Dr. Heena Gavit, Raksha Khadse, Dr. Subhash Bhamre, Smita Wagh, Dr. Bharti Pawar
Dr. Heena Gavit, Raksha Khadse, Dr. Subhash Bhamre, Smita Wagh, Dr. Bharti Pawar esakal
सप्तरंग

सह्याद्रीचा माथा : ठहरीये, पिक्चर अभी बाकी है दोस्त!

लेखक : डॉ. राहुल रनाळकर

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर महाराष्ट्रातील सहापैकी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या वाट्याच्या पाच जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. नाशिकची जागा शिंदे गटाकडे आहे. महाविकास आघाडीने नंदुरबार वगळता अजून उमेदवारांची घोषणा केलेली नाही. वंचितसह इतर पक्षांच्या पातळीवरही सामसूम आहे.

उत्तर महाराष्ट्रात चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात निवडणूक (Lok Sabha Election 2024) होणार आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष एकमेकांची चाल, उमेदवार जाणून घेत सावध पावले उचलत आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी रावेर आणि धुळ्यातील उमेदवारांबाबत काही ठिकाणी उघडपणे विरोध प्रदर्शित करण्यात आला.

एकूणच स्थिती अतिशय गुंतागुंतीची असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होऊ शकते, असे तरंग राजकीय क्षितिजावर उमटत आहेत. (Uttar Maharashtra saptarang article on lok sabha election 2024 khandesh news)

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यावर सर्व राजकीय पक्षांच्या पातळीवर सध्या खलबते सुरू आहेत. गतवेळी एकमेकांच्या बरोबर असलेल्या पक्षांमध्ये फूट पडून दोन्हींची तोंडे विरुद्ध बाजूला गेली आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरळसरळ दोन गट पडले आहेत.

दुसरीकडे भाजप काहीही करून राज्यातील किमान ४० जागा जिंकण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. स्वतःचा सर्वे काहींबाबत नकारात्मक असूनही जळगावचा अपवाद वगळता सर्व विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

मात्र, ही उमेदवारी जाहीर झाल्यावर आधीपासून तयारी करीत असलेल्यांमध्ये काहीशी नाराजी पसरली आहे. नंदुरबारमधून तर शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी खासदार डॉ. हीना गावितांना उमेदवारी देऊ नये, असा उघडपणे विरोध दर्शविला होता. धुळ्यातूनही डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी मिळणार नाही, असे सांगितले जात होते.

रावेरमधून रक्षा खडसे यांना, दिंडोरीतून डॉ. भारती पवार यांच्याविषयी नाराजी असल्याचे भाजपच्या आतल्या गोटात सांगितले जात होते. ही सर्व स्थिती असताना भाजपने रिस्क न घेता विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. भाजपने सावधपणे घेतलेला हा निर्णय असला, तरी विद्यमान खासदारांबाबत कथित नाराजीच्या पार्श्वभूमीवर वर्षापासून तयारी करणारे अनेक घटक नाराज झाले आहेत.

काहींनी त्याबाबत सोशल मीडियातून भूमिकाही मांडली. रावेरमधून माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल हेही आधीपासून तयारी करीत होते, त्यांच्या समर्थकांनी नाराजीची भावना व्यक्त केली आहे. जळगावमधून स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला चाळीसगावात विरोध दर्शविण्यात आला.

नंदुरबारमधून डॉ. हीना गावित यांना उमेदवारीनंतर उघडपणे कुणी विरोध केला नसला तरी गतवेळेप्रमाणे भाजपचे जुने जाणते कुवरसिंग वळवी यांचे पुत्र डॉ. विशाल वळवी आणि सुहास नटावदकर यांची कन्या समीधा यांची अपक्ष उमेदवारी किंवा भूमिका किंबहुना समाज संघटनांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

नवीन चेहऱ्याला संधी मिळावी, अशी भाजपमधीलच काहींची मागणी होती. उमेदवारीला विरोध करणारे चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम यांनी महायुतीच्या बैठकीला हजेरी लावत आपल्या नाराजीचे कारण स्पष्टपणे गावित परिवाराला सांगितले. निवडून आल्यावर आमची कामे होत नसतील तर करायचे काय? ही त्यांच्या मनातील सल बरेच काही सांगून जाणारी आहे.

असेच वक्तव्य गिरीश महाजन यांनी रक्षा खडसे यांच्या उमेदवारीबाबत करून निवडून आल्यावर आमच्याकडे लक्ष द्या, असे सांगत स्वतःची नाराजी व्यक्त केली. धुळे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्याविरोधात उमेदवारीला विरोध करणारे फ्लेक्स मालेगावमध्ये झळकले. त्यामुळे भाजपने उमेदवारी जाहीर केल्यावरही सारे काही आलबेल असेल, असे चित्र सध्या तरी दिसत नसल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते.   (latest marathi news)

भाजपने उमेदवार जाहीर करूनही महाविकास आघाडीने केवळ नंदुरबार वगळता अजूनही उमेदवार जाहीर केलेले नाहीत. जळगावची जागा शिवसेना ठाकरे गट, तर रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहे. दिंडोरी आणि धुळे महाविकास आघाडीकडे आहेत.

मात्र, येथे पक्षाचा तुल्यबळ उमेदवारांचा शोध अजूनही संपलेला नाही. नाशिकच्या जागेवर भाजप हक्क सांगत असला, तरी जागावाटपात ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे असून, त्यांनी परस्पर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे, त्यावरून भाजपने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करीत प्रदेश महामंत्री यांच्याकडे धाव घेतली.

संकेतांना झुगारून उमेदवारी कशी जाहीर होते, असा प्रश्न उपस्थित करीत ‘नाशिकचा खासदार कमळाचाच’ अशी भूमिका मांडत गदारोळ उडवून दिला. अर्थात, ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भावना होती की आणखी काही समोर आले नाही, कारण पक्षाने त्याबाबत पुढे काहीही वक्तव्य अजून तरी केलेले नाही. त्यामुळे ही जागा नेमकी कुणाला मिळते, यावर महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होणार आहे. 

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांबाबत जनमानसात आणि कार्यकर्त्यांत एकीकडे अशा प्रतिक्रिया उमटत असल्या, तरी उमेदवारी जाहीर झालेली असून, ती बदलणार नाही, हेही निश्चित मानावे; तर भाजपने जळगाव आणि दिंडोरीबाबत गेल्या निवडणुकीत ऐनवेळी बदललेल्या उमेदवारीचा अनुभव पाहता असे काही होणारच नाही, याची खात्री कुणालाही आता नाही.

यामुळेच भाजपने उमेदवार जाहीर केले असले, तरी महाविकास आघाडीही अतिशय सावध पावले टाकत आहे. भाजपच्या तोडीस तोड उमेदवार देता येईल का, किंबहुना त्यांच्यातील प्रबळ दावेदाराला आपल्याकडे घेता येईल का ? किंवा आपला प्रबळ दावेदाराचे पत्ते शेवटच्या क्षणी खोलून भाजपला बेसावध ठेवता येईल का, अशी वेगवेगळ्या पातळ्यांवरील रणनीती आखली जात आहे, त्यामुळेच दोस्त ‘अभी पिक्चर बाकी है’ असेच सध्याच्या राजकीय स्थितीबाबत म्हणता येईल. 

गोवालचे सर्वांनाच नवल 

काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत उत्तर महाराष्ट्रातील एकमेव नंदुरबारमधील उमेदवारी जाहीर केली आहे. येथून काँग्रेसतर्फे माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या स्नुषा व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनी नाईक, सीमा वळवी आदी नावांची चर्चा होती. खुद्द आमदार ॲड. के. सी. पाडवी यांच्या नावाचाही पक्ष विचार करीत असल्याचे चित्र होते.

असे असताना पक्षाने त्यांचे पुत्र ॲड. गोवाल पाडवी यांची उमेदवारी जाहीर करीत सर्वांनाच धक्का दिला. याचे कारण ॲड. गोवाल हे पक्षाच्या कोणत्याही घडामोडींत तसे सक्रिय नव्हते किंवा त्यांनी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढविलेली नव्हती. त्यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला उमेदवारी देण्यामागचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT