NSK26H35087
नंदुरबार : स्वामिनारायण मंदिरात आयोजित अन्नकूट महोत्सवात मांडलेले विविध पदार्थ.
---
नंदुरबारातील स्वामिनारायण मंदिरात
भक्तिभावाने अन्नकूट महोत्सव उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १५ : येथील बी.ए.पी.एस. स्वामिनारायण मंदिरात रविवारी (ता. १५) अन्नकूट महोत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात झाला. भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. सनातन हिंदू धर्माच्या उत्सव परंपरेतील दिवाळीला आपल्या इष्टदेवप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अन्न-धान्याचा पहिला नैवेद्य म्हणून अन्नकूट महोत्सव आयोजित करून अर्पण केला जातो. या कार्यक्रमासाठी ज्ञानचिंतन स्वामी आणि पवित्रमूर्ती स्वामी या संतांची प्रमुख उपस्थिती होती. श्रद्धा, समर्पण आणि भक्तीद्वारे भगवंताला व सत्पुरुषाला कशाप्रकारे प्रसन्न करावे, याबाबत त्यांचे भाविकांना दिव्य मार्गदर्शन लाभले.
या महोत्सवात भगवंताला अर्पण करण्यात आलेला अन्नकूट भाविकांचे आकर्षण ठरले. हरिभक्तांनी अत्यंत भक्तिभावाने हे विविध नैवेद्याचे पदार्थ आपल्या घरून स्वतः तयार करून आणले होते. हे पदार्थ भगवंताला नैवेद्यासाठी अर्पण करण्यात आले. या वेळी देवाला सुमारे २५० विविध पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. सकाळी भाविकांसाठी अन्नकूट दर्शन आयोजित करण्यात आले.
दर्शनानंतर दुपारी उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. अन्नकूट महोत्सवात २५१ प्रकारचे व्यंजन नैवेद्य दाखविण्यात आले. त्यात विविध प्रकारचे फरसाण, मिठाई व अन्य पदार्थ होते. त्यानंतर ५६ भोग लावण्यात आले. त्यात कांदा व लसूणविरहित पदार्थ लावण्यात आले. या वेळी महाआरती करण्यात आली. तत्पूर्वी धुळे येथून आलेल्या स्वामींचे प्रवचन झाले.