उत्तर महाराष्ट्र

संस्थाचालक, शिक्षकांमधील रुंदावलेल्या दरीचे प्रतीक

सकाळवृत्तसेवा

जळगाव शहरातच नव्हे; तर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात लौकिकप्राप्त असलेल्या ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या आर. आर. विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिकपणे संस्थाध्यक्षांविरुद्ध बंड पुकारले. अध्यक्षांकडून मुख्याध्यापकांसह सर्वच कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ होत असल्याची तक्रार थेट शिक्षणमंत्र्यांपर्यंत गेली. या प्रकरणाच्या चौकशीतून जे काय तथ्य बाहेर यायचे ते येईल. मात्र, शताब्दी महोत्सव साजरा करणाऱ्या शैक्षणिक संस्थेबाबत हा प्रकार समोर आल्यानंतर संस्थेच्या जनमानसातील प्रतिमेला धक्का बसला, यात शंका नाही. अशा मोठ्या संस्थांमध्ये अनेकवेळा अशी प्रकरणे घडतात, कालांतराने समाजही ती विसरतो. मात्र, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात संस्थाचालक आणि शिक्षकांमध्ये यामुळे अविश्‍वासाची दरी निर्माण होत असेल तर त्याचा एकूणच पिढी घडविण्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात केवळ "आर. आर.‘च नव्हे कमी-अधिक प्रमाणात सर्वच संस्थांमध्ये ही दरी दिसून येते, हेही नाकारून चालणार नाही.

केवळ पुणे-मुंबईतच नव्हे; तर समाजाची गरज ओळखून जळगावसारख्या ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्षेत्रातही अनेक चांगल्या शैक्षणिक संस्था सुरू झाल्या. समर्पितपणे काम करणाऱ्या संस्थाचालक व सोबतीला त्याच तळमळीने ज्ञानार्जन करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानातून या संस्थाही बहरल्या आणि विस्तारीत झाल्या. दोन-चार नव्हे; तर अगदी आठ-दहा दशकांची अर्थात शतकोत्तर वाटचालीची परंपरा लाभलेल्याही संस्था जळगावात आहेत. परंतु काळानुरूप बदल स्वीकारत या संस्थांनीही "प्रोफेशनॅलिझम‘ स्वीकारले. व्यावसायिकता स्वीकारणे अपरिहार्य असले तरी ती स्वीकारताना काही संस्थांनी आपले तत्त्व सोडले, त्यातून काही चुकीच्या गोष्टी समोर येऊ लागल्या. संस्थाचालक आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांमधील सुप्त वाद हा त्याचाच परिणाम म्हणावा लागेल. 


सर्वच शैक्षणिक संस्थांमध्ये संस्थाचालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये अगदी सलोख्याचे व सौहार्दपूर्ण संबंध असल्याचे वरवर दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात हे संबंध इतके मधुर कधीच नव्हते, आजही नाहीत. कमी-अधिक प्रमाणात सर्वच संस्थांमध्ये या दोन घटकांमधील वाद सर्वश्रुत आहेत. फरक एवढाच, की काही संस्थांच्या कारभारातून ते वारंवार समोर येत असतात, तर काही संस्थांमध्ये ते सुप्तावस्थेत आहेत. 


शतकोत्तर परंपरा सांगणाऱ्या ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या आर. आर. विद्यालयात नुकताच उफाळून आलेला संस्थाचालक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधील वाद हे त्यातलेच उदाहरण. हा वाद अचानक उफाळून आला व कर्मचाऱ्यांनी अध्यक्ष अरविंद लाठींविरुद्ध बंड पुकारले असेल, असे वाटत नाही. गेल्या अनेक दिवस नव्हे वर्षांपासून ही धुसफूस सुरू होती व त्यात अलीकडच्या काळात अतिरेक झाल्याने कर्मचाऱ्यांच्या बंडाच्या माध्यमातून ती चव्हाट्यावर आली. विशेष म्हणजे दोन-चार नव्हे; तर मुख्याध्यापकांसह सर्वच कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांविरुद्ध एकत्रितपणे तक्रार केल्याने स्वाभाविकत: समाजाची भूमिका कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे. अध्यक्षांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, मानसिक छळ हे या तक्रारीतील प्रमुख मुद्दे. अध्यक्षांनी ते नाकारून संस्थेत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला म्हणून कर्मचारी विरोधात गेले, असे स्पष्टीकरण देणेही स्वाभाविक म्हणावे लागेल. 


या प्रकरणाच्या चौकशीअंती जे समोर यायचे ते तथ्य येईलच. ज्ञानार्जनाचे मंदिर असलेल्या शैक्षणिक संस्थांमधून असे प्रकरण समोर येत असेल तर संस्थेच्या वाटचालीतील हे घटक विद्यार्थ्यांसमोर नेमका कोणता आदर्श ठेवताहेत? हा खरा प्रश्‍न आहे. यातून दोषींवर कारवाई होणे, संस्थाचालक-कर्मचाऱ्यांमधील वाद संपुष्टात येणे या प्रक्रियेची उत्तरे आगामी काळात मिळतीलच. मात्र, तरीदेखील केवळ हेच नव्हे तर अन्य अनेक कारणांवरून अनेक संस्थांमध्ये संस्थाचालक-कर्मचाऱ्यांमध्ये होत असलेले वाद, त्यातून निर्माण होणारी दरी आणि अशा अविश्‍वासाच्या वातावरणात होणारे ज्ञानार्जन कितपत सक्षम पिढी घडवू शकेल? हा खरा प्रश्‍न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

IPL 2024 DC vs MI Live Score : बुमराहने ऋषभ पंतला धाडलं माघारी; दिल्ली पार करणार अडीचशे धावांचा टप्पा?

SCROLL FOR NEXT