उत्तर महाराष्ट्र

..या "अमृता'साठी विषाची परीक्षा नको! 

सचिन जोशी

जळगाव शहराचा "स्मार्ट सिटी'त समावेश होऊ शकला नाही, त्याचे दु:ख जळगावकरांना मुळीच झाले नाही. कारण, मुळातच मूलभूत सुविधांसाठी संघर्ष सुरू असलेल्या जळगावकरांनी आपलं शहर "स्मार्ट' होईल, ही अवाजवी अपेक्षा कधीच ठेवली नाही. त्यातही काहीतरी चांगलं होईल म्हणून "अमृत' योजनेकडून अपेक्षा होती. अडथळ्यांची शर्यत पार करून हे काम सुरू झालं खरं, मात्र त्याचा त्रास इतका असह्य झाला की विकासाच्या या "अमृता'साठी विषाची परीक्षा नको, अशी जळगावकरांची मानसिकता झाली असेल, तर त्यात गैर काय? 
 
गेल्या दोन-चार दशके विकासापासून वंचित राहिलेल्या जळगावकरांना पालिकेच्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळी विकासाची स्वप्ने दाखविण्यात आली. या स्वप्नांची पूर्तता जळगावकरांमधील आताच्या तरुण वा वृद्ध पिढीच्या जन्मात होईल का? असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. कारण, अनेक वर्षांपासून जळगावची जी अवस्था होती, तीच आजही कायम आहे. उलटपक्षी, त्यापेक्षा कठीण झालीय, असे म्हटले तरी वावगे ठरु नये. 
2014 ला केंद्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर काहीतरी चांगलं होईल, असा समज झाला होता. केंद्राच्या "स्मार्ट सिटी' योजनेच्या निकषांत जळगाव कुठेच बसणार नव्हतं. शेवटी "अमृत' योजनेत जळगावचा समावेश झाला आणि विविध विकासकामांसाठी अडीचशे कोटींचा निधी जळगावसाठी मंजूर झाला. यात अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे उभारण्याससह जलकुंभ तसेच भुयारी गटार योजना, उद्याने विकास आदी कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात जलवाहिन्या व भुयारी गटारांची कामे करण्याचे निश्‍चित झाले. त्यानुसार जलवाहिन्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली, ती दुर्दैवाने कोर्टकचेरीत अडकली. वर्ष-दीड वर्षाचा कालावधी त्यात निघून गेल्यानंतर अखेरीस निविदा मंजूर झाली व कार्यादेश दिले गेले. आता या कामाचे कार्यादेश देऊन वर्ष उलटले, तरी हे काम पूर्ण तर दूरच परंतु, पन्नास टक्केही झालेले नाही, अशी स्थिती आहे. 
"अमृत'मधील जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाल्याशिवाय प्रमुख मार्गांवरील भुयारी गटारांचे काम हाती घेता येणार नाही, आणि या कामांच्या पूर्ततेशिवाय रस्त्यांची कामे होणार नाही, हे ठरलेले... "अमृत'अंतर्गत जलवाहिन्यांसाठी कॉलन्या-वस्त्यांमधील रस्ते, गल्ली-बोळा खोदून ठेवल्या आहेत. जलवाहिनी टाकल्यानंतर हे खड्डे योग्य पद्धतीने बुजलेलेही नाहीत. या खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात तर होत आहेतच, शिवाय शहरातील मुख्य रस्त्यांची कामेही हाती घेता येत नसल्याने त्या रस्त्यांवरील खड्डे वाहनचालकांची हाडे मोडत आहेत. आता जून-जुलैत पाऊस सुरू झाल्यानंतर जळगावकरांच्या अंगणात या खड्ड्यांमुळे होणारा चिखल मावणार नाही, अशी अवस्था होईल. बरं, "अमृत'च्या जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले तर जळगावकरांना चोवीस तास पाणी मिळणार का, किमान दररोज, दिवसाआड तरी मिळेल का, याबद्दल कुणी बोलत नाही. बस्स.. काम सुरू आहे, एवढंच..! 
ऑगस्टमध्ये महापालिका निवडणुकीच्या वेळी वर्षभरात जळगावचा कायापालट करणार, असा शब्द गिरीश महाजनांनी दिला. त्याला प्रतिसाद देत जळगावकरांनी महापालिका महाजनांच्या भाजपकडे सोपवली. आठ महिने झालेत, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिताही शिथिल झाली.. आता वर्ष व्हायला किंवा विधानसभेची आचारसंहिता लागायला तीन-चार महिने उरलेत.. या चार महिन्यांत जळगावचा कायापालट कसा होणार? हे महाजनांनाच ठाऊक. तूर्तास "अमृत'च्या जलवाहिन्यांचे काम पूर्ण करून गल्लीबोळातील रस्ते ठीकठाक करून दिले, तरी अल्पसंतुष्ट जळगावकर आभार मानतील. पण, तेही होणार नसेल तर या "अमृता'साठी विषाची परीक्षा नको, अशी आर्त हाक देण्याशिवाय पर्याय उरणार नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

SCROLL FOR NEXT