Virat Kohli
Virat Kohli Sakal
सप्तरंग

क्रिकेटपटूच्या मनातला 'माणूस'

सुनंदन लेले sdlele3@gmail.com

भारतीय संघात निवड झाल्यापासून विराट कोहलीची कारकीर्द जवळून अभ्यासण्याचा योग माझ्याकरता जमून आला. खेळाच्या मैदानावर उतरल्यावर तो झपाटल्यासारखा असतो.

भारतीय संघात निवड झाल्यापासून विराट कोहलीची कारकीर्द जवळून अभ्यासण्याचा योग माझ्याकरता जमून आला. खेळाच्या मैदानावर उतरल्यावर तो झपाटल्यासारखा असतो. भारतीय संघाकडून सामना खेळताना फलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण, प्रत्येक चेंडूसाठी जीव ओतून प्रयत्न करताना दिसणारा विराट मला खूप आवडायचा. नुसताच फलंदाज म्हणून नव्हे तर कर्णधार म्हणून विराट कोहली नेहमी अत्यंत करारी व्यक्तिमत्त्वाचा वाटला मला.

कर्णधार म्हणून त्याने ‘आधी केले मग सांगितले’, असा मार्ग निवडला. मग तो कमालीच्या फिटनेसचा असो किंवा सामना खेळताना प्रत्येक क्षणी सर्वस्व झोकून देण्याचा मुद्दा असो. संघातील सहकाऱ्यांना त्याने फार बडबड न करता असा संदेश दिला की मला याप्रकारे संघाला पुढं न्यायचं आहे.

त्याच्या याच गुणांमुळे भारतीय संघानं गेल्या पाच वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये लक्षणीय कामगिरी केली. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं चाळीस कसोटी सामने जिंकले. दुसऱ्या बाजूला मोजक्या लोकांशी मैत्रीचा हात पुढं करणारा विराट मैदानाबाहेर नेहमी हसत खेळत बोलणारा वाटला. मैदानावर त्यानं कमाल कामगिरी करून प्रेक्षकांना भारावून टाकण्याचे कित्येक प्रसंग मी अनुभवले. स्वत: विराट भारावून जाण्याचे दोन मैदानाबाहेरचे प्रसंग माझ्या मनात अत्तराच्या कुपीसारखे लपले आहेत. त्याच्या शंभराव्या कसोटीच्या निमित्तानं माध्यमातून ‘क्रिकेटर कोहली’ बद्दल बरेच काही बोलले लिहिले जाणार आहे. म्हणून जरा दोन वेगळे प्रसंग तुम्हांला सांगतो ज्याने ‘माणूस विराट कोहली’ कसा आहे याचा थोडा अंदाज तुम्हांला येईल.

अपने अपनोंको नकार कैसे देते है

बर्‍याच सामाजिक कामात हिरिरीने सहभाग घेण्याच्या सवयीमुळे सामाजिक काम करणार्‍या लोकांशी मैत्री करायला मला खूप आवडते. सिंहगड रोडवरील माणिक बागेत डॉ अपर्णा देशमुख आभाळमाया नावाचा वृद्धाश्रम चालवतात. आधुनिक काळात घरातील एक किंवा जास्तीतजास्त दोन वृद्धांना सांभाळताना नाके मुरडणाऱ्यांच्या जमान्यात अपर्णा देशमुख आणि तिचे सहकारी जवळपास पन्नास वृद्धांना मनापासून सांभाळतात. अर्थातच अशा सेवाभावी संस्थांना बक्षिसे खूप दिली जातात पण त्यांची आर्थिक चणचण कधीच संपत नाही. आभाळमाया वृद्धाश्रमाकरता काहीतरी चांगले करायची इच्छा होती म्हणून संस्थेला विराट कोहलीने भेट द्यावी असे माझे प्रयत्न होते. विराट सतत खेळण्यात कमालीचा व्यग्र असल्याने भेट घडवणे कठीण होत होते. शेवटी माझ्या डोक्यात कल्पना आली जेव्हा आयपीएल स्पर्धा चालू होती. मी विराटला म्हणालो, तुझा मुंबईचा सामना संपल्यावर बेंगलोर संघ पुण्याला येणार आहे पुढचा सामना खेळायला. संघ मुंबईहून बसने पुण्याच्या हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत मी आभाळमाया वृद्धाश्रमाची भेट करून तुला त्यांच्या अगोदर पुण्यातील हॉटेलात सोडतो. विराट म्हणाला हे कसे शक्य आहे? मी त्याला भरवसा दिला आणि तो तयार झाला.

माझा जवळचा मित्र अमित भोसलेने खास व्यवस्था करायला सहकार्य केले. मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवरून मी विराट कोहलीला घेऊन हेलिकॉप्टरनं पुण्याला अवघ्या २५ मिनिटात आलो. हेलिकॉप्टरमध्ये आमच्यासोबत प्रसिद्ध उद्योगपती सायरस पुनावाला पण होते. भोसले कुटुंबीयांच्या घरातील हेलिपॅडवर उतरून आम्ही नाश्ता करून लगेच सिंहगड रोडवरील आभाळमाया वृद्धाश्रमात पोहोचलो. डॉ अपर्णा देशमुखांनी तळमजल्यावर विराटचे स्वागत करून त्याला वृद्धाश्रमाची माहिती दिली.

कमाल गोष्ट म्हणजे नेहमी कोणालाही भेटायला खूप वेळ घेणाऱ्या विराट कोहलीनं आभाळमाया वृद्धाश्रमातील सर्वच्या सर्व पन्नासपेक्षा जास्त वृद्धांना त्यांच्या खोलीत जाऊन भेटून, प्रेमाने विचारपूस केली. भारतीय क्रिकेटचा सर्वांत मोठा तारा विराट कोहली स्वत: येऊन प्रेमाने भेटून विचारपूस करतो आहे म्हटल्यावर सर्व आजी - आजोबांनी विराटला भरभरून आशीर्वाद दिले. नुसती भेट देऊन विराट थांबला नाही तर विराट कोहली फौंडेशनतर्फे आभाळमाया वृद्धाश्रमाचा एका वर्षाचा खाण्यापिण्याचा खर्च भागेल इतकी देणगीही विराटनं आपणहून देऊ केली.

आभाळमायाला भेट देऊन कारमध्ये बसल्यावर विराटच्या डोळ्यात पाणी तरारले होते. सर मी मनापासून मदत केली. पण खरं सांगू का तुम्हांला, वृद्धाश्रम ही संकल्पना मला पटत नाही. अपने ही अपनोंको नकार कैसे देते है, असे भाबडेपणाने विचारून विराटने पाण्याने डबडबलेले डोळे पुसले होते. घरातील वृद्धांना घरचेच सांभाळायला नकार देऊ शकतात हा विचार विराट कोहलीला पचला नव्हता.

हे क्रिकेट कठीण आहे

मला तो प्रसंग कधीच विसरता येणार नाही. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळायला बेंगलोरला आला होता. विराट कोहलीचा जानी दोस्त ए बी डिव्हिलियर्सचा तो शंभरावा कसोटी सामना होता आणि तो बेंगलोरच्या चिन्नास्वामी मैदानावर होणार होता, हा कमाल योगायोग होता. नेमकी त्याचवेळी दिवाळी होती. कसोटी सामन्याच्या अगोदर तीन दिवस बेंगलोरला गेलो असताना मी समर्थनम नावाच्या सामाजिक संस्थेला भेट द्यायला गेलो होतो. महंतेश नावाची अत्यंत कर्तबगार व्यक्ती ही संस्था चालवते. महंतेश दृष्टिहीन आणि दिव्यांग व्यक्तींना स्वत:च्या पायावर उभे करायला विविध व्होकेशनल कोर्स या संस्थेमार्फत चालवतात. अजून एक खास बात म्हणजे समर्थनम संस्थेत दिव्यांग खेळाडूंना मोठे पाठबळ दिले जाते. त्या काळात भारतीय दृष्टिहीन संघाने दक्षिण आफ्रिकेत झालेला विश्वकरंडक जिंकला होता त्याचा नाईक नावाचा कर्णधार समर्थनम संस्थेचा होता. त्याच संस्थेच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डेव्हीड सर आणि महंतेश यांची इच्छा होती की संस्थेच्या संघातील काही खेळाडूंना भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींना भेटायला मिळावे. रवी शास्त्री माझा खेळायच्या जमान्यातील मित्रं असल्याने त्याला विनंती केल्यावर तो लगेच तयार झाला. जेव्हा ही गोष्ट त्याने कर्णधार विराट कोहलीच्या कानावर घातली तेव्हा तो पण यायला तयार झाला. इतकेच नाही तर रवी आणि विराटने येताना ईशांत शर्मा, रोहित शर्मा, उमेश यादव, रवींद्र जडेजाला पण सोबत आणले.

कर्नाटक क्रिकेट संघटनेचे सचिव आणि माजी खेळाडू ब्रिजेश पटेल यांनी मोठ्या मनाने या भेटीला परवानगी दिली आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर ज्या हॉलमध्ये पत्रकार परिषद भरवली जाते त्याच हॉलमध्ये दिव्यांग खेळाडू आणि भारतीय खेळाडूंची भेट करायची योजना पक्की झाली. दिव्यांग संघातील खेळाडूंसह डेव्हीड सर आणि महंतेशना घेऊन मी हॉलमध्ये गेलो असताना जेव्हा रवी शास्त्री बाकी खेळाडूंना घेऊन आला तेव्हा विराटने, कैसे हो भाईलोग....मैं ईशांत शर्मा आपका स्वागत करता हूँ, असे ईशांत बोलतो त्या स्वरात आवाज काढून सांगितले. ईशांत शर्माला भेटायला मिळते आहे बघून भारतीय दिव्यांग संघाचा कर्णधार नाईक हस्तांदोलन करायला पुढे सरसावला. त्याने हात हाती घेतला तेव्हा त्याला समजले की हा हात ईशांत शर्माचा नाहीये कारण ज्या उंचीवरून तो बोलत होता त्यापेक्षा ईशांत शर्मा उंच आहे. नाईकने हात तपासून बघता तो पुसटसा किंचाळला ‘‘ अरे बापरे ये तो विराट कोहली है ’’ तो असे म्हणाला. बाकी खेळाडूंचे आणि महंतेशचे चेहरे उजळले. मग विराट कोहली आणि शास्त्रीने पुढे सरसावत बाकी खेळाडूंची त्या दिव्यांग खेळाडूंशी ओळख करून दिली.

मग नाईकने विराटला आमच्याबरोबर थोडा वेळ क्रिकेट खेळायचे प्रेमाचे आव्हान दिले. विराटने ते स्वीकारले आणि डोळ्यावर पट्टी बांधली. भारतीय दिव्यांग संघाचा कर्णधार नाईक भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेट खेळू लागले. डोळे बंद केलेले असल्याने विराटला चेंडूचा अंदाज येत नसलेला बघून बाकीचे भारतीय संघातील खेळाडू गालातल्या गालात हसत होते. डोळ्यावरील पट्टी काढून विराटने मग ती रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाच्या डोळ्यावर बांधत विराट म्हणाला, मित्रांनो हे क्रिकेट कठीण आहे.

क्रिकेट खेळून झाल्यावर बाकी खेळाडूंनी दिव्यांग खेळाडूंना चॉकलेटस् दिली. हातात छोटे आकाशकंदील घेत ग्रुप फोटो काढले गेले. विराटने डोके चालवून विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार नाईक याच्याकरता आपले लाडके परफ्युम भेट द्यायला आणले होते. ते नुसते हाती न देता विराटने ते नाईकच्या शर्टवर मारत सांगितले की ही भेट या सुगंधाने आपल्या मनात ताजी राहील. विराटच्या त्या प्रेमभावनेने आम्ही सगळेच भारावून गेलो. वरून नारळासारखा कणखर दिसणारा विराट कोहली माणूस म्हणून आतून गोड आणि मऊ खोबर्‍यासारखा असल्याची भावना माझ्या मनाला सुखावून गेली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT