फोटो - 16054
मालेगाव कॅम्प : मालेगाव पूर्व भागात उभारण्यात आलेले उच्च क्षमतेचे हायमास्ट.
---
पश्चिम भाग अंधारात; हायमास्टची मागणी
अपुऱ्या प्रकाशामुळे नागरिकांमध्ये नाराजी, पूर्व भागात ५०० मीटरवर हायमास्ट
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव कॅम्प, ता. ७ : मालेगाव महापालिका प्रशासनाचा दुटप्पी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहराच्या पूर्व भागात बसस्थानक ते दरेगाव दरम्यानच्या रस्त्यावर अवघ्या ५०० मीटर अंतरावर उच्च क्षमतेचे हायमास्ट लावले जात असून, मालेगाव मध्य परिसरातही अनेक ठिकाणी हायमास्ट उभारले आहेत. मात्र मालेगावच्या पश्चिम भागावर मनपा प्रशासनाकडून अन्याय केला जात असून, मुख्य रस्त्यांना उच्च क्षमतेच्या पथदीपांपासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिक व सामाजिक संघटनांकडून केला जात आहे.
पूर्व भागाप्रमाणेच पश्चिम भागातील मुख्य रस्त्यांवर उच्च क्षमतेच्या हायमास्ट दिव्यांची नितांत गरज आहे. तोकडे पथदीप उभारले असून, प्रकाश कमी पडतो. तसेच काही भागात पथदीप बंद पडले आहेत. विशेषतः सटाणा नाका, सोयगाव प्रवेशद्वार, बच्छाव सर्कल ते चर्चगेटदरम्यान किमान सात ते आठ हायमास्टसाठी पोल उभारणे गरजेचे असून, याशिवाय कॉलेज स्टॉप ते रावळगाव नाका आणि विविध कॉलनी-वसाहतींच्या मुख्य रस्त्यांवर रात्रीच्या वेळी लख्ख प्रकाशव्यवस्था असणे काळाची गरज बनली आहे.
सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शहरात चोरी, घरफोडी व दरोड्याच्या घटना व अंधारामुळे गुन्हेगारी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरात जर उच्च क्षमतेची हायमास्ट व्यवस्था केली, तर गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल, असे मत विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केले. मनपा प्रशासनास घरपट्टी, पाणीपट्टी करवसुली सर्वधिक पश्चिम भागातूनच होते. नियमित कर भरणा करूनही मूलभूत सुविधांपासून या भागाला वंचित ठेवल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
पश्चिम भागातील नगरसेवक आशाबाई अहिरे, विरोधी पक्षनेते नीलेश काकडे, प्राची पवार, प्रमोद बच्छाव यांनी या समस्येबाबत महापालिका महासभेत व प्रशासनाकडे अनेकदा आवाज उठवला व मागणी केली आहे. मात्र, मनपा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे या मागणीला आजवर यश मिळू शकले नाही. पूर्व व पश्चिम, असा दुजाभाव न करता संपूर्ण शहरात समान आणि उच्च दर्जाची प्रकाशव्यवस्था उभारणे गरजेचे आहे.
---
कोट
शहरातील अपुऱ्या व कमी क्षमतेच्या पथदीपांमुळे रात्रीच्या वेळी रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य असते. दुष्काळी परिस्थितीत चोरी आणि दरोड्यांसारख्या गुन्हेगारी घटना वाढत असताना मनपा प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे. पूर्व आणि पश्चिम असा भेदभाव न करता संपूर्ण शहरातील मुख्य रस्त्यांवर उच्च क्षमतेचे हायमास्ट बसवणे गरजेचे आहे.
- सचिन देशमुख
सामाजिक कार्यकर्ते, सोयगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.