धुळे ः टुडे १ साठी
---
वृद्ध लोककलावंतांच्या
मानधनाचा प्रश्न एरणीवर
तीन वर्षांपासून निवड समिती नाही
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ ः लोककलेचा वारसा जिवंत ठेवणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांवर प्रशासकीय अनास्थेमुळे मानधनासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. शेजारील जळगाव जिल्ह्यात २०० वृद्ध कलावंतांचे मानधन प्रस्ताव मंजूर झाले असताना, धुळे जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून निवड समितीच गठित करण्यात आलेली नाही. परिणामी, सुमारे १५०० कलावंतांचे प्रस्ताव ऑनलाइन प्रक्रियेत अडकून पडले आहेत, अशी माहिती खानदेश तमाशा परिषदेचे अध्यक्ष शेषराव गोपाळ यांनी दिली.
ते म्हणाले, की धुळे जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून वृद्ध कलावंत निवड समिती नाही. जिल्ह्यातील हजार ते पंधराशे कलावंतांचे मानधन प्रस्ताव ऑनलाइन प्रक्रियेत रखडले. मानधनाअभावी ज्येष्ठ कलाकार कर्जबाजारी असून अनेकांचे औषधोपचाराविना हाल होत आहेत. याप्रश्नी पालकमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी श्री. गोपाळ यांनी केली आहे. आयुष्यभर समाजप्रबोधन करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना वृद्धापकाळात आर्थिक विवंचनेत जगावे लागत आहे. काही कलावंतांचा तर मानधनाच्या प्रतीक्षेत मृत्यूही झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. शेजारील जळगाव जिल्ह्यात २०० वृद्ध कलावंतांचे मानधन मंजुरीचे प्रस्ताव निवड समितीने मंजूर करून सांस्कृतिक विभागाकडे पाठवले आहेत. मात्र, धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, साक्री, शिरपूर, धुळे शहर व ग्रामीण भागातील असंख्य कलाकार अद्यापही मानधनापासून वंचित आहेत. दरमहा पाच हजार रुपये मानधनानुसार एका कलावंताचे तीन वर्षांत सुमारे एक लाख ८० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आता धुळे जिल्ह्यातील कलावंतांना कधी न्याय मिळणार, असा प्रश्न श्री. गोपाळ यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.