historical mount mary church sakal
टूरिझम

ऐतिहासिक माऊंट मेरी चर्च

वांद्रे येथील बँड स्टॅडच्या समुद्रसपाटीपासून अर्धा किलोमीटरवर आणि ८० मीटर उंच टेकडीवरील या चर्चला शेकडो वर्षांचा इतिहास आहे.

प्रशांत ननावरे

वांद्रे येथील बँड स्टॅडच्या समुद्रसपाटीपासून अर्धा किलोमीटरवर आणि ८० मीटर उंच टेकडीवरील या चर्चला शेकडो वर्षांचा इतिहास आहे.

मुंबईत फार पूर्वीपासून सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत आणि मुंबईला आजची ओळख देण्यात प्रत्येकाचे मोलाचे योगदान आहे. मुंबईत बेटावर सर्वात प्रथम दाखल झालेले पोर्तुगीजही त्याला अपवाद नाहीत. स्वत:चा कारभार चालवण्यासाठी ज्याप्रमाणे त्यांनी किल्ले आणि इतर वास्तू बांधल्या त्याप्रमाणे धार्मिक स्थळंही उभारली. यापैकी अतिशय जुनी आणि दिमाखदार वास्तू म्हणजे वांद्रे येथील माऊंट मेरी चर्च.

वांद्रे येथील बँड स्टॅडच्या समुद्रसपाटीपासून अर्धा किलोमीटरवर आणि ८० मीटर उंच टेकडीवरील या चर्चला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. वांद्रे रेल्वे स्थानकापासून सात किलोमीटरवर असलेल्या चर्चपर्यंत रिक्षा, बस, टॅक्सीने पोहचता येते. पोर्तुगालमधील ख्रिस्ती धर्मगुरूंनी सोळाव्या शतकात मदर मेरीची मूर्ती इथे आणून चर्चची बांधणी केली. ‘बेसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माऊंट’ या नावाने ओळखले जाणारे चर्च पहिल्यांदा १६४० साली बांधले गेले आणि १७६१ मध्ये त्याची पुनर्रचना केली गेली. १८७९ मध्ये बोमनजी जिजीभॉय यांनी या टेकडीच्या उत्तरेला चर्चपर्यंत जाणाऱ्या पायऱ्या बांधल्या. या पायऱ्या चढून वर जाताना परदेशातील एखाद्या ठिकाणी आल्याचा भास होतो. आजवर अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे पार पडले आहे. १८८२ साली चर्चच्या इमारतीसमोर एक सभागृह बांधण्यात आले; परंतु भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन १९ व्या शतकाच्या अखेरीस चर्चची पुनर्बांधणी करण्याचे ठरले. त्यानुसार निओ-गॉथिक पद्धतीने नवीन चर्चची आखणी करून ते बांधण्यात आले. चर्चची सध्याची इमारत १०० वर्षे जुनी आहे.

समुद्रकिनाऱ्याला लागून असलेला चर्चचा परिसर अतिशय सुंदर आहे. चर्चच्या दिशेने जाणारी रस्त्याची चढण चढताना वेगळ्याच मुंबईचे दर्शन घडते. टुमदार बंगले, मध्यम उंचीच्या इमारती, रस्त्याच्या दुतर्फा झाडांमुळे हा परिसर बघताक्षणी आपल्याला प्रेमात पाडतो. मुंबईतील अनेक नामांकित लोक या परिसरात राहतात. त्यामुळे त्यांना बघण्यासाठी येथे कायम लोकांची गर्दी असते. दगडाचे मजबूत बांधकाम असलेली चर्चची इमारत वास्तुरचनेचा एक उत्तम नमुना आहे. चर्चमध्ये प्रवेश करताच त्याच्या भव्यतेची प्रचिती येते. दोन्ही बाजूंना असलेले गोलाकार खांब, त्यावर नक्षीकाम, बाजूच्या भिंतीमधील मोठाल्या दरवाजांना बसविण्यात आलेली काचेची तावदानं, चाळीस ते पन्नास फूट उंचीचे छत, प्रार्थनेसाठी करण्यात आलेली लाकडी बाकांची बैठकव्यवस्था आणि समोर मध्यभागी उंचावर दिसणारी मदर मेरीची मूर्ती मन प्रसन्न करते. चर्चच्या भिंतीवर मदर मेरीचा जीवनप्रवास चितारण्यात आला आहे. मदर मेरीची मूर्ती पायऱ्यांच्या संगमरवरी बांधकामावर उभी आहे. मूर्तीच्या खाली मध्यभागी ‘लिओनार्डो दा विंची’ने काढलेले ‘द लास्ट सपर’ हे जगप्रसिद्ध चित्र संगमरवरामध्ये कोरलेले आहे.

चर्चच्या बाहेरील बाजूस समोरच आणखीन एक अर्धगोलाकार छोटी वास्तू आहे. अतिशय कलात्मक पद्धतीने तिचे बांधकाम केलेले आहे. वास्तूच्या मध्यभागी मदर मेरीची मूर्ती असून दोन्ही बाजूंनी वर जाण्यास पायऱ्या आहेत. मदर मेरीची मूर्ती बरोबर चर्चच्या समोर आहे, त्यामुळे उन्हाच्या वेळी मूर्ती असलेल्या काचेमध्ये संपूर्ण चर्चचे प्रतिबिंब पडते आणि प्रतिबिंबाच्यावर मदर मेरीची मूर्ती दिसते. छायाचित्रणाच्या दृष्टीने अतिशय सुंदर फ्रेम इथे तयार होते. मदर मेरीचे जवळून दर्शन घेण्यासाठी आणि फोटोग्राफीसाठी भाविक येथे गर्दी करत असतात.

दरवर्षी ८ सप्टेंबरला मदर मेरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानंतरच्या पहिल्या रविवारपासून पुढील एक आठवडा माऊंट मेरीची जत्रा येथे भरते. या जत्रेला तीन शतकांहून अधिक वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. सर्वधर्मीयांचे आकर्षण असलेल्या या जत्रेला मुंबईकर दरवर्षी मोठ्या संख्येने गर्दी करतात. जत्रेमध्ये विविध आकार आणि रंगांच्या मेणबत्त्या, फुलं, कलाकुसरीच्या वस्तू, कपडे, दागदागिने आणि खेळणी विक्रीला असतात. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची रेलचेल असते. संपूर्ण परिसर रोषणाईने न्हाऊन निघतो. सुमधुर संगीत वाजत असते. जत्रेला ज्याप्रमाणे लोकं गर्दी करतात त्याचप्रमाणे आणि तितकाच उत्साह नाताळच्या काळातही इथे पाहायला मिळतो. संपूर्ण चर्चला रोषणाई केली जाते, चांदण्या लावल्या जातात, येशूच्या जन्माचा प्रसंग मांडला जातो. नाताळ आणि नवीन वर्षाच्या रात्रीच्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव एकत्र येतात. हा सुंदर सोहळा पाहण्यासाठी इतर धर्मीयदेखील आवर्जून उपस्थित असतात. समुद्रकिनाऱ्याला लागून आणि मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीमधील या पुरातन वास्तूला नाताळच्या काळात भेट देणे पर्वणी ठरू शकते.

nanawareprashant@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SAW, 1st T20I: जेमिमाह रोड्रिग्सचं शानदार अर्धशतक, स्मृती मानधनाचीही मिळाली साथ; भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

Accident News:'अपघातात आर्टिकामधील तिघे ठार तर दोन जखमी'; धरणगाव-धुपेश्वर रोडवरील घटना, चालकाचे नियंत्रण सुटल अन्..

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 : राज्यात कुठं कुणाचा नगराध्यक्ष? दिवसभरातील निकालासंदर्भातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jejuri Fire Incident Video : निवडणुकीच्या विजय जल्लोषादरम्यान मोठी आग; दोन नवनिर्वाचित नगरसेवक भाजले, अनेक लोक जखमी, जेजूरीतील धक्कादायक Video समोर...

Gadchiroli Municipal Result: गडचिरोलीत काँग्रेस उमेदवाराचा अवघ्या 'एका' मताने विजय; पराभूत मांडवगडेंचा निकालावर आक्षेप!

SCROLL FOR NEXT