मुक्त विद्यापीठात २९ ला ‘रोजगार महाकुंभ’
वीस कंपन्यांमधील एक हजार ७० जागांवर संधी उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १९ : सुशिक्षित बेरोजगार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारतर्फे २९ सप्टेंबरला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय जागतिक-रोजगार महाकुंभ’ आयोजित केला आहे. याअंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील उपक्रमात २० कंपन्यांमधील एक हजार ७० जागांवर उमेदवारांना संधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांनी नोंदणी करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि युवाशक्ती फाउंडेशन (नाशिक) यांच्यातर्फे २९ सप्टेंबरला सकाळी नऊ ते दुपारी चारदरम्यान विद्यापीठ मुख्यालयातील कृषी विज्ञान केंद्र येथे मेळावा होईल. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र–कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनाखाली मेळावा होतो आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त विजय रिसे उपस्थित राहतील.
मेळाव्यासाठी १८ ते ३५ वर्ष वयोगटांतील सर्व शाखेतील पदवीधर, आयटीआय (सर्व ट्रेड्स), पदविका, अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल), सीएनसी ऑपरेटर आणि सीपेट शिक्षण पूर्ण केलेले, तसेच दहावी, बारावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी मोफत अर्ज करू शकतात. नाशिक, जळगाव, सातपूर, अंबड, सिन्नर, गोंदे, इगतपुरी, वाडा (पालघर) व खोपोली येथे विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. लिंकद्वारे ऑनलाइन फॉर्म भरून किंवा क्यूआर कोडद्वारे मोफत ऑनलाइन नोंदणी करता येईल. नोंदणीकृत उमेदवारांना सात दिवसांचे पूर्व-नियुक्ती प्रशिक्षण दिले जाईल. यात मुलाखतीची कौशल्ये, संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि नोकरीसाठी आवश्यक तयारीचा समावेश असेल. या कंपन्या उद्योग, उत्पादन, सेवा आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांतील रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड करतील. नोंदणीकृत उमेदवारांनी २९ ला सकाळी आठला उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. संजीवनी महाले, कुलसचिव प्रा, सुरेंद्र पाटोळे, विभागीय संचालक डॉ. एस. आर. निकम, ग्रामीण विकास व उद्योजकता विद्या शाखा संचालक प्रा. कैलास मोरे, युवाशक्ती फाउंडेशनचे गिरीश लाड, सागर पवार, सचिन अहिरे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.