उत्तर महाराष्ट्र

नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारले

सकाळवृत्तसेवा

मेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव - गिरणा परिसरात सुमारे पाच महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर आज रात्री १० वाजून १७ मिनिटांनी कंठस्नान घालण्यात यश आले. वरखेडे खुर्द (ता. चाळीसगाव) परिसरातील जंगल भागात बिबट्याच्या मागावर असलेले हैदराबादचे शार्पशूटर नवाब शाफतअली खान यांनी आपल्या बंदुकीचा अचूक निशाणा साधत पहिल्याच गोळीत बिबट्याला ठार केले.

गिरणा परिसरात सात बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला दिसताच क्षणी ठार मारण्याचे आदेश मिळाल्यानंतर वन विभागाने वेगाने पावले उचलली होती. बिबट्याला शोधून काढण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. ‘ड्रोन’च्या सहाय्यानेही त्याचा शोध घेण्यात येत होता. वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावूनही बिबट्या त्यात अडकत नव्हता. त्यानंतर निष्णात नेमबाज बोलावण्यात आले.

हैदराबाद येथून आलेले शार्पशूटर नवाब खान हे आल्यापासून बिबट्याच्या मागावर होते. त्यांनी पिंपळवाड म्हाळसा (ता. चाळीसगाव) येथून आज वरखेडे खुर्दकडे जाणाऱ्या रस्त्याने बिबट्याचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यांच्यासोबत शार्पशूटर डॉ. सहाद नशबंदी, डॉ. सौद नशबंदी, नवाब खान यांचा मुलगा अजगरअली खान व डी. जी. पवार होते. 

नदीपात्रातील पाण्यामुळे योग
गिरणा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने वरखेडे गावातून खुर्दकडे जाण्यासाठी नदीपात्रातून जाणे शक्‍य नसल्यामुळे पिंपळवाड म्हाळसा रस्त्याने हे सर्व जण निघाले. रात्री दहाच्या सुमारास काही ग्रामस्थांच्या झोपड्या असलेल्या भागाकडे बिबट्या गेल्याचा सुगावा त्यांना लागला. सुरवातीला नवाब खान यांना शेपूट दिसली. क्षणाचाही विलंब न करता, नवाब खान आपल्या ‘मॅग्नम ३७५’ रायफलसह सज्ज झाले. रात्रीचा अंधार असला, तरी बिबट्याला सहज टिपता येईल, असे त्यांच्यादृष्टीने वातावरण होते. या भागातील ओंकार तिरमली यांनी मक्‍यासाठी शेती तयार केली आहे. त्या ठिकाणापासून काही अंतरावर झुडपांमध्ये नवाब खान व त्यांच्यासोबतचे इतर सहकारी दबा धरून बसले. अखेर कपाशीच्या शेतातून माणसांकडे जाऊ पाहणाऱ्या बिबट्याला १० वाजून १७ मिनिटांनी अखेर नवाब खान यांनी गोळी झाडली अन्‌ क्षणात बिबट्याचे धूड जागीच कोसळले. 

वनविभागाचा जल्लोष
बिबट्या ठार झाल्याचे कळताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडत जल्लोष केला. काही वेळातच वनविभागाचे वाहन ज्या ठिकाणी बिबट्याला ठार केले होते, त्या भागात पोचले. यावेळी ग्रामस्थांची होणारी गर्दी लक्षात घेता, उपस्थित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याला वाहनाच्या मागच्या बाजूला टाकून चाळीसगावकडे नेले. यावेळी आमदार उन्मेष पाटील, वनविभागाचे संपर्क अधिकारी टी. एन. साळुंखे, जिल्हा उपवनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी आदी उपस्थित होते.

...तर पुन्हा बळी गेला असता
बिबट्याला गोळी घातल्यानंतर हैदराबाद येथील शार्पशूटर नवाब शाफतअली खान यांनी सांगितले, की मी पाच दिवसांपासून बिबट्याच्या शोधात होतो. तीनवेळा मला बिबट्या दिसला; पण आम्हाला शंका होती, की नरभक्षक आहे किंवा नाही. परंतु आज वरखेड गावातून जेव्हा आम्ही जात होतो, आमच्यामागे आणि पुढेही लोक होते. तेव्हा रस्त्याच्या बाजूने बिबट्या जाताना दिसला, तो तत्काळ कपाशीच्या शेतात शिरला. मी त्याच्यावर लक्ष ठेवून होतो. जेव्हा हा बिबट्या दबक्‍या पावलांनी त्या माणसांकडे शिकारीसाठी जाऊ लागला, तेव्हा हाच नरभक्षक बिबट्या असल्याची माझी खात्री झाली आणि तत्क्षणी मी एकाच गोळीत त्याला ठार केले. जर मी त्याला ठार केले नसते, तर त्याने आज पुन्हा एका निष्पाप माणसाचा बळी घेतला असता.

लोकांच्या मनात बिबट्याविषयी जी भीती होती, ती आता दूर झाली आहे. नरभक्षक बिबट्या ठार झाला आहे. ग्रामस्थांनी आता बिबट्याची भीती बाळगू नये. बिबट्याचा धुमाकूळ रोखण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी तातडीने दखल घेत सर्वतोपरी केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांचे व शार्पशूटर नवाब शाफतअली खान यांचे तालुक्याच्या वतीने कोटी कोटी आभार!
- उन्मेष पाटील, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT