NEW BOOKS
NEW BOOKS  
सप्तरंग

स्वागत नव्या पुस्तकांचे

सकाळवृत्तसेवा

ओंजळीतील सूर्य
प्रकाशक : साकेत प्रकाशन, औरंगाबाद 
(०२४०-२३३२६९२) / पृष्ठं : १८४ / मूल्य :२०० रुपये
गो. द. पहिनकर यांचा हा कथासंग्रह. मराठवाड्यातल्या अर्धनागरी जीवनाचं प्रत्ययकारी चित्रण या पुस्तकात आहे. मातीवर प्रेम करणारा शेतकरी, मातृत्व जपण्यासाठी जिवाच्या आकांतानं संघर्ष करणारी आई, प्रतिभावान कवीच्या काव्यावर लुब्ध झालेली एक तरुणी, उच्चशिक्षित झाल्यावर वर्गभेदात कैद झालेला एक तरुण अशी अनेक पात्रं या कथासंग्रहात भेटतात. वाचकाला खिळवून ठेवणारं तंत्र, नेटके संवाद, पात्रांचं नेमकं चित्रण आणि प्रत्येकाला भिडणारं कथानक यांमुळे या पुस्तकातल्या कथा वाचकाला खिळवून ठेवतात. 

एका सेलिब्रिटी डेंटिस्टची बत्तिशी
प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे (०२०-२४४८०६८६) / 
पृष्ठं : १७२ / मूल्य : २०० रुपये
अनेक कलाकारांचे दंतवैद्य म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलेले डॉ. संदेश मयेकर यांनी लिहिलेल्या या ‘दंतकथा.’ डॉ. मयेकर यांच्याकडे अनेक प्रकारचे अनुभव आहेतच आणि त्यांची ते सांगण्याची त्यांची शैलीही चुरचुरीत आहे. अनुभव सांगतासांगता त्यांच्यामागचं विज्ञान, वैद्यकीय ज्ञान डॉ. मयेकर देतात आणि त्याच वेळी काय करायचं, समस्या कशा टाळायच्या, डॉक्‍टरांनी काय करायचं अशाही गोष्टी त्याच ओघात सांगतात. दंतरोपणापासून अक्कलदाढांच्या त्रासापर्यंत आणि श्‍वासाच्या दुर्गंधीपासून वृद्धत्वातल्या दातांच्या समस्यांपर्यंत अनेक गोष्टींवर डॉ. मयेकर यांनी प्रकाश टाकला आहे. डॉ. अरुण मांडे यांनी अनुवाद केला आहे. 

अंतरंग युवामनाचे
प्रकाशक
: शांती पब्लिकेशन्स, पुणे (०२०-२४३६२२५०) / पृष्ठं :१४४ / मूल्य :२१० रुपये
युवकांशी संबंधित विविध प्रश्‍नांचा वेध घेणारं हे पुस्तक प्रा. नंदकुमार कुलथे यांनी लिहिलं आहे. युवकांनी अभ्यास कसा करावा, सभाधीटपणा कसा मिळवावा, स्पर्धेचं महत्त्व, युवक आणि वैवाहिक जीवन, दोन पिढ्यांमधला संघर्ष, युवक आणि कौटुंबिक जीवन, परीक्षेला तोंड कसं द्यावं, आत्मविश्‍वास कसा वाढवावा, लोकप्रियता कशी वाढवावी अशा अनेक विषयांवर प्रा. कुलथे यांनी मतं मांडली आहेत. 

जस्ट मॅरीड, प्लीज एक्‍स्कुज 
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे (०२०-२४४७६९२४) / पृष्ठं : २२२ / मूल्य:२५० रुपये
लग्न जुळण्यापासून ते योग्य प्रकारे निभावण्यापर्यंतच्या काळात अनेक प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागतं. एकमेकांच्या 
आवडीनिवडी जुळणं, जुळवून घेणं, मित्र-मैत्रिणींचा हस्तक्षेप, कौटुंबिक स्थिती, सामाजिक वर्तुळ यांचे धागे जुळणं, पाहुणे येणं, मुलांच्या आगमनाची उत्सुकता, वेगवेगळे वाद अशा किती तरी गोष्टीं या प्रवासात आपसूकच येतात. यशोधरा लाल यांनी आपल्या अशाच अनुभवांना विनोदी पद्धतीनं मांडलं आहे. यशोधरा या प्रवासात स्वतःचा शोध घेत जातात आणि निरीक्षणं मांडत जातात, त्यामुळं वाचकांनाही त्यात स्वतःचं प्रतिबिंब उमटताना दिसतं. नीता गद्रे यांनी मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद केला आहे. 

ज्योती 
प्रकाशक : इंद्रनील प्रकाशन, कोल्हापूर (९५४५९८६३२१) / पृष्ठं : ३२८ / मूल्य : ४६० रुपये
मनोहर पोतदार ‘अबोध’ यांनी लिहिलेली ही कादंबरी. ज्योती नावाच्या एका युवतीच्या आयुष्याचा वेध घेणारी. वैधव्याच्या दुःखातून बाहेर पडून ही युवती कशी सावरते, अनेक सहृदय व्यक्ती तिला मदत कशी करतात अशी कथावस्तू असलेली आणि एकूणच या सगळ्या विषयाचं अतिशय संवेदनशीलपणे चित्रण करणारी ही कादंबरी. प्रा. माधव, प्रा. फ्रॅंक, डॉ. मार्गारेट, ज्योतीचा मित्र परिवार, कुटुंबीय अशा अनेक व्यक्तिरेखा या कादंबरीत आहेत. लेखकानं त्यांची गुंफण करताना एक सकारात्मक विचार सतत कायम ठेवला आहे. मानवी नाती, स्त्रीचं जीवन, स्त्री शिक्षण, विधवांची सामाजिक स्थिती अशा अनेक गोष्टींना स्पर्श ही कादंबरी स्पर्श करते.  

शारदीचिये चंद्रकळे
प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२०-२५५३७९५८) / पृष्ठं : १७८ / मूल्य : २०० रुपये
डॉ. रामचंद्र देखणे यांनी संतसाहित्याचं सौंदर्य या पुस्तकातून उलगडून दाखवलं आहे. संतसाहित्याशी संबंधित वेगवेगळ्या विभागांचं रसग्रहण करणारे लेख त्यांनी या पुस्तकात लिहिले आहेत. श्री विठ्ठल आणि पंढरपूर, संतसाहित्यातला श्रीकृष्ण, संतसाहित्यातली दिवाळी अशा विषयांवर त्यांनी लिहिलं आहे. अमृतानुभव, गीतारहस्य अशा पुस्तकांच्या विवेचनाबरोबरच भजन, वारी, दिंडी, कीर्तन यांची माहितीही पुस्तकात आहे. देव, देश आणि धर्म, संतसाहित्यातलं पत्र, अध्यात्मलाभ, प्रश्‍न :शोध आणि तत्त्वबोध आदी विषयांवरच्या लेखांचाही पुस्तकात समावेश आहे. 

अंतोनी गौडी आणि सॅंटियागो कॅलट्राव्हा

प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-४४७३४५९) / पृष्ठं : १३६ / मूल्य : २५० रुपये
स्पेनमधले अंतोनी गौडी आणि सॅंटियागो कॅलट्राव्हा या दोन स्थापत्यमहर्षींची ओळख करून देणारं पुस्तक. अमेरिकेत वास्तुरचनाकार म्हणून काम करणारे श्रीनिवास माटे यांनी हा परिचय करून दिला आहे. अतिशय अद्भुत, स्वर्गीय आणि देखणी वास्तुशिल्पं गौडी आणि कॅलट्राव्हा यांनी तयार केली. त्यांच्यामागचं सौंदर्य माटे यांनी उलगडून दाखवलं आहे. अनेक उत्तम छायाचित्रांचा वापर असल्यामुळं गौडी आणि कॅलट्राव्हा यांचं काम समजून घेणं सोपं जातं. सग्राडा फॅमिलया कॅथेड्रल, व्हॅलेन्शिया आर्ट सेंटर यांचा त्यांनी विशेष परिचय करून दिला आहे. पिअरे लुईजी नेरवी या इटालियन वास्तुरचनाकाराविषयीही त्यांनी अनुषंगानं माहिती दिली आहे. सुलभा तेरणीकर यांनी संपादन केलं आहे. 

महाभारताचा कालनिर्णय
प्रकाशक : पुष्पक प्रकाशन, पुणे (०२०-२४४८३०६२) / पृष्ठं : १५२ / मूल्य : १८० रुपये
खगोलशास्त्रीय आणि कालगणनेच्या दृष्टीनं महाभारतावर प्रकाश टाकणारं हे पुस्तक प्रफुल्ल मेंडकी यांनी लिहिलं आहे. महाभारतात अनेक ठिकाणी ग्रहणं, ग्रहदर्शन, नक्षत्रतारका दर्शन, दक्षिणायन-उत्तरायण यांचे उल्लेख आले आहेत. त्या सर्वांचा विचार करून मेंडकी यांनी कालनिश्‍चितीचा दावा केला आहे. अनेक गोष्टींसाठी मेंडकी यांनी संगणकाचाही वापर केला आहे, नासाच्याही इंजिनिअरना संपर्क करून मदत घेतली आहे. ‘डेल्टा टी’ या सूत्राचा वापर करून त्यांनी विश्‍लेषण केलं आहे. अतिशय मेहनत घेऊन एक वेगळ्या प्रकारचं संशोधन त्यांनी केलं आहे. 

चला जाऊ अवकाश-सफरीला
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-४४७३४५९) / पृष्ठं : १२८ / मूल्य : १५० रुपये
अवकाश क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टींबद्दल किशोरवयीन मुलांना कुतूहल असतं. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांनी या पुस्तकात संवादरूपानं मुलांच्या शंकांचं निरसन केलं आहे. सूर्य का चमकतो, धूमकेतू म्हणजे काय, कृष्णविवर म्हणजे काय, विश्‍व किती विशाल आहे, सूर्याखाली अंधार का असतो, विश्‍वात आपण एकटेच आहोत का अशा किती तरी प्रश्‍नांची उत्तरं अतिशय सहज-सोप्या शब्दांत या पुस्तकात मिळतात. एक आजोबा आणि त्यांच्या नातवंडांच्या संवादातून प्रश्‍नोत्तरं उलगडत असल्यामुळं ही अवकाश-सफर आणखी रंजक झाली आहे. डॉ. पुष्पा खरे यांनी अनुवाद केला आहे.

साभार पोच

 हुंदका / कवितासंग्रह /कवी : किसनराव नितनवरे (९५५२३८४८८१)/ श्री-टेक टेक्‍नॉलॉजीज, पुणे / पृष्ठं : ११६ / मूल्य :१०० रुपये
  चंद्राक्षरे / विविध कवींच्या कवितांचा संग्रह /संपादक ः डॉ. शंतनू चिंधडे (९८६०३३७४८३)/ स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे (०२०-२४४७२५४९) / पृष्ठं ः ६४ / मूल्य ः ९० रुपये
  शृंगार सहस्रकम्‌ / प्रेमकविता / कवी ः सम्राट नाईक (९८२३८१४२२५)/ संयम पब्लिकेशन, पुणे (९८६००७२२०४) / पृष्ठं ः ९६ / मूल्य ः ३० रुपये
  गीत भागवत / भागवतातील तत्त्वज्ञानावर आधारित गीतांचा संग्रह / गीतकार ः धनश्री कानिटकर / प्रकाशक ः मोरेश्‍वर कानिटकर, मिरज (८३९०२५०९६०) / पृष्ठं ः १३२ / मूल्य ः १२० रुपये
  अध्यात्माचा शास्त्रीय अन्वयार्थ अर्थात ज्ञानेश्‍वरीचे सुलभ संकलन / अध्यात्मिक / लेखिका ः धनश्री कानिटकर / प्रकाशक ः मोरेश्‍वर कानिटकर, मिरज (८३९०२५०९६०) / पृष्ठं ः ३०४ / मूल्य ः १५० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT