पाचोरा ः शिक्षण संस्थाचालकांनी बनावट कागदपत्र व विद्यार्थी संख्येच्या आधारे संच मान्यता घेऊन केलेली बोगस शिक्षक भरती केल्याने हे प्रकरण राज्यभर गाजत आहे. या संदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी चौकशी व कारवाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी दिली.
जळगाव जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी व सध्या नाशिक महापालिकाचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या देविदास महाजन यांनी गेल्या महिन्यात काही शिक्षण संस्थाचालकांनी आपल्या सहीचे स्कॅन करून बनावट विद्यार्थी संख्या दाखवून, बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे संचमान्यता
व अनुदानित तुकड्यांवरील शिक्षक भरती बाबतची मान्यता मिळवल्याची तक्रार शिक्षण उपसंचालकांकडे केलेली होती. त्याबाबत सखोल चौकशी व माहिती अंती आमदार किशोर पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या विषयात हा विषय मांडला होता. त्याची दखल घेण्याचे शिक्षणमंत्र्यांनी अधिवेशनातच आश्वासित केले होते. त्याआधारे 21 जानेवारीला मुंबईत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या
मंत्रालयातील दालनात बैठक झाली. बैठकीसाठी या प्रश्नाला वाचा फोडणारे आमदार किशोर पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. शिक्षण संचालक, उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, नाशिक मनपा शिक्षणाधिकारी व सचिवही या बैठकीला उपस्थित होते. आमदार किशोर पाटील यांनी मंत्री गायकवाड यांच्यासमोर हा विषय सविस्तरपणे व गांभीर्याने मांडला. त्याआधारे उपस्थित अधिकाऱ्यांना याप्रकरणी सखोल चौकशी करून कागदपत्रांची खातरजमा करून दोषी असलेले संस्थाचालक, अधिकारी व यातील दलालांवर कठोर कारवाई करण्याचे तसेच चौकशी अंती सदरच्या मान्यता रद्द करण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे आता पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यासह राज्यभर विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमिक शाळांची चौकशी होणार असल्याचे चित्र आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.