Rajaram Maharaj
Rajaram Maharaj 
सप्तरंग

राजाराम महाराजांच्या इतिहासावर प्रकाश

श्रीमंत कोकाटे

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या "शिवपुत्र छत्रपती राजाराम' या ग्रंथाचे प्रकाशन आज (शनिवार) पुण्यात होत आहे. या निमित्ताने छत्रपती राजाराम महाराजांच्या इतिहासावर एक दृष्टिक्षेप.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार हे अभ्यासू वृत्तीने आणि निष्पक्षपणे इतिहासाचे संशोधन, मांडणी करीत असतात. डॉ. पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती संताजी घोरपडे, महाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील इत्यादी महापुरुषांवर संशोधनात्मक लेखन करून वस्तुनिष्ठ इतिहासाची मांडणी केली आहे. त्यांच्या अविरत परिश्रमातून "शिवपुत्र छत्रपती राजाराम' हा अभ्यासपूर्ण ग्रंथ आकाराला आला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन पुण्यात आज (ता. 10 मार्च) कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होत आहे.

"शिवपुत्र छत्रपती राजाराम' या चरित्रग्रंथासाठी डॉ. जयसिंगराव पवार यांनी पर्शियन, (खाफीखान, साकी मुस्तैदखान, मोगल दरबाराची बातमीपत्रे) फ्रेंच, इंग्रजी, मराठी इत्यादी समकालीन आणि अस्सल साधनांचा संदर्भ घेतलेला आहे. डॉ. पवार यांच्या या ग्रंथामुळे राजाराम महाराजांची प्रतिमा नव्याने समोर येत आहे. छत्रपती राजाराम महाराज म्हणजे स्थिरबुद्धी, सौम्य प्रकृती अशी जी प्रतिमा निर्माण करण्यात आली होती ती निराधार असून, छत्रपती राजाराम महाराज हे पराक्रमी, मुत्सद्दी, समंजस, निर्भीड, उत्तम संघटक, धोरणी राजे होते, हे डॉ. पवार यांनी या ग्रंथामध्ये मांडले आहे. 
राजाराम महाराजांच्या वाट्याला फक्त तीस वर्षांचे (1670 ते 1700) आयुष्य आले. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर विस्कटलेले स्वराज्य सावरण्याचे महान कार्य राजाराम महाराजांनी केले. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या मराठा साम्राज्याला ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. मोगलांकडे गेलेल्या मराठा सरदारांना मराठ्यांच्या राज्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव करून देताना ते म्हणतात, ""हे मऱ्हाठे राज्य तुम्ही आम्ही मऱ्हाठे लोकी इनामासी खता (लबाडी) न करिता मराठा धर्माची दुरे (ईर्ष्या-अभिमान) धरून स्वामिकार्य करावे.'' शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा धर्माचे रक्षण करणे ही तुमची- माझी सर्वांची प्रामाणिक जबाबदारी आहे, याची जाणीव त्यांनी या सरदारांना करून दिली. राजाराम महाराजांनी सटवाजी डफळे, नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, नागोजी माने, गणोजी शिर्के इत्यादी मोगलांकडील मराठा सरदारांना स्वराज्यात परत आणण्याचे काम केले. यातून त्यांची मुत्सद्देगिरी दिसते. नावजी बलकवडे, विठोजी करके, बहिर्जी घोरपडे, हणमंतराव निंबाळकर, गंगाजी बाबर, अमृतराव निंबाळकर, गिरजोरी यादव, कृष्णाजी सावंत, चांदोजी व नागोजी पाटणकर, बडोजी ढमाले, मकाजी देवकाते, नामाजी गायकवाड इत्यादी सरदार या काळात नावारूपाला आले. राजाराम महाराजांच्या काळात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे पराक्रमी सरदार उदयाला आले. त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य राजाराम महाराजांनी केले. 

राजाराम महाराजांचा जन्म झाल्यानंतर शिवाजी महाराज म्हणाले होते, ""राजाराम मोगलशाही पालथी घालील.'' त्यांचा हा विश्‍वास राजाराम महाराजांनी सार्थ ठरविला. दिल्ली जिंकण्यासाठी घोरपडे बंधूंना त्यांनी प्रोत्साहन दिले, तर कृष्णा सावंत यांना फौज देऊन उत्तेरकडे पाठवले. नर्मदा पार करून लष्करी मोहीम काढणारे कृष्णा सावंत हे पहिले मराठा वीर आहेत. 

राजाराम महाराजांनी जिंजीवरून महाराष्ट्रातील लष्करी मोहिमांसाठी वेळोवेळी आर्थिक मदत पाठवली. विशेषतः 1690 मध्ये एक लाख होनांचा खजिना त्यांनी रायगडाकडे पाठवला होता. स्वराज्याची अर्थव्यवस्था भक्कम असावी याकडे त्यांचे लक्ष होते. अर्थव्यवस्था, लष्करी यंत्रणा, प्रशासन यावर त्यांची उत्तम पकड होती. जिंजीच्या वेढ्यात असताना मोगलांचे संकट टाळण्यासाठी झुल्फिकार खानाबरोबर त्यांनी अंतःस्थ मैत्री प्रस्थापित केली, असे मार्टिन, तसेच इंग्रजांकडील नोंदींवरून दिसते. यातून त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा प्रत्यय येतो. याबाबतचे समकालीन संदर्भ डॉ. जयसिंगराव पवार यांनी या ग्रंथात दिले आहेत. 

राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत सभासदांकडून "शिवचरित्र' लिहून घेतले. हा मराठी भाषेचा आणि शिवचरित्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाईंना युद्धकला, राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे ताराबाईंनी मराठा साम्राज्याचे मोठ्या हिमतीने संवर्धन आणि संरक्षण केले. राजाराम महाराज हे पराक्रमी, निर्भीड, मुत्सद्दी, समंजस, धोरणी, प्रजावत्सल राजे होते. मोगलांशी कडवी झुंज देत स्वराज्याचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. तीन मार्च 1700 रोजी प्रकृतीअस्वास्थ्यामुळे त्यांचे सिंहगडावर निधन झाले. त्यांच्या प्रेरणादायी चरित्राचा अभ्यासपूर्ण परामर्श घेणारा हा ग्रंथ आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT