MPSC Student
MPSC Student sakal
सप्तरंग

प्लॅन बी...

अवतरण टीम

- सोनाली लोहार, sonali.lohar@gmail.com

सरकारी अधिकारीपद मिळवण्यासाठी अनेक तरुण लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यात आपले आयुष्य खर्ची घालतात. आर्थिक सुरक्षितता, सन्मान आणि आपण समाजाला काही देणं लागतो या उच्च भावनेपोटीच ते या परीक्षेची तयारी करत असतात. हे मिळवण्यासाठी परीक्षा देतानाच एक ‘प्लॅन बी’ असणं गरजेचं आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल नुकताच लागला. ११०५ पदांसाठी देशभरातून जवळपास १० लाखांच्या वर उमेदवारांनी परीक्षेचा फॉर्म भरला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ‘अ’ आणि ‘ब’ संवर्गातील ६७३ पदांसाठीही लवकरच परीक्षा होणार आहेत. दरवर्षी अंदाजे २० लाखांच्यावर मुलं परीक्षेसाठी तयारी करत असतात आणि यापैकी जवळपास पाच लाख मुलं या परीक्षांना बसतात. उपलब्ध पदांची संख्या आणि परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या बघितली तर लक्षात येईल की जवळपास ०.००११% इतकेच विद्यार्थी हे पदांसाठी पात्र ठरतात, उर्वरित ९९.९९% उमेदवार दुसऱ्या वर्षीच्या तयारीला लागतात.

आयोगाचे निकाल लागले रे लागले की यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो टाकून पानभर जाहिराती मिरवणारे गावोगावचे महागडे कोचिंग क्लासेस आपल्या अपयशी ठरलेल्या अशा मुलांचीही संख्या कधी सांगतात का हो?! काय होतं या मुलांचं पुढे?

अर्जुनाला जसा पोपटाचा फक्त डोळाच दिसायचा तसंच काहिसं या विद्यार्थ्यांचं असतं. यशाच्या संभाव्यतेच्या धूसर धाग्याला पकडून ही मंडळी आयुष्याची काही अत्यंत उमेदीची वर्षे पणाला लावतात आणि ते गैर नव्हेच, पण या प्रवासात तग धरून राहण्यासाठी आवश्यक असणारी आर्थिक, मानसिक आणि शारीरिक क्षमता मात्र प्रत्येकात असेलच असे नव्हे. वर्षानुवर्ष हुलकावणी देणारं यश तरुणांना नैराश्याच्या गर्तेतही ढकलत जातं. यापैकी बरेचजण पालकांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असतात.

वयाच्या ४१व्या वर्षी परीक्षा देणाऱ्या एका उमेदवाराविषयी मी नुकतंच ऐकलं. या ‘मुलाने (?)’ गेली काही वर्षें परीक्षेची तयारी करणं आणि परीक्षा देणं या व्यतिरिक्त इतर काहीही केलं नाही. परीक्षा शुल्कही पालकच भरतात. जेव्हा वयोमर्यादा संपेल तेव्हा पुढच्या आयुष्यात तो काय करणार हे या क्षणीतरी कोणालाच ठाऊक नाही. तो ४० वर्षांचा म्हणजे पालक नक्कीच साठी-पासष्ठीचे. आता या वयात मुलाला स्थिरस्थावर करण्याची जबाबदारीही त्यांचीच! परीक्षांचा ध्यास घेताना आणि त्याबाबत नियोजन करताना एक ‘प्लॅन बी’ असणं किती गरजेचं आहे, ते यावरून समजतं.

सरकारी पद हे जर आर्थिक सुरक्षितता, सन्मान आणि आपण समाजाला काही देणं लागतो या उच्च भावनेपोटीच हवं असेल तर या तीनही गोष्टी मिळवण्याचे इतरही मार्ग आहेत, त्यांचाही तरुणांनी नक्कीच विचार करावा.

आपल्याच राज्यातली पुढील काही उदाहरणं. या तरुणांनी वयाच्या विशीतच वेगळे मार्ग धरले आणि आज ते लाखोंची उलाढाल असलेले व्यवसाय करीत आहेत.

१. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील विष्णू थिटे यांनी २३ व्या वर्षी केवळ एका कामगाराला सोबत घेऊन वेल्डिंग-फॅब्रिकेशन व्यवसाय सुरू केला. प्रवास सोपा नव्हता. आज १० कोटींची उलाढाल असलेल्या या युनिटमध्ये ७० कामगार आणि पाच इंजिनियर आहेत. आठवड्याचा एक दिवस नवउद्योजकांना मार्गदर्शनासाठी राखून ठेवणारे थिटे म्हणतात, ‘युवकांनी शहरात ५० हजारांची नोकरी करण्यापेक्षा ‘सीजीटीएमएस’सारख्या शासनाच्या अनेक सुलभ योजनांचा लाभ घेऊन गावी स्वतःचेच व्यवसाय सुरू करावेत. इतर युवकांनाही प्रशिक्षित करावं. रोजगार उपलब्ध करावेत आणि स्वतःच तरुणांसाठी आदर्श बनावं.’

२. अशाचप्रकारे ‘लेझर कटिंग’चा यशस्वी उद्योग सुरू करणारे माढा तालुक्याचे विठ्ठल गवळी म्हणतात, ‘नोकरी ही तुमच्या गरजा पूर्ण करते; पण उद्योग हा तुमचे स्वप्न पूर्ण करतो. ग्रामीण भागात व्यवसायाच्या अनेक सुवर्णसंधी आहेत. सरकारच्या अनेक प्रशिक्षण योजना आहेत. त्यांचा लाभ घेतला तर कर्ज, सबसिडीज हे सगळंच मिळणं सुलभ होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या एका व्यवसायाने तुम्ही अनेक पूरक व्यवसायांनाही चालना देता.’

३. हिंगोलीचे गजानन भालेराव हे खरं तर अल्पशिक्षित, पण बाजारपेठेत मध, मेण आणि पोलन्सला मागणी आहे हे त्यांनी हेरलं आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन मधुमक्षिका पालनाच्या व्यवसायात उडी घेतली. आज हा व्यवसाय मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि त्यापलीकडेही पसरला आहे. शालेय शिक्षणही पूर्ण करू न शकलेले गजानन आज विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन तरुणांना मार्गदर्शन करतात, प्रशिक्षितही करतात.

या उदाहरणांच्या निमित्ताने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना सांगणं इतकंच की, स्वप्न बघा पण ती डोळसपणे बघा! ‘परीक्षांमधील यश’ इतकीच यशाची व्याख्या नव्हे हे कायम स्मरणात ठेवून इतर पर्यायही नेहमी हातात ठेवा.

(लेखिका व्हॉईस थेरपिस्ट आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT