सप्तरंग

कसं काय, काश काय? (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर

ज्या समाजात नेता व नागरिक समान असतात तोच समाज महान होतो हे एक वैश्‍विक सत्य आहे. मात्र, आपण भारतीय लोक त्याकडं दुर्लक्ष करत आहोत. जर आपण आपली मानसिकता बदलली तर इथलं प्रत्येक शहर काशकायपेक्षा सरस होऊ शकेल यात शंका नाही. 

पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथून पश्‍चिमेला अर्धा तास प्रवास केला की काशकाय नावाचं ठिकाण येतं. अलीकडं या शहराच्या नगरपालिकेनं जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. सकृद्दर्शनी काशकाय हे सर्वसामान्य शहरांसारखंच आहे; परंतु इथल्या नगरपालिकेनं केलेल्या अभिनव प्रयोगांमुळे जगातले अनेक तज्ज्ञ 'कसं काय आहे काशकाय?' या प्रश्‍नाचं उत्तर शोधत तिथं जात आहेत. 

या काशकाय शहराचं आर्थिक अंदाजपत्रक नागरिकांच्या सहभागातून तयार करण्यात येतं. आपल्या गावात कोणकोणते प्रकल्प हवेत हे सर्वसामान्य नागरिक दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत सुचवतात. हे प्रकल्प पर्यावरणाचा समतोल राखून कमी खर्चात लवकरात लवकर साकार कसे करता येतील याचे प्रस्ताव पाठवतात. कोणताही नागरिक शहराला उपयुक्त असा प्रस्ताव पाठवू शकतो. त्यासाठी राजकीय, सामाजिक, व्यापारविषयक, धार्मिक अथवा इतर कोणत्याही संस्थेचं पाठबळ असण्याची गरज नसते. ज्यांनी प्रस्ताव पाठवले असतील ते नागरिक छोट्या छोट्या नागरिकसभांमध्ये आपल्या प्रस्तावाची अभ्यासपूर्ण मांडणी मार्च-एप्रिल महिन्यात करतात. 

कुणी वाचनालय सुरू करायला सुचवतं...कुणी शहराच्या विशिष्ट भागात जलव्यवस्थापनाविषयी किंवा सौरऊर्जेविषयी सुचवतं... कुणी दळणवळण सुधारण्यासाठी काही सूचना मांडतं... कुणी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणखी काय काय करता येईल याविषयीच्या कल्पना मांडतं... 
नागरिकांकडून असे विविध प्रस्ताव मांडले जातात. 

नागरी सभेच्या छाननीत जे प्रस्ताव संमत होतात, त्यांचं विश्‍लेषण तज्ज्ञांची समिती करते. मे-जूनमध्ये तज्ज्ञ समिती या प्रस्तावांना तांत्रिक व आर्थिक परिमाणे लावून त्यासंबंधीच्या प्रकल्पांबाबतचा आपला अहवाल मांडते व काही प्रकल्प शहरासाठी निवडले जातात. तज्ज्ञ समितीनं निवडलेल्या प्रकल्पांवर शहरात सार्वमत घेण्यात येतं व नागरिकांनी खुल्या मतदानाद्वारे निवडलेल्या प्रकल्पांना निधी पुरवला जातो आणि पुढच्या एक-दोन वर्षांत ते प्रकल्प साकार केले जातात. अशा तऱ्हेनं नागरी सहभागातून खर्चाचा विनिमय ठरवण्यात येतो. 

भारतात लोकप्रतिनिधींना योग्य वाटतील अशी विकासाची कामं घडवून आणण्यासाठीच्या निधीची तरतूद आहे; परंतु त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते अधिक मजबूत होतात. 'काशकाय'मध्ये उलटं घडतं. तिथं नागरिकांचा सहभाग असलेल्या अंदाजपत्रकापासून लोकप्रतिनिधींना व राजकीय नेत्यांना दूर ठेवून प्रत्यक्ष नागरिकशक्ती अधिक बळकट करण्यात येते. ही प्रक्रिया प्रत्येक टप्प्यावर पारदर्शक असल्यानं राजकीय नेत्यांना अथवा शासकीय अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करायला वाव मिळत नाही. 

अर्थात काशकायला राजकारण होतंच नाही असं नाही. मात्र, या राजकारणात शत्रुराष्ट्र, विरोधकांवर व्यक्तिगत आरोप, राष्ट्रवाद हे मुद्दे नसतात, तर 'वाचनालय हवं की अजून एक पर्यटन केंद्र हवं' अथवा 'पाणीयोजना की ऊर्जाप्रकल्प' अशा मुद्द्यांवर तिथं चर्चा घडते. 

काशकाय नगरपालिकेनं आणखी एक अभिनव योजना राबवली आहे. तिचं नाव आहे 'सिटी पॉईंट काशकाय.' म्हणजे कोणत्याही नागरिकानं काही समाजोपयोगी काम केलं तर एका ऍपद्वारे त्याविषयी नगरपालिकेला कळवायचं. यात सुका व ओला कचरा वेगळा करण्याची प्रक्रिया, वृद्धांना मदत असं 25-30 प्रकारचं 'स्वेच्छासेवाकार्य' नोंदवता येतं. त्यावर पॉईंट अथवा गुण मिळतात व या गुणांच्या आधारे सांस्कृतिक स्पर्धांची अथवा क्रीडास्पर्धांची तिकिटं मिळवता येतात. थोडक्‍यात, शहरासाठी स्वेच्छेनं काही समाजकार्य केलं तर ते करणाऱ्याला मनोरंजनार्थ तिकिटं मिळतात. काही नागरिक ही तिकिटं गरिबांना देतात. 

येत्या दोन वर्षांत काशकाय शहरात सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेद्वारे संपूर्णतः मोफत प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे व मोटारगाड्यांवरचे कर वाढणार आहेत. कुणाला बसनं जायचं असेल अथवा नगरपालिकेनं पुरवलेल्या सायकलनं जायचं असेल तर काहीही खर्च नाही. मात्र, गाड्या बाळगायच्या असतील तर त्यासाठी संबंधितांना मोठा कर द्यावा लागेल. या व्यवस्थेची सुरवात म्हणून विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे स्थानक ते विद्यापीठ असा प्रवास आताच विनाशुल्क करण्याची सवलत देण्यात आली आहे. 

काशकाय नगरपालिकेला शहरातल्या लोकांचं जीवन समृद्ध करण्यासाठी कायम नवीन काही सुचत असतं. आंतरराष्ट्रीय वैचारिक परिषदा आपल्या इथल्या एस्टोरिल या केंद्रात भरवण्यासाठी देशाबाहेरच्या संघटनांना नगरपालिका आमंत्रित करत असते. 'होरासिस' या उद्योगजगतातल्या संघटनेची वार्षिक बैठक काशकायला भरते. तिथं 50-60 देशांतून सुमारे 600-700 उद्योजक व विचारवंत जात असतात. त्याशिवाय या छोट्या शहरात दरवर्षी सुमारे 15-16 लाख पर्यटक जातात. त्यातले अनेकजण शहरात गुंतवणूक करतात. काशकाय नगरपालिकेनं शहराचा इतिहास अतिशय अनोख्या प्रकारे लिहिलेला आहे. 

पहिलं विद्युतीकरण, पहिल्या सिनेमाचं चित्रीकरण, फुटबॉलचा पहिला सामना, पहिली नौकास्पर्धा, पहिलं वाचनालय व पहिली रेल्वे यांची नोंद या इतिहासलेखनात आहे. सत्ताधीशांचा नामोल्लेखही त्यात नाही. काशकायच्या प्रमुख ऐतिहासिक क्षणांत राजकीय पक्ष, नेते, प्रतिनिधी यांना जागा नाही. 

समजा, आपण महाराष्ट्रात 'काशकाय पॅटर्न' आणला तर काय होईल? पुण्यातल्या वाहतूकव्यवस्थेवर व साताऱ्याच्या पाणीपुरवठ्यावर टीका करणारे नागरिक ही समस्या सोडवण्यासाठी योजना तयार करतील किंवा नवीन कल्पना सुचवतील. ज्यांचा सध्या विचारच होत नाही अशी सौर ऊर्जाकेंद्रं, आंतरराष्ट्रीय दर्जाची वाचनालयं, विद्युतसायकलींचं संकुल असे प्रकल्प उभे राहतील...प्रत्येक शहरात नद्या स्वच्छ करून त्यांच्या काठांवर सुंदर बगीचे, पर्यटनकेंद्रं आदींच्या निर्मितीसाठी नागरिक दबाव आणतील. या सर्व विकासामुळे नवीन रोजगार निर्माण होतील. नागरिकांमध्ये चैतन्य येईल. 

काही वर्षांपूर्वी 'सकाळ माध्यम समूहा'नं मलेशियातल्या 'पेमांडू' पद्धतीची ओळख करून दिली होती व पाच-सहा क्षेत्रांसंदर्भात नागरिकांच्या सूचना मागवल्या होत्या. नागरिकांनीही मोठ्या उत्साहानं अनेक सूचना पाठवल्या होत्या. त्यावर 'सकाळ'नं काही कार्यशाळांचं आयोजनही केलं होतं. 

महाराष्ट्रात अथवा भारतात राजकीय नेते अशा कार्यक्रमांची वर वर स्तुती करतात. प्रत्यक्षात मात्र लोकप्रतिनिधींचा स्थानिक विकासनिधी बंद करून नागरिकांना 'काशकाय पॅटर्न'प्रमाणे पारदर्शक पद्धतीनं त्या निधीचा वापर करण्यात सहभागी करून घेत नाहीत. 

नगरपालिकांच्या अंदाजपत्रकातही आयुक्त, नगरसेवक व राजकीय नेते यांना दूर ठेवून आणि प्रत्यक्ष नागरिकांवर विश्‍वास ठेवून नागरिकांच्या सहभागानं उपक्रम ठरवले जात नाहीत. कारण आपण सर्वजण नेत्यांना व अधिकाऱ्यांना नागरिकांच्या वरचं स्थान देतो. 

मात्र, काशकायमध्ये हे कसं काय शक्‍य होतं? कारण तिथले विद्यार्थी, वृद्ध, कामगार, उद्योजक, व्यापारी यांना नेत्यांपेक्षा कमी मानलं जात नाहीत. ज्या समाजात नेता व नागरिक समान असतात तोच समाज महान होतो हे एक वैश्‍विक सत्य आहे. मात्र, आपण भारतीय लोक त्याकडं दुर्लक्ष करत आहोत. जर आपण आपली मानसिकता बदलली तर इथलं प्रत्येक शहर काशकायपेक्षा सरस होऊ शकेल यात शंका नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT