Rohit Sharma
Rohit Sharma sakal
सप्तरंग

सुधारणेसाठी चुका मान्य करण्याची गरज

सुनंदन लेले saptrang@esakal.com

भारतीय क्रिकेट संघाच्या असंख्य सामन्यांचं वार्तांकन केल्यावर असं स्पष्ट जाणवत आहे की, खूप मोठे बदल झाले आहेत. धोनी कर्णधार होता तोपर्यंतच्या काळात संघ पराभूत झाल्यावर कर्णधार किंवा प्रशिक्षक पत्रकारांशी बोलायला आले, तर पराभवाची कारणं देताना झालेल्या चुका काही प्रमाणात तरी मान्य करायचे. गेल्या ५-७ वर्षांत कोणाही पत्रकाराने काहीही प्रश्न विचारो, त्याचं उत्तर देताना ‘नॉट रिअली’, अशा किंवा याच आशयाच्या शब्दांनी सुरुवात केली जाते.

याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, पत्रकारांनी काहीही विचारो, त्याच्याशी संघ व्यवस्थापन सहमत नाही हे अगदी सांगितलं जातं. माध्यमं आणि माजी खेळाडू एका मताचे आहेत जे संघाचं हित इच्छित नाहीत आणि संघ दुसऱ्‍या बाजूला जो सतत सुधारणेचा, सर्वोत्तमतेचा ध्यास घेऊन खेळत आहे असं चित्र ठरवून रंगवलं जातं. मग पराभवानंतर प्रशिक्षक किंवा खेळाडूला तिरका प्रश्न विचारला की, संघ त्या पत्रकाराला लक्षात ठेवतो.

बीसीसीआयसुद्धा टीका करणाऱ्‍या पत्रकारांना आणि माजी खेळाडूंना नेम धरून लक्षात ठेवते असंच सातत्याने आढळून आलं आहे. टीका करणारे माजी खेळाडू आणि पत्रकार भारतीय क्रिकेटचं हित चिंतणारे नाहीत, असाच आविर्भाव आणला जातो.

तसं बघायला गेलं तर भारतीय संघाने चांगला खेळ केल्यावर ज्या प्रमाणात कौतुक केलं जातं, त्याच्या तुलनेत खराब खेळ केल्यानंतरची टीका कमी प्रमाणात असते. कौतुकाचं मोल ठेवलं जात नाही; पण टीका मात्र बरोबर लक्षात ठेवली जाते आहे. कौतुक करणाऱ्‍या भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना गृहीत धरलं जातं आणि टीका करणाऱ्‍या माजी खेळाडू आणि पत्रकारांना टार्गेट केलं जातं. गेली दहा वर्षं आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धेत एकही विजेतेपद पटकावण्यात भारतीय संघाला यश आलेलं नाहीये, हे सत्य चाहत्यांना बोचत आहे.

अर्थात, खेळाडूंना त्याची निराशा, कमालीचा त्रास होतो आहे. पण जर चुका कबूल केल्या नाहीत तर सुधारणा होणार कशी, हा प्रश्न मनात पिंगा घालतो आहे. गेल्या पाच वर्षांतील भारतीय क्रिकेट संघाची दोन देशांतील मालिकांमधली कामगिरी उत्तम राहिली आहे. विराट कोहलीने भारतीय वेगवान गोलंदाजांना तंदुरुस्तीच्या पातळीवर वर नेण्याचा ध्यास घेतला, ज्याचा खूप मोठा चांगला परिणाम झाला.

भारताने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड दौऱ्‍यात सातत्याने चांगला खेळ करून कसोटी सामने जिंकले. ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्या मैदानावर जाऊन आव्हान देण्याची कमाल भारतीय संघ सोडून कोणालाही जमली नाही, हे विसरून चालणार नाही. त्याचबरोबर एकाही संघाला भारतात दौऱ्‍यावर आल्यावर भारतीय संघाला आव्हान देता आलेलं नाही.

परदेश दौऱ्‍यावर गेल्यावर भारतीय संघाने कधीही खेळपट्टी कशीही बनवली तरी कणभरही तक्रार केली नाही. दौऱ्‍यावर आलेले बाकी संघ मात्र भारतातील फिरकीला साथ देणारी खेळपट्टी बघून सामन्याअगोदरच मनातून खलास होताना बघायला मिळाले आहेत. थोडक्यात सांगायचं तर, बायलॅटरल मालिकांमध्ये भारतीय संघाचा खेळ चांगलाच झाला, हे कबूल करावं लागेल.

बाकी वेळेला चांगला खेळ करून भारतीय संघ जेव्हा कोणत्याही मोठ्या स्पर्धेत उतरतो, तेव्हा अर्थातच अपेक्षा वाढलेल्या असतात. चाहत्यांच्या अपेक्षा अजून वाढतात, जेव्हा चांगला खेळ करून भारतीय संघ बाद फेरीत पोहोचतो आणि मग नेमकी तिथंच माशी शिंकते. साखळी फेरीत तडफदार खेळ करणाऱ्‍या भारतीय संघाला बाद फेरीत हुडहुडी भरते आणि मग निर्माण झालेल्या आशांवर पाणी फिरतं. एखाददुसऱ्‍या वेळी असं झालं असतं, तर कालवा करायची गरज पडली नसती; पण गेल्या १० वर्षांत ८ आयसीसी स्पर्धांत असं निर्णायक क्षणी अपयश आल्यावर टीका होणार नाहीतर काय?

इतकंच नाही, तर आशिया कप स्पर्धेतही तसंच अपयश भारतीय संघाला आलं आहे. भारतीय संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआय कितीही ‘ऑल इज वेल’ची धून गात असले, तरी सगळ्यांना मनातून कल्पना आहे की, काहीतरी मोठं चुकतं आहे.

डोळ्यांत खुपणाऱ्या चुका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामना खेळायला जाताना खेळाडू, बीसीसीआय, पत्रकार आणि चाहते... अगदी सगळ्यांना पूर्ण कल्पना होती की, सलग दोन महिने दर्जेदार टी-२० क्रिकेट खेळून एका आठवड्यात अत्यंत महत्त्वाच्या कसोटी सामन्याची तयारी होणं अशक्य आहे. दोन महिन्यांच्या आयपीएल धबडग्यानंतर खेळाडूंना ना विश्रांती मिळाली होती, ना तयारीला पुरेसा अवधी. मग व्हायचं तेच झालं.

भारतीय गोलंदाजांना चार षटकांचा मारा करायची सवय लागली होती आणि करावा लागला १५-२० षटकांचा मारा. फलंदाजांचं पितळ जास्त उघडं पडलं, कारण महत्त्वाचे खेळाडू कसोटी सामन्याला लागणाऱ्‍या संयमी खेळाचा विसर पडल्याने अत्यंत खराब फटके मारताना बाद झाले. सगळ्यांना मनातून माहीत आहे की, ओव्हलवरील पराभवाला काय गोष्टी कारणीभूत आहेत; पण बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन चकार शब्द काढणार नाहीत.

पुढचा विचार हवाच

बीसीसीआयला कल्पना आहे की, भारतीय कसोटी संघातून ओव्हल मैदानावर खेळलेल्या खेळाडूंमधील पाचपैकी चार फलंदाज वयाची ३५ गाठलेले आहेत. याचाच अर्थ असा की, शुबमन गिलचा अपवाद वगळता बाकी खेळाडू कसोटी क्रिकेटच्या शेवटच्या टप्प्याच्या जवळ आहेत. मग रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या नंतर कोणते खेळाडू कसोटी संघाच्या फलंदाजीची जबाबदारी घेण्याच्या क्षमतेचे आहेत, याचा विचार, शोध घेणं आवश्यक आहे.

निवड समितीला विचार करून हा शोध घ्यावा लागेल. खेळाडू पारखण्यात निष्णात असलेले दिलीप वेंगसरकर नेहमी म्हणायचे की, राष्ट्रीय निवड समितीत काम करताना कोणते खेळाडू स्थानिक सामन्याच्या क्षमतेचे आहेत आणि कोणते आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं दडपण झेलून उत्तम कामगिरी सातत्याने करायची तयारी दाखवतील, याचा योग्य अंदाज लावावा लागतो. सध्याच्या निवड समितीत तसा पारखणारा जोहरी कोण आहे हे नक्की समजत नाहीये. ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वालसह उमरान मलिकसारख्या खेळाडूंना योग्य वेळी योग्य संधी मिळायला हवी, हे निवड समितीला कळत असेल. गरज आहे आता भविष्याचा विचार करून कणखर निर्णय घेण्याची.

बीसीसीआयची भूमिका महत्त्वाची

सगळं काही सुरळीत होईल आणि भारतीय क्रिकेटला योग्य दिशा सापडेलही, गरज आहे ती फक्त बीसीसीआयच्या कृतीची. सतत एकामागोमाग एक मालिका नियोजित करणं आणि त्यातून भरमसाट पैसे जमा करणं इतकंच काम बीसीसीआयचं नसून, सुनियोजन गरजेचं आहे. दोन मालिकांमध्ये योग्य विश्रांती खेळाडूंना दिली नाही, तर सामन्यांची संख्या भले वाढेलही; पण त्यात दर्जा नसेल.

गेल्या दहा वर्षांत भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेत निर्भेळ यश मिळालेलं नाही, याची बोच बीसीसीआयला लागत असेल, तर आयसीसी स्पर्धेअगोदर भारतीय संघाचा सराव, विश्रांतीचं नियोजन मोलाचं आहे. जुलै महिन्यात नवीन कालावधीसाठी प्रक्षेपण हक्क विकले जातील, तेव्हा बदल करायची संधी बीसीसीआयला असेल. जर ही संधी गमावली आणि परत एकदा फक्त सामन्यांच्या जास्त संख्येवर भर दिला गेला, तर मात्र भारतीय क्रिकेटला बसणारे धक्के कायम राहतील आणि त्याला पूर्णपणे जबाबदार बीसीसीआय असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT