सप्तरंग

साखरपट्ट्यातील खडाखडी...(डॉ. श्रीरंग गायकवाड)

डॉ. श्रीरंग गायकवाड

पश्‍चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर परिसरात दोन आखाडे प्रसिद्ध आहेत. एक कुस्त्यांचा आणि दुसरा राजकारणाचा! छत्रपती शाहू महाराजांच्या प्रोत्साहनामुळे कुस्तीची जिंदादिल परंपरा इथं कायम आहे, तर यशवंतराव चव्हाणांसारख्या द्रष्ट्या नेत्यामुळे इथं विस्तारलेला सहकार आणि त्याभोवती फिरणारं राजकारण राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवतं. सध्या या दोन्ही आखाड्यांमध्ये चांगलीच खडाखडी ऐकू येते आहे.

गावोगावच्या उरुसांमधले कुस्तीचे आखाडे सुरू झाले आहेत, तर आगामी निवडणुकीमुळे राजकीय फडातही दंड-बैठका सुरू आहेत. या फडांचे वस्ताद मात्र, आपल्याच मल्लांनी ठोकलेल्या शड्डूंमुळे चिंतावतील, असं वातावरण आहे. कारण निवडणुकीला सामोरे जाताना आपापले गड बळकट करायला हवेत. पण ते राहिलं बाजूला आणि गडकऱ्यांनी एकमेकांवरच शरसंधान सुरू केलं आहे. निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप या प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. 

परवाच मुंबईत काँग्रेसबरोबर लोकसभेच्या ४८ पैकी एकमत न झालेल्या आठ जागांबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्यात कोल्हापूर लोकसभेसाठी विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्‍चित झाली. त्याला माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी आक्षेप घेतला आणि आपण स्वत:च इच्छुक असल्याचं सांगितलं.

एवढंच नव्हे तर ‘महाडिक दिल्लीत शरद पवारांसोबत, मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या आगेमागे आणि कोल्हापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत असतात. पक्षविरोधी कृत्ये करतात,’ असा पाढाच मुश्रीफांनी पवारांसमोर वाचला. यातून गेल्या निवडणुकीप्रमाणं मुश्रीफ हे महाडिकांच्या सोबत कितपत राहतील याबाबत शंका आहे. 

दुसरीकडे कोल्हापुरातील आघाडीचे प्रमुख शिलेदार, एकेकाळचे जीवलग मित्र असणारे बंटी आणि मुन्ना अर्थात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि ‘राष्ट्रवादी’चे खासदार धनंजय महाडिक आता एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी बनलेत. त्यामुळे आघाडी होऊनही काँग्रेसचे कार्यकर्ते कोल्हापुरात महाडिकांना मदत करतील, याची ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांनाही खात्री वाटत नाही. काही दिवसांपूर्वीच एकेकाळच्या ‘राष्ट्रवादी’च्या महिला आघाडीच्या प्रमुख व हातकणंगलेच्या माजी खासदार निवोदिता माने यांनी नाराज होऊन मुलगा धैर्यशील यांच्यासह हातावर शिवसेनेचे ‘शिवबंधन’ बांधून घेतले आहे.      

कोल्हापूर परिसर म्हणजे काँग्रेसचा एकेकाळचा पारंपरिक बालेकिल्ला. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सवतासुभ्यानंतर भाजप-शिवसेनेला पश्‍चिम महाराष्ट्रात शिरकाव करायला जागा मिळाली. गेल्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले. पण या पक्षातही आता सारे काही आलबेल नाही. ‘लोकसभेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशीच जास्त संपर्क आहे. त्यांना आमची गरज आहे की नाही?’ असा सवाल शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी रविवारी विचारला.

शिवसेनेचे संपर्कमंत्री दिवाकर रावते यांच्या तोंडावरच पक्षातील ही खदखद व्यक्त झाली. महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायला निघालेल्या शिवसेना नेतृत्वाला पश्‍चिम महाराष्ट्रातील ही पक्षांतर्गत बेकी परवडणारी नाही. भाजपपासून दुरावलेले हातकणंगलेचे स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांच्याशी ‘राष्ट्रवादी’ने आता सलगी सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत बसलेला दणका, भाजपच्या ताब्यात गेलेली सांगली महापालिका, जिल्हा परिषद आणि तोंडावर आलेली निवडणूक साखरेच्या राजकारणामुळे कडू होऊ नये, असा ‘राष्ट्रवादी’चा प्रयत्न आहे. 

साखरेच्या माध्यमातून काँग्रेसचं राजकारण महाराष्ट्राच्या पोटात शिरलंय, हे लक्षात आलेल्या भाजपनं या साखरपट्ट्यावर लक्ष केंद्रित केलंय. भाजपची मंडळी ‘राष्ट्रवादी’, काँग्रेस आणि शिवसेनेच्या राजकारणावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. संधी मिळताच यातील नाराजांना आपल्याकडे ओढण्याची चाल खेळली जात आहे. शेती आणि साखरेचं राजकारण आपलंसं करण्यासाठी राजू शेट्टींचे सहकारी सदाभाऊ खोतांना सुभेदारी दिली गेली.

‘वारणा’च्या माध्यमातून सहकाराचं साम्राज्य वाढवणारे माजी मंत्री विनय कोरेंच्या जनसुराज्य पक्षासोबत भाजपने सलगी वाढवली आहे. कोल्हापूर गादीचे छत्रपती संभाजीराजे, तसेच समरजितसिंह घाटगे आदींसारखे नेते भाजपमध्ये दाखल झाले. सांगलीत नागनाथअण्णा नायकवडी यांचे चिरंजीव वैभव यांना बळ देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडं अजूनही काँग्रेसची पकड असणाऱ्या सहकार चळवळीवर कब्जा मिळविण्यासाठी सहकारी संस्था, बॅंकांचे कायदे आणि नियमांमध्ये बदल करण्यात येत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारीही मोडण्याचा प्रयत्न झाला.

कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटलांना दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री बनवून त्यांच्यामार्फत पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड बसविण्याचा जोरदार प्रयत्न भाजप करत आहे. त्याला काही प्रमाणात यशही येताना दिसत आहे. अशा वेळी ‘राष्ट्रवादी’, काँग्रेस आणि शिवसेना नेतृत्वासमोर पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान आहे. 

नेत्यांमधील ही दुही कार्यकर्ते आणि मतदारांना रुचणारी नाही. त्यांना पश्‍चिम महाराष्ट्राचं राज्याच्या राजकारणात असलेलं अढळ स्थान, कोल्हापूरचा विकास आणि सन्मान महत्त्वाचा वाटतो. राजकीय साठमारीत कोल्हापूरला राज्याचे नेतृत्व करण्याची उसंतच मिळालेली नाही. मुख्यमंत्रिपद भूषविण्याची संधी कोल्हापूरला अद्याप मिळालेली नाही, अशी खंत नुकतीच श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी व्यक्त केली. त्यांची ही खंत म्हणजे कोल्हापूरच्या जनतेची खंत आहे. पण पक्षांतर्गत सुंदोपसुंदी थांबली, तरच राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT