Sunil-Datta
Sunil-Datta 
सप्तरंग

निर्मळ, निरागस, अबोध!

सकाळ वृत्तसेवा

चौकटीतली ‘ती’ - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक
मला भावलेला तुझ्यातला सर्वांत मोठा गुण कोणता माहितंय? तुझ्यात कोणताही गुण नाही, हाच तुझा सर्वांत मोठा गुण! 

सुजाताच्या निरागस रूपावर भाळलेला अधीर तिला हे सांगतो तेव्हा खरं तर त्याला ती ‘खरी कोण’ आहे हे माहीत नसतं. त्यालाच कशाला, खुद्द सुजाताला तरी तारुण्यात पाऊल ठेवेपर्यंत ती खरी कोण आहे, हे कुठं माहीत झालेलं असतं? जेव्हा ते कळतं तेव्हा तिच्या जगण्याच्या आकांक्षाच विरून जातात...पण त्या अवस्थेतही ती सावरते. जगू पाहते. खरं तर सतरा-अठरा वर्षांपूर्वी तिनं या जगात पहिलं पाऊल ठेवलं त्या वेळीच साथीच्या आजारानं तिच्या मातापित्याचा बळी घेतलेला. एका अस्पृश्‍य, खालच्या समजल्या गेलेल्या जातीतली ती. आई-बापाच्या पश्‍चात जातबिरादरीतलं कुणीही नाही म्हणून या अनाथ, अश्राप बालिकेला उच्चवर्णीय कुटुंबातल्या उपेंद्रनाथ चौधरी यांच्या दारात आणून ठेवलं जातं. त्यांच्या स्वत:च्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाची लगबग सुरू असतानाच. बांधकाम अभियंता म्हणून नोकरीत असलेले उपेनबाबू काहीशा अनिच्छेनंच या बालिकेचा सांभाळ करायला तयार होतात.

‘तिच्या जात-बिरादरीतलं कुणी सापडेपर्यंत मी तिला ठेवून घेईन’ या बोलीवर. घरातल्या दाईकडेच तिचा सांभाळ करायची जबाबदारी सोपवली जाते. त्यांची मुलगी रमा तशी ही सुजाता! दोघीही एका घरात, एकाच कुटुंबातल्या मुलीसारख्या वाढू लागतात. उपेनबाबूंची पत्नी चारू हिलादेखील या अनाथ मुलीचा लळा लागतो. सुजाताही रमाप्रमाणेच उपेनबाबू व चारू यांना ‘बापू’ आणि ‘अम्मी’ म्हणून हाक मारत असते. अर्थात सामाजिक रीतिरिवाजात वाढलेली चारू या मुलीला योग्य ते अंतर ठेवून वागवत असते. माणुसकीपोटी केवळ तिच्या पालनपोषणाची जबाबदारी आपली, बाकी तिनं आपल्या रमासोबत फार मिसळू नये, लिहा-वाचायला शिकू नये, असाच चारूचा दृष्टिकोन असतो. पण लाघवी सुजाता हट्ट करून तिला हवं ते मागून घेत असते. रमाप्रमाणे आपलाही वाढदिवस व्हावा, आपल्यालाही तिच्यासारखं शिकायला मिळावं, ही सुजाताची इच्छा असते.

तिच्या संगतीनं रमा बिघडू नये, म्हणून सुजाताला अनाथाश्रमात ठेवण्याचा विचार केला जातो. पण सुजाता रडून, आक्रोश करून तो बेत हाणून पाडते. उपेनबाबूंच्या कर्मठ वृत्तीच्या आत्याला हे असं अस्पृश्‍य मुलीला घरात ठेवून घेणं अजिबात मंजूर नसतं. त्याबद्दल ती या दोघांची सतत खरडपट्टी काढत असते. काळ पुढे सरकत राहतो. उपेनबाबू सेवानिवृत्त होतात. रमा आणि सुजाताही मोठ्या होतात. शिक्षण अर्धवट राहिलेली सुजाता एव्हाना घरकामात पारंगत झालेली तर रमाचं शिक्षण अद्याप सुरू. आपण या घरातल्याच असूनही अम्मी ज्याला त्याला ‘ही माझ्या मुलीसारखी’ असं का सांगते, हा प्रश्‍न सुजाताला सतावत असतो. एकदा उपेनबाबूंची आत्या घरी आलेली असताना रमानं बनवलेला चहा बाजूला ठेवून नोकराकरवी दुसरा चहा बनवला जातो, तेव्हा मात्र सुजाता कळवळून अम्मीला विचारते, ‘खरं सांग, मी कोण आहे?’ त्या क्षणी तिला कळतं, ती खालच्या जातीतली, अस्पृश्‍य आहे म्हणून! वास्तवाच्या या जाणिवेनं सुजाता हादरते.

आत्महत्येसारखे टोकाचे विचार तिच्या मनात येतात. पण ती माघारी फिरते. पूर्वीसारखी या घरात राहू लागते. रमाला चांगलं स्थळ मिळण्यासाठी आधी सुजाताचं लग्न लावून द्यायला हवं, या विचारानं तिच्या विवाहाचे प्रयत्न केले जातात. उपेनबाबूंच्या आत्याचा नातू अधीर याचं रमाशी लग्न व्हावं, अशी दोन्ही घरातल्यांची इच्छा असते. उच्चशिक्षित असलेला, सुसंस्कृत स्वभावाचा व कविमनाचा अधीर प्रथमदर्शनीच सुजातावर भाळतो. तिचं ते अबोध सौंदर्य पाहून तो तिच्या प्रेमात पडतो. अधीरच्या प्रेमाच्या आविष्कारानं सुजाता आयुष्यात प्रथमच मोहरून उठते. पण वास्तवाचं भान येता क्षणी ती त्याला आपण कोण आहोत हे स्पष्ट करते. पण अधीरचा निर्धार कायम असतो. सुजाताशी लग्न करण्याच्या अधीरच्या निर्णयानं दोन्ही घरांत कोलाहल माजतो. त्यातून सुजाताविषयी सर्वांचा गैरसमज, पुढे त्याचं निराकरण, चारूच्या गंभीर आजारात अन्य कुणाचंही रक्त जुळत नसताना सुजातानं दिलेल्या रक्तानं तिचे प्राण वाचणं अशा घटनांनी शेवट गोड होतो. 

प्रतिभावान निर्माता-दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या ‘सुजाता’ (१९५९) या चित्रपटाची ही नायिका आजही मनात जिवंत आहे. सुबोध घोष यांच्या मूळ कथेतली ही व्यक्तिरेखा पडद्यावर एका कवितेसारखी उतरली यामागे बिमलदांबरोबरच नबेंदु घोष (पटकथा) आणि महेंद्र पॉल (संवाद) या सहकाऱ्यांचाही मोलाचा वाटा होता आणि कथानायिका साकारणाऱ्या नूतनला कोण विसरेल? खरं तर तिच्या सर्वोत्कृष्ट तीन भूमिकांची निवड करायला गेल्यास ‘सुजाता’ला त्यात हमखास स्थान मिळेल. कुटुंबात राहत असूनही ‘मुलगी नव्हे तर मुलीसारखी’ आहोत म्हणजे काय, हे न कळलेली, अधीरच्या प्रेमाविष्कारानं मोहरून उठणारी पण लाजाळूच्या वेलीगत संकोचून जाणारी, गाणं गुणगुणतानासुद्धा दार लावून घेणारी, स्वत:चं नेमकं स्थान कळाल्यानंतर उन्मळून पडणारी, एकांतात टेलिफोनवर अधीरचं प्रेमगीत ऐकताना असहायपणे अश्रूंना वाट मोकळी करून देणारी ही सुजाता! अन्यायाविरुद्ध बंडखोरी तर सोडाच, साधी नापसंती देखील व्यक्त करता येऊ नये अशा काळात आणि कुळात ती जन्मलेली. तरीही तिच्यात दखल घेण्याजोगं काहीतरी आहेच. तिच्या आयुष्यातले असे अनेक क्षण नूतननं विलक्षण उंचीवर नेऊन ठेवले. मुळातच सशक्त असलेली एखादी भूमिका जेव्हा त्याच क्षमतेच्या अभिनेत्रीला साकारायला मिळते तेव्हा ती व्यक्तिरेखा केवळ ‘पडद्यापुरती’ राहत नाही. थेट प्रेक्षकांच्या हृदयात उतरते. साठ वर्षे उलटून देखील ‘सुजाता’ अनेकांच्या हृदयात घर करून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT