काही शोकांतिका मनात कायमचं घर करतात. ‘देवदास’ अशाच शोकांतिकांमधली एक. मग ती पुस्तकातली असो वा पडद्यावरची.
काही शोकांतिका मनात कायमचं घर करतात. ‘देवदास’ अशाच शोकांतिकांमधली एक. मग ती पुस्तकातली असो वा पडद्यावरची. बंगाली लेखक शरच्चंद्र चटर्जी यांची १९१७ मध्ये प्रकाशित झालेली ‘देवदास’ कादंबरी, त्यावर न्यू थिएटर्सचे प्रथमेशचंद्र बरुआ यांनी १९३५ मध्ये बंगाली आणि हिंदीत बनवलेले चित्रपट, त्यानंतर तब्बल वीस वर्षांनी न्यू थिएटर्सच्याच तालमीत तयार झालेल्या बिमल रॉय या प्रतिभावंत दिग्दर्शकाने केलेला त्याचा रिमेक, पुढे संजय लीला भन्साळी (देवदास/२००१) आणि अनुराग कश्यप (देव-डी/२००९) या दिग्दर्शकांनी लावलेले या कथेचे अन्वयार्थ, झालंच तर अन्य भाषांमधून बनवले गेलेले चित्रपट आणि नाटकं अशी सुमारे शंभर वर्षं या कथेने भारतीय जनमानसावर मोहिनी घातली आहे.
‘देवदास’वर आतापर्यंत तयार झालेल्या चित्रपटांचा एकत्रित धांडोळा घेणं तर सोडाच; पण या घडीला जो चित्रपट नजरेसमोर आहे, त्या बिमल रॉय यांच्या १९५५ सालातल्या नितांतसुंदर कलाकृतीवर या ठिकाणी विस्ताराने लिहिणं कठीण आहे.
अशा वेळी सदराच्या चौकटीशी इमान राखून चित्रपटाच्या शेवटाविषयीच लिहिणं हा सोयीस्कर मार्ग. अन्यथा दिलीप कुमार (देवदास), सुचित्रा सेन (पारो), वैजयंतीमाला (चंद्रमुखी) आणि मोतीलाल (चुनीलाल) यांचा अप्रतिम अभिनय... बिमल रॉय यांच्या दिग्दर्शनाबरोबरच नवेन्दू घोष (पटकथा), राजेंद्रसिंग बेदी (संवाद), कमल बोस (छायाचित्रण), साहिर (गीते) आणि सचिन देव बर्मन (संगीत) यांतल्या कुणाकुणाबद्दल काय काय लिहिणार?कथा सर्वपरिचित आहे. बंगालमधल्या धनाढ्य जमीनदाराचा मुलगा देवदास आणि शेजारच्या सर्वसाधारण कुटुंबातली पार्वती अर्थात ‘पारो’ यांची बालपणापासूनची गाढ मैत्री, देवदासच्या उनाडपणामुळे वडिलांनी शिक्षणासाठी त्याची कोलकाता इथं केलेली रवानगी, तरुणपणी देवदास नि पारो या दोघांमध्ये फुललेला प्रीतीचा अंकुर, त्यांच्या लग्नाला देवदासच्या वडिलांनी केलेला विरोध, त्या अवमानापायी पारोच्या कुटुंबीयांनी एका श्रीमंत पण विधुर इसमाशी लावलेलं तिचं लग्न, प्रेमभंगामुळे घर सोडून कोलकाता इथं गेलेल्या देवदासचं चंद्रमुखी या गणिकेच्या सहवासात येऊन व्यसनाधीन होणं, या व्यसनातून त्याच्या आयुष्याची झालेली धूळधाण आणि शेवटी भणंग अवस्थेत पारोच्या गावी पोचल्यानंतर तिच्या हवेलीसमोर बेवारस अवस्थेत झालेला त्याचा मृत्यू... हे ‘देवदास’चं कथासार.
या गावाहून त्या गावी असा रेल्वे प्रवास करता करता देवदास त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या ‘स्थानका’वर पोहोचतो. अपरात्री केव्हातरी पांडवा इथं गाडी पोहोचते. पाठोपाठ आवाज येतो, ‘पांडवा स्टेशन...! मीरपूर, मीरगंज, माणिकपूर की सवारियां उतर जाए...’
अर्धवट शुद्धीतल्या देवदासला जाणवतं, हे स्टेशन पारोच्या सासरपासून, माणिकपूरपासून जवळ आहे. म्हणजे आपण पारोच्या जवळ पोहोचलो आहोत. तो गाडीतून उतरतो. स्टेशनबाहेर झोपलेल्या गाडीवानाला उठवत विचारतो, ‘‘गाडीवाले, माणिकपूरला चलणार का?’ ‘माणिकपूर? खूप दूर आहे बाबूजी... रस्तादेखील खराब आहे. एवढ्या अंधाऱ्या रात्री कसं जाणार? रात्री झोपा इथं. सकाळी जाऊ.’ ‘माझ्यापाशी तेवढा वेळ नाही बाबा, मला तातडीने पोहोचायला हवं. मी तुला भरपूर भाडं देईन. मला लगेच नेऊन सोड.’
गाडीवान राजी होतो. काळोख्या रात्री बैलगाडी निघते. ‘गाडीवाले, अजून किती वेळ लागेल?’ ‘बाबूजी, आत्ताच तर तुम्ही गाडीत बसलाय. अजून खूप वेळ लागेल...’ गाडी जात असते अन् देवदासच्या डोळ्यांसमोरून जुनी दृश्यं तरळत जातात. लहानपणी कोलकात्याला जाताना पारोचा घेतलेला निरोप... काही वर्षांनी ती भेटल्यानंतरचे त्याचे उद्गार, ‘किती मोठी दिसतेयस तू!’... घर सोडून निघालेल्या देवदासला आईने कळवळून मारलेली हाक... पारोच्या लग्नातील सनईचे सूर... खूप काही...
‘अरे बाबा, हा रस्ता संपणार आहे की नाही?’ देवदास विचारतो. ‘संपेल बाबूजी, लवकरच संपेल.’ त्या काळोखातच गाडी इच्छित स्थळी पोहोचते. देवदास त्या अवस्थेतही शंभराची नोट काढून त्याच्यासमोर धरतो. ‘बाबूजी, आलं बघा माणिकपूर. ही आली जमीनदार साहेबांची हवेली. तुम्हाला कुठं जायचंय? अरेच्चा, झोपलात की काय? बाबूजी, आपण माणिकपूरला आलो आहोत. कुणाच्या घरी जायचंय तुम्हाला? तुम्ही बोलत का नाही? काय झालं तुम्हाला?’
गाडीवानाच्या एकाही प्रश्नाला उत्तर मिळत नाही. अस्फुट आवाजात देवदास पुटपुटतो, ‘पारो...’ घरात झोपलेली पारो कुणाची तरी हाक ऐकल्याचा भास होऊन दचकून जागी होते. मधूनच दार वाजल्याचाही भास होतो. अंथरुणावरून उठून ती सज्जात जाते अन् कुणी हाक मारलीय का, हे पाहू लागते. ‘कुणी तरी हाक मारत होतं मला,’ ती नवऱ्याला म्हणते. ‘एवढ्या रात्री कोण कशाला हाक मारेल? भास झाला असेल. चल, झोपी जा.’ नवऱ्याचं बोलणं ऐकून ती पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करते.
सकाळ होते तेव्हा पारोच्या घरासमोरच्या पारावर देवदासचं कलेवर पडलेलं असतं. हळूहळू बघ्यांची गर्दी होऊ लागते. गाडीवान पोलिसाला घेऊन येतो. पारोच्या घरात कसला तरी धार्मिक विधी चाललेला. त्यामुळे घरातून मंत्रोच्चाराचे आवाज येत असतात; पण का कोण जाणे, आज तिचं पूजापाठात लक्ष नाही. मनाची बेचैनी वाढते तशी ती सज्जात जाऊन उभी राहते. फाटकाजवळ जमलेली गर्दी बघून तिचं कुतूहल जागं होतं. एकदोघांना ती गर्दीचं कारण विचारते. नोकरांच्या कुजबुजीवरून कुणी परगावचा माणूस रात्रभर पडून होता एवढी माहिती तिला मिळते. नोकरचाकरांच्या बोलण्यात तालपूरसोना या तिच्या माहेरच्या गावाचा उल्लेख आल्याने ती बेचैन होते. त्याच वेळी बाहेरून आलेल्या सावत्र मुलाला ती विचारते,
‘महेंद्र, बाहेर कोणी मरून पडलं आहे?’ ‘नीट समजलं नाही आई, पण तुमच्या गावातला कुणी देवदास मुखर्जी नावाचा माणूस मेला, अशी चर्चा आहे.’
‘कोण?’ स्तंभित झालेली पारो विचारते. ‘तुमच्या गावातला देवदास मुखर्जी.’ ‘कशावरून समजलं?’ ‘त्याच्याजवळ काही पत्रं आढळली, त्यात एक द्विजदास मुखर्जी नावाच्या व्यक्तीचं होतं.’ ‘हो... ते त्याचे मोठे भाऊ.’ ‘दुसरं पत्र काशीहून कुणा हरिमतीदेवी नामक महिलेचं...’
‘हां हां, ती त्याची आई!’ ‘हातात निळ्या खड्याची अंगठी होती.’
‘हो, त्याची मुंज झाली तेव्हा त्याच्या काकांनी दिली होती... मी जाते तिकडं....’ ‘तुम्ही कुठं जाताहात? आतापर्यंत लोकांनी उचललं असेल त्याला...’
‘नाही नाही... मला जायला हवं... देवदास...’’ पार्वती भान हरपल्यागत धावत सुटते. पायऱ्या उतरून फाटकाच्या दिशेने पळत जाते. पाठीमागून घरातल्या लोकांचे आवाज, ‘पार्वती थांब! आई! अरे कुणीतरी अडवा तिला... वेड लागलंय का? फाटक बंद करा...’’
जिवाच्या आकांताने पारो फाटकाकडे पळत जाते; पण ती पोचण्याच्या आत फाटक बंद केलं जातं. दारावर कपाळ आदळून पारो कोसळते.देवदासचा बेवारस मृतदेह चितेवर जळताना स्मशानातला डोंबवगळता अन्य कुणीही नसतं. देवदास मुखर्जीची कहाणी इथं संपते. कहाणी संपते, पण काही प्रश्न अनुत्तरित ठेवून. देवदासच्या मृत्यूनंतर चंद्रमुखी आणि पारो या दोघींचं पुढे काय झालं असेल, हा प्रश्न छळत राहतो. पारोला निदान देवदासच्या मृत्यूची वार्ता कळलेली असते. पण, चंद्रमुखीचं काय? तिचा काहीच ठावठिकाणा लागत नाही; आणि पारो दारावर डोकं आपटून कोसळते की तिचाही मृत्यू ओढवतो? (मूळ कादंबरीत पारो दारावर आपटते असा प्रसंगच नाही. ती दाराजवळ बेशुद्ध होते अन् तिला उचलून घरात आणलं जातं, दुसऱ्या दिवशी तिला शुद्ध येते असं वर्णन आहे. चित्रपटात मात्र पारो फाटकावर डोकं आपटून कोसळते असं दर्शवलंय.)
देवदासचं प्रेत जळताना शेवटच्या दृश्यात आकाशात दोन पक्षी विहरताना दिसतात, यावरून पारोने देह त्यागला असावा असं समजायचं का? ‘सौंदर्याची एवढी घमेंड चांगली नाही’ असं म्हणत देवदासने छडी मारल्याने पारोच्या कपाळी जखमेचा व्रण राहिलेला असतो. शेवटी दाराला धडकल्यानंतर त्याच व्रणाच्या जागी तिला जखम होणं, हा ‘योगायोग’ विषण्ण करून सोडणारा! मन विषण्ण करणाऱ्या या अशा खुणा ‘देवदास’मध्ये जागोजागी सापडतात.
(सदराचे लेखक हिंदी, मराठी चित्रपटांचे अभ्यासक आणि सुगम संगीताचे जाणकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.