नाशिक : कोरोना संसर्गाच्या कालावधीत डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता विद्यार्थ्यांना हा पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ऑफलाइन पर्यायात विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध केली जातील तर याचा फायदा म्हणजे शुल्कातही सवलत दिली जाणार आहे.
पुस्तकांच्या छपाईच्या खर्चात बचत होणार
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे सद्यःस्थितीत विविध पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र अशा विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना त्या त्या अभ्यासक्रमाची पुस्तके पोच केली जातात. परंतु कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत डिजिटल माध्यमांचा वाढलेला वापर लक्षात घेता, मुक्त विद्यापीठानेही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना ई- कंटेंटचा पर्याय निवडण्याची संधी असेल. पुस्तकांच्या छपाईच्या खर्चात बचत होणार असल्याने, याचा लाभ थेट विद्यार्थ्यांच्या शुल्कात दिला जाणार आहे. त्यामुळे कमी शुल्कात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होताना, अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता येणार आहे.
डिजिटल माध्यमातून अभ्यास सामग्री उपलब्ध
विद्यापीठाचा पुस्तक छपाईचा वार्षिक खर्च वीस कोटींवर सद्यःस्थितीत विद्यापीठाकडून पुस्तक छपाईसाठीची प्रक्रिया राबविली जाते. यात कच्चा माल खरेदी, छपाई असा सर्व मिळून वर्षाला वीस कोटी रुपये खर्च येतो. विद्यार्थ्यांना अभ्यास सामग्री उपलब्ध करून देताना त्याचे शुल्कदेखील आकारले जाते. ई-कंटेंटमुळे विद्यापीठाच्या या खर्चात कपात होणार असून, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. ई-कंटेंटमध्ये विद्यार्थ्यांना पीडीएफ व अन्य डिजिटल माध्यमातून अभ्यास सामग्री उपलब्ध होईल.
मुक्त विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची स्थिती
पदवी अभ्यासक्रम पीजी, पदविका व प्रमाणपत्र
सुमारे चार लाख विद्यार्थी सुमारे तीन लाख विद्यार्थी
छापील पुस्तकांना पर्याय म्हणून ई- कंटेंट उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्याचे विचाराधीन आहे. यामुळे विद्यापीठाच्या खर्चात होणाऱ्या बचतीतून विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत दिली जाईल. यामुळे अधिकाधिक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येतील. - प्रा. ई. वायुनंदन, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.