residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

"सकाळ' वर्धापनदिनास वाजपेयींची उपस्थिती, नाशिककरांना आठवणीने हुंदका अनावर 

सकाळवृत्तसेवा

नाशिक, ता. 16 ः भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी ऋणानुबंध राहिले. याच ऋणानुबंधाने नाशिककरांच्या मनात घर केले. निवडणुकांच्या सभांप्रमाणेच त्यांनी शिक्षण संस्था आणि "सकाळ'च्या 17 मार्च 1991 ला उत्तर महाराष्ट्र आवृत्तीच्या दुसऱ्या वर्धापनदिन सोहळ्यात नाशिककरांशी संवाद साधला.

गुरुवारी (ता. 16) सायंकाळी श्री. वाजपेयी यांच्या निधनाची माहिती येऊन थडकताच, त्यांचा सहवास लाभलेल्या कार्यकर्त्यांना आठवणीने हुंदका अनावर झाला. 
"सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीबरोबर नाशिककरांमध्ये वाचनसंस्कृती वृद्धिंगत केलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सव सोहळ्यासाठी श्री. वाजपेयी उपस्थित होते.

 वाजपेयी यांना स्वतःच्या फियाट गाडीतून मुंबईहून आणणे आणि पुन्हा मुंबईला पोचविण्याची जबाबदारी सुहास शुक्‍ल यांच्यावर होती. सुहास शुक्‍ल यांचे वडील महादेव गणेश शुक्‍ल यांच्याशी श्री. वाजपेयी यांचा स्नेह होता. पुढे दादासाहेब वडनगरे यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्यासाठी सुहास शुक्‍ल यांनी वाजपेयी यांना औरंगाबादहून नाशिकला आणले, नाशिकचा सोहळा झाल्यावर मालेगावमधील प्रल्हाद शर्मा यांच्या निवासस्थानी स्वतःच्या गाडीतून नेले. मालेगावमधून मनमाड रेल्वेस्थानकावर सोडले.

सुहास शुक्‍ल म्हणाले, की राजकारणातील कविमनाचे श्री. वाजपेयी खूपच साधे होते. वडिलांची तब्येत ठीक नसताना ते तीन वेळा भेटायला आले. त्यांना भोजनात गोड पदार्थ खूप आवडायचे. आमच्या घरी भोजन करत असताना गरम गुलाब जाम येताच, त्यांनी चमच्याने मोठ्या कौतुकाने पहिला घास मला भरवला. मनमाड रेल्वेस्थानकावर उतरल्यावर त्यांनी स्वतःच सूटकेस उचलली. 

विमानतळावर बाकावरच विश्रांती 
राजाभाऊ मोगल म्हणाले, की जनसंघाचा मी पूर्णवेळ कार्यकर्ता होतो. पहिल्यांदा परदेश दौऱ्यावरून परत आल्यावर त्यांना विमानतळावरून आणण्याची जबाबदारी जनसंघाचे कार्यालयीन मंत्री भाऊराव अत्रे आणि माझ्यावर होती. त्यांना आणण्यासाठी टॅक्‍सी घेऊन आम्ही दोघे जात असताना काहीसा उशीर झाला. मग त्यांनी पूर्ण मुंबईतील विमानतळावर शोधले. ते सापडले नाहीत. अखेरीस एका बाकावर विश्रांती घेत असलेले श्री. वाजपेयी आम्हाला दिसले. आम्हाला उशीर झाला म्हणून ते अजिबात रागावले नाहीत. पार्लेमध्ये एका कार्यकर्त्याच्या निवासस्थानी स्नान करून ते दिल्लीला विमानाने रवाना झाले. तसेच पूर्ण बहुमत मिळाल्यावर त्यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला मी उपस्थित होतो. मुंबईच्या चर्चगेट रेल्वेस्थानकासमोरील इंडियन चेंबरच्या कार्यक्रमातून गर्दीतून ते एकटेच बाहेर पडले आणि बोरिवलीला कार्यकर्त्याच्या घरी रेल्वेने थेट पोचले. 

"साठा सो साठा' 
हायस्कूल मैदानावर 1983 मध्ये दादासाहेब वडनगरे यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या सोहळ्याचे आमदार हेमंत टकले सूत्रसंचालन करत होते. या सोहळ्यात श्री. वाजपेयी यांनी मराठीत "साठी बुद्धी नाठी', असे म्हटले जात असले, तरीही हिंदीत "साठा सो साठा' असे वर्णन करत दादासाहेबांच्या कार्याचा गौरव केला, असे सांगून भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी म्हणाले, की लोकसभा निवडणुकीनंतर सभेसाठी नाशिकला श्री. वाजपेयी आलेले असताना त्यांनी गर्दी पाहून शाब्दिक कोटी केली. इतक्‍या लोकांनी मते दिली असती तर आम्ही पराभूत झालो नसतो. आताची गर्दी पडल्यानंतर किती लागले हे पाहायला आली आहे, असे त्यांनी सांगताच, उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

वाजपेयी सरकारची आर्थिक शिस्त 
वाजपेयी सरकारच्या आर्थिक शिस्तीची आठवण अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी सांगितली. ते म्हणाले, की मोठ्या शहरांना महामार्गांनी जोडून अर्थव्यवस्थेला चालना दिली. पंतप्रधान ग्रामसडक योजना राबवत ग्रामीण आणि शेतीच्या अर्थव्यवस्थेला मदत केली. वित्तीय शिस्तीच्या एफआरबीएम कायद्याने सरकारने वित्तीय तुटीची कमाल मर्यादा घालून घेतली. महसुली तूट शून्यापर्यंत आणणे सरकारला कायद्याने बंधनकारक केले. सरकारच्या कर्जावर मर्यादा आल्या. दूरसंचार कंपन्यांना महसूल वाटा करार करून परवानगी देण्याचे धोरण स्वीकारले. सरकारचा महसूल वाढला. भारतीय दूरसंचार निगमची स्थापना करून धोरणनिश्‍चिती आणि अंमलबजावणी स्वतंत्र केली. शिक्षण, कौशल्य विकासासाठी सर्वशिक्षा अभियान सुरू करत शिक्षणातील 60 टक्के गळती कमी केली. 
 

संस्मरणीय उपस्थिती 
0 सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात परराष्ट्रमंत्री असताना उपस्थिती. 
0 नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या हीरकमहोत्सवी सोहळ्याचे 12 मे 1979 ला प्रमुख पाहुणे. 
(दादासाहेब पोतनीस सर्वसाधारण सभेचे, डॉ. वि. श्री. पुराणिक व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष, रा. गो. कुंटे सचिव, आबा शिंगणे सहसचिव) 
(शिक्षकांचे कार्य मंत्र्यांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण असल्याचे श्री. वाजपेयी यांनी अधोरेखित केले होते.) 
0 भोसला मिलिटरी स्कूलच्या 15 सप्टेंबर 1997 ला वार्षिक सोहळ्यासाठीचे अतिथी. 
0 लोकसभेचे भाजपचे उमेदवार पोपटराव हिरे यांच्या प्रचारासाठी भरदुपारी सभा. 
0 सार्वजनिक वाचनालयाचा 17 मार्च 1991 ला शतकोत्तर सुवर्णमहोत्सव सोहळा. 
(सरकारने ग्रंथालयांसाठी मुक्तहस्ते निधी द्यायला हवा, अशी अपेक्षा अभिप्रायात नोंदवली.) 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT