सातारा

राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, थोरातांची मोदी सरकारवर सडकून टीका

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : पृथ्वीराज चव्हाण आणि विलासराव पाटील-उंडाळकर हे दोघे एकत्र येणे ही सातारा जिल्ह्यासह राज्यातील राजकीय परिवर्तनाची नांदी ठरेल. त्यामुळे सातारा जिल्ह्यासह राज्यातील कॉंग्रेस पक्षाला दिशा मिळेल, असा आशावाद महसूलमंत्री तथा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. 

माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे कट्टर विरोधक दुरावा संपवून तीन दशकानंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. त्यानिमित्त आयोजित कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या दोन्ही नेत्यांसह कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, कॉंग्रेसच्या सह प्रभारी सोनल पटेल, ऍड. उदयसिंह पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कऱ्हाड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, इंद्रजित मोहिते, वसंतराव जगदाळे, जगन्नाथराव मोहिते, इंद्रजित चव्हाण, शिवराज मोरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

श्री. थोरात म्हणाले, "कॉंग्रेस ताकदवान करायची आहे. कॉंग्रेसमध्ये ऍड. उदयसिंह पाटील सक्रिय झाले आहेत. त्यांना आम्ही प्रदेशवर काम करण्याची संधी देणार आहोत. त्यांनी राज्यावर काम करून जबाबदारी पार पाडण्याची तयारी ठेवावी. पृथ्वीराजबाबा हे कॉंग्रेसचे पारदर्शी आदर्श व्यक्तिमत्त्व आहे, तर विलासकाका हे कार्यकर्त्यांची घडी बसवणारे नेते आहेत. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्र घडवला. उदयसिंह यांनी यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर वाटचाल करावी.'' सध्या राज्यात माणसा-माणसांत भेद करून, धार्मिक तेढ निर्माण करून सत्ता मिळवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. अर्थव्यवस्था रसातळाला गेली. देशात बेरोजगारी वाढली आहे. देशाला पुन्हा गतवैभव देण्यासाठी कॉंग्रेसच्या विचारांची गरज आहे. त्याची सुरुवात कऱ्हाडमध्ये पृथ्वीराजबाबा व विलासकाका एकत्र येऊन झाली आहे. ही सातारा जिल्ह्यासह राज्यातील राजकीय परिवर्तनाची नांदी ठरेल. त्यामुळे सातारा जिल्ह्यासह राज्यातील कॉंग्रेस पक्षाला दिशा मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. 

काका-बाबांच्या कार्यक्रमात पतंगराव कदम असायला हवे होते. त्यांना मोठा आनंद झाला असता, असे सांगून मंत्री कदम यांनी ऍड. उदयसिंह पाटील यांच्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील तरुण नेत्यांना साथ द्या, असे आवाहन केले. ऍड. उदयसिंह म्हणाले, ""कॉंग्रेसच्या विचारधारेवर काका आणि बाबा हे दोन ज्येष्ठ नेते एकत्र आले आहेत. आमच्या वैर नव्हते. मात्र, वैचारिक मतभेद होते. सतेज पाटील, मनोहर शिंदे, धनाजी काटकर आणि मी कॉंग्रेसच्या विचारातून दोन्ही नेत्यांना एकत्र आणले. सध्या राष्ट्रवादाचे मार्केटिंग करून तरुणांना वाईट विचारांकडे नेले जात आहे. मात्र, गावागावांतील कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून एकत्र येऊन विकास साधावा.'' डॉ. जाधव, अजित पाटील-चिखलीकर यांची भाषणे झाली. मनोहर शिंदे यांनी स्वागत केले. प्रा. काटकर यांनी प्रास्ताविक केले. शिवराज मोरे यांनी आभार मानले. 

निष्ठावंतांच्या डोळ्यात आनंदाश्रू 
पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील-उंडाळकर हे दोन्ही दिग्गज नेते अनेक वर्षांनंतर शुक्रवारी एका व्यासपीठावर आले. हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठवण्यासाठी दोन्ही गटांचे कार्यकर्ते आतुर झाले होते. दोन्ही नेते एका व्यासपीठावर येताच उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या वेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रूही ओघळले. 

...आता आमचं बी ठरलंय 
पृथ्वीराज चव्हाण हे माझ्या घरी आले. त्या वेळी सतेज पाटील, मनोहर शिंदे, धनाजी काटकर होते. त्यानंतर मीडियावाल्यांनी काय-काय ठरलंय, असे विचारले. त्या वेळी विलासकाकांनी "काय घंटा ठरलंय? आता आमचं बी ठरलंय' अशी प्रतिक्रिया देताच उपस्थितात हशा पिकला. 

तुमचा राईट हॅण्डच... 
सध्या पदासाठी अनेक जण लाचार होत आहेत. माजी मुख्यमंत्री कऱ्हाडला एका हॉटेलमध्ये मुक्कामी आले. त्यांना भेटण्यासाठी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची रांग लागली. त्यांनी पदेही वाटली. त्यात माजी प्रांताध्यक्षांचा मुलगा गेला आणि भाजपचे कमळ घेऊन बाहेर आला. तो ह्यांचा "राईट हॅण्ड' असे पृथ्वीराजबाबांना उद्देशून उंडाळकरांनी फटकारा मारताच उपस्थितांत हशा पिकला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT