नामपूर (जि.नाशिक) : साल्हेर मुल्हेर येथील ऐतिहासिक किल्ले, चिंचली घाट परिसरात फेसाळणारे धबधबे.......हजारो फूट खोल दर्या.......अंगाला झोंबणारा थंडगार वारा......... धुक्याच्या दाट गर्दीतून रस्ता शोधणारी वाहने ......हिरवा शालू परिधान केलेले गडकिल्ले व सह्याद्रीच्या रांगा......अशा निसर्गरम्य वातावरणामुळे बागलाण तालुक्याच्या आदिवासी भागातील हिरव्यागार पश्चिम पट्ट्याने पर्यटकांना मोहिनी घातली आहे. त्यामुळे 'वन डे टूर' साठी साल्हेर मुल्हेर परिसर उत्तम पर्याय ठरत आहे.
बागलाण तालुक्याच्या पश्चिमेकडील गुजरात सीमेवरील साल्हेर-मुल्हेर येथील ऐतिहासिक शिवकालीन किल्ले इतिहासाचे साक्षीदार आहेत. शिवाजी महाराजांच्या सर्व आठवणी येथील किल्ल्यांनी जतन करून ठेवल्या आहेत. यंदा आदिवासी भागातील परिसरात असल्यामुळे हा परिसर पर्यटकांना खुणावतो आहे. साल्हेर, मुल्हेर येथील किल्ल्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा अशी अपेक्षा आदिवासी भागातील नागरिक, पर्यटक, इतिहासप्रेमी यांनी व्यक्त केली आहे.
अनेक लहानमोठे धबधबे
साल्हेर मुल्हेर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे निसर्गाने जमीन सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. यंदाच्या दमदार पावसामुळे गेल्या महिन्यापासून हरणबारी धरण ओसंडल्याने मोसम नदीसह सर्व लहान मोठे नाले खळाळून वाहत आहेत. हरणबारीच्या घाटापासून थेट साल्हेर चिंचलीपर्यंत अनेक लहानमोठे धबधबे पाहायला मिळतात. साल्हेर किल्ल्याच्या व चिंचली घाट परिसरात हजारो फूट उंचीवरून कोसळणारे आकर्षक धबधबे आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगांवर, साल्हेर मुल्हेर किल्ल्यावर डोळ्यांचे पारणे फेडणारी विविध रंगांची आकर्षण फुले पाहायला मिळतात.
पावसामुळे सारा परिसर हिरवागार झाल्यामुळे हिरवळ दाटे चोहीकडे चित्र पाहायला मिळत आहे. आदिवासींचा प्रमुख पीक असलेल्या भात व नागलीच्या हिरवेगार शेत यामुळे नैसर्गिक सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांना धुक्यांनी आपल्या कुशीत घेतल्यामुळे परिसराला भेट दिल्यावर महाबळेश्वरची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ऐतिहासिक पाऊलखुणा जपणारी साल्हेर-मुल्हेर ही गावे आजही विकासापासून वंचित आहेत. आदिवासींच्या सर्वांगिण विकासासाठी किल्ल्याचा पर्यटन स्थळ म्हणून विकास होणे काळाची गरज आहे.
आदिवासी भागातील प्रेक्षणीय स्थळे
* साल्हेर, मुल्हेर येथील ऐतिहासिक शिवकालीन किल्ले
* हरणबारी येथील निसर्गरम्य धरण
* मांगीतुंगी येथील वृषभदेव यांची १०५ फुटांची सर्वात उंच पाषाण मूर्ती, जैन मंदिर, मांगी आणि तुंगी डोंगरावरील पाण्याच्या टाका व उंच शिखर
* मुल्हेर येथील उद्धव महाराज मंदीर
* हरणबारी गावाजवळ उंच डोंगरात विराजमान झालेली कपार भवानी माता.
* अंतापूर येथील शंकर महाराज मंदीर, दावल मलिक बाबा यांची समाधी, कमलनयन महाराज यांची समाधी
* अलियाबाद येथील हेमाडपंथी शिवमंदिर
* गुजरात सीमेवरील प्रचंड हिरवळीने नटलेला चिंचली घाट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.