Runner Dilip Gavit and coach Vaijnath Kale
Runner Dilip Gavit and coach Vaijnath Kale esakal
नाशिक

Nashik News: गुरू शिष्याची अनोखी यशोगाथा...! गुरूने शिष्यासाठी विकली सोन्‍यासारखी जमीन

अरुण मलाणी

Nashik News : सध्याच्‍या काळात जमिनीला सोन्‍यापेक्षा अधिक मोल आले असताना शिष्याच्‍या प्रशिक्षणासाठी क्षणाचा विचार न करता गुरूने प्रसंगी सोन्‍यासारखी जमीन विकली. संकटांना तोंड देत, आव्‍हानांचा सामना करीत प्रशिक्षणात खंड पडू दिला नाही. अखेर शिष्यानेही पॅरा आशियाई स्‍पर्धेत सुवर्णपदक जिंकत गुरूचे ऋण फेडले.

ही यशोगाथा आहे, तोरण डोंगरी (ता. सुरगाणा) ते चीनपर्यंतचा खडतर प्रवास यशस्‍वी केलेल्‍या प्रशिक्षक वैजनाथ काळे आणि दिव्‍यांग धावपटू दिलीप गावित या गुरू-शिष्यांची. शनिवारी (ता. २८) दिलीपने ४०० मीटर गटातून ‘सुवर्ण’ कामगिरी केली. (coach sold land for student training nashik news)

दिलीपचा खडतर प्रवास तोरण डोंगरी या छोट्याशा डोंगराळ भागातील पाड्यापासून सुरू झाला. वयाच्या पाचव्‍या वर्षी अपघातात त्याचा हात मोडला. ग्रामीण भागात मर्यादित वैद्यकीय सुविधांमुळे त्याला उजवा हात कायमचा गमवावा लागला. तिथूनच त्याचे एकहाती जगणे सुरू झाले. सामान्‍य स्वच्छंदी जीवन अन्‌ दिव्यांगत्व आल्‍यानंतरच्‍या जीवनात खूप तफावत होती. आता दिलीपला शिक्षणापासून इतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

अर्थात, कुटुंबीयांना त्याच्‍या भविष्याची चिंता भेडसावत होती. आधी नैराश्‍याने ग्रासलेला दिलीप कालांतराने मित्रांबरोबर दरी, डोंगर, तळ्यात खेकडे, मासे व इतर शिकारींसाठी जायला लागला. शेळ्या-मेंढ्यांच्या मागे धावताना मित्रांबरोबर व्‍यसनाच्‍या आहारी जाऊ लागला. पण, त्‍याच्‍या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलणारा दिवस उजाडला अन्‌ दिलीपनेही नंतर कधी मागे वळून पाहिले नाही.

अन्‌ प्रशिक्षक काळे यांनी दिलीपला घेतले दत्तक

शहीद भगतसिंग माध्यमिक विद्यालय, अलंगुण (ता. सुरगाणा) येथे विरंगुळा म्हणून वर्गशिक्षकांनी दिलीपचे नाव धावण्याच्या स्‍पर्धेसाठी दिले. स्पर्धेला पंच म्हणून अॅथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे उपस्थित होते. दिव्‍यांग दिलीपला खेळताना, बागडताना पाहून दृढ विचाराने काळे यांनी शाळेतील शिक्षकांशी त्याच्याबद्दल चर्चा केली.

त्‍याच्या घरच्यांची भेट घेताना, सर्व हाल अपेष्टा व हलाखीची आर्थिक परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर काळे यांनी वडिलांसमोर दिलीपला दत्तक घेण्याचा प्रस्ताव ठेवला. प्रारंभी शंका, भीतीच्‍या छायेत असलेले दिलीप व त्‍याचे कुटुंबीय या निर्णयामुळे काही मिनिटांनी सुखावले.

शासन दरबारी मदत मिळाली नाही, अन्‌ विकावी लागली जमीन...

२०१६ मध्ये दिलीप १४ वर्षांचा असताना काळे यांनी नाशिकला स्वतःच्या घरी आणले. निवास, पालन-पोषण, शालेय शिक्षण, प्रशिक्षणाच्या व इतर संपूर्ण खर्चाची जबाबदारी त्‍यांनी उचलली. काळे हे स्‍वतः राष्ट्रीय खेळाडू पंच असून, आयएएएफ लेव्‍हल-३ पात्रताधारक प्रशिक्षक आहेत. त्यामुळे त्‍यांच्‍या तंत्रशुद्ध प्रशिक्षणाचा फायदा दिलीपला होत गेला. आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविताना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते.

यासाठी गुरू-शिष्याने आदिवासी विकास विभागाचे दरवाजे ठोठावले; पण बाबूशाहीकडून प्रतिसाद न मिळाल्‍याने सरकारी कार्यालयांचे हेलपाटे त्‍यांच्‍या पदरात पडले. हेलपाटे मारून थकल्यावर वैजनाथ काळे यांनी मनाशी निर्धार करताना काळजावर दगड ठेवत जमीन विकण्याचा निर्णय घेतला.

सामान्‍य खेळाडूंना दिलीप देतोय करडी टक्‍कर

दिव्‍यांग असूनही दिलीपने आजवर सर्वसामान्य खेळाडूंबरोबर व पॅरा खेळाडूंबरोबर विविध स्‍पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे. राज्यस्‍तरीय स्पर्धेत २० आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ११ सुवर्णपदकांसह महाराष्ट्राच्‍या नावलौकिकात त्‍याने भर घातलीय. दिलीप सध्या पेठ येथील दादासाहेब बीडकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बी.ए. द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत असून, वैजनाथ काळे यांच्या व्हीडीके स्पोर्टस फाउंडेशनमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

"लहानपणीच दिलीपमधील गुणकौशल्‍ये हेरताना त्‍याला प्रशिक्षण उपलब्‍ध करून दिले. पॅरा आशियाई स्‍पर्धेतील पदक जिंकल्‍यावर आता २०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या पॅरा ऑलिम्‍पिक स्‍पर्धेत भारताला पदक जिंकून देण्याचे आमचे एकमेव ध्येय असणार आहे." - वैजनाथ काळे, दिलीपचे प्रशिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT