Women Science Day
Women Science Day sakal
सप्तरंग

तंत्रज्ञानात यावे महिलाराज

सकाळ वृत्तसेवा

मालिनी नायर

आंतरराष्ट्रीय पातळीवर ११ फेब्रवारी हा दिवस विज्ञान क्षेत्रातील मुली आणि महिलांचा दिवस म्हणून ओळखला जातो. जगभरातील विकासाच्या प्रक्रियेत महिलांना सामावून घेण्याची गरज ओळखून संयुक्त राष्ट्रसंघाने २०१५ मध्ये याची सुरुवात केली. विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक-आर्थिक शाश्वत विकासात समानतेला प्रोत्साहन देणे हा यामागील हेतू आहे. अनेक देशातील महिलाकेंद्रित उपक्रम आणि परिषदांनी हा दिवस साजरा केला जातो. परिणामी ‘अमेरिकन उद्योग सल्लागार गटा’ने यूएस स्टेट डिपार्टमेंट, यूएसएआयडी, यूएसआयएसपीएफ यांच्या सहकार्याने भारवावर लक्ष केंद्रित केले.

अधिक भारतीय महिलांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (एसटीईएम) या क्षेत्रात शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रसिद्ध जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाने एका संयुक्त उपक्रमाची घोषणा केली. ज्याद्वारे महिलांचा ‘एसटीईएम’ संबंधित नोकऱ्यांमध्ये सहभाग वाढेल. याचा हेतू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा होता.

हा उपक्रम ‘वुमन्स इकॉनॉमिक एम्पॉवरमेन्ट एसटीईएम कोलॅबरेटिव्ह’ म्हणून ओळखले जातो. ही घोषणा यूएस-इंडिया अलायन्स शॅटर समिटमध्ये करण्यात आली. या कोलॅबरेटिव्हच्या माध्यमातून एसटीईएम क्षेत्रात महिलांना शिक्षण घेताना किंवा नोकरी मिळवताना येणाऱ्या अडथळ्यांची नोंद घेतली जाईल.

तंत्रज्ञानाशी संबंधित मानव संसाधनासाठी भारत जागतिक स्तरावर ओळखला जातो. जर भारताला या क्षेत्रात नेतृत्व करायचे असेल, तर तंत्रज्ञानाशी संबंधित नोकऱ्यांमध्ये अधिकाधिक महिलांना आणण्याची गरज आहे. युनेस्कोच्या अहवालानुसार एसटीईएमशी संबंधित क्षेत्रांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे. फक्त तीन टक्के मुली माहिती तंत्रज्ञान संबंधित उच्च शिक्षण अभ्यासक्रमात,

पाच टक्के मुली नैसर्गिक विज्ञान, गणित आणि सांख्यिकी संबंधित शिक्षणात आणि आठ टक्के अभियांत्रिकी, उत्पादन आणि बांधकाम संबंधित शिक्षणासाठी प्रवेश घेतात. सामान्यत: महिलांना या क्षेत्रात लिंगभेदाचा सामना करावा लागतो. ही क्षेत्रे परंपरेने पुरुष विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची क्षेत्रे म्हणून ओळखली जातात. दूरचित्रवाणी कार्यक्रम आणि चित्रपटांमध्येही महिला वैज्ञानिक, गणितज्ज्ञ किंवा सांख्यिकीतज्ज्ञ म्हणून क्वचितच दिसतात.

गीना डेव्हिस संस्थेने २०१५ मध्ये केलेल्या जेन्डर बायस विदाऊट बॉर्डर्स या अभ्यासात असे दिसून आले की, पडद्यावर एसटीईएम संबंधित नोकरी करणारी महिला केवळ १२ टक्के आहेत.

या क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व आहे, यात काहीही आश्चर्य नाही. या क्षेत्रात येण्यासाठी महिलांना परावृत्तच केले जात नाही, तर त्यांना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यापेक्षा कमी वेतन, कनिष्ठ पद यांसारख्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. जगभरातच दीर्घकाळपर्यंत महिलांना शिक्षण घेण्याची संधीच उपलब्ध करून दिली गेली नाही.

त्यांना चूल आणि मूल एवढेच सीमित करण्यात आले होते. महिला क्रांतीनंतर काही गोष्टी बदलल्या. महिला घराबाहेर पडण्याचे धाडस करू लागल्या, शिक्षण घेऊ लागल्या आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी करू लागल्या. पण, एसटीईएम क्षेत्र फारसे बदलले नाही. हे सर्व अडथळे असतानाही महिलांनी काही पथदर्शक शोध लावले. उदाहरणार्थ, मादाम मेरी क्युरी या पहिल्या महिला नोबेल विजेत्या होत्या.

त्यांच्यामुळेच आपल्याला क्ष-किरणांची माहिती मिळाली. नुकतेच जीवरसायनशास्त्रज्ञ जेनिफर ए. दौदना आणि त्यांच्या टीमने ‘सीआरआयएसपीआर’ नावाचे एक साधन तयार केले, ज्याद्वारे डीएनएचे संपादन शक्य झाले. या शोधामुळे त्यांनी जननशास्त्र आणि जीवरसायनशास्त्रात मोठे योगदान दिले. दोषपूर्ण जीन्समुळे निर्माण झालेल्या रोगांचे आणि अंपगत्वाचे निर्मूलन करणे या शोधामुळे शक्य झाले. याच संशोधनासाठी त्यांना दोन-तीन वर्षांपूर्वी नोबेल मिळाले. भारतीय महिलांनीदेखील एसटीईएम क्षेत्रात अभूतपूर्व योगदान दिले आहे.

संपूर्ण जगाला लॉकडाऊनमध्ये ढकलणाऱ्या कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी लस बनवण्यात के. सुमती आणि नीता पटेल यांचे महत्त्वाचे योगदान आहे. कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकमधील रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटचे नेतृत्व सुमती यांनी केले, जी भारताची स्वतःची लस होती; तर अमेरिकेतील नोवाव्हॅक्सचे नेतृत्व करणाऱ्या नीता पटेल यांनी नोवाव्हॅक्स कोविड व्हॅक्सिन बनवण्यात मोलाची कामगिरी पार पाडली.

काही शतकांपूर्वीचा काळ पाहिला तर भारत हा शंकुतला देवी यांच्यासारख्यांचा देश राहिला आहे.

गणित विद्येची माता आणि मानवी कॅलक्युलेटर म्हणून त्यांना ओळखले जात असे. आपल्या मानसिक गणिताच्या क्षमतेच्या जोरावर त्यांनी त्या काळच्या भारतातील सर्वात जलद संगणकाचा पराभव केला होता. विशेष म्हणजे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नसताना त्यांनी हे करून दाखवले.

गणितातील त्यांची क्षमता सर्वांनाच माहीत आहे; पण फार थोड्या लोकांना हे माहीत आहे की ‘द वर्ल्ड ऑफ होमोसेक्सुअल्स’ नावाच्या पुस्तकाचे लिखाणही त्यांनी केले आहे. लैंगिक ओळख हा आजही कलंकित विषय म्हणून ओळखला जातो, त्यामुळे तर हे जास्त विशेष आहे. १९७७ मध्ये त्यांनी लैंगिक ओळख आणि त्याविषयीचे स्टिरिओटाईप्स याविषयी लिहिले होते. हे सर्व त्यांनी शिक्षण न घेता साध्य केले. कल्पना करा त्यांना औपचारिक शिक्षणाची संधी मिळाली असती, तर त्या जगाला अधिक योगदान देऊ शकल्या असत्या.

उच्च शिक्षणातील २०१८-१९ ला केलेल्या अखिल भारतीय सर्वेक्षणानुसार आणि जागतिक बँकेच्या अहवालानुसार एसटीईएम विषयांची निवड करण्यात भारतीय महिलांचे प्रमाण जास्त आहे. एसटीईएम विषयात भारतातील ४३ टक्के महिला पदवी संपादन करतात,

असे या अहवालात म्हटले आहे. हे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे; तरीही यातील केवळ १४ टक्के महिला वैज्ञानिक, अभियंता, तंत्रज्ञ होऊ शकतात. नॅशनल सायन्स फाऊंडेशनच्या अहवालातूनही हाच निष्कर्ष समोर आला आहे. त्यानुसार ५२ टक्के महिला एसटीईएम विषयांसाठी प्रवेश घेतात; पण केवळ २९ टक्केच या क्षेत्रात नोकरी करू शकतात. आणि ज्या या क्षेत्रात जातात त्या नेतृत्वस्थानी जाण्यात यशस्वी होत नाहीत.

नॅशनल सायन्स फाऊंडेशनच्या अहवालानुसार केवळ तीन टक्के महिला एसटीईएम क्षेत्रात मुख्य कार्यकारी संचालकपदापर्यंत (सीईओ) पोहोचू शकतात. अनेक नामांकित आयआयटी संस्था किंवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्चमध्ये महिलांचे प्रमाण खूपच कमी आहे. एका नव्या अहवालानुसार आयआयटी बॉम्बेमध्ये १४३ प्राध्यापकांपैकी फक्त २५ महिला आहेत; तर मद्रास आयआयटीमध्ये ३०४ प्राध्यापकांपैकी ३१ महिला आहेत. एवढेच नाही, तर या संस्थांमध्ये आतापर्यंत कधीही महिला संचालक नव्हती. यावरून एसटीईएम क्षेत्रातील महिलांविषयीचा स्पष्ट भेदभाव दिसतो.

हे लिंगभाव गुणोत्तर अतिशय निराशाजनक आहे. पण, ही गोष्ट इथेच थांबत नाही, ज्या महिला एसटीईएम कार्यक्षेत्रात येतात, त्यांना वेतन श्रेणीतील तफावतीचा सामना करावा लागतो. ‘केली ग्लोबल वर्कफोर्स’च्या अहवालानुसार जवळपास ८१ टक्के भारतीय महिलांना कामगिरीच्या मूल्यमापनावेळी पक्षपाती वागणुकीला तोंड द्यावे लागते.

याचा अर्थ त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून त्यांच्या पुरुष समकक्षांच्या तुलनेत कमी मूल्यमापन मिळते. त्यामुळे त्यांची नेतृत्वस्थानी बढती होत नाही. अर्थातच त्यांच्या पुरुष सहकाऱ्यापेक्षा कमी वेतन मिळते. महिला त्यांच्या पुरुष सहकाऱ्यापेक्षा १५ ते ३० टक्के कमी कमावतात. आपण आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून याकडे पाहिले तरी तुम्हाला हा महिलाविरोधातील पक्षपात दिसून येईल.

१९०१ पासून मागील वर्षापर्यंत केवळ ६० महिलांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. ही समस्या समाजात महिलांविषयी असणाऱ्या दृष्टिकोनाची आहे. जोपर्यंत समाजाचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून त्यांना न्याय्य व्यासपीठ मिळणार नाही, तोपर्यंत महिला मागेच राहतील. या सर्व गोष्टी ओळखून सरकारने महिलांना एसटीईएम क्षेत्रात येण्यासाठी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

गुणवंत शालेय विद्यार्थिनींना एसटीईएम क्षेत्रात जाण्यास मदत व्हावी, यासाठी केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने ‘विज्ञान ज्योती’ ही योजना सुरू केली. महिलांना एसटीएम क्षेत्रात समान संधी मिळावी, यासाठी पायलट प्रोजेक्ट, जेंडर अॅडव्हान्समेंट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इन्स्टिट्यूशन्स (जीएटीआय)सारखे उपक्रम राबवले जात आहेत. ‘जीएटीआय’ ही नॉलेज इन्व्हॉल्व्हमेंट रिसर्च अॅडव्हान्समेंट थ्रू नर्चरिंग (किरन) सह एकत्रित काम करते. ‘किरन’ हा असा उपक्रम आहे जो महिला शास्त्रज्ञ आणि संशोधकांना संधी शोधण्यात मदत करतो, विशेषत: ज्या करिअरच्या मध्यात ब्रेक घेऊन परतल्या आहेत.

अनेक मुलींना एसटीईएम विषयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि त्याच क्षेत्रात करिअर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हे निश्चितपणे सकारात्मक पाऊल आहे. ज्यांनी तरुण मुली, महिला यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले अशा ११ महिला शास्त्रज्ञांची यादी महिला व बालविकास मंत्रालयाने २०२० मध्ये जाहीर केली. १९८०च्या दशकात पीटी उषाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केल्यानंतर किती मुलींना अॅथलेटिक्समध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली हे लक्षात आहे ना?

शासन पातळीवर होणाऱ्या प्रयत्नांशिवाय शाळा आणि कुटुंबातदेखील प्रयत्न व्हायला हवेत. शालेय अभ्यासक्रमात महिला शास्त्रज्ञांचे योगदान समाविष्ट केले पाहिजे आणि शिक्षकांना विज्ञानातील महिलांबद्दल विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. विज्ञानासंबंधित उपक्रमात सहभागी होण्यासाठी कुटुंबातूनच मुलींना प्रोत्साहन द्यायला हवे आणि मुलींना शिक्षण व नोकरीसाठी प्रवेश मिळण्याइतके एसटीईएम क्षेत्र सामान्य झाले पाहिजे.

शिक्षणाच्या आणि कामाच्या सर्व क्षेत्रात मोठी उंची गाठण्यास महिला आणि मुली सक्षम आहेत. कमतरता आहे ती योग्य मार्गदर्शनाची, प्रोत्साहनाची आणि त्यांना सिद्ध करण्यासाठी योग्य संधीची. विज्ञानाच्या क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या आपल्या घरातील महिला व मुलींचा मार्ग विनाअडथळा बनवण्याचे व्रत घेऊ या, जेणेकरून त्या उंच भरारी घेऊ शकतील आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटेल असे कार्य करतील.

विज्ञानासंबंधित उपक्रमात सहभागी होण्यासाठी कुटुंबातूनच मुलींना प्रोत्साहन द्यायला हवे आणि मुलींना शिक्षण व नोकरीसाठी प्रवेश मिळण्याइतके एसटीईएम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) क्षेत्र सामान्य झाले पाहिजे. शिक्षणाच्या आणि कामाच्या सर्व क्षेत्रात मोठी उंची गाठण्यास महिला आणि मुली सक्षम आहेत.

कमतरता आहे ती योग्य मार्गदर्शनाची, प्रोत्साहनाची आणि त्यांना सिद्ध करण्यासाठी योग्य संधीची. विज्ञानाच्या क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या आपल्या घरातील महिला व मुलींचा मार्ग विनाअडथळा बनवण्याचे व्रत घेऊ या, जेणेकरून त्या उंच भरारी घेऊ शकतील आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटेल, असे कार्य करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT