tamasha artist
tamasha artist 
सप्तरंग

वग लांबलाय, गणगवळणीची मजा घ्या!

श्रीमंत माने

गवळणी दुधदुभतं घेऊन मथुरेच्या बाजाराला निघाल्यात. कुणाच्या डोईवर दूधाची चरवी. कुणाच्या काखेला ताकाची कळशी. कुणाच्या हातात दह्याची किटली. कापडात गुंडाळलेला लोण्याचा गोळा. हसणं-खिदळणं सुरू आहे.

जरा आवाज वाढला की मावशीला राग येतो. "गपा की गं, किती बोलावं बाईमाणसानं? नटमोगऱ्या नुसत्या!!!', असं दटावते. बहुतेकवेळा ती मावशी खरं म्हणजे "तो'च असतो. सोबत आणखी एखादा नाच्या किंवा सोंगाड्या. मराठी पिक्‍चरमधल्या गणपतराव पाटलांसारखा. दिस डोईवर यायच्या आधी बाजार गाठायला पाहिजे म्हणून अवघड वाट अन्‌ वळणाची वाट तुडवतायत सगळ्याजणी. इतक्‍यात डोक्‍यावर मोरपीस लावलेला किस्ना अन्‌ पाय वडत वडत त्याच्या मागं धावणारा पेंद्या आडवा येतो. "थांबा', असा आवाज देतो. "द्या ते सगळ दहीदूधलोणी', म्हणतो. मावशी पुढं अन्‌ तिच्यामागं लपलेल्या गवळणी त्याची विनवणी करतात. किस्ना, पेंद्या अन्‌ त्याचे सवंगडी काही ऐकायला तयार होत नाहीत. मग सुरू होतात कान्हाच्या विनवणीच्या एक ना अनेक तऱ्हा. "माझ्या दुधात नाही पाणी' पासून "कान्हा माझी घागर गेली फुटून' पर्यंत. मध्येच एखादं पिक्‍चरचं गाणं. "सख्या चला बागामंदी'सारखं. प्रेक्षकांवर भिरकावलेले इश्‍काचं बाण. फक्‍कड लावणीत एखादं हिंदी गाणंही चालतं.

तमाशात वग सुरू होईपर्यंत ही गणगवळण सुरू राहते. वग म्हटला की राजा, परधान, सेनापती, सावकार असं सारंच आलं. "गाढवाचं लगीन' असलं तर गंग्या, गंगी, गाढवरूपातला गंधर्व, सातमजल्याची माडी, राजा व त्याची राजकन्या. एखाद्या वेळंला मागच्या कपडेपटात काही अडचण असली, की कनातीच्या बाजूला भलतीच लगबग होते. गण-गवळण जरा लांबवायला सांगितली जाते. किस्ना मग फिरून फिरून गवळणींची वाट अडवतो. पेंद्या पुन्हा पुन्हा त्यांची मस्करी करतो. मावशी पुन्हा पुन्हा चिडते. नाच्याच्या टाळ्या जास्तीच्या वाजतात. गाण्याच्या जणू भेंड्या सुरू ठेवाव्या लागतात.

पाचशे अन्‌ हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला 8 नोव्हेंबरला. तेव्हापासून नोटबंदीच्या तमाशाचं असंच सुरू आहे. चाळीस दिवस झाले आता उणेपुरे. मोदींनी सांगितलेल्या मुदतीतले दहाच दिवस आता उरलेत. दरम्यान, सरकार, पंतप्रधानांसह झाडून सगळे मंत्री, रिझर्व बॅंक, वित्तसचिव, नीती आयोग रोज नवा "इव्हेंट' घडवून आणतायत. तसे या मंडळींना "इव्हेंट' नवे नव्हते व नाहीतही. पण, किती दिवस हा रोज कसला ना कसला "इव्हेंट' करणार? जनतेला गुंतवून ठेवण्याच्या ना ना क्‍लुप्त्या वापरणार? त्यासाठी आधी जाहीरपणे रडारड, मग चिडाचीड, शेवटी आरोपांची धडाधड रंगली. ब्लॅकमनी, टेररिस्ट, नक्‍सलाईटस्‌, भ्रष्टाचार, कॅशलेस इकॉनॉमी, कोई छुटेगा नही, छोडूंगा नही, हे या रोजच्या "इव्हेंट'चे 'कीवर्डस्‌' आहेत.
राजधानी दिल्लीत रोज किमान तीन-चार पत्रकार परिषदा होतातच होतात. सुरवातीच्या पंधरा दिवसांत, किती जमा झाले, किती बदलले गेले, एटीएम मशीन किती दुरुस्त झाल्या वगैरे माहिती असायची. त्या माहितीला तडका होता, दोन हजारांची नवी नोट बाजारात आल्याच्या तिसऱ्याच दिवशी तिची डुप्लीकेट आल्याचा! थोडा धक्‍का होता, अतिरेक्‍यांकडे दोन हजारांच्या नव्या नोटा सापडल्याचा! जोडीला सत्ताधाऱ्यांच्या "वॉररूम'मधून तयार झालेले सामान्यांचे प्रचंड ज्ञानवर्धन करणारे संदेश. त्यात खऱ्याखोट्या माहितीचं चलाख मिश्रण. अणूस्फोटाच्या वेगानं होणारे "फॉरवर्ड'. काय खरं अन्‌ काय खोटं कळूच नये असा सगळा संभ्रमाचा बाजार!

नोटांच्या साठ्यावरचे छापे सुरू झाले. इथं इतके सापडले, तिथं तितके सापडले. अमक्‍या ठिकाणी धाड पडली. फलाण्याचा खजिना सापडला. बॅंकांसमोर अन्‌ एटीएमसमोर लागलेल्या रांगांच्या फोटोंवर आता तारीख अन्‌ ठिकाण टाकलंच पाहिजे असं अजिबात नाही. सगळे फोटो सारखेच असतात. याच रागांमध्ये उभे असताना कोसळलेल्यांच्या, जीव गमावलेल्यांसाठी लोक हळहळले. काहींनी त्यांच्या नावानं गळा काढून झालं. त्यांच्या मरणावर हौतात्म्याचा शिक्‍का मारून झालं. त्यांना वीरमरणाचं प्रमाणपत्र, पेन्शन द्या, अशी मागणीही होऊन गेली. त्यानंतर, बॅंकांच्या करामती एकेक करून पुढे यायला लागल्या. "गंगाधरही शक्‍तिमान है, वैसाही अमूक बॅंकही स्वीस बॅंक है', असं वाटण्याजोगं वातावरण आहे.

हे सगळं सुरू असताना संसदेतल्या कपडेपटात राजा काही तयार होत नव्हता. वग लांबत चालला होता. तिथला व कनातीतला गोंधळ म्हणाल तर विचारूच नका. देशातल्या जनतेला "याची देही याची डोळा' हे पाहायला मिळालं, हे दुर्दैव! तमाशात असतात, तसे संसदेतही कलगी व तुऱ्यावाले. म्हणजे शैवउपासक व वैष्णवाचे भक्‍त. अध्यक्ष-सभापतींच्या उजव्या-डाव्या बाजूच्या बाकांवरून कलगी-तुरा रंगला. "बोलने नही दिया जाता', हे तमाशातच शोभावं असं एक खास "फार्सिकल'ही होऊन गेलं.
इतकं सारं झालं तरी सगळ्या त्रासातून सुटका करणारा, मनोमन आनंद देणारा "वग' सुरू व्हायची काहीही लक्षणं नाहीत. चलनातून बाद झालेल्या सगळ्या नोटा कधी पूर्णपणे बदलून वलनात येणार हे नक्‍की नाही. बारकाईनं पाहा, "सामान्य जनतेला होणारा त्रास पन्नास दिवस हळूहळू वाढत जाईल व त्यानंतर हळूहळू तो कमी होत जाईल', अशी शाब्दिक चलाखी दीसा इथल्या सभेपासून सुरू झालीय. म्हणजे, नव्या वर्षातलेही किमान पन्नास दिवस धरून चाललं पाहिजे. नाहीतरी एकदा बारीसाठी बसल्यावर प्रेक्षकांच्या हाती काय उरलेलं असतं? वग सुरू होस्तोवर गवळणींचा तोरा न्याहाळायचा. पैजणांच्या तालावर डोलायचं. लगबग गोड मानून घ्यायची. मावशीच्या लटक्‍या संतापावर हसायचं. किस्ना, पेंद्या आहेच फिरून फिरून स्टेजवर यायला. तो आला, त्यानं वाट अडवली की गवळणींनी गाणं म्हणून, नाचून वगैरे त्याच्याभोवती पिंगा घालायचा, मनधरणी करायची.

बॅंकेच्या खात्यावर पैसे असूनही व रांगा लावूनही ते मिळत नसल्यामुळं वैतागलेलो आपण सगळे या तमाशाचे प्रेक्षक आहोत, एवढं नक्‍की आहे. हे विचारू नका, की किस्ना कोण, पेंद्या कोण, गवळणी कोण, मावशी कोण, नाच्या कोण? ...अन्‌ सर्वांत महत्वाचं म्हणजे वगाचं नाव नक्‍की असलं तरी तो सुरू कधी होणाराय, हेही विचारू नका!

(लेखासाठीचे छायाचित्र http://sudhirsikarwar.blogspot.in/ या ब्लॉगवरून घेतले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT