुक्षू लोक विषयापासून पराङ्मुख होऊन पारमार्थिक कल्याणाच्या प्राप्तीसाठी उत्सुक असतात त्यांना ज्या विद्येमुळे अविद्येचा विध्वंस करता येतो व पराविद्येची प्राप्ती होते त्या विद्येला उपनिषद् असं म्हणतात.
अथवा ‘सद्’ याचा दुसरा अर्थ ‘गति’ हा घेतला तर ज्या विद्येमुळे ब्रह्माचं ज्ञान होतं त्या विद्येला (ब्रह्मविद्येला) उपनिषद् असं म्हणतात. किंवा, ‘सद्’ या धातूचा ‘अवसादन’ हा अर्थ घेतल्यास जन्म, जरा, मृत्यू या तापांपासून ज्या विद्येमुळे निवारण होतं त्या विद्येलाही उपनिषद् म्हणता येईल. अशा रीतीनं शंकराचार्यानी उपनिषद् या शब्दाचा अर्थ ‘अविद्याविध्वंसिनी ब्रह्मविद्या’ असा केला आहे. हा अर्थ धात्वर्थापासून प्राप्त होत नसून तो ‘उपनिषद्’ शब्दाचा तात्कालिक रूढार्थ आहे हे मात्र ध्यानात ठेवणं आवश्यक आहे. अशा रीतीनं उपनिषदांचा अर्थ ब्रह्मविद्या असा झाल्यानंतर ज्या ग्रंथांमध्ये अगर ज्या मंत्रांमध्ये ही ब्रह्मविद्या सांगितलेली असेल त्या ग्रंथांनाही उपनिषद असं नाव प्राप्त झालं.
तात्पर्य, उपनिषद् या शब्दाचा अर्थ ‘ब्रह्मविद्याप्रतिपादक ग्रंथ’ असा केल्यास त्यात मुळीच वावगं होणार नाही. अशा प्रकारचीं ब्रह्मविद्याप्रतिपादक उपनिषदं किती आहेत त्यांचा नक्की आकडा सांगता येणं अशक्य आहे.
कुणी उपनिषदांची संख्या २५० मानतात. ब्रह्मविद्याप्रतिपादक आणखीही उपनिषदं झाल्यास ही संख्या केव्हाही फुगतच जाईल यात शंका नाही. या २५० उपनिषदांत अल्लोपनिषद, खंडोपनिषद अशा अगदी अर्वाचीन उपनिषदांचीही गणना केली गेली आहे; पण अशा उपनिषदांची संख्या वगळल्यास उपनिषदांची संख्या फारच कमी भरेल यात शंका नाही. त्यातल्या त्यात निरनिराळ्या आचार्यांनी आपापल्या भाष्यामध्ये ज्या उपनिषदांचा वेळोवेळी उल्लेख केला आहे ती उपनिषदंच महत्त्वाची, प्राचीन व अधिक विश्वसनीय मानणं आवश्यक आहे.
अशा प्रकारची शंकराचार्यांच्या ग्रंथांत उल्लेख केली गेलेली उपनिषदं ११ आहेत. ती म्हणजे ‘छांदोग्य’, ‘केन’, ‘ऐतरेय’, ‘कौषीतकी’, ‘ईश’, ‘कठ’, ‘मुंडक’, ‘तैत्तिरीय’, ‘बृहदारण्यक’, ‘श्वेताश्वतर’ व ‘प्रश्न’ ही होत. याशिवाय, ‘अमृतबिंदू’, ‘कैवल्य’, ‘गर्भ’, ‘गोपालतापनी’, ‘छुरिका’, ‘जाबालसंन्यास’, ‘ध्यानबिंदू’, ‘नारायणीय’, ‘नृसिंहोत्तरतापनीय’, ‘महानारायण’, ‘मांडूक्य’, ‘मैत्री’, ‘योगतत्त्व’, ‘रामपूर्व’ (तापनी), ‘वज्रसूची’ अशी मिळून किरकोळ तीस-बत्तीस उपनिषदं आहेत. उपनिषदांचा नक्की काळ ठरवता येणं शक्य नाही. एवढं मात्र खरं की, ‘ब्राह्मणग्रंथां’नंतर उपनिषदं रचली गेली; पण याच्या पलीकडे निश्चयात्मक असं विधान करता येत नाही.
प्रत्येक वेदाची निरनिराळी उपनिषदं आहेत व ती ‘आरण्यकाच्या शेवटचे भाग’ या नात्यानं ‘ब्राह्मणग्रंथांत’ आलेली आहेत. अथर्ववेदांगभूत उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे. शिवाय ॠग्वेद, यजुर्वेद अगर सामवेद यांतील उपनिषदांची नावं ज्याप्रमाणे वेदांच्या निरनिराळ्या शाखांवरून पडलेली आहेत त्याप्रमाणे अथर्ववेदातील उपनिषदांची स्थिती नाही. या वेदातील उपनिषदांची नावं त्यांतील वस्तुविषयावरून पडलेली दिसतात.
ॠग्वेद, यजुर्वेद व सामवेद हे वेद विशेषतः आधी ब्राह्मणवर्गाच्या मालकीचे होते; पण क्षत्रियांनी ज्या वेळी आत्मा व ब्रह्म या विषयांवर विचार करण्यास सुरुवात केली त्या वेळी त्यांनी जी तत्त्वं पुढं मांडली त्यांनाच उपनिषद हे नाव देण्यात येऊन अशा प्रकारच्या पुष्कळ उपनिषदांची अथर्ववेदात गणना होऊ लागली. ‘ईशोपनिषद’ एवढंच मात्र संहितांतर्भूत आहे. अथर्ववेदातील उपनिषदांचे डायसन यांनी पाच प्रकार पाडले आहेत.
त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे, ज्या उपनिषदांमध्ये वेदान्ताचं उद्घाटन केलेलं आहे अशी उपनिषदं. उदाहरणार्थ: ‘मुंडक’, ‘प्रश्न’, ‘मांडुक्य’, ‘गर्भ’, ‘गारुड’ इत्यादी. दुसरा प्रकार योगोपनिषदांचा होय. उदाहरणार्थ: ‘अमृतबिंदू’,‘क्षुरिका’,‘नादबिंदू’,‘ब्रह्मबिंदू’ इत्यादी. तिसरा प्रकार संन्यासपर उपनिषदांचा होय. उदाहरणार्थ : ‘ब्रह्म’, ‘सर्वसार’ ‘संन्यास’,‘आरुणेय’,‘आश्रम’ वगैरे. चौथा प्रकार शिवोपासनापर उपनिषदांचा होय. उदाहरणार्थ : ‘कैवल्य,’ ‘नीलरुद्र,’ ‘अथर्वशिरस’ इत्यादी. पाचवा प्रकार विष्णुपर उपनिषदांचा होय.
उदाहरणार्थ : ‘आत्मबोध’,‘नारायण, ‘रामपूर्वतापिनी,‘रामोत्तरतापिनी वगैरे. उपनिषदांचा नक्की काल ठरवता येणं जरी अशक्य असलं तरी जी जुनी व महत्त्वाची अशी उपनिषदं आहेत त्यांच्यापैकी अगोदरची कोणती व नंतरची कोणती हे अंतर्गत पुराव्यांवरून ठरवता येतं. या उपनिषदांचेही डायसन यांनी चार विभाग पाडलेले आहेत, ते असे (१) प्राचीन गद्यात्मक उपनिषदं : बृहदारण्यक, छांदोग्य, तैत्तिरीय, ऐतरेय, कौषीतकी, केन (२) पद्यात्मक उपनिषदं : काठक, ईश, श्वेताश्वतर, मुंडक, महानारायण (३) नंतरची गद्योपनिषदं : प्रश्न, मैत्रायणीय, मांडूक्य (४) नंतरची अथर्वोपनिषदं: गर्भ, पिंड, आत्मबोध इत्यादी.
या चौथ्या प्रकारच्या उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे. उपनिषदांच्या कर्त्यांविषयीही निश्चयात्मक सांगणं अवघड आहे. जी उपनिषदं कोणत्या तरी आरण्यकाच्या अखेरीस आलेली आहेत, त्या उपनिषदांचे कर्ते, ज्यांनी ‘ब्राह्मणग्रंथ’ रचले तेच होत असं म्हणता येईल; पण याशिवाय इतर उपनिषदांच्या कर्त्यांचा निश्चय करता येत नाही.
उपनिषदांच्या कर्त्यांची नावं मुद्दाम न देण्यात एक-दोन हेतूही आढळून येतात. उपनिषदांत तत्त्वज्ञानाविषयीचे परमोच्च विचार प्रकट झाल्यानं ते विचार कुण्या एका विशिष्ट व्यक्तीचे आहेत असं म्हटल्यास त्या विचारांविषयी जितका आदर उत्पन्न होतो त्यापेक्षा शतपटींनी अधिक आदर ते विचार ‘ईश्वरनि:श्वास’ आहेत हे म्हटल्यानं होईल ही गोष्ट प्राचीनांच्या मनात आली असावी व त्यामुळे त्यांनी अमक्या उपनिषदाचा कर्ता अमका ॠषी असं न म्हणता, ‘अखिलवेद हे ईश्वराचे नि:श्वास व म्हणूनच अपौरुषेय आहेत’ अशा प्रकारची विचारसरणी त्या वेळच्या तत्त्वज्ञांनी, पंडितांनी पत्करली असावी असं दिसतं.
याचा दुसरा एक फायदा असा झाला की, वरील विचारसरणीमुळे उपनिषदांचं सांप्रदायिक अगर वैयक्तिक स्वरूप जाऊन त्यांना सार्वत्रिक स्वरूप प्राप्त झालं. दुसरं कारण असं की, काही उपनिषदं निरनिराळ्या ‘ब्राह्मणां’तील व ‘वेदां’तील निरनिराळे महत्त्वाचे मंत्र एकत्र करून रचली गेल्यामुळे अमक्या एका व्यक्तीचं नाव कर्ता या नात्यानं देता येणं शक्य नसावं असं दिसतं.
(लेखक अध्यात्मक्षेत्राचे गाढे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.