Sports
Sports esakal
नाशिक

Nashik Sports : क्रीडाविश्वात नाशिकच्या खेळाडूंचा डंका!

सकाळ वृत्तसेवा

"नाशिकला लाभलेली निसर्गसंपदा आणि आरोग्यदायी वातावरणामुळे खेळाडूंसाठी निर्माण झालेल्या पोषक वातावरणाचा नाशिकच्या खेळाडूंनी योग्य वापर करून घेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. यात अर्जुन पुरस्कारविजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, विदित गुजराथी, दत्तू भोकनळ, अंजना ठमके यांसारख्या नामांकित खेळाडूंनी नाशिकचे नाव अटकेपार पोचवले. अशा अनेक खेळाडूंना ज्यांनी घडविले असे ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक व संघटक (कै.) भीष्मराज बाम यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर नाशिकच्या १२ क्रीडा संघटक, पाच मार्गदर्शक, तसेच क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध खेळाच्या ५० खेळाडूंचा महाराष्ट्र शासनाने आजवर शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. क्रीडाविश्वाला समृद्ध करणाऱ्या या खेळाडूंमुळेच नाशिकची ओळख आता क्रीडा नगरी म्हणूनही होत आहे."

- नरेंद्र छाजेड, शिवछत्रपती पुरस्कारविजेते, अध्यक्ष, नाशिक जिमखाना, नाशिक

(Nashik players in sports world sakal anniversery special article news)

नाशिकचा आपण ६० ते ६५ वर्षांपूर्वीचा काळ आठवला तर खेळाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. खेळाची आवड असली तरीही फारशा सुविधा नसल्यामुळे नागरिकांचा खेळाकडे पाहाण्याचा दृष्टिकोन दुय्यम होता. तरीही नाशिकच्या खेळाडूंनी राष्ट्रीयस्तरावर आपले कौशल्य सिद्ध करून आपापल्या परीने नाशिकच्या लौकिकात भर घालण्याचा प्रयत्न केला.

या काळात नाशिकचा भौगोलिक विस्तार कमी असल्याने खेळांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही बोटावर मोजण्याइतक्याच होत्या. एखादा खेळाडू चांगली कामगिरी करीत असला तरी त्याला फारशी प्रसिद्धी मिळत नव्हती व सरकारी पातळीवरदेखील फारशी दखल घेतली जात नव्हती.

आज ज्या प्रमाणात खेळाडूंना सरकारकडून सुविधा मिळतात तेवढ्या त्या काळात मिळत नव्हत्या. गुणवत्ता असूनही केवळ अर्थसहाय्य नसल्याने अनेक खेळाडू त्या काळात मागे पडत होते. ठराविक व्यायामशाळा आणि हायस्कूल ग्राउंड खेळासाठी उपलब्ध होते.

अशा परिस्थितीतही नाशिकच्या बापू नाडकर्णी यांनी क्रिकेटच्या इतिहासात नाशिकचे नाव अजरामर केले. बापू नाडकर्णीप्रमाणेच जिभाऊ जाधव यांनीही क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटविला. त्याच काळात बापू नाडकर्णी यांचे बंधू छोटू नाडकर्णी यांनी टेबल टेनिस खेळात उत्कृष्ट कामगिरी करीत नाशिकच्या लौकिकात भर टाकली.

(कै.) कृष्णाजी बळवंत महाबळ गुरुजींनी त्या काळात यशवंत व्यायामशाळेच्या माध्यमातून खेळाला एक वेगळाच आयाम दिला. त्याकाळात टेबल टेनिसमध्ये (कै.) बाबा सौंदाणकार, राजा वर्टी, नंदू दामले, संजय मोडक बास्केट बॉलमध्ये सुधीर माने, अविनाश खांडेकर, स्वरांगी सहस्रबुद्धे, शुभांगी पंडित, उज्ज्वला गोठी, क्रिकेटमध्ये विंग कमांडर बाळ दाणी, राजेंद्र लेले, अन्वर शेख, रमेश वैद्य, सलिल अंकोला, बॅडमिंटनमध्ये विष्णू पाटील, राजा वर्टी अशा अनेक खेळाडूंनी फारशा सुविधा नसताना खेळात नैपुण्य दाखविले.

त्यानंतरच्या काळात व्हॉलीबॉलमध्ये सुषमा प्रधान, वैशाली फडतरे, श्यामा सारंग, तसेच राजेश गायकवाड, कबड्डीमध्ये भक्ती कुलकर्णी, अनुराधा डोणगावकर व माधुरी कुलकर्णी, बॅडमिंटनमधे ऋचा फाल्गुने, शिखा गौतम यांनी आपला एक वेगळा दबदबा या खेळात निर्माण केला होता.

नाशिकचा भौगोलिक विस्तार वाढत गेला आणि त्याबरोबरच नवीन खेळांची मैदाने, क्रीडासंकुले, व्यायामशाळा अस्तित्वात आल्या. कालानुरूप खेळाकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलत गेला आणि पालकांनीच आपल्या पाल्यांना अभ्यासाबरोबर खेळासाठी प्रोत्साहन देण्यामुळे नवोदित खेळाडूंचा खेळातील सहभाग वाढत गेला.

तसेच अद्ययावत खेळांच्या सुविधा निर्माण होत गेल्या. आज नाशिक शहरात सर्व प्रकारच्या खेळांच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. खेळाडूंना अद्ययावत क्रीडांगणे, चांगले खेळाचे साहित्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, खेळाडूंना आवश्यक असलेले संतुलित आहाराचे मार्गदर्शन, शारीरिक व मानसिक मार्गदर्शन या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

विविध क्रीडा संघटनांच्या वतीने जिल्हा, राज्य, तसेच राष्ट्रीय स्पर्धांचे व प्रशिक्षणवर्गाचे नियमितपणे आयोजन केले जाते. त्यासाठी क्रीडा संघटना आणि क्रीडा कार्यकर्ते, शासनाचे क्रीडा खाते, विविध संस्था कठोर परिश्रम घेत असतात.

खेळाडूंच्या जडणघडणीमध्ये संघटनेचे पदाधिकारी, प्रशिक्षक, प्रसिद्धी माध्यमे आणि पालकांचाही मोलाचा वाटा आहे. त्याच्याच जोडीला केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळत आहे.

अलौकिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येते. तसेच क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर खेळाडूंना आता चांगल्या नोकऱ्याही मिळू लागल्या आहेत. खेलो इंडिया आणि टॅलेंट हंट यांसारख्या स्पर्धांचे सरकारकडून आयोजन करण्यात येत आहे. त्यातून चांगल्या खेळाडूंची निवड करून २०२८ ऑलिंपिकसाठी त्यांच्याकडून तयारी करून घेण्यात येत आहे.

या वर्षी झालेल्या खेलो इंडिया, विद्यापीठ आणि टॅलेंट हंट स्पर्धेसाठी नाशिकच्या सुमारे ५० पेक्षा जास्त खेळाडूंची विविध खेळांच्या राज्य संघात निवड झाली. यातील पदकविजेत्या खेळाडूंना शासनाच्या वतीने गौरविण्यात आले होते. ऑलिंपिकसाठी तयारी करण्याकरिता फार मोठा खर्च अपेक्षित आहे. शासन, संघटना व पालक यांना मर्यादा आहेत.

अशाप्रसंगी औद्योगिक घराण्यांनी खेळाडूंचा आर्थिक भार उचलला पाहिजे. नाशिकच्या खेळाडूंमध्ये ऑलिंपिकपर्यंत जाण्याची क्षमता आहे. परंतु त्यांना सर्व प्रकारची मदत मिळाली तर येणाऱ्या काळात नाशिकचे खेळाडू ऑलिंपिकपर्यंत नक्कीच मजल मारतील.

आज नाशिकचे खेळाडू टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, मैदानी खेळ, खो-खो, बॅडमिंटन, सायकलिंग, स्वीमिंग, तलवारबाजी, नौकानयन, कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल, क्रिकेट, शूटिंग, पॅरा ॲथलेटिक्स, रोइंग, फुटबॉल, मलखांब, जिम्नॅस्टिक यांसारख्या अनेक खेळांत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून आपले नैपुण्य सिद्ध करीत आहेत.

आज अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करीत असून, पदक प्राप्त करीत आहेत. अर्जुन पुरस्कारविजेते कविता राऊत (मैदानी खेळ) आणि दत्तू भोकनळ (रोइंग) या नाशिकच्या खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये सहभाग घेऊन नाशिकचा लौकिक वाढविला आहे.

नाशिकचे ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक व संघटक (कै.) भीष्मराज बाम यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर नाशिकच्या बारा क्रीडा संघटक, पाच मार्गदर्शक, तसेच क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध खेळाच्या ५० खेळाडूंचा महाराष्ट्र शासनाने आजवर शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर, तसेच आंतरविद्यापीठ स्पर्धेत बुद्धिबळमध्ये विदित गुजराथी, मैदानी खेळात मोनिका आथरे, संजीवनी जाधव, दुर्गा देवरे, किसन तडवी, ताई बामणे, तसेच पूनम सोनुने, वैष्णवी सावंत, अमन कुमार, अतुल चौधरी, अक्षय चव्हाण, सेजल सिंग, गगन सिंग, सुमीत राठी, श्रावणी सांगळे या नाशिकच्या खेळाडूंनी आपले नैपुण्य सिद्ध केले आहे.

वेटलिफ्टिंगमध्ये प्राजक्ता खालकर, मुकुंद आहेर आणि निकिता काळे, तसेच पूजा वैष्णव, विनाताई आहेर, आकांक्षा व्यवहारे, साईराज परदेशी, टेबल टेनिसमध्ये तनिशा कोटेचा, सायली वाणी, कुशल चोपडा, रोइंगमधे संतोष कडाळे, मृण्मयी साळगावकर, नीलेश धोंडगे, कॅनोयिंग व कयाकिंगमध्ये सुलतान देशमुख, सागर नागरे, अनुष्का आंबेकर, तलवारबाजीमध्ये अजिंक्य दुधारे, क्रिकेटमध्ये सत्यजित बच्छाव, यासर शेख, मुर्तजा ट्रंकवाला, तसेच युवा क्रिकेटपटू नील चंद्रात्रे, साहिल पारख, शर्वीन किसवे, प्रतीक तिवारी, तन्मय शिरोडे, पवन सानप, मुलींमध्ये किशोरी सावकार, माया सोनवणे, साक्षी कानडी, रसिका शिंदे, खो-खोमध्ये चंदू चावरे, दिलीप तडवी, रोहिणी भवर, वृषाली भोये, कौसल्या पवार, गौरव बेंडकोळी, जलतरणात सायली पोहरे, बॅडमिंटनमध्ये स्मित तोष्णीवाल, प्रज्वल सोनवणे, बुद्धिबळमध्ये धनश्री राठी, शूटिंगमधे अंजली भागवत, अमृता पाटील, अनन्या बात्रा, सुहानी भोसले असे नाशिकचे अनेक खेळाडू आहेत. येणाऱ्या काळात या खेळाडूंकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविण्याची अपेक्षा करण्यास काही हरकत नाही. नाशिककरांकडून एवढीच अपेक्षा, की त्यांनी खेळाडूंच्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तुमच्या कौतुकाच्या परीस स्पर्शाने खेळाडूंचे नीतिधैर्य नक्कीच उंचावेल, कौशल्यांची नवनवी उंची गाठण्याची जिद्द, उत्साह आणि मेहनत घेण्याची त्यांची इच्छा दुणावेल. अशाप्रकारे खेळ आणि खेळाडूंची दखल घेण्याची वृत्ती केवळ क्रीडा क्षेत्रासाठीच हितकारक नाही. एकूण समाज स्वास्थ्यासाठीही पूरक आहे आणि देशहिताचीही आहे. येणाऱ्या काळात नाशिक ही क्रीडा नगरी म्हणून ओळखली जाईल, यात कुठलीही शंका मला नाही. भविष्यात ‘नाशिकचे खेळाडू महान’ हे म्हणण्याचा योग नाशिककरांना नक्की येईल.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

मॅरेथॉन स्पर्धा, सायकलिंगचा करिश्‍मा

नाशिकला आता मॅरेथॉन शहर म्हणून ओळखले जाते. विविध संघटनांमार्फत आयोजित या स्पर्धांमध्ये नाशिकचे नागरिक फार मोठ्या संख्येने सहभागी होतात. सायकलिंगमध्ये नाशिकच्या डॉ. महेंद्र महाजन व हितेंद्र महाजन या बंधूंनी अल्ट्रा सायकलिस्ट (रॅम फिनिशर), तसेच साहसी एवरेस्ट वीर म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

त्याची गीनिज बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांच्या साहसी उच्चांकाची नोंद घेतली आहे. तसेच आयर्नमॅन नावाने ओळखल्या जाणाऱ्या जागतिक स्पर्धेत सायकलिंग, स्वीमिंग व चालणे या तीन गोष्टींचा समावेश असतो.

अशा अत्यंत अवघड स्पर्धेतही नाशिकच्या अनेक स्पर्धकांनी सहभागी होऊन ‘आयर्नमॅन’ नावाचा किताब पटकविला. त्यामधे अम्मार मियाजी, महेंद्र छोरिया, प्रशांत डबरी, अरुण गचाले, वैभव पाटील, अरुण पालवे, किशोर घुमरे, सुभाष पवार यांचा समावेश आहे.

‘सेंच्युरी’ पार केलेल्या क्रीडा संस्था

ब्रिटिशकाळातील ‘किंग एडवर्ड क्लब’ म्हणजे आत्ताचा ‘नाशिक जिमखाना’, ‘किंग जॉर्ज कोरोनेशन क्लब’ म्हणजे आत्ताचा ‘मित्रविहार क्लब’, तसेच यशवंत व्यायामशाळा या शंभरी पार केलेल्या काही संस्था कार्यरत होत्या.

त्यामध्ये किंग एडवर्ड क्लबची स्थापना ११ नोव्हेंबर १९११ मध्ये झाली. ती ब्रिटिशकालीन अधिकाऱ्यांना खेळण्यासाठी. त्या काळात ब्रिटिश अधिकारी आपल्या खेळण्याचे शोक पूर्ण करण्यासाठी या क्लबवर येतात. हाच तो क्लब जो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘नाशिक जिमखाना’ नावाने ओळखला जाऊ लागला.

ब्रिटिशांच्या काळात टेबल टेनिस, बिलियर्ड्स, कार्ड गेम, तसेच क्रिकेट हे खेळ खेळले जात असे. सध्या संस्थेत टेबल टेनिस, बॅडमिंटन, बास्केट बॉल, बुद्धिबळ, बिलियर्ड व स्नूकर, क्रिकेट, रायफल शूटिंग या खेळांच्या सोई उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाचा टेबल टेनिस हॉल, बॅडमिंटन हॉल, बिलियर्ड्स स्नूकर हॉल संस्थेने तयार केली आहेत.

दुसरी शंभरी पार केलेली संस्था म्हणजे किंग जॉर्ज कोरोनेशन क्लब म्हणजेच आजचा मित्रविहार क्लब. या संस्थेची स्थापना १२ डिसेंबर १९१२ मध्ये झाली. या ठिकाणी येथे ब्रिज व रमी हेच खेळ खेळले जात होते. ब्रिज व रमी या खेळापुरता मर्यादित असलेला या क्लबमधे आता ज्यूदो, व्हॉलीबॉल, ब्रिज या खेळाच्या नवीन सुविधा उपलब्ध आहेत.

श्री यशवंत व्यायामशाळेची स्थापना १ मार्च १९१७ मध्ये (कै.) कृष्णाजी बळवंत महाबळ ऊर्फ महाबळ गुरुजी, श्री त्रिंबक गोविंद देशपांडे व श्री रंगनाथ कृष्ण यार्दी यांनी गोदावरी काठी देव मामलेदार यशवंतराव महाराज संस्थानाच्या जागेत केली.

त्यावरूनच या संस्थेस यशवंत हे नाव देण्यात आले. सध्या व्यायामशाळेत मलखांब, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, ज्यूदो, जिम्नॅस्टिक, योगा, लेडीज जिम, टेबल टेनिस, बॅडमिंटन व २०० मीटर चालण्याचा ट्रेक या सुविधा उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT