kotsquad village sakal
सप्तरंग

खुणावणारं कॉटस्वॉल्ड

इंग्लंडमध्ये कॉटस्वॉल्डमधल्या खेड्यांमध्ये फिरायला आणि सुट्टी घालवायला जाणे, हा पर्यटनाचा महत्त्वाचा भाग आहे.

अवतरण टीम

- विशाखा बाग

इंग्लंडमध्ये कॉटस्वॉल्डमधल्या खेड्यांमध्ये फिरायला आणि सुट्टी घालवायला जाणे, हा पर्यटनाचा महत्त्वाचा भाग आहे. खरंतर या प्रदेशांमध्ये आणि यामधील कोणत्याही गावांमध्ये असं काहीही खूप जगावेगळं अजिबात नाही.

हिरवीगार पसरलेली कुरणं, स्वच्छ वाहत्या नद्या, अनेक लहान-मोठे डोंगर, योग्यरीत्या संवर्धन केलेली दगडी घरं या अतिशय साध्या गोष्टी इथे आहेत. इथे कोणतंही थीम पार्क नाही, कोणताही मॉल नाही, कोणतंही मानवनिर्मित मोठं आकर्षण नाही, तरीही इथं मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते...

आज आपण बघणार आहोत इंग्लंडमधील मुख्यतः ग्लॉस्टरशायर आणि ऑक्सफर्डशायर या दोन परगण्यातील निसर्ग आणि सृष्टिसौंदर्याने नटलेला प्रदेश म्हणजे कॉटस्वॉल्ड. कॉटस्वॉल्ड म्हणजे हिरव्यागार कुरणांनी सजलेल्या छोट्या छोट्या टेकड्या, जिथे शेळ्या-मेंढ्यांना लागणारं हिरवगार गवत आणि पाणी मोठ्या प्रमाणात आहे अशी गावं. ही सर्व गावं निसर्गसौंदर्याने सजलेली आहेत, यात वादच नाही. कॉटस्वॉल्डचा हा प्रदेश साधारण दोन हजार चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे.

मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात इथे जाण्याचा योग आला होता. अर्थात हा प्रदेश खूप मोठा आहे; परंतु यामधली फक्त तीनच गावं माझ्या बघण्यात आली, ती इतकी नयनरम्य होती की जसं ठरवून वसवलेली!

बिबरी, बोर्टन ऑन वॉटर, ब्रॉडवे, बर्फोर्ड, कॅसल कॉम्बे यांसारखी अनेक छोटी छोटी चित्रात असल्यासारखी खेडी इथे बघायला मिळतात. पिवळसर लाईनस्टोनच्या दगडात बांधलेली झोपडीवजा घरं, थोडक्यात साधारण दोन मजली दगडी घरं या खेड्यांमध्ये सर्वच ठिकाणी बघायला मिळतात. नीटनेटकी घरं, त्यासमोर असलेली बाग आणि बरेचदा सरळ घरासमोर नदी. हे असं बघायला मिळणं अप्रूप आहे.

सगळीकडे स्वच्छता, घरासमोर बागा, त्यामध्ये वेगवेगळी फुलझाडं आणि घरावर चढवलेल्या वेगवेगळ्या वेली, यामुळे त्या दगडी घराचं सौंदर्य अधिकच उठून दिसतं. याशिवाय सार्वजनिक छोट्या बागा प्रत्येक गावामध्ये बघायला मिळतात.

नदीच्या आणि अशा बागांच्या आजूबाजूला असलेले कॅफेज, रेस्टॉरंट्स आणि दुकानं या सर्व गोष्टींमुळे हा परिसर पर्यटनाचं मुख्य आकर्षण केंद्र झाले आहे. इंग्लंडमधील अनेक वेगवेगळ्या छोट्या स्थानिक पर्यटनाच्या कंपन्या इथे एक ते दोन दिवसाच्या टूर्स काढत असतात.

इंग्लंडमध्ये इथल्या खेड्यांमध्ये फिरायला आणि सुट्टी घालवायला जाणे, हा पर्यटनाचा महत्त्वाचा भाग आहे. कॉटस्वॉल्डमधल्या या गावांना वेगवेगळ्या प्रकारे ओळखलं जातं. बिबरी या गावाला इंग्लंडमधील सर्वात सुंदर खेडं म्हणून मान मिळाला आहे, बोर्टन ऑन वॉटर गावाला कॉटस्वॉल्डचे वेनिस म्हणून ओळखतात.

ब्रॉडवे या गावाला कॉटस्वॉल्डचा हिरा म्हणून ओळखतात आणि बर्फोर्ड या गावाला कॉटस्वॉल्डचं प्रवेशद्वार म्हणून ओळखतात. आणि फोर्ब्स २००९च्या यादीत जगातलं सहावं योग्य आणि सुंदर राहण्याचं ठिकाण म्हणून या गावाला मान मिळाला आहे. याचबरोबर गावाची अशी ओळख कायम ठेवण्यासाठी निसर्गसौंदर्याबरोबरच इथे राहणाऱ्या रहिवाशांचासुद्धा खूप मोलाचा सहभाग आहे.

बोर्टन ऑन वॉटर अगदी चित्रात काढावं तसंच गाव आहे. अगदी गावाच्या मधोमध विंडरश नावाची नदी वाहते. नदी लहानशीच; पण दोन्ही बाजूचा परिसर बांधकाम करून सजवून ठेवला आहे. नदीवरून एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायला छोटे छोटे दगडी पूल आहेत, पुलाच्या दोन्ही बाजूला बागा आणि नदीमध्ये अनेक प्रकारची बदकं हमखास दिसतात. अर्थातच नदीचे पाणी स्वच्छ आहे.

तेथील रहिवासी आणि येणारे-जाणारे पर्यटकसुद्धा कोणत्याही कारणाने नदी, आजूबाजूचा परिसर घाण करत नाहीत. या निसर्गसौंदर्याबरोबरच या गावामध्ये पर्यटकांसाठी बघण्यासाठी म्हणून एक छोटं मॉडेल व्हिलेज, एक वन्यजीव पार्क, छोटं रेल्वे आणि मोटार म्युझियम आणि एक चर्च आहे. थोडक्यात काय, लंडनपासून एका दिवसाची ट्रिप या गावांमध्ये करून, अगदी फ्रेश होऊन पुन्हा आपण लंडनला परतु शकतो.

हे सगळं बघत असताना पोटपूजा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कॅफेज आणि रेस्टॉरंट्स नैसर्गिक सजावट असल्याने खुणावतात.

ब्रॉडवे या गावामध्ये गेल्यावर लगेच तुम्हाला सोनेरी पिवळसर रंगांमध्ये बांधलेली टिपिकल इंग्लिश पद्धतीची दगडी घरं आणि त्यासमोर असलेली चेस्टनट वृक्षांची लांब पसरलेली रांग बघून आपण या गावाच्या प्रेमात पडतो. या गावामध्येसुद्धा पर्यटकांसाठी अनेक आकर्षण केंद्र आहेत. ब्रॉडवे टॉवरवर चढून इथून आजूबाजूचा संपूर्ण हिरव्यागार कुरणांचा प्रदेश आणि नदी हे सगळंच खूप सुंदर दिसतं.

इथे लव्हेंडरची शेती केली जाते, तिथेही तुम्ही भेट देऊ शकता. बिबरी येथील दगडी घरांची गल्ली अतिशय जगप्रसिद्ध आहे. या दगडी घरांमध्ये अकराव्या ते बाराव्या शतकापासून लोकर साठवली जात असे आणि हीच लोकर आर्लिंग्टन फॅक्टरीमध्ये पाठवली जात असे.

कॉटस्वॉल्ड या प्रदेशातली ही सगळीच गावं साधारण नवव्या ते दहाव्या शतकाच्या आधीपासूनची वसलेली आहेत. तेव्हापासून ते अगदी १८व्या शतकापर्यंत येथील महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे शेती, शेळ्या-मेंढ्या राखणं, त्यांच्यापासून लोकर काढणं आणि ती साठवून ठेवून बाहेरच्या प्रदेशांमध्ये विकणं. यावरच या संपूर्ण प्रदेशाची अर्थव्यवस्था अवलंबून होती.

इथे मोठ्या प्रमाणात मिळणारा पिवळ्या रंगाचा दगड संपूर्ण इंग्लंडभर चर्चेस, युनिव्हर्सिटी आणि पॅलेस बांधण्यासाठी वापरण्यात आला आहे. सध्या या सर्वच प्रदेशाचा प्रमुख व्यवसाय हा पर्यटन आहे आणि याच पर्यटनामुळे सुरू असणारे वेगवेगळे जोडधंदे हेच येथील उत्पन्नाचे साधन आहे.

इथल्या सर्व रहिवाशांना आणि व्यवसायिकांना इथल्या निसर्गाचं, नदीचं आणि या प्रदेशाला मिळालेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानाचं आणि किताबाचं महत्त्व आहे. हा प्रदेश टिकवून ठेवला, निसर्गसौंदर्य आणि स्वच्छता अबाधित ठेवली तरच आपलं उत्पन्न आणि व्यवसायसुद्धा टिकेल, याची या लोकांना पूर्णपणे जाणीव आहे.

खरंतर या प्रदेशांमध्ये आणि यामधील कोणत्याही गावांमध्ये असं काहीही खूप जगावेगळं अजिबात नाही. हिरवीगार पसरलेली कुरणं, शेळ्या-मेंढ्या आदी पशुधन, स्वच्छ वाहत्या नद्या, अनेक लहान-मोठे डोंगर, योग्यरीत्या संवर्धन केलेली दगडी घरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता या अतिशय साध्या गोष्टी इथे आहेत.

इथे कोणतंही थीम पार्क नाही, कोणताही मॉल नाही, कोणतंही मानवनिर्मित मोठं आकर्षण नाही, तरीही इथं मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. अगदी कॉलेजच्या तरुण-तरुणींपासून फॅमिली आणि सीनियर सिटिझनपर्यंत सर्व जण इथे आनंदाने येत असतात. आपल्याकडे मात्र आपण खेड्यांमध्ये पर्यटनाला जाणे खूपच दुर्मिळ आहे. आपल्याकडचा पर्यटक आपल्याच देशातल्या खेड्यांमध्ये पर्यटनासाठी वळवण्यासाठी आपल्याला खूप मोठा पल्ला अजून गाठायचा आहे.

gauribag7@gmail.com

(लेखिका या वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''कुणाचा बाप, बापाचा बाप.. त्याचा आजा आला तरी...'' मुंबई महानगर पालिका निवडणुकीवरुन मुख्यमंत्र्यांचं सभागृहात मोठं विधान

Tej Pratap Yadav: तेजप्रताप यादव नव्या पक्षाची घोषणा करणार? , अनुष्काही असणार सोबत!

Latest Marathi News Updates :गुंडांना पक्षात घेऊन पदं देण्यात आली, उद्धव ठाकरेंची टीका

Bangladeshi Man Arrested: धक्कादायक! नेहा नाही हा तर बांगलादेशी अब्दुल; तब्बल २० वर्षांपासून राहत होता किन्नर बनून

हे काय नवीनच! दोन सख्ख्या भावांनी केलं एकाच मुलीसोबत लग्न; एक राहातो गावात तर दुसरा परदेशात

SCROLL FOR NEXT