धुळे : कोरोनाबाधितांची वाढती रूग्णसंख्या आणि मृत्यूदर पाहता रुग्णांसह नातेवाइकांचा अधिकतर खासगी रुग्णालयांकडे ओढा आहे. त्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि बेडला अधिक मागणी वाढल्याने त्यांचा तुटवडा निर्माण झाल्याची ओरड सुरू आहे. या स्थितीत शासकीय यंत्रणेने जिल्हा पातळीवर पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. मोफत दिले जाणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि पौष्टिक आहारासह बेडही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. या सेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी रविवारी (ता. ४) ‘सकाळ'शी बोलताना केले.
जिल्ह्याला संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या घातक स्ट्रेनने विळखा घातला आहे. रोज सरासरी चारशे ते साडेपाचशे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. शिवाय वेळेत नमुने तपासणी न करता (स्वॅब) खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सल्ल्याने सिटी स्कॅनच्या अहवालानुसार उपचार घेणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. त्यामुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शन, बेडची मागणी वाढली असून त्यांचा तुटवडा असल्याची ओरड सुरू आहे.
नागरिकांसाठी सोयीसुविधा
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यादव यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, की स्थानिक शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात ठिकठिकाणी पुरेशा सोयीसुविधांची उपलब्धता केली आहे. पुरेसे बेड, मोफत रेमडेसिव्हिर इंजेक्शन व इतर औषधोपचार केले जात आहेत. शिवाय रुग्णाला दूध, केळी, अंडी यासह पौष्टिक आहार दिला जात आहे. थंडी, ताप, सर्दी- कफ, अंगदुखी, घशाची खवखव आदी लक्षणे असलेल्या नागरिकांनी वेळेत नमुने तपासणी केली आणि वैद्यकीय सल्ल्याने लागलीच उपचार सुरू केले तर या आजाराशी यशस्वी मुकाबला करता येऊ शकेल. शासकीय यंत्रणेच्या या सोयीसुविधांच्या लाभातून जिल्ह्यात पूर्वी शकडो रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
२८ कोविड केअर सेंटर
जिल्ह्यात २८ कोविड केअर सेंटर आहेत. त्यात ५ हजार ६०० बेडची तयारी आहे. सरासरी ९५ पर्यंत ऑक्सिजनचे प्रमाण असलेल्या अनेक रुग्णांना काही कारणाने विलगीकरण, प्रसाधनगृहाची सोय घरात उपलब्ध होऊ शकत नाही. अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेता येतील. तेथे वेळोवेळी थंडी, ताप, ऑक्सिजनचे प्रमाण मोजून देखरेख ठेवली जाते.
ऑक्सिजनयुक्त हजार बेड
जिल्ह्यातील १८ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजनची सुविधा असलेले एक हजार बेड आहेत. यात ९० ते ९५ पर्यंत ऑक्सिजनचे प्रमाण असलेल्या रुग्णांवर विविध तपासण्या, चाचण्यांनुसार देखरेख ठेवली जाते. त्यांना ऑक्सिजनयुक्त बेडची सुविधा दिली जात आहे.
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल
हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय अर्थात डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण ९० व त्यापेक्षा कमी प्रमाण असलेल्या रुग्णांवर उपचार होतो. त्याठिकाणी विविध इंजेक्शनपासून ऑक्सिजन, व्हेंटीलेटरपर्यंतची सुविधा दिली जाते. रुग्णाला पूर्ण प्रमाणात लिक्विड ऑक्सिजन दिला जातो.
ऑक्सिजन बेडसह विस्तार सुरू
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर असलेल्या येथील नेहरू चौकालगत अजमेरा हॉस्पिटलमध्ये ६०, साक्री रोडवरील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मनपासह १२०, जवाहर मेडिकल फाउंडेशनमध्ये १००, शिरपूरला १००, दोंडाईचा येथे १३०, साक्री येथे १००, पिंपळनेर येथे ३०, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात ३०० ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध आहेत. याशिवाय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त १००, जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या रुग्णालयात अतिरिक्त १०० बेडची सुविधा तत्काळ उपलब्ध केली जात आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. खासगी रुग्णालयांमध्ये मिळून सरासरी ५०० ते ६०० बेड आहेत.
रुग्णाविना शिल्लक बेडची संख्या
सद्यःस्थितीत जवाहर रुग्णालयात विनाऑक्सिजनचे सरासरी ८०, अजमेरा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे सरासरी ३५, सिव्हीलमध्ये मनपाचे सरासरी १५, शिरपूरला पाच ते सहा, दोंडाईचात परवापर्यंत सरासरी ऑक्सिजनचे सरासरी ३० बेड शिल्लक होते. बरेच रुग्ण बरे झाल्यानंतर रिक्त बेडचा लाभ त्या- त्या ठिकाणच्या रुग्णांना मिळू शकतो, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
यंत्रणेकडे रेमडेसिव्हिरचा असा साठा
शासकीय यंत्रणेशी संलग्न सिव्हिल हॉस्पिटलकडे ४१०, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे एक हजार, शिरपूर येथे १७०, दोंडाईचा येथे १६५ आणि हिरे वैद्यकीय महाविद्यालयाकडे ५०० रेमडेसिव्हिर, असा जिल्ह्यात सद्यःस्थितीत एकूण १२४५ इंजेक्शनचा साठा उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले. तसेच या शासकीय आरोग्य संस्थांसह संबंधित कंपन्यांशी वैयक्तिक संपर्क साधून शहर व जिल्ह्यासाठी किमान हजार, नगरहून ५००, नाशिकच्या विक्रेत्याकडून २००, मुंबईहून अधिक रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्धतेच्या प्रयत्नात असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.