सातपूरमध्ये छटपूजेच्या तयारीला वेग
बाजारपेठांमध्ये पूजेच्या साहित्याची खरेदी
सातपूर, ता. १३ : उत्तर भारतीय बांधवांचा महत्त्वाचा मानला जाणारा छटपूजा महोत्सव सुरू होत असून, सातपूर परिसरात या उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. छटपूजेनिमित्त परिसरातील उत्तर भारतीय नागरिकांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
श्रमिकनगर, शिवाजीनगर, सोमेश्वर कॉलनी, खांदवेनगर स्वारबाबानगर व इतर भागात उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत या भागांत छटपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सातपूरमधील उत्तर भारतीय छटपूजेची तयारी काही दिवस आधीपासूनच सुरू झाली असून पूजेसाठी लागणारे बांबूचे सुप, टोपल्या, फळे, ऊस, नारळ, ठेकुआ तसेच अन्य पूजासाहित्याची खरेदी केली जात आहे. बाजारपेठांमध्येही पूजा साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून आली. छटपूजेच्या दिवशी भाविक नदी, तलाव किंवा कृत्रिम जलकुंडाच्या ठिकाणी एकत्र येऊन सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन व्रताची सांगता केली जाते. सातपूर परिसरात उत्तर भारतीय बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास असल्याने छटपूजा या सणाच्या निमित्ताने विविध भागांतील नागरिक एकत्र येतात. त्यामुळे धार्मिक वातावरणाबरोबरच सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडते.
--कोट
सातपूर परिसरातील सर्व घाटांची स्वच्छता करण्यात आली आहे. भाविकांना पूजाविधी करताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी घाट परिसरात स्वच्छता, प्रकाश व्यवस्था तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी मनपा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
- सुनील राजभोज, मनपा विभागीय अधिकारी
---कोट
छटपूजा हा उत्तर भारतीय बांधवांचा अत्यंत श्रद्धेचा आणि महत्त्वाचा सण आहे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने विविध घाटांची स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी तसेच आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- राकेश दुबे, सल्लागार,
उत्तर भारतीय हिंदी प्रसारणी सभा