book review
book review 
सप्तरंग

वन्यजीवन उलगडणारी 'निसर्गवाट' (उदय हर्डीकर)

उदय हर्डीकर

अरण्य म्हणजे केवळ वाघ-सिंह-बिबटे-सांबरे-नीलगाई किंवा माकडं-वानरं नाहीत. वनाच्या आश्रयानं राहणारा प्रत्येक जीव त्याचा घटक आहे. अगदी निळ्या आभाळात स्वच्छंद विहार करणारे पक्षीही त्याचे अविभाज्य भाग आहेत. शिवाय अरण्य किंवा वन म्हणजे घनदाट झाडी नव्हे. शुष्क पानगळीचा प्रदेश, मोकळी मैदानंही त्यात येतात. प्रत्येक प्रजाती तिला अनुकूल अशा परिसरात राहते. या वनांनी त्यांच्या पोटात अनेक गूढ गोष्टी साठवल्या आहेत. या वनांचा छंद एकदा लागला, की मग माणूस त्यात हरपून जातो. निसर्गाच्या ग्रंथाला प्रारंभ नाही आणि शेवटही. आपण त्यातून किती शिकतो यावर सगळं अवलंबून आहे. अतुल धामनकर हे असे निसर्गप्रेमी आहेत. जंगलाच्या प्रेमात पडलेले. गेली कित्येक वर्षं त्यांची वनांमध्ये भ्रमंती सुरू असून, अनेक दुर्मिळ घडामोडींचे ते साक्षीदार ठरले आहेत. वन्यजीवांच्या कथा रसाळ भाषेत सांगणारे ते लेखकही आहेत. त्यांचं "निसर्गवाट' हे पुस्तक आपल्याला थेट जंगलात घेऊन जातं आणि तिथल्या घडामोडी आपण जणू प्रत्यक्ष पाहतो आहोत याची जाणीव करून देतं.

धामनकर यांनी या पुस्तकात निसर्गाच्या विविध रूपांचा परिचय करून देतानाच जंगलात घडणाऱ्या घडामोडीही उलगडून दाखवल्या आहेत. त्यांचं पक्ष्यांवर प्रेम असल्यामुळे या पुस्तकातले बहुसंख्य लेख विहंगांवर आहेत. आपल्याला वाटतं तसं पक्ष्यांचं जग निष्पाप वगैरे काही नसतं. तिथंही स्पर्धा, द्वेष, फसवणूक, हुशारी आदी गुण असतातच. पुस्तकातल्या "निसर्गवाट' या पहिल्यात प्रकरणात लेखकानं त्यानं पाहिलेल्या चार थरारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. एका शिकारी पक्ष्यानं जवळपास त्याच्याच आकाराच्या एका पक्ष्याच्या केलेल्या शिकारीचा त्यात समावेश आहे. धामनकर आणि ट्रॅकर नारायणसिंग या प्रसंगाचे साक्षीदार ठरले. कबुतरापेक्षा थोडा मोठा असलेल्या "तिसा'नं (व्हाइट आय बझार्ड) एका सोनपाठी सुतार पक्ष्याची केलेली ही शिकार होती. सोनपाठी सुताराची चोच चांगलीच भक्कम असते; पण तिसानं भक्ष्याला प्रतिकाराची संधीच मिळू दिली नाही आणि विलक्षण वेगानं हल्ला करून शिकार साधली, असा हा प्रसंग पुस्तकातच वाचायला हवा. एका व्याधानं (गरुडाची एक जात) केलेली लांडोरीची शिकार, कोतवालासारख्या छोट्या पक्ष्यानं सर्प गरुडासारख्या शक्तिशाली आणि मोठ्या पक्ष्यावर हल्ला करून त्याला पळवून लावणं, तिसानं केलेली सोनपाठी सुताराची शिकार आणि एका उदमांजरानं केलेल्या मत्स्य घुबडाच्या शिकारीच्या प्रयत्नाला धामनकर साक्षीदार होते. त्यातून त्यांची निसर्गाबाबतची ओढ वाढत गेली, असं ते नमूद करतात.

"चंदन आणि करू' हे असंच एक छान प्रकरण. करकोच्याच्या वर्गातला "चंदन' (लेसर ऍडज्युटंट स्टॉर्क) हा एक मोठा पक्षी आहे. ताडोबात क्वचित नजरेला पडणाऱ्या या पक्ष्याचं लेखकाला व्यवस्थित निरीक्षण करता आलं. त्याचं घरटं सापडल्यावर तिथं ठाण मांडून; पण पक्ष्याला न बिथरवता धामनकरांनी हे निरीक्षण केलं. चंदनाच्या घरट्याचा परिसर वाघाच्या वावराचा होता. एका सायंकाळी निरीक्षण संपवून परतताना वाघाशी होणारा संभाव्य सामना थोडक्‍यात कसा हुकला, याचं वर्णन या प्रकरणात आहे. विहंगांच्या जगातही भरपूर लबाड पक्षी आहेत. लबाड म्हणजे परजीवी पक्षी. हे स्वत: घरटं न बनवता दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यांत अंडी घालून त्या पक्ष्यांवर आपल्या पिलांच्या संगोपनाची जबाबदारी लादतात. त्यात आपल्याला माहिती असलेला पक्षी म्हणजे कोकिळा. कावळ्याच्या घरट्यात अंडी घालून पळ काढणारा हा पक्षी; पण याचे भाईबंदही आहेत. त्यात पावशा (कॉमन हॉक कक्कू), चातक (पाइड कक्कू), कक्कू (कॉमन कक्कू) आणि भारतीय कक्कू (इंडियन कक्कू) यांचा समावेश होतो. मात्र, एका कक्कूनं खाटिक पक्ष्याच्या घरट्यात अंडं घातल्याचं लेखकाच्या नजरेत आलं आणि मग निरीक्षण सुरू झालं. या कक्कूच्या पिलाची वाढ फार झपाट्यानं होते आणि आकारानं ते मोठे असल्यामुळे खाटिक पक्ष्यानं आणलेलं खाद्य तेच खात गेले आणि परिणामी खाटकाची तीन पिलं उपासमारीनं खंगली. शेवटी या पिलानं त्यांना घरट्यातूनही खाली ढकलून दिलं. बापड्या खाटिक पक्ष्याला मात्र हे काही समजलं नाही आणि त्यानं या नकली पिलाचा सांभाळ चालू ठेवला. "बळी तो कानपिळी' हेच निसर्गाचं तत्त्व असल्यामुळे कक्कूच्या पिलानं स्वत:चा स्वार्थ साधला. हे सगळं प्रकरण वाचण्यासारखंच.

पुस्तकात पक्ष्यांवर अन्य प्रकरणंही आहेत. सोबत सुरेख छायाचित्रांची जोड आहे. पक्ष्यांच्या या मनमोहक जगात वावरायचं असेल, त्यांच्याबाबत जाणून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक वाचायला हवं. वन्यजीवनाबाबत खूप काही जाणून घेण्यासाठी ही "निसर्गवाट' उपयुक्त आहे.

पुस्तकाचं नाव : निसर्गवाट
लेखक : अतुल धामनकर
प्रकाशक : श्रीविद्या प्रकाशन, पुणे (020-24458455/9995)
पानं : 143, किंमत : 300 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT