अँकर
---
आंबोडे परिसरातील श्रद्धास्थान : श्री सिद्धिविनायक मंदिर
---
धुळे शहरापासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आंबोडे गावाच्या उत्तरेस आणि नवलनगरच्या दक्षिणेला राज्य मार्गालगत हिरव्यागार शेतशिवारात श्री सिद्धिविनायक गणपतीचे श्रद्धास्थान मंदिर आहे. पुरातन काळातील जुन्या विहिरीशी जोडलेली आख्यायिका, जमिनीच्या पातळीखाली असलेले मंदिर आणि उजव्या सोंडेची गणेशमूर्ती ही या देवस्थानाची वैशिष्ट्ये आहेत.
- पी. एन. पाटील, नवलनगर
---
प्रत्येक प्राचीन देवस्थानामागे एखादी आख्यायिका, लोकस्मृती किंवा श्रद्धेची कहाणी दडलेली असते. आंबोडे येथील सिद्धिविनायक मंदिराची कथाही अशाच श्रद्धापरंपरेशी जोडलेली आहे. स्थानिकांकडून सांगितल्या जाणाऱ्या आख्यायिकेनुसार, एका शेतकऱ्याच्या स्वप्नात श्री गणेशाने दर्शन देऊन आपण येथील विहिरीत असल्याचा दृष्टांत दिला. आपल्याला विहिरीतून बाहेर काढून त्या ठिकाणी मंदिर उभारावे. या दृष्टांतानंतर गणेशमूर्ती विहिरीतून बाहेर काढण्यात आली आणि तिची स्थापना करून पूजाअर्चा सुरू झाली, अशी श्रद्धा आहे. कालांतराने या ठिकाणी गणेशभक्तांची वर्दळ वाढली. प्रारंभी पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या या देवस्थानाचा पुढे भक्तांच्या सहकार्याने विकास झाला. आज येथे पक्के मंदिर उभे असून, मंदिराच्या परिसरात भाविकांच्या सोयीसाठी काही सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
प्राचीन विहिरीचे वैशिष्ट्य
सिद्धिविनायक मंदिराचे सर्वांत वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्याची रचना. मंदिराचा गाभारा जमिनीच्या पातळीपेक्षा खाली असून, त्याच्या लगतच खोल विहीर आहे. या विहिरीची खोली सुमारे ९५ फूट असल्याचे सांगितले जाते. विहिरीलगतचे मंदिर साधारण १५ फूट रस्ता सपाटीकरणापासून खाली असल्याने पायऱ्या केल्या आहेत. विहीर लागून असल्याने बंदिस्त दरवाजा केला आहे. पावसाळ्यात विहिरीतील पाण्याची पातळी वाढल्यास मंदिराच्या खालच्या भागातही पाणी येते. त्यामुळे पाण्याचा निचरा, विहिरीची सुरक्षितता आणि मंदिराच्या बांधकामाचे संरक्षण यांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक ठरते.
उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक
मंदिराच्या गाभाऱ्यात संगमरवरी मखरात चौथऱ्यावर श्री गणेशाची मूर्ती विराजमान आहे. पश्चिममुखी आणि उजव्या सोंडेची ही गणेशमूर्ती भाविकांचे विशेष आकर्षण ठरते. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोर सुंदर मूषकाची मूर्ती आहे. परिसरात होमकुंड आणि दक्षिणेकडे शिवपिंडही आहे. या विविध श्रद्धास्थानांमुळे मंदिर परिसराला धार्मिकदृष्ट्या वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक भाविक या गणेशस्थानाला ‘वनदेव स्वयंभू’ असेही संबोधतात.
भाविकांच्या मनातील श्रद्धास्थान
‘सिद्धिविनायक नवसाला पावतो,’ अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणरायाला नारळ अर्पण केला जातो. गणेश जयंती, गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. संकष्ट चतुर्थीसह इतर दिवशी देखील भाविकांची गर्दी असते. नवस फेडण्यासाठी येणारे भाविक, कुटुंबासह दर्शनाला येणारे भक्त आणि धुळे शहरासह परिसरातील गावांमधून पायी येणारे गणेशभक्त यांच्यामुळे मंदिरात वर्षभर वर्दळ असते.
जैन परिवाराकडून देखभाल
तीन पिढ्यांपासून जैन परिवार या देवस्थानाची देखभाल व पूजेअर्चेची जबाबदारी सांभाळत आहे. योगेश जैन आणि त्यांचा परिवार मंदिराच्या धार्मिक परंपरा जपण्याचे कार्य करीत आहेत. स्थानिक ग्रामस्थांचे, पदाधिकाऱ्यांचे व परिसरातील भाविकांचे ग्रामपंचायतच्या सहकार्याने हळूहळू बराच बदल मंदिर परिसरात होत आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या योजनेंतर्गत येथे एक सभागृह, भक्तनिवास उभारण्यात आले. निसर्गसौंदर्य आणि धार्मिक महत्त्व यांची सांगड घालणाऱ्या अशा स्थळांना पर्यटनाच्या नकाशावर स्थान मिळाल्यास ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळू शकते.
मंदिरापर्यंत कसे पोहोचाल?
आंबोडे येथील श्री सिद्धिविनायक मंदिर हे धुळे शहरापासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर आहे. धुळे-अमळनेर मार्गावरून नवलनगर येथून आंबोडे गावाकडे जाताना एक किलोमीटरवर मंदिर आहे. नागपूर महामार्गावर अजंग गावाकडून आंबोडे गावाकडे येता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.