Pegasus Sakal
विज्ञान-तंत्र

पेगॅससचा विळखा

एकदा पेगॅससरूपी राक्षस मोबाईलमध्ये शिरला, की तुमची संपूर्ण ‘कुंडली’च हल्लेखोरांचा ताब्यात जाते.

ऋषिराज तावडे

एकेकाळी तेलाभोवती फिरणारी जगाची अर्थव्यवस्था आता डेटाभोवती फिरत आहे. डेटारूपी माहिती गोळा करण्यासाठी गेल्या आठवड्यात पेगॅसस स्पायवेअरचा वापर करून जगभरातील पत्रकार, राजकारणी, अधिकारी, सेलिब्रिटी यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा प्रकार समोर आला. त्यात भारतातील ४० पत्रकारांचाही समावेश असल्याचीही माहिती उघड झाली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार समोर आल्याने सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही केले जात आहे. पेगॅसस प्रकरण काय आहे, त्याबाबत थोडक्यात...

पेगॅसस काय आहे?

इस्राईलच्या ‘एनएसओ’ या कंपनीने विकसित केलेले पेगॅसस हे स्पायवेअर म्हणजेच हेरगिरी करण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर होय. एखादी व्यक्ती, राजकीय नेता, पत्रकार, सेलिब्रिटी त्याचबरोबर जोडीदारावरही लक्ष ठेवण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या मोबाईलमध्ये हे स्पायवेअर त्याच्या लक्षात न येऊ देता टाकता येते. सामान्यतः मिस्ड व्हॉट्सअॅप कॉल किंवा ज्या अॅपचा एखादा व्यक्ती सर्वाधिक वापर करतो, त्याद्वारे हे पेगॅसस स्पायवेअर व्यक्तीच्या अॅण्ड्रॉईड किंवा आयफोन अशा कोणत्याही मोबाईलमध्ये सहजगत्या टाकले जाते. एकदा पेगॅससरूपी राक्षस मोबाईलमध्ये शिरला, की तुमची संपूर्ण ‘कुंडली’च हल्लेखोरांचा ताब्यात जाते. तुमच्या मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ, संभाषण, संपर्क यादी, व्हॉट्सअॅप किंवा अन्य सोशल मीडियावरील खासगी चॅटिंग, मोबाईलचे लोकेशन, कॅमेरा, माईक, ऑडिओ जॅक आदी सर्व बाबींवर नियंत्रण मिळवले जाते. आणि सुरू होते तुमच्यावर पाळत ठेवण्याचा सिलसिला...

शक्तीशाली अस्त्र

शत्रू गटाविरोधात किंवा राष्ट्राविरोधात युद्ध पुकारायचे म्हटल्यास सद्यःस्थितीत तुमच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रांपेक्षा पेगॅसससारखा स्पायवेअरही पुरेसा आहे. एखाद्या बॉम्बने होणार नाही, इतके नुकसान हा स्पायवेअर करतो. केवळ तांत्रिक कौशल्याच्या जोरावर शत्रुपक्षाला सहजगत्या नामोहरम करण्याची क्षमता यामध्ये आहे. स्पायवेअरद्वारे केली जाणारी चोरी किंवा सायबर हल्ल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेक राष्ट्रांनी त्यांच्या सुरक्षा यंत्रणांवर सायबर हल्ला झाल्याचे स्पष्ट केले होते. तीन-चार वर्षांपूर्वी इस्रायल-पॅलस्टिनी युद्धावेळीही हमास दहशतवादी संघटनेने इस्रायली सैनिकांच्या रणनीतीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये स्पायवेअर पेरल्याचे उघड झाले होते. एवढेच नव्हे, तर गुगल प्ले-स्टोअरवरील स्मेशअॅपच्या माध्यमातून पाकिस्तानने भारतीय सैनिकांच्या मोबाईलमध्येही अशाप्रकारे सायबर हल्ला केला होता.

हिटलिस्टमध्ये मातब्बरांचा समावेश

पॅरिस येथील ‘फॉर्बिडन स्टोरीज’ आणि ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थांनी पेगॅससची हेरगिरी उघडकीस आणली. त्यांना ५० हजार मोबाईल क्रमांकाची यादीच मिळाली. धक्कादायक बाब म्हणजे त्यामध्ये जगभरातील १८९ पत्रकार, ६००हून अधिक राजकीय नेते, सरकारी अधिकारी, ६५ उद्योगपती, ८५ मानवाधिकार कार्यकर्ते, काही देशांचे प्रमुख, द असोसिएटेड प्रेस, रॉयटर्स, सीएनएन, द वॉल स्ट्रीट जर्नल, फायनान्शिअल टाइम्स यांच्यासह भारतातील इंडिया टुडे, द वायर, हिंदुस्तान टाइम्स आणि इतर काही वृत्तसंस्थांच्या वरिष्ठ पत्रकारांचे मोबाईल क्रमांक लीक झालेल्या यादीत आहेत. केवळ हुकूमशाही देशांनीच नव्हे, तर अमेरिका, फ्रान्स, हंगेरी, भारत, अझरबैजान, कझाकस्तान, पाकिस्तान, मेक्सिको, सौदी अरेबिया या देशांमध्ये ‘पेगॅसस’चा वापर झाला आहे. या देशांनी विशिष्ट व्यक्ती, विरोधी पक्षातील नेत्यांसह चळवळीतील कार्यकर्त्यांवर पाळत ठेवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून हे स्पायवेअर खरेदी केल्याचेही उघड झाले आहे.

खबरदारी काय?

पेगॅसससारखे तंत्रज्ञान विकसित करणे हे नैतिकतेच्या पातळीवर चुकीचे असले, तरी ज्याप्रकारे कित्येक देशांनी हे स्पायवेअर खरेदी केले आहे. जेवढी ऊर्जा हे तंत्रज्ञान तयार करायला खर्ची घातली, तेवढीच त्याला आळा घालण्यासाठी खर्ची घालावी लागणार आहे.

त्याशिवाय, सार्वजनिक वायफायचा वापर न करणे, संशयास्पद जाहिरातींद्वारे आलेल्या लिंकवर क्लिक न करणे, उच्चदर्जाच्या अॅण्टीव्हायरसचा वापर, वेळोवेळी मोबाईल आणि त्यामधील अॅप्स अपडेट करणे आदी उपाय आपण सर्वसामान्य म्हणून करू शकतोच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT