मालेगाव ः महासभेत शाळा दुरुस्तीचा विषय मांडताना शिवसेनेचे गटनेते नीलेश आहेर.
-----------
वाहन विभागातील गैरव्यवहाराची चौकशी
मालेगाव महासभेत समितीची घोषणा ः आयुक्त जाधवांच्या नावाने रस्त्याचा विषय अखेर मागे
------
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १३ ः महानगरपालिकेच्या मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे अनुदानाचा प्रस्ताव सादर करणे यासह वाहन विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती गठित करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता.१३) महासभेने घेतला. प्रस्तावित कर्करोग रुग्णालयासाठी जागा, जनावरांसाठी शेड, सायने व दरेगाव येथे गणेशकुंड उभारणी आदींसह नागरी सुविधांबाबतचे विषय मंजूर करण्यात आले.
माजी आयुक्त रवींद्र जाधव यांच्या नावाने रस्त्याचे नामकरण करण्याचा प्रस्ताव महासभेने एकमताने मागे घेतला. महापौर नसरीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली एका विषयावर चर्चा करण्यासाठी महासभा बोलाविण्यात आली होती. माजी नगरसेवक समिउल्ला अन्सारी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत सभा दहा मिनिटे तहकूब करण्यात आली. सभेत मागील तहकूब महासभेचे विषय चर्चेत आले.
शहरातील महापालिका शाळांची अवस्था बिकट असल्याने पहिल्या टप्प्यात आठ शाळा नव्याने बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यासाठी शासनाकडून अनुदान मिळविण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करण्यावर चर्चा झाली. शिवसेनेचे गटनेते नीलेश आहेर यांनी शहरातील सर्व महापालिका शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार करावेत. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शाळांच्या दुरुस्तीचा खर्च शासनामार्फत करण्याबाबत सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार आसिफ शेख यांनीही यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती अस्लम अन्सारी यांनी दिली. नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी यांनी कोणार्क, मालेगाव पॉवर सप्लाय कंपनी व महापालिकेचे खाते असलेल्या बँकांनीही या कामांसाठी योगदान द्यावे अशी मागणी केली.
महापालिकेच्या वाहन विभागातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा नगरसेवक अस्लम अन्सारी यांनी उपस्थित केला. नगरसेवक दिनेश ठाकरे यांनी वाहनावर दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च होत असल्याकडे लक्ष वेधले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशीसाठी समिती नेमण्याची मागणी केली . सोयगाव अग्निशमन केंद्रात वाहनचालक उपलब्ध नसल्याची तक्रारही नगरसेवकांनी केली.
शहरातील स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन सर्वेक्षण क्रमांक १०९ मधील महापालिकेच्या जागेवर जनावरे बांधण्यासाठी शेड उभारून ती जागा बीफ युनियनला देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. शिवसेनेने या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर हा विषय मंजूर करण्यात आला. भाजपचे गटनेते मदन गायकवाड यांनी जिवाजी महाला यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. दरेगाव व सायने येथेही गणेशकुंड उभारण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक प्रवीण दरेकर यांनी केली. माजी आयुक्त रवींद्र जाधव यांच्या नावाने रस्त्याचे नामकरण करण्याचा प्रस्ताव मागे घेण्यात आला. उपमहापौर शाने हिंद निहाल अहमद, उपायुक्त सुनीता कुमावत, नगरसचिव साजिद अन्सारी आदींसह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.
-----------------
२०-२ चौकट
महासभेत झालेले ठळक निर्णय
किल्ला पोलिस ठाण्याला शिवाजी टाऊन हॉलजवळील खोल्या देण्यास मंजुरी देण्यात आली. ख्वाजा गरीब नवाज पुलाखाली टॅक्सी स्टँड, रिक्षा थांबा व वाहतूक पोलीस चौकीसाठी जागा निश्चित करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. दरेगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची जीर्ण इमारत पाडून त्या ठिकाणी तीन मजली शाळा उभारण्यासाठी संबंधित शासकीय विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यासही मंजुरी देण्यात आली. पोलिस परेड ग्राउंड, तालुका क्रीडा संकुल, ६० फुटी रस्ता आणि शहरातील अन्य ठिकाणचे पथदीपांचे विद्युत पोल महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत चर्चा झाली. शहरातील काही रस्त्यांवरील पोल स्थलांतरित करण्याची निलेश आहेर यांची सूचना मंजूर करण्यात आली. महापालिकेच्या मालमत्ता विभागासाठी स्वतंत्र अधीक्षक किंवा मालमत्ता व्यवस्थापक नेमणे, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे आणि आवश्यक कर्मचारी, कार्यालय व संगणक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.