सप्तरंग

तूच आहेस तुझ्या बालकाचा शिल्पकार...!

वृषाली गोखले

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आपल्याकडे 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त 'सकाळ अर्काईव्ह'मधून पुनर्प्रकाशित केलेला लेख.

आजची मुलं जन्मतःच तंत्रस्नेही असतात याचं कौतुक करतो आपण; पण त्याचबरोबर भावनिकदृष्ट्या कोरडी असतात, याची चिंताही. काही तरी चुकतंय हे नक्की... पण नेमकं काय आणि कुठे चुकतंय? त्यावर उपाय आहे की नाही?

"बा लकांचं संगोपन, त्यांचं स्वास्थ्य व आरोग्य नेमकं कशावर अवलंबून असतं? शारीरिक की मानसिक वाढीवर? वैचारिक व भावनिक सक्षमतेवर? मुलांचं जन्मपूर्व अस्तित्व, जन्मानंतरचं त्यांचं बालसुलभ फुलणं, बहरणं यात काय अडथळे आहेत? हे प्रश्‍न विचारले कुणाला तर सवयीने अनेक जण ते गुगल करायला घेतील...

हेच ते. माहिती तंत्रज्ञानाच्या अफाट विस्तारामुळे प्रत्येक जण आज तांत्रिक झालाय. यंत्रावर अतिशय सुलभपणे; पण यंत्रवतच काम करतोय. पण निसर्गाने फुकट दिलेले "मेंदू नामक यंत्र' आणि त्यासोबत असलेली प्रचंड यंत्रणा विसरत चाललोय का आपण?

मेंदूचं कार्य, त्याची यंत्रणा समजून घेण्याचे आदेश आपल्या मेंदूला जातच नाहीयेत... आणि "तंत्रस्नेही' बनण्याच्या नादात अनेक नकारात्मक परिणाम होऊ लागलेत आपल्यावर. पालकवर्ग स्वतःच्या चिंतेने ग्रासलाय, त्यामुळे मुले मोकाट सुटलीत... त्यामुळेच अनेक संगणकावरील भयानक गेम्सची शिकार होत आहेत. 

आजकालची मुलं हायपर असतात, हेही कौतुकाने सांगितलं, ऐकलं जातंय. हसत-खेळत, रमत-गमत, आनंदात, सुखात, शांततेत त्यांना जगताच येत नाहीये, असं वाटतं त्यांच्याकडे पाहून. चूक त्यांची नाही. मुलांनी तंत्रस्नेही होणं हेच महत्त्वाचं मानलं तर काय होणार? "तंत्रस्नेही'पणाच्या नादात मेंदूचे चौरस पोषण होतंय का, हे कुणी पाहायचं? फक्त तंत्रस्नेही मुलं समाजात आत्मविश्वासाने व सुरक्षितपणे वावरू शकतात? 

प्रश्न म्हटलं तर अनेक आहेत.

म्हणूनच आज बालदिनानिमित्त एक नवा संकल्प करूया... 

आपलाच माईंडसेट (मनोधारणा) बदलण्याचा. 
म्हणजे नेमकं काय करायचं? 
त्यासाठी काही पायऱ्या लक्षात घेऊ... 
- जन्मपूर्व अवस्था व गर्भात ज्ञानी होणारे "बाळ'
- जन्मापासून ते 4 वर्षांपर्यंत ज्ञान घेणारा "शिशु'.
- 4 ते 8 वर्षांची "बालके'
- 8 ते 12 वर्षांचे "कुमार'
- 12 ते 18 वर्षांचे "किशोर'
आणि 
या सर्व वयोवस्थेतील बालकांचे पालक आणि आपण सर्व!

जन्माला येण्याअगोदर आईच्या गर्भातच आजची बालके अफाट ज्ञान घेऊनच जन्माला येतात, हे शाश्वत सत्य आहे. जन्माला आल्यावरही खूपच कमी वयात मोबाईलवर गाणी, गोष्टी ऐकताहेत... ज्या वयात (वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत) बाळ-शिशूंना गाणी-गोष्टी-खेळ आणि इतर सर्व कौशल्ये "प्रत्यक्ष संवादातून' कळायला हवीत. पण ते होत नाहीय... बाळाचे शब्दकौशल्य वाढण्यासाठी, संवाद-कौशल्य विकसित होण्यासाठी आवश्‍यक असतो तो

पालक-बालक थेट संवाद. पण आई-वडील आणि इतरांच्या हातात बालके मोबाईलच पाहतात, त्यांच्याही हातात तो सहजच येतो. मग तांत्रिक गोष्टी बालके लवकर शिकतात. त्याचं कौतुकही होतं, पण त्यामुळे भाषा-संवाद-शब्दसिद्धी- आपल्या भाषेत सादरीकरण, विचार बोलणे-लिहिणे या अगदी प्राथमिक गोष्टींचा विकास होण्यात अडथळे निर्माण होतायत, याचा विचार होतच नाहीये. 

शिशू ते कुमारवयीन या महत्त्वाच्या कालखंडात अनेक "सूक्ष्म' कौशल्ये विकसित होतच नाहीत. उदा. एखाद्या अडचणींवर स्वतः उपाय शोधण्याची कला, विविध प्रकारे बोलण्याची कला, आपले विचार आपल्या शब्दांत उतरवण्याची कला, गणिती कौशल्ये हे सगळं राहूनच जातंय. थोडक्‍यात, "जीवनसंघर्ष' ज्या जीवनकौशल्यांच्या आधारे सुलभ व्हायला हवा आणि बालके मनाने सक्षम व्हायला हवीत, ती होत नाहीयेत... वर्तनसमस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मुलांचा मेंदू विचित्र पद्धतीने व असमतोलपणे कार्य करत आहे. मानसशास्त्रज्ञांची फौज निर्माण होतेय; पण मानसोपचार तज्ज्ञांनाही ताण यावा, असे एकूण चित्र आहे.

मग याला उपाय आहे? तो कोणाकडे आहे?

आहे, पालकांकडेच आहे. पण त्यासाठी पालकत्व "सुजाण व समंजस' हवे आहे!

पालकांनी भावनिक साक्षर बनायला हवेय. आणि पालकत्व म्हणजे फक्त जन्मदाते आई-वडीलच नाहीत, तर पूर्ण समाजानेच उत्तम व परिपक्व पालक बनण्याची गरज निर्माण झाली आहे.

मोबाईलवाचक न राहता, पुस्तकवाचकही बनले पाहिजे!

विविध ज्ञानाचे, माहितीचे संदर्भ शोधण्यासाठी, आंतरजालाचाच (नेट) फक्त वापर न करता, ग्रंथालयातही गेले पाहिजे!

मुलांना गोष्टी, गाणी आणि इतर कोणतेही ज्ञान पुरवताना, पालकांनीही स्वतः कष्ट घेतले पाहिजेत. त्यांच्या हातात मोबाईल देऊन, "शोध', असे न सांगता, पुस्तके वाचायलाही प्रोत्साहित करायचे आहे!

सर्वसमावेशक विचारसरणी व तशीच मनोधारणा विकसित होण्याचे आव्हान आहे सर्वांसमोर...!! 

पण यानिमित्ताने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. "मी आता यांना घडवतो' अशी भूमिका घेऊ नये, कारण हे प्रोसेस दुहेरी असते. मुलं घडता घडता आपल्यालीही घडवत असतात. त्यामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवायचे असतील तर बदलाची सुरुवात स्वतःपासून करायला हवी!

(लेखिका शालेय समुपदेशक व मार्गदर्शक आहेत) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT